मुंबई जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

मुंबईच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे भारताच्या औद्योगिक, आर्थिक राजधानीचा मान मुंबईस मिळाला आहे. जगातील ‘फॉर्च्यून ४००’ कंपन्यांपैकी चार भारतीय कंपन्यांची कार्यालये मुंबईमधे आहेत. मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात औषधनिर्माण, बांधकाम, अभियांत्रिकी, धातूउद्योग, रेशीमउद्योग, काचसामान, सिनेमा, प्लॅस्टिक, भारत व हिंदुस्थान पेट्रोलियम असे उद्योग आहेत. आय.टी.(माहिती तंत्रज्ञान), संगणकशास्त्र, सॉफ्टवेअर, वैद्यकीय संशोधन, विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधनसामग्री, अपारंपरिक उर्जा अशा प्रकारचे उद्योगही मुंबईत आहेत. रिझर्व्ह बँक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मिंट, यांसाख्या संस्थांची मुख्यालये मुंबईतच आहेत. याशिवाय टाटा ग्रूप, रिलायन्स, बॉंबे डाईंग, वेदांत रिसोर्सेस, आदित्य बिर्ला समुह, गोदरेज, पार्ले बिस्किट्‌स, प्रिमियर, स्टेट बँक ऑफ इंडिया (एस्‌.बी.आय्‌.) व आय्‌.सी.आय्‌.सी.आय्‌. ह्या महाउद्योगांची व बँकांची मुख्य कार्यालये तसेच अनेक परदेशी बँकांची कार्यालये मुंबईत आहेत.

भारतातील बहुतेक दूरदर्शन केंद्रांचे (प्रमुख वाहिन्यांचे) जाळे मुंबईत एकवटले आहे. ‘बॉलिवूड’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या हिंदी चित्रपट उद्योगाचे (हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे) मुंबई हेच प्रमुख केंद्र आहे. शिवाय येथे मोठ्ठे चित्रपट निर्मिती करणारे फिल्म स्टुडिओज्‌ आणि प्रॉडक्शन हाउसेसही आहेत. मुंबई तसेच उपनगरांमध्ये अनेक प्रकारचे उद्योग आढळतात.कापड,अवजड यंत्रसामग्री, खते तसेच इतर अनेक प्रकारची उत्पादने जिल्ह्यात घेतली जातात.मरोळ येथे औद्योगिक वसाहत आहे. कापड उद्योग हाच अजूनही मुंबईचा सर्वात मोठा उद्योग आहे. त्याचबरोबर बांधकाम उद्योग, इंजिनिअरिंग, धातू उद्योग, छपाई, मोठी पेट्रोलियम इंडस्ट्री मुंबईत आहे. जवळपास सर्व भारतातील पेट्रोल बाजार हा मुंबईशी निगडीत असतो. विविध प्रकारच्या उद्योगांना आवश्यक असणारी रसायने पुरवण्यासाठी मुंबईत रासायनिक निर्मितीची अनेक केंद्रे आहेत. हे महानगर म्हणजे अत्यंत आधुनिक उद्योगधंद्यांना मूलभूत सोयी पुरवणारे महत्त्वाचे केंद्र आहे. पेट्रोकेमिकल्सनिर्मितीचे केंद्र तुर्भेला आहे. येथे असलेल्या तेलशुद्धीकरण कारखान्यामध्ये देशातील ४०% पेक्षा जास्त पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनासाठी कच्चा माल पुरवला जातो. तुर्भे परिसरात असलेल्या या केंद्रामधून इथिलीन, प्रॉपिलीन, बेन्जीन, फिनॉल, असिटोन, पी.व्ही.सी. इत्यादी रासायनिक व इतर उत्पादने पुरवली जातात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*