औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

जगप्रसिध्द अजंठा लेणी – सोयगांव तालुक्यात औरंगाबादपासून सुमारे १०० कि.मी अंतरावरील अजिंठा येथे जगप्रसिद्ध कोरीव लेणी आहेत. ही लेणी रंगीत भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. येथे एकूण तीस लेणी असून, इ.स. पूर्व २०० ते इ.स. ६५० या काळादरम्यान ही लेणी खोदली गेली आहेत. या लेणी बौद्धधर्मीय असून खडकांत कोरलेली बौद्धमंदिरे, गुंफा, विहार तसेच गौतम बुद्धाच्या जीवनावरील कोरलेले अनेक प्रसंग अतिशय रेखीव आहेत. बौद्ध धर्मात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या जातककथांवर आधारित चित्रे या लेण्यांमध्ये पाहण्यास मिळतात. १८१९ मध्ये स्मिथ ह्या इंग‘ज अधिकार्‍याने या लेण्यांचा शोध लावला.
वेरुळ येथील कैलास लेणी – खुल्दाबाद तालुक्यातील वेरूळ येथील कैलास लेणी जगभर प्रसिद्ध आहेत. ८ व्या शतकातील राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने ही लेणी खोदली असे म्हटले जाते.
घृष्णेश्वर मंदिर – भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर मंदिर वेरुळ येथील येलगंगा नदीकाठी आहे. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
पैठण – गोदावरी नदिच्या तीरावर वसलेले पैठण हे धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. याला दक्षिण काशी असे देखील संबोधले जाते. हा तालुका महाराष्ट्रातील आध्यात्मिक व सांस्कृतिक महापुरुषांचे जन्मस्थान आहे. इ. स.१२७५ मध्ये पैठण तालुक्यातील आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. ज्ञानेश्वरांनी येथेच रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले असे म्हटले जाते. महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका फडकवणारे आणि भारुडे – अभंग यांच्या माध्यमातून जनप्रबोधन करणारे संत एकनाथ यांचा जन्म इ.स.१५०४ मध्ये पैठण येथेच झाला असे मानले जाते. त्यांची समाधी येथेच आहे. एकेकाळी सातवाहनांच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या पैठणला पूर्वी प्रतिष्ठान म्हणून ओळखले जाई. वृंदावन व शालिमार या उद्यानांना समोर ठेवून विकसित करण्यात आलेले पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान प्रेक्षणीय आहे.
दौलताबाद येथील प्राचीन किल्ला – दौलताबाद येथे प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला असून, तो यादवांनी बांधल्याचे मानले जाते. याचे प्राचीन नाव देवगिरी होते. राजा रामदेवरायाच्या काळात दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जिंकला व यादवांचे राज्य संपुष्टात आले. महमद तुघलकाने काही महिन्यांसाठी दिल्लीहून भारताची राजधानी येथे आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवले. किल्ल्याभोवती भक्कम तटबंदी असून किल्ल्याच्या सभोवती खोल खंदक आहे. दौलताबादपासून जवळच खुल्ताबाद येथे औरगंजेबाची कबर आहे.
औरंगाबाद शहर – हे या जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरातील बीबी-का-मकबरा, हे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण आहे. ही इमारत औरंगजेबाच्या पत्नीच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. ह्याला छोटा ताज असेदेखील म्हटले जाते. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे एक वेगाने वाढणारे शहर आहे.
पितळखोरा येथील बौध्दकालीन लेणी – कन्नड तालुक्यातील पितळखोरा येथील बौद्धकालीन लेणी भारतातील सर्वांत प्राचीन लेण्यांमध्ये गणली जातात. कन्नडपासून जवळच औरंगाबाद व जळगाव या दोन्ही जिल्ह्यांत पसरलेले गौताळा-औटरमघाट हे अभयारण्य आहे.

He https://essay4today.com/ was the author of journey to the fair pacific, a report of his travels in asia in 1951

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*