चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान (व्याघ्र प्रकल्प) – हे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. ताडोबा हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ. किलोमीटर एवढे आहे. या अरण्यात ‘ताडोबा’ नावाचा आदिवासींचा देव आहे, त्यामुळेच या राष्ट्रीय उद्यानास ‘ताडोबा’ असे नाव देण्यात आले. हे वाघ संरक्षित क्षेत्र आहे. या उद्यानात मोर, धनेश, गरूड, नीळकंठ, चंडोल, सुगरणी इत्यादी साधारण २५० प्रकारचे पक्षी आहेत. तसेच वाघ, सांबर, नीलगाय, गवा, अस्वल, चितळ, भेकर असे अनेक वन्यप्राणी आहेत. याशिवाय ताडोबातले ‘मगरपालन केंद्र’ आशिया खंडातले एक महत्त्वाचे व उत्तम मगरपालन केंद्र आहे. उद्यानात एका सुंदर झोपडीत वन्य प्राण्यांचे संग्रहालय आहे. संग्रहालयात अस्वल, रानडुक्कर इत्यादी प्राण्यांचे सांगाडे आहेत. पक्ष्यांनी विणलेली सुंदर घरटी, विविध पक्ष्यांची मनमोहक छायाचित्रे हे सर्व इथे पर्यटकांना पाहायला मिळते. वन्यप्राणी आणि पक्षी-पाखरे यांना मुक्त संचार करता यावा, या हेतूने तयार झालेले, हरीतसृष्टी आणि वनसंपदेने नटलेले हे उद्यान भारतीय पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचेही आकर्षण ठरत आहे.
चंद्रपूर – चंद्रपूर शहराचा उल्लेख ऐतिहासिक शहर म्हणून करता येईल. येथील गोंडकालीन किल्ला प्रेक्षणीय आहे. गोंड राजा ‘खांडक्या बल्लरशहा’ याने हा किल्ला बांधला असे म्हणतात. तसेच येथे असलेले महाकाली व अचलेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध आहे. अलीकडे हे शहर औद्योगिकदृष्ट्याही विकसित होत आहे.
नागभीड – येथील सातबहिनी, मुक्ताबाई व महादेव टेकड्यांवरील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण झाले आहे. येथे जवळच घोडेझरी हा तलाव आहे. तलावाच्या शेजारीच पूर्वी तलावात सापडलेल्या घोड्याचे मंदिरही आहे. ह्या परिसराला निसर्गाची अनमोल अशी देणगीच लाभली आहे.
बल्लारपूर – गोंड राजवटीत बल्लारपूर हे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. वर्धा नदीच्या काठावर ४०० वर्षांपूर्वी बांधलेला येथील किल्ला प्रसिद्ध असून तो बांधण्याचे श्रेय गोंड राजा खांडक्या बल्लर शाह यास दिले जाते. या किल्ल्यातील राणीमहाल हा येथील आकर्षण ठरतो.
भद्रावती – येथील भद्रनाथ मंदिर व पार्श्वनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. येथून जवळ असलेल्या विजासन टेकडीवर बौद्धकालीन लेणी आहेत.
सोमनाथ – सोमनाथ हे मूल तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण असून येथील महादेवाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी चालविला जाणारा बाबा आमटेंचा प्रकल्प येथे ही कार्यरत आहे.
वरोरा येथील आनंदवन – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक  बाबा आमटे व त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांचे सेवाकार्य गेली ५७ वर्षे चालू आहे. बाबा आमट्यांनी जून १९५१ मध्ये महारोगी सेवा समितीच्या वतीने कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी ‘आनंदवन’ ह्या प्रकल्पाची स्थापना केली. आणि आता या कार्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे आणि सून डॉ.भारती आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या आदर्श सेवाकार्याची जागतिक पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*