भारतीय रेल्वेचं मुंबईतलं संग्रहालय

आपण राज्यात कुठेही राहत असलो आणि मुंबईमध्ये जायची वेळ आली तर “सीएसएमटी” म्हणजेच “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” हे मध्यवर्ती ठिकाण. येधून रेल्वेचे वेगवेगळ्या दिशेला जाण्याचे पर्यायही उपलब्ध असतात.

अनेकदा या स्टेशनवर येऊनही येथे माहितीचा भव्य खजिना आहे, याची माहितीच अनेकांना नसते. वर्षानुवर्षे “सीएसएमटी”ला उतरून आपापल्या कार्यालयात जाणार्‍या लाखो मुंबईकरांनाही रेल्वेचा संपूर्ण ‘प्रवास’ इथेच बघता येईल, अनुभवता येईल याबद्दल अनभिज्ञता असते.

रेल्वेने एका सुंदर संग्रहालयाच्या रूपाने रेल्वेचा हा प्रवास जतन करून आपल्यासमोर उलगडलाय. प्रत्येकाने भेट द्यायलाच हवी, असे हे म्युझियम आहे मुंबईतल्या “सीएसएमटी” स्थानकातच.

१६ एप्रिल १८५३ रोजी भारतात इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीची आगगाडी प्रथमच धावली. अवघ्या भारतासाठी तेव्हा हा एक आश्चर्याचा भाग होता. बोरीबंदर स्टेशनातून सुरू झालेला हा रेल्वेचा अभूतपूर्व प्रवास आज मुंबईतील जनसामान्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य भाग झालेला आहे. भारतीय रेल्वेचा हाच १६८ वर्षांचा इतिहास पर्यटकांना सीएसएमटी हेरीटेज गॅलेरीमध्ये पाहायला मिळतो.
.
२९ जानेवारी २०१० साली ही हेरीटेज गॅलेरी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. तेव्हापासून मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनमध्ये
असलेल्या या मोठ्या दालनाला रोज शेकडो पर्यटक भेट देतात. जेम्स वॅटने तयार केलेल्या वाफेवरच्या पहिल्या इंजिनापासून ते भारतात पहिली आगगाडी धावण्यांसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा चित्ररूपी प्रवास पर्यटकांना सीएसएमटी हेरीटेज गॅलेरीमध्ये पाहायला मिळतो.

याचबरोबर भारतातील १८५३ ला भारतात रेल्वे सुरू झाल्यापासून रेल्वेने घेतलेली वेगवेगळी वळणं पर्यटकांसमोर रेल्वेचा इतिहास
उलगडतील. यासाठी येथे क्रमवार तब्बल ३९ पॅनल्स पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. भारतात पहिल्यांना धावलेल्या वाफेवरच्या इंजिनापासून ते थेट सध्याच्या मुंबईकरांची “लाइफलाइन” असलेल्या लोकल ट्रेनपर्यंतचे सर्व प्रकारच्या ट्रेनचे वर्किंग
मॉडेल येथे आपल्याला पाहायला मिळतील.

रेल्वेच्या इतिहासातील आणखी एक मोठा टप्पा म्हणजे माथेरानला जाणारी मिनी ट्रेन. पायथ्याच्या नेरळ गावाहून पर्यटकांना माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन जाणारी ही मिनी ट्रेन आजही त्याच उत्साहात धावते आहे. या माथेरानच्या मिनी ट्रेनच्या इतिहासावरही एक दालन या गॅलेरीमध्ये आहे.

याच सोबत भारतात रेल्वे सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंतच्या विविध सिग्नल यंत्रणांचाही इतिहास पाहण्यासारखा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*