मुंबई जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मुंबादेवी – याच देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई असे नाव पडले. या देवीचे मंदिर मुंबईमधील क्रॉफर्ड मार्केट येथे महात्मा फुले मंडईत आहे.

श्री बाबुलनाथ मंदिर – मलबार हिल येथील १७८० मध्ये बांधण्यात आलेले श्री बाबुलनाथ मंदिर तेथील शंकराच्या पिंडीसाठी प्रसिद्ध आहे.

इस्कॉन मंदिर – जुहू येथील संगमरवरी इस्कॉन मंदिर लोकप्रिय आहे.

महालक्ष्मी मंदिर – महालक्ष्मी येथील श्री महालक्ष्मीच्या मंदिरात भाविकांची सतत वर्दळ असते.

हाजीअली दर्गा – मुस्लिम धर्मीयांचे जागृत देवस्थान म्हणून गणले जाणारा हाजीअलीचा दर्गा महालक्ष्मीपासून जवळच बांधण्यात आला आहे. मुस्लीम संत हाजी अली यांच्या नावाचा हा दर्गा आहे. हे ठिकाणही हाजी अली म्हणूनच ओळखले जाते. हा दर्गा वरळी भागाच्या मध्यभागी वसला आहे. फक्त ओहोटीच्या वेळीच या दर्ग्यात जाता येते.

माऊंट मेरी चर्च – इ. स. १५६८-७० या दरम्यान बांधलेले माऊंट मेरीचे वांद्रे येथील चर्च सर्व धर्मांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

सिध्दीविनायक मंदिर – १८०१ मध्ये बांधण्यात आलेले श्री सिद्धीविनायकाचे मंदिर (प्रभादेवी) जागृत देवस्थान म्हणून प्रचलित आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे, हे हिचे एक वैशिष्ट्य मानण्यात येते. हे मंदिर अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.

चैत्यभूमी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दि.६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांचे अंत्यसंस्कार दादरच्या चौपाटीवर करण्यात आले व त्याच जागी एक भव्य चैत्यगृह बांधले गेले. आधुनिक बौद्ध स्थापत्य कलेचा तो एक उत्तम नमुना मानला जातो. आज तो परिसर चैत्यभूमी म्हणून ओळखला जातो.

गेट वे ऑफ इंडिया – भारताचे हे प्रवेशद्वार १९११ मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आले. हे बांधकाम सोळाव्या शतकातील गुजराती व इस्लामिक शैलीचे आहे असे मानले जाते. याच्या मागील बाजूस जुन्या व नवीन ताजमहाल हॉटेलची इमारत आहे. या ठिकाणाचे परदेशी पर्यटकांनाही आकर्षण आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस – हे रेल्वे स्थानक ब्रिटिशांनी १८८८ मध्ये बांधले. याची रचना फेडरिक विल्यम्स स्टीव्हन्स या वास्तुशास्त्रकाराने केली. याचे बांधकाम पूर्ण होण्यास दहा वर्षे लागली. ही जगातील उत्तम वास्तुंपैकी एक मानली जाते. मुंबईमध्ये येण्यासाठी तसेच बाहेर जाण्यासाठी; उपनगरीय तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांकरिता हे फार महत्त्वाचे स्थानक आहे. हे भारतातील सर्वांत व्यस्त स्थानकांपैकी एक असून येथे मध्य रेल्वेचे मुख्यालयही आहे.

हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) – संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या आंदोलकांचे स्मारक येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे या परिसराला हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. ग्रीक देवी फ्लोरा हिच्या नावावरून या परिसराला फ्लोरा फाउंटन असे नाव पडले होते.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम – हे म्युझियम व्हिक्टोरियन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना मानले जाते. जॉर्ज विटेट याला या म्युझियमच्या रचनेचे श्रेय दिले जाते. याचे बांधकाम १९२३ साली पूर्ण झाले. विविध चित्रे, शिल्पे यांचा उत्तम संग्रह येथे आहे.

मरीन ड्राईव्ह – रस्त्यावरील दिव्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हा परिसर ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणून ओळखला जातो. येथील चौपाटी, अर्ध वर्तुळाकार सागरी किनारा व किनार्‍यालगतचा रस्ता पर्यटकांचे आकर्षण आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – १०४ चौ.कि.मी.वर पसरलेले हे उद्यान बोरिवली येथील कृष्णगिरीच्या परिसरात आहे. कृष्णगिरी उपवनाच्या टेकडीवर महात्मा गांधी स्मृती मंदिर आहे. पूर्वी हे उद्यान बोरिवली राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जायचे. या उद्यानात घनदाट जंगलात वाहते झरे, बागडणारे पशू-पक्षी पाहण्यास मिळतात. या उद्यानातून सफर घडवणारी छोटी आगगाडीही पर्यटकांना आकर्षित करते .

कान्हेरी लेणी – कान्हेरी डोंगरांतील गुंफांमध्ये प्राचीन काळातील कोरीव लेणी आहेत. एकशेबारा गुंफांमध्ये खोदलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाच्या ध्यान, चितन यांसारख्या अवस्थांमधील अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. या गुंफा व लेणी बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातच आहेत.

याशिवाय मुंबईतील राणी जिजाबाई उद्यान, हँगिंग गार्डन, तारापोरवाला मत्स्यालय, नेहरू तारांगण, मणी भवन, मलबार टेकडी, जुहू किनारा, कमला नेहरू उद्यान, छोटा काश्मीर उद्यान, जहांगीर कला दालन, अफगाण चर्च, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) इ. ठिकाणेही प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*