नवीन लेखन...

टीव्ही बघणे…एक क्रिया

दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही, हे दृक्श्राव्य माध्यम आहे. कुटुंबात टीव्ही पाहणारे सदस्य वयोगटाने विखुरलेले असतात. एका कुटुंबात एक टीव्ही हे सर्वसाधारण प्रमाण आहे. कुटुंबांमधील सदस्यसंख्या कमी होत असूनसुध्दा एकाहून जास्त टीव्ही कुटुंबात असण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. सर्वांना समर्पक व सोयीस्कर ठरतील असे कार्यक्रम प्रसारित होत असतात. कार्यक्रमांची निर्मिती करणारे व त्यांचे वितरण करणारे असे दोन घटक आपल्या टीव्हीचा पडदा उजळविण्यात महत्वाचे असतात. आवड व मागणी यांनुसार चॅनेल-मालक कार्यक्रम ठरवतात, आणि सॅटेलाईट डिश वा केबल ऑपरेटर यांच्यामार्फत ते आपल्यापर्यंत पोचतात. टीव्हीवर दिसणारे कार्यक्रम हे मालिका, चित्रपट, संगीत, शिक्षण अशा अनेक प्रकारचे असतात.

आपण टीव्ही वर जेव्हा कार्यक्रम पाहतो तेव्हा आणखी काय काय दिसते? प्रत्येक चॅनेल आपले नाव, तारीख व वेळ दाखविते. याव्यतिरिक्त बर्‍याच वेळा टीव्हीचा पडदा इतर कशा-कशाने व्यापलेला असतो. हे ‘इतर’ म्हणजे काय? तर कार्यक्रमांसंबंधी आणि प्रयोजक कंपन्यांच्या वस्तू व सेवेशी संबंधित जाहिराती, सूचना, निवेदने, आवाहने इत्यादी. हे सर्व चित्र, लिखित शब्द (Text)  व ध्वनी या स्वरूपात असते. टीव्ही पहात असताना डोळे व कान काम करत असतात आणि हो, मेंदूही.

  1. डोळे काय करतात?

डोळ्यांद्वारे नेत्र पटलावर (Retina) पडणारी संवेदना विद्युतसंदेशात रूपांतरित होते. मेंदूतील 30 केंद्रे गरजेनुसार या संदेशांवर प्रक्रिया करतात व आपल्याला दृश्याचा बोध होतो.

  1. कान काय करतात?

कानावर पडणार्‍या ध्वनीचा अर्थ मेंदूतील एका केंद्रात (Wernicke’s Area) लावला जातो. शब्द ओळखणे, शब्दाचा भाषिक अर्थ व वाक्याचा अर्थ लावणे हे या केंद्रात घडते.

  1. मेंदू काय करतो?

दृश्य व ध्वनी यांना भावनिक छटा (Limbic System या केंद्रात) दिली जाते व सादर होत असलेल्या प्रसंगाचे आकलन आपणास होते.

आपला मेंदू हे सर्व काही करण्यात तरबेज असतो. अत्यंत कमी वेळात हे घडत असते. आपले दृष्टीकेंद्र एका सेकंदात 10 ते 12 फ्रेम्स वर जेव्हा संस्करण करते तेव्हा आपल्याला प्रत्येक चित्र वेगळे ओळखता येते. याहून जास्त वेगाने फ्रेम्स आल्यास चित्र हलत असल्याचे दिसते.  टीव्हीवर दिसणार्‍या चित्रांचे अनेक प्रकार आहेत जसे स्थिरचित्र, चलचित्र, संथगती हालचाल, ऍनिमेशन, कार्टून, धूसर केलेले चित्र, मिक्स केलेली चित्रे, चित्र व लिखित शब्द (Text , Sub  titles) वगैरे. या माहितीची मेंदूत वेगवेगळ्या पध्दतीने छाननी होते. सरळ प्रक्षेपणाचे (अन्य चित्रे व शब्द पडद्यावर नसताना) आकलन करताना मेंदूचे काम त्यातल्या त्यात सोपे असते. सरळ नसणारे प्रक्षेपण मुख्यतः बातम्यांचे वेळेस व काही प्रक्षेपणांमध्ये बघावयास मिळते. एका वेळी चार-पाच प्रकारचे संदेश प्रसारित होत असतात. उदाहरणार्थ, मुख्य चित्र, पडद्याच्या तळाशी सरकते निवेदन, त्यावरच्या आडव्या पट्ट्यात इतर बातम्यांची झलक, पडद्याच्या वरच्या आडव्या पट्टीत मुख्य चित्राशी संबंधित मजकूर आणि एखद्या छोट्याशा फ्रेममध्ये जाहिरात वा वार्ताहराचा फोटो. आपल्या डोळ्यांनी काय काय पहावे व मेंदूने कशा कशाचा अर्थ लावावा अशी आपली अपेक्षा असते? मान्य आहे की आपला मेंदू प्रचंड क्षमता असलेला आहे. सतत टीव्ही बघण्याने डोळ्यांबरोबरच मेंदूही तणावग्रस्त होतो. कारण विसंगती टाळण्यासाठी समर्पक अर्थ मिळेपर्यंत मेंदू माहिती घुसळून काढतो.

