पुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात ह्या मार्गाचा विचार मनात येताच मी भयंकर चपापलो! असा विचार माझ्या मनात कसा काय आला याचे मला फार आश्चर्य वाटले.
त्याचे असे झाले, एक दिवस सपाटून पाऊस पडत होता. दुपारी लंच टाईममध्ये बाहेर जाऊन यायला फारसा वेळ नव्हता. अर्जंट कामामुळे सर्वांना लवकर परत यायचे होते. मी ऑफिसमध्येच काहीतरी मागविणार होते. पण गोरे कंपूची बाहेरच जायची इच्छा होती. बाहेर जवळपास चांगले हॉटेल नव्हते म्हणून कोपऱ्यावरच्याच एका लहानशा हॉटेलात आम्ही घुसलो. हॉटेल कळकट होते पण लवकर परत जायचे असल्यामुळे दुसरा उपाय नव्हता. प्रत्येकाने भराभर आपापली ऑर्डर दिली. गोरेने इडलीसांबार मागविले. मी वडा, इतरांनी डोसा वगैरे काही ना काही मागविले. आम्ही खायला सुरुवात करणार एवढ्यात कुठूनसे एक झुरळ उडत आले आणि चक्क गोरेच्या सांबारातच जाऊन पडले. गरमागरम सांबारात ते तडफडू लागले. झुरळाला पाहताच गोरे भयंकर घाबरला. ते पाहून मला फार गंमत वाटली. मी त्याची आणखी गंमत करावी म्हणून त्या झुरळाच्या मिश्या पकडून त्याला वर उचलले आणि त्याच्या डोळ्यांपुढे नाचवू लागलो. गोरेने दोन्ही हात पुढे केले आणि तो ओरडला. “नको! नको!! फेक, ते फेक!!” एवढे म्हणून तो धाडकन मागे खुर्चीवर कोसळला. त्याच्या तोंडाला फेस आला होता. त्याला फीट आली होती. त्यानंतर आमचे खाण्यावरचे लक्षच उडाले. आम्ही गोरेला शुद्धीवर आणायच्या प्रयत्नाला लागलो. तोंडावर पाणी मारताच काही वेळाने तो शुद्धीवर आला. माझ्याकडे जळजळीत नजरेने पाहून, झटकन उठून तो हॉटेलच्या बाहेर पडला. आम्ही पण सगळे खाणे तसेच टाकून परत ऑफिसमध्ये आलो. त्या दिवशी गोरे काही बोलला नाही. सर्व कंपूसमोर आपली फजिती झाली याचा त्याला फार अपमान वाटला होता आणि मी दाखविलेल्या बहादुरीने त्याचा अगदी जळफळाट झाला होता. या प्रसंगाने गोरेचा एक वीक पॉईंट मला मात्र समजला आणि त्याचाच उपयोग करून मला सलणारा काटा काढायचे मी निश्चित केले.
त्यानंतर मला छळायचा गोरेने अगदी सपाटाच लावला. काहीतरी खुसपट काढून तो रोज मला घालून पाडून बोलायला लागला. याचा माझ्या मन:स्थितीवर फार परिणाम झाला आणि साध्यासाध्या कामातही माझ्या हातून चुका व्हायला लागल्या. गोरेला फिट आली त्याच्या तिसऱ्या दिवसाचीच गोष्ट. मी एक ड्राफ्ट गोरेकडे मंजुरीसाठी पाठविला. त्याने मला बोलावले आणि तो ड्राफ्ट झुरळासारखा नाचवीत माझ्यावर खेकसला, “गावडे अहो ड्राफ्ट लिहिता का झोपा काढता? संबंध ड्राफ्टमध्ये एका वाक्यापुढेही पूर्णविराम नाही. आपलं फास्ट गाडीसारखं लिहित सुटलात! वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो एवढे साधेही तुम्हाला समजत नाही?”
“साहेब, गडबडीत राहून गेले आता देतो सुधारून!”
“काही नको, जा तुम्ही युसलेस!”
माझा संतापाने तिळपापड झाला नुसता. साधा पूर्णविराम तो काय आणि त्याबद्दल एकदम युसलेस म्हणायचे? आता मात्र या प्रकारांना पूर्णविराम दिलाच पाहिजे. आता सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. माझे लिहिणे म्हणजे फास्ट ट्रेन काय? फास्ट लोकल! पूर्णविराम! फास्ट लोकल!! पूर्णविराम!!! हे शब्द माझ्या डोळ्यांसमोर गरगरा फिरायला लागले. मी केबीनमधून बाहेर आलो आणि संतापाने फणफणत माझ्या जागेवर येऊन बसलो. थोड्या वेळाने गोपाळ आला आणि त्याने माझ्या हातात एक ‘मेमो’ ठेवला. कामात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल गोरेने माझ्यावर ठपका ठेवला. तो मेमो मी चोळामोळा करून टोपलीत फेकला. बघणारे सगळे थक्क झालो. माझ्यात एवढी हिंमत कुठून आली ते त्यांना कळेना. हा प्रकार गोरेनेही पाहिला होता. तो रागारागाने केबीनच्या बाहेर आला आणि पुन्हा मला वाटेल तसे बोलला. आतापर्यंत मी पूर्णपणे भानावर आला होतो. मी म्हणालो, “साहेब, माफ करा, चुकी झाली. परत नाही असे होणार. लेखी माफी मागतो!”
