चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ मध्येच बांधण्यात आले असून अद्यापही ते व्यवस्थित आहे. पवना नदीला पूर आल्यावर संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते.

मोरया गोसावी या गणेशाच्या भाविकाने मोरगावला मोरेश्वराची उपासना केली. त्यामुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. समाजाला त्यांची प्रचिती येत होती. मोरयांना त्यामुळे उपसर्ग होत होता. त्यांच्या सेवेत खंड पडत होता. त्या वेळी त्यांना श्रीगणेशाने दृष्टांत दिला की मी तुझ्यासाठी चिंचवड येथे प्रकट होत असून तेथे तू माझी सेवा कर. त्यानुसार मोरया गोसावी यांनी मोरगाव सोडले आणि चिंचवडजवळील ताथवडे गावानजीकच्या जंगलात पवना नदीच्या काठी बसून गणेश उपासनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी गणपतीचे मंदिर बांधले आणि तेथेच गणेश उपासना केली.

मोरया गोसावींनी याच ठिकाणी १५६१ मध्ये पवना नदीकाठी संजीवन समाधी घेतली. या मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची असून मनोकामना पूर्ण करणारी अशी या गणेशाची ख्याती आहे. या मंदिराचा उल्लेख शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*