रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला. महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला. रायगडावर शिवछत्रपतींची समाधी, भवानी मंदिर, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर, पालखी दरवाजा, नगारखाना, वाघदरवाजा, मीना दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ इत्यादी प्रमुख स्थळे पाहायला मिळतात. सुमारे ३३० वर्षांपूर्वीचे बांधकाम असूनही, आजही काही बांधकाम आपल्याला येथे पाहण्यास मिळते. त्या अवशेषांवरून तत्कालीन स्थापत्यकलेची व भव्यतेची साक्ष पटते.
पाली – सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी असलेल्या परिसरात व अंबानदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात पाली येथे अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर आहे. येथे जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आहेत व सरसगड किल्ला आहे.
महड – अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणेशाचे येथील मंदिर प्रसिद्ध आहे. महड हे स्थान खालापूर तालुक्यात आहे.
अलिबाग – समुद्रकिनारी वसलेले हे छोटे शहर रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. समुद्रकिनार्‍यापासून जवळच कुलाबा हा जलदुर्ग आहे. या किल्ल्यामुळे जिल्ह्याला पूर्वी कुलाबा असे नाव देण्यात आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मायनाक भंडारी या आरमारप्रमुखाचे वास्तव्य होते. हा किल्ला प्रबळ असल्याने १६८० नंतर मराठी आरमाराचे कान्होजी आंग्रे यांनीही आपली सत्ता येथूनच राबवली. अलिबागजवळच खांदेरी व उंदेरी असे दोन भव्य जलदुर्गही आहेत. खांदेरी किल्ल्यावर बोटींना मार्गदर्शन करणारे दीपगृह आहे.
श्रीवर्धन – पेशव्यांचे मूळ गाव असलेल्या श्रीवर्धनचे ३ किमी. लांबीचा अथांग, शांत, मनाला निवांत करणारा सागरतीर हे मुख्य आकर्षण. येथील पेशवे मंदिरातील चौथर्‍यावर पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सोमजाई मंदिर, जीवनेश्वर मंदिर, राम मंदिर, कुसुमादेवी मंदिर अशी अनेक मंदिरे पाहायला मिळतात.
हरिहरेश्वर – श्रीवर्धनला जोडूनच हे ठिकाण आहे. श्रीशंकराच्या प्राचीन मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले ठिकाण श्रीवर्धन तालुक्यात आहे. येथील समुद्रकिनाराही पर्यटकांचे आकर्षण आहे. हे जागृत स्थान दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.
काशीद बीच – मुरूडहून १८ किमी. अंतरावर गोव्यामधील किनार्‍याची आठवण करून देणारा रूपेरी वाळूचा स्वच्छ-सुंदर काशिदचा समुद्रकिनारा विदेशी पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
दिवे आगर – श्रीवर्धन तालुक्यातील शिलाहारांची प्राचीन राजधानी असलेले दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील श्री रूपनारायण मंदिर हे देखील दर्शनीय आहे. याच ठिकाणी मराठी भाषेचे उल्लेख असलेले प्राचीन अवशेष सापडले आहेत.
एलिफंटा लेणी (घारापुरी) – घारापुरी हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे, परंतु ते प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात येते. ‘एलिफंटा गुंफा’ या समुद्रात असलेल्या हरितबेटावर सातव्या शतकापासून अस्तित्वात आहेत. येथे शिवाची  कातळामधील, प्राचीन जगप्रसिद्ध महेशमूर्ती पाहायला मिळते. येथेच वनोद्यानही विकसित करण्यात आले आहे.
शिवथर घळ – महाड तालुक्यात वरंधा घाटात हे स्थान आहे. येथे श्री समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला असे मानले जाते. येथे श्री समर्थ रामदासांचे दहा वर्षे वास्तव्य होते. येथील धबधबा, घनदाट जंगल, नैसर्गिक घळ व पवित्र शांतता यांमुळे येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते. येथील निसर्ग सुंदरतेचा उल्लेख दासबोधामध्येही झाला आहे.
श्री कनकेश्वर – श्री परशुरामाने निर्माण केलेल्या कनकडोंगरी या उंच टेकडीवर सुंदर कोरीव काम केलेले शंकराचे मंदिर आहे. कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे निसर्गाची पार्श्र्वभूमी लाभलेले प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.
जंजिरा किल्ला – अरबी समुद्रावरील अजिंक्य व बलाढ्य किल्ला म्हणून जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे. मुरूडपासून जवळच राजापुरी खाडीत हा जलदुर्ग उभा आहे.
साळावचे बिर्ला मंदिर – रेवदंड्यापासून जवळच साळाव या गावात बिर्ला ग्रुपने बांधलेले श्री गणपतीचे भव्य मंदिर आहे. येथे मंदिराच्या बाजूने खास तयार केलेली हिरवळ, आणि मंदिरातील प्रकाशयोजना आपल्याला आकर्षित करते.
महाड – महाड येथील १९२७ सालचा चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. चवदार तळे तत्कालीन अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनामुळे चवदार तळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची आठवण म्हणून येथे क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे.
माथेरान – माथेरान हे कर्जत तालुक्यात असून सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण आहे. घनदाट वने व नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे पोहोण्यासाठी धावणारी नेरळ-माथेरान ही ‘नॅरोगेज’ रेल्वे सुद्धा आकर्षक आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची इथे नेहमीच वर्दळ असते.
फणसाडचे अभयारण्य –  नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आत्ताचे फणसाडचे अभयारण्य. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगर प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. शेकडो प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, औषधी वनस्पती, विविध प्राणी या सगळ्यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे.
कर्नाळा –  पनवेल जवळ सुमारे  १० किमी. अंतरावर कर्नाळा हा प्रचंड डोंगरी किल्ला वसलेला आहे. ५०० मीटरहून अधिक उंच असलेला हा किल्ला पर्यटकांचे व गिर्यारोहकांचेही मुख्य आकर्षण आहे. येथे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. किल्ल्याच्या सभोवती साडेचार किमी. क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*