गोंदिया जिल्हा

राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन भारतातील कालिदासाइतकेच श्रेष्ठ साहित्यिक व प्रतिभावान नाटककार भवभूति यांची ही जन्मभूमी. गोंदिया हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. व जिल्ह्याचा बराचसा भाग वनांनी व्यापलेला आहे. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे. गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. नेहरू चौकाजवळील कॉर्नरवर दर रविवारी होणार्‍या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. गोंदिया शहर हे ‘तांदूळाचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. गोंदिया तांदूळ उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य (नवेगाव राष्ट्रीय उद्यान) व नागझिरा अभयारण्य यांसह गोंदिया पर्यटनातही प्रगती करत आहे.