वर्धा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

बोर अभयारण्य – हिंगणी येथील ६१.१० चौ. कि .मी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य अनेक वन्य जीवांचे आश्रयस्थान आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ झपाट्याने विकसित होत आहे. या अभयारण्यात असलेले वाघ, रानगवे, नीलगाई, चितळ, सांबर, मोर, चिंकारा, अस्वल आदी वन्यजीव आपले लक्ष वेधून घेतात. ह्या अभारण्यापासून वर्धा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन असून ५ कि.मी. अंतरावरील हिंगणीपर्यंत रस्त्याने जाता येते. एप्रिल व मे हे दोन महिने अभयारण्यास भेट देण्यास ऊचित असतात.

मगन संग्रहालय – वर्धा जिल्ह्यात १९३८ मध्ये मगन संग्रहालय स्थापन करण्यात आले. खादी व इतर ग्रामोद्योगातील विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री व या वस्तू तयार करण्याची पद्धती हे इथले मुख्य आकर्षण.

गीताई मंदिर – हे विश्वशांती स्तूपाजवळीत गोपुरी येथे गीताई मंदिर आहे. देशातील अशा प्रकारचे हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर असूनही या देवळात देवीची मूर्ती किंवा देवळाला छतही नाही. ग्रॅनाईट दगडाच्या केवळ भिंतीच या मंदिरास असून त्यांवर गीताई मधील १८ अध्याय कोरले आहेत. ‘गीताई’ म्हणजे थोर सर्वोदयी नेते आचार्य विनोबा भावे यांनी मराठीत केलेला श्रीमदभगवतगीतेचा सुलभ अनुवाद आहे.

विश्वशांती स्तूप – हा शुभ्र पांढरा स्तूप गीताई मंदिराशेजारीच उभारला आहे. महात्मा गांधीचे स्नेही फुजी गुरुजी यांचे ते स्वप्न होते.

परमधाम आश्रम – आचार्य विनोबा भावे यांनी हा आश्रम १९३८ साली धाम नदीच्या काठावर अध्यात्मिक हेतूने बांधला . त्यांनी येथूनच आपल्या भूदान यात्रेला प्रारंभ केला तसेच ब्रह्मविद्या मंदिर ही येथे स्थापन केले आहे.

याचबरोबर केळझर येथील वरद विनायकाचे मंदिर, वर्धा शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर, हिंगणघाट तालुक्यातील जैन मंदिर व मल्हारी मार्तंड मंदिर ही जिल्ह्यातील ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. सेवाग्राम व परमधाम ही तर आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटनस्थळे आहेतच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*