“ठीक आहे. तसे लिहून द्या!’ असे म्हणून गोरे निघून गेला. मी मनाशी काही विचार केला आणि लंच टाईममध्ये सर्वांना चुकवून एकटाच बाहेर पडलो. झपाझप चालत त्या कोपऱ्यावरच्या कळकट हॉटेलपाशी गेलो आणि तिथे मागच्या गल्लीत शिरलो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच तिथे खूप घाण आणि कचरा पडला होता आणि मोठमोठी झुरळे त्यावर यथेच्छ ताव मारत होती. त्यातली चार निवडक झुरळं मी पकडून माझ्या बुशशर्टच्या खिशात टाकली. खिशाला सफारीप्रमाणे बटण होतं ते बंद करून टाकलं आणि लगेच परत आलो. सगळे परत येण्यापूर्वी मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीला बारीक भोकं पाडली नि ती झुरळं पुन्हा त्यात भरून माझ्या खिशात ठेवून दिली.
थोड्याच वेळात गोरे कंपू आला. आज मी त्यांना चुकवून गेलो याचा त्यांना राग आलेला दिसला आणि त्यांच्या नजरेवरून आज संध्याकाळी गाडीत त्याचे उट्टे काढू असा त्यांनी मला सुप्त इशाराही दिला. मी अगदी उदास झालो होतो. पण एक ढोमसेबाई सोडल्या तर कुणीही मला साधी सहानुभूतीसुद्धा दाखवली नाही.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मात्र या कंपूने माझा ताबाच घेतला. कल्याण फास्ट ट्रेनमध्ये नेहमीसारखे मला ढकलून, कंपू टवाळक्या करू लागला. वयं वाढली होती पण मूळ स्वभाव तोच होता. उलट गोरे आता मॅनेजर झाला असल्यामुळे अधिकाराचा तोरा आणि उद्दामपणा जास्तच झाला होता. गाडीने स्टेशन सोडले आणि माझ्या डोक्यावर टपल्या मारून नेहमीची टिंगलटवाळी चालू झाली. येणाऱ्या जाणाऱ्या लोकलकडे पाहून शिट्या मारणे, हातवारे करणे त्यांचे सुरू झाले. मला हवी तशी संधी येत नव्हती. गाडी दादरला पोचली तरी माझे काम झाले नाही. गाडीने घाटकोपर सोडले आणि मी थोडा पुढे सरकून गोरेच्या जवळ जायला लागलो.
“काय माताऱ्या दरवाजात उभं रहायचंच वाटतं? बसतोस का माझ्या खांद्यावर म्हणजे हात र चेल वर.” गोरे छद्मीपणाने म्हणाला. मी काहीच बोललो नाही. थोडा हसलो.माझ्या बुटक्य उंचीमुळे मी त्या सर्वांच्या खांद्यापर्यंतसुद्धा पोचत नव्हतो. पण मला आज तिचाच फायदा घ्यायचा होता. मी गोरेच्या मागे सरकलो आणि हळूच माझ्या खिशाचे बटण उघडून झुरळांना सोडले. कुलकर्णी पुढे, गोरे मधे आणि त्याच्या मागे पाटील. गोरेचा एक हात कुलकर्णीच्या खांद्यावर. एक झुरळ कुलकर्णीच्या पाठीवरून वर आलं. ते पाटलाने पाहिलं आणि तो ओरडला, झुरळऽ झुरळऽ ते ऐकून गोरे जाम टरकला. तेवढ्यात आणखी दोन झुरळं कुलकर्णीच्या मानेपर्यंत पोचली आणि तिथून थेट गोरेच्या नाकावरच! त्याबरोबर त्यानं एक भयंकर किंकाळी फोडली. त्याची दरवाजावरची पकड सुटली आणि धावत्या गाडीतून तो जोरात खाली फेकला गेला आणि त्याच्या मागोमाग कुलकर्णी! पाटील आणि इतर प्रवासी ओरडले. ओरडा ऐकून कुणीतरी साखळी खेचली, तशी पुढे जाऊन लोकल थांबली. सगळ्यांच्या बरोबर मीही उतरलो. रेल्वे रूळावर कुलकर्णी आणि गोरे छिन्नविछिन्न होऊन पडले होते. दृश्य बघण्यासारखे नव्हते! तरी मला ते झुरळ दिसले! रूळावर बसून ते ते माझ्याकडचे खुषीनं पाहत होते असे मला वाटले. खुषीनं असं मला आपलं वाटलं. खरं म्हणजे, असं व्हायला नको होते. झुरळ पाहून गोरे फीट येऊन डब्यातच पडेल नि त्याची चांगली फजिती होईल असं मला वाटलं होतं. पण घडलं ते मात्र वेगळंच. म्हणजे इतक्या वर्षांच्या खोल जखमेवर यशस्वी शल्यकर्म त्या झुरळानं केलं. या प्रसंगाची आठवण म्हणून हे प्लॅस्टिकचे झुरळ मी तेव्हापासून भिंतीवर लावून ठेवलं आहे.
-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)
Leave a Reply