कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

श्रेष्ठ पंडित कवी वामन पंडित – हे हातकणंगले तालुक्यातील हुपरी या गावचे. त्यांनी गीतेवरील टीकात्मक ग्रंथ यथार्थदीपिका लिहिला.

पंडित कवी मोरोपंत – पंडित कवी मोरोपंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातच झाला. त्यांनी १०८ प्रकारे रामायण लिहिले, आर्या हे वृत्त मराठीत रूढ केले.

रामचंद्रपंत अमात्य – ‘आज्ञापत्रा’सारखा श्रेष्ठ व मार्गदर्शक ग्रंथ निर्माण करणारे, त्यातील नेमक्या, समर्पक भाषेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची सूत्रे उलगडून दाखवणारे असे रामचंद्रपंत अमात्य यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातच झाला.

रणजित देसाई – स्वामी व श्रीमानयोगी या कादंबर्‍यांनी महाराष्ट्राला वेड लावणारे रणजित देसाई यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातच झाला.

शिवाजी सावंत – मृत्यूंजय, छावा, युगंधर सारख्या कादंबर्‍या महाराष्ट्राला देणारे शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला.

गोविंदराव टेंबे – गोविंदराव टेंबे हे ज्येष्ठ कलावंत कोल्हापूरचेच. श्री. टेंबे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट हार्मोनियम वादक होत. आजही त्यांचे नाव संगीत क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी काही नाटकांतून अभिनयही केला, पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नाटकातील पदांना शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट चाली दिल्या. श्री. टेंबे यांनी संगीत या विषयावर संशोधनात्मक पुस्तकेही लिहिली.

विजय तेंडूलकर – महान नाटककार विजय तेंडूलकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात झाला होता. यांचे प्राथमिक शिक्षणही कोल्हापुरातच झाले होते

क्रिकेटपटू विजय हजारे – महान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व भारतीय संघाचे माजी कप्तान विजय हजारे हे कोल्हापूरचेच होते.

कुस्तीचा विचार करता गणपत शिंदे, गणपतराव आंदळकर, हिंदकेसरी मारुती माने, युवराज पाटील अशा कोल्हापूरच्या मातीतल्या अनेक मल्लांचा उल्लेख करता येईल. भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ या चित्रपटात कोल्हापूरच्या मास्टर विठ्ठल यांनी नायकाची भूमिका केली होती. केवळ बालकलाकारांच्या भूमिका असलेल्या ‘बाळ ध्रुव’ या पहिल्या बालचित्रपटाची निर्मिती कोल्हापुरातच झाली. असंख्य चित्रपट निर्माण झाल्याने कोल्हापूर परिसरात अनेक स्टुडिओ होते. शासनाने पुढाकार घेऊन शांताकिरण स्टुडिओ परिसरात चित्रनगरी निर्माण केलेली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*