कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

श्रीमहालक्ष्मी मंदिर – कोल्हापुरातील श्रीमहालक्ष्मी मंदिर हे पूर्ण शक्तिपीठ तर आहेच, शिवाय ते स्थापत्य शास्त्रातील व कलेतील एक उत्तम प्रतीचा नमुना म्हणून गणले जाते. श्री महालक्ष्मीचे मंदिर कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. इ. स. ६३४ च्या सुमारास चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. पुढील अनेक राजवटींत या मंदिराचा यथायोग्य विस्तार करण्यात आला. श्री तिरुपती बालाजीची रूसून आलेली पत्नी म्हणजे महालक्ष्मी , अशी कथा प्रचलित आहे. श्री तिरुपतीचे दर्शन घेतल्यानंतर श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे येतातच.

ज्योतिबा देवस्थान – ज्योतिबा देवस्थान हे पन्हाळा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असून, यास वाडी रत्नागिरी किंवा केदारनाथ असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने जोतिबाच्या दर्शनासाठी येतात.

श्रीकोप्पेश्वर महादेव मंदिर – शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या कृष्णेकाठच्या गावात श्रीकोप्पेश्र्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असून शिल्पकला व स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट उदाहरण असलेले हेमाडपंती मंदिर आहे.

जिल्ह्यातील किल्ले – पन्हाळगड, विशाळगड, भूदरगड, व गगनगड हे जिल्ह्यातील प्रमुख किल्ले आहेत. पन्हाळा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजवटीत दुसर्‍या भोजराजाने बांधला असा उल्लेख इतिहासात आढळतो. पन्हाळगडावर कवी मोरापंतांचे जन्मस्थान, रामचंद्र पंत अमात्यांची समाधी, यादवकालीन अंबाबाई मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळगडावर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय असून गडाच्या पायथ्याशी नेवापूर येथे प्रतिशिवाजी वीर शिवा काशिद यांची समाधी आहे. गडावर वीर बाजीप्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचे भव्य पुतळेही आहेत. विशाळगड (ता. शाहूवाडी), भूदरगड (ता.गारगोटी), सामानगड (ता. गडहिंगलज) हेही किल्ले १२ व्या शतकात शिलाहार राजवटीत दुसर्‍या भोजराजाने बांधल्याचे इतिहासकार मानतात. या किल्ल्यावर अनेक सुखसोयी उपलब्ध असून थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पन्हाळ्याला सिद्धी जौहरने घातलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका, त्यांनी जिल्ह्यातीलच विशाळगडाकडे केलेला अद्भूत प्रवास आणि घोडखिंडीत (पावनखिंड) जौहरच्या सैन्याला अडवून बाजीप्रभूंनी शिवाजी राजांचे केलेले संरक्षण – हा सर्व रोमांचक इतिहास जिल्ह्याच्या मातीशी जोडलेला आहे.

नेसरी (गडहिंग्लज) – येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कुसुमाग्रजांच्या कवितेत वर्णन केलेला प्रसंग या नेसरी गावातील खिंडीत घडला. शरण आलेल्या आदिलशाही सरदाराला – बहलोलखानाला – प्रतापरावांनी, शिवाजी राजांची परवानगी न घेता सोडून दिले. त्यामुळे महाराज प्रतापरावांवर संतापले. आपली चूक कळून आल्यानंतर प्रतापराव केवळ सहा सरदारांसह, बहलोलखानाच्या सैन्यावर त्वेषाने चालून गेले. ही लढाई नेसरीच्या खिंडीत झाली, या लढाईत सात मराठे वीर धारातीर्थी पडले.

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात शंकराचार्यांचा मठ, जैन धर्मीयांचे तीर्थस्थान बाहुबली, बिनखांबी गणपती मंदिर, रंकाळा तलाव, न्यू पॅलेस, शालीनी पॅलेस ही ठिकाणे आवर्जून पाहण्याजोगी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*