कोकणातले रातांबे (कोकम)

आंबा, काजू आणि फणस म्हणजे कोकणचा मेवा. या मेव्यात आणखी एक फळ आहे जे कोकणी माणसाचा जीव की प्राण आहे. ते म्हणजे रातांबे. आलुबुखारसारख्या दिसणार्‍या जांभळट गोल आकाराच्या रातांब्यापासून कोकम, आगळ, कोकम सरबत आणि तेल तयार केलं जातं. रातांब्यांचा पित्तनाशक गुणधर्म पाहता आहारात त्यांचा उपयोग आवर्जून केला जातो. कोकम सगळ्यांकडे स्वयंपाकात हमखास वापरले जाते.

उन्हाळ्यात न चुकता ज्या अस्सल देशी पेयाची आठवण होते ते म्हणजे कोकम सरबत! जेव्हा रसना, ट्यांग, पेप्सी, कोक यासारख्या कृत्रीम शितपेयांनी घरातली जागा बळकावली नव्हती तेव्हा घरी येणाऱ्या पाहुण्यांच स्वागत माठातल्या थंड पाण्यात बनवलेल्या कोकम सरबताने व्हायचं. हल्ली माठ तर गायबच झालेत… पण घरगुती कोकम सरबतपण बर्‍याचजणांकडे मिळत नाही.

रातांब्याची झाडे जास्त पावसाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात वाढतात. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात रातांब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.

रातांब्याच्या फळामध्ये बिया असतात. या बियांपासून तेल काढलं जातं. ते मेणासारखं घट्ट आणि पांढरं असतं. त्याला भिरंडेल, मुठेल तेल किंवा कोकमतेल म्हणतात. त्याचा खाण्यात उपयोग केला जातो. तसंच हे तेल औषधी म्हणूनही ओळखलं जातं. मेणबत्त्या करण्यासाठी तसेच मेणापासून निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी या तेलाचा उपयोग पूर्वी कोकण आणि गोव्यात केला जायचा. निरनिराळ्या प्रकारचे मलम बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो.

रातांब्याची साल वाळवून त्यापासून कोकम तयार केली जातात. कोकम आमसूल, आमसोल किंवा सोलं म्हणूनही ओळखली जातात. कोकण गोव्यात कोकमचा जेवणात चिंचेऐवजी सर्रास उपयोग केला जातो. कारण कोकम चिंचेपेक्षा पथ्यकर आणि पित्तनाशक असतात. ठाणे जिल्ह्यातले आदिवासी सार (सूप) बनवताना चिंचेचा आणि उत्तरेत आंबेलीयाचा जसा उपयोग करतात, अगदी तसाच कोकणी, मालवणी, गोवन लोक कालवण बनवण्यासाठी खासकरुन माशांचे पदार्थ बनवताना कोकमचा वापर करतात. त्यामुळे कोकणी माणसाचं जेवण कोकमशिवाय पूर्ण होत नाही, असंही म्हटलं जातं.

कोकम ह्या फ़ळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यात सायट्रीक, असेटिक, मॆलिक, एस्कोर्बिक, हायड्रो सायट्रीक इतक्या प्रकारची आम्ल असतात जी शरीराला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. या फ़ळात बी कॊम्प्लेक्स, क जिवनसत्व तर असतातच पण त्याच जोडीला पोट्याशिअम, म्यान्गेनीज आणि म्याग्नेशिअम सारखी खनिजं असतात. हे सगळे घटक शरीराला वर्धकच असतात.

या फ़ळात अजिबात कोलोस्टेरॊल नसतं जे हृदयाला उत्तमच. यात अतिशय कमी क्यालरीज असल्याने याचा नियमित वापरपण चांगलाच. आयुर्वेदात व्रिक्षमाला नावाने याचा वापर अनेक औषधांमधे केला जातो.

कोकम सरबताने पित्त, अपचन, उष्माघाताचा त्रास कमी होतोच पण त्याच जोडीला रक्तदाबही ताब्यात राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो. आणि हो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा ह्या सरबताचा उपयोग केला जातोच. नियमीत कोकम सरबताच्या वापराने पोटाची पचनाची सगळी दुखणी दूर रहातात असा अनुभव येतो.

कोकमचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून होत आहे. चरकाच्या मते, चिंचेपेक्षा कोकम अधिक गुणकारी आहेत. साधारण १० ते २० मीटरपर्यंत वाढणारी कोकमाची झाडे कोकण, कर्नाटक, मलबार या भागात आढळतात.

कोकममुळे कोकणी बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. कोकमच्या फळांचा जो रस असतो, त्याला आगोळ म्हणतात. या रसापासूनही सरबत बनवता येते.

1 Comment on कोकणातले रातांबे (कोकम)

Leave a Reply

Your email address will not be published.


*