सोप्या शब्दांमध्ये (दशलक्ष आणि अब्जमधले आकडे टाळून) दृश्य व ध्वनी संवेदनांच्या संस्करणासंबंधी काही बाबी अशा आहेत.

  • पापणीची उघडझाप होण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्या तीस पट कमी वेळात मेंदू समोरील दृश्याचे आकलन करतो.
  • नेत्रपटलाकडून आलेल्या विद्युत संदेशांवर मेंदू प्रक्रिया करतो. हवाई वाहतुक नियंत्रकाला जसे रडारवर विमान दिसत नाही पण एक ठिपका दिसतो, तसंच मेंदूत होत असतं. खरं म्हणजे डोळे संदेश पाठवतात आणि मेंदू डिजिटल स्वरूपात प्रतिमेचे मॉडेल तयार करतो.
  • शाब्दिक वर्णनाचे (Text) आकलन होण्यास चित्रापेक्षा जास्त वेळ लागतो कारण हे शब्द आपल्या मेंदूत ध्वनीच्या रूपात आल्यासारखे पोचतात.
  • चित्र आणि लिहिलेले तसेच ऐकलेले शब्द यांची सांगड घातली जाते तेव्हा आपल्याला दृश्याचे पूर्ण आकलन होते. (आठवा, सिनेमा पाहताना डबिंग चुकले असल्यास डोक्यात कसा गोंधळ उत्पन्न होतो).

टीव्हीचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी व करमणुकीसाठी होतो. आपली ही उद्दिष्टे कितपत सफल होतात? निखळ करमणुक व विश्वासार्ह माहिती किती कार्यक्रमांमधून मिळते? विरंगुळा देण्याऐवजी आपला समतोल कोणता कार्यक्रम बिघडवतो? लहान मुलांवर टीव्हीचा काय परिणाम होतो? अशा प्रश्नांची सर्वसाधारण उत्तरे मिळवणे सोपे नाही. अनेक घटक व अनेक कंगोरे असलेले हे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण आपल्यापुरते सोडवावे यात शहाणपण आहे.

टीव्ही बघण्याने मेंदूत होणार्‍या काही घडामोडी अशा आसतात.

  • थोडा वेळ टीव्ही पाहिल्याने Insular Cortex व Amygdala हे भाग उत्तजित होतात व मूड समतोल राहतो. त्यामुळे रिलॅक्स झाल्याचे वाटते.
  • टीव्ही बघताना उजवा मेंदू कार्यरत होतो. तो विश्लेषणाच्या भानगडीत पडत नाही. तो भावनिक प्रतिसादात रमतो. त्यामुळे विचार करणे थांबते.
  • वाचत असताना मनात प्रतिमा तयार केल्या जातात. यात मेंदूची पुश्कळ ताकद वापरली जाते. मेंदूची तब्बेत ही त्याचा किती वापर केला जातो यावर अवलंबून असते, (जास्त वापर जास्त चांगली तब्बेत). टीव्ही बघताना हे घडत नाही. म्हणून ‘TV rots your brain’ हे वाटते त्याहून अधीक सत्य आहे.
  • सतत बदलणार्‍या टीव्ही वरील दृश्यांमुळे व मालिकांमुळे कमी वेळ लक्ष केंद्रित करण्याची सवय होते. हे शिक्षणासाठी घातक ठरते.
  • टीव्ही मुळे Endorphin स्त्रवते. त्याने चांगले वाटते व त्यावरील अवलंबित्व वाढते.

टीव्ही सुरू वा बंद करणे आपल्या हाती असते. टीव्हीवर सुरू असलेला कार्यक्रम बघणे वा न बघणे ही आपली मर्जी असते. एखादा कार्यक्रम पाहता न आल्याचे किती वाईट वाटून घ्यायचे हे आपण ठरवायचे असते. एक तास नेटाने टीव्ही बघितल्यावर ‘कार्यक्रम रद्दड होता’ असे म्हणायचे की ‘टