यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्री. वसंतराव नाईक – प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी प्रामुख्याने कृषिविषयक समस्या हाताळून धान्याच्या बाबतीत महाराष्ट्राच्या स्वयंपूर्णतेकडे लक्ष दिले. पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. महाराष्ट्राचे आणखी एक मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक हेही याच जिल्ह्यातले. ते कै. वसंतराव नाईक यांचे पुतणे होते. ते बंजारा समाजाचे होते. ज्येष्ठ राजकीय नेते प्रा. राम कापसे हे देखील मूळचे याच जिल्ह्यातील होत.

लोकनायक माधव श्रीहरी अणे – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य पुढारी ‘लोकनायक’ माधव श्रीहरी अणे यांचा जन्म यवतमाळमधील वणी या ठिकाणी झाला. ते १९२८ मध्ये संपन्न झालेल्या ग्वाल्हेर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते लोकमान्य टिळकांचे कट्टर अनुयायी होते म्हणून त्यांना ‘छोटा टिळक’ असे म्हणत. त्यांनी म. गांधींच्या असहकार चळवळीत हिरीरीने भाग घेतला व कॉंग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविली. त्यांनी लोकमान्य टिळकांचे संस्कृत चरित्र ‘तिलक यशोर्णव’ प्रसिद्ध केले.

श्री. जवाहरलाल दर्डा – महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या ‘लोकमत’ या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक श्री. जवाहरलाल दर्डा यांची कर्मभूमी म्हणजे हा यवतमाळ जिल्हाच होय. श्री. दर्डा स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होते.

प्रा. राम शेवाळकर – मराठीतील प्रथितयश प्रभावी वक्ते प्राचार्य राम शेवाळकर यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावचा. ते विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष होते.

2 Comments on यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Leave a Reply

Your email address will not be published.


*