अहमदनगर जिल्हा

जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे. या आध्यात्मिक वैशिष्ट्यांसह आज अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला, आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हा अशी वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. ‘राळेगण सिद्धी’ द्वारे जिल्ह्याने जलव्यवस्थापनाचा एक आदर्श निर्माण केला, तर ‘हिवरे बाजार’ हे आदर्श खेडे म्हणून नावारूपास आले. ज्वारी हे नगर जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते दोन्ही हंगामात घेतले जाते. कृषी व शैक्षणिकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राहुरी येथे स्थापन झालेले, महाराष्ट्रातील पहिले (१९६८) कृषी विद्यापीठ होय.