इस्रायल

इस्रायल, अधिकृतरीत्या इस्रायल संघराज्य, (हिब्रू: יִשְׂרָאֵל; अरबी: إِسْرَائِيلُ) हा पश्चिम आशियातील भूमध्य सागराच्या किनाऱ्याला लागून आग्नेयेस वसलेला एक देश आहे. जेरुसलेम ही इस्रायलची घोषित राजधानी आहे (जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी असण्यावरून वाद चालू आहे. त्यामुळे बऱ्याच राष्ट्रांनी आपले दूतावास तेल अवीव्हमध्ये ठेवले आहेत).

इस्रायलमध्ये संसदीय लोकशाही असून ते जगातले एकमेव ज्यू राष्ट्र आहे. परंतु इस्रायलमध्ये इतर धर्माचे आणि इतर पंथाचे लोकही आहेत (पहा इस्रायली लोक).अमेरिकेने इस्राएलची राजधानी जेरुसलेम यास राजधानी म्हणून मान्यता दिली आहे.

इस्रायल ह्या नावाचा उगम हिब्रू बायबलमध्ये आढळून येतो. जेकबचे एका विचित्र शक्तीबरोबर मल्लयुद्ध झाल्यावर त्याला इस्रायल हे नाव मिळाले. त्याच्या पितृछायेखाली वाढलेल्या लोकांना “इस्रायलची मुले” अथवा “इस्रायली” असे नाव पडले. सध्याच्या आधुनिक इस्रायलच्या लोकांना मराठीत “इस्रायली” असे संबोधतात.

जेनेसिस ३२:२८ च्या भाषांतरात “इस्रायल” ह्या शब्दाचा उल्लेख बायबलमध्ये पुढीलप्रमाणे आला आहे (इंग्रजी भाषांतर): “And-he-is-saying not Jacob he-shall-be-said further name-of-you but rather Israel (इस्रायल) that you-are-upright with Elohim and with mortals and-you-are-prevailing.” थोडक्यात ישראל चे शब्दशः भाषांतर “देवाला सन्मुख” असे आहे (ישר-אל; इश्र-अल).

इतिहास
इस्रायल ह्या शब्दाचा लिखित वापर प्रथम इजिप्तच्या स्टेलने (Merneptah Stele) कनानवरील लष्करी स्वाऱ्यांचे वर्णन टिपताना केला. जरी स्टेलने ह्याचा वापर लोकांच्या समूहासाठी (राष्ट्राच्या संकल्पनेचा त्यात अभाव होता) इ..पू. १२११ साली केला, तरी ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ही ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी पवित्र भूमी व वचन भूमी आहे. इस्रायलची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्चाची आहे. कारण तिथे ज्यू लोकांची अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत. त्यांमध्ये ज्यूंचा राजा सोलोमनच्या पहिल्या व दुसऱ्या मंदिराचे अवशेष आहेत. ह्या दोन मंदिरांशी संलग्न असलेल्या ज्यूंच्या अनेक महत्त्वाच्या चालीरिती आहेत. त्या आधुनिक ज्यू धर्माचा पाया समजल्या जातात. इ. स. पूर्व ११ व्या शतकापासून ज्यू राज्यांच्या समूहाने इस्रायलच्या [[इस्रायलच्या भूमीवर राज्य केले. ते राज्य साधारण एका सहस्त्रकाहून अधिक काळ टिकले.

नंतर असीरियन, बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक, रोमन, बॅझंटाईन आणि काही काळापुरते सॅसेनियन राज्यांच्या प्रभावामुळे व समूहांनी विस्थापित झाल्यामुळे त्या विभागातील ज्यूंचा प्रभाव कमीकमी होत गेला. विशेषकरून इ.स. १३२साली रोमन साम्राज्याविरुद्ध केलेल्या बार खोबाच्या बंडाला आलेल्या अपयशामुळे मोठ्या प्रमाणावर ज्यूंची हाकालपट्टी झाली. ह्याच काळात रोमन लोकांनी ह्या भूभागाला सीरिया पॅलेस्टिना असे नाव देऊन ह्या भूमीशी ज्यूंचे असलेले नाते तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. मिस्नाह आणि जेरुसलेम तालमूद हे दोन ज्युडाइझमचे सर्वांत महत्त्वाचे धर्मग्रंथ ह्याच काळात ह्या भूमीवर लिहिले गेले. त्यानंतर मुसलमानांनी हा प्रांत बॅझंटाईन साम्राज्याकडून ६३८ साली जिंकून घेतला. त्यानंतर (क्रुसेडरांच्या स्वाऱ्यांचा काळ सोडल्यास) १५१७ पर्यंत ह्या भागावर विविध मुसलमान राज्यांचे अधिपत्य होते. १५१७ साली हा प्रांत ओटोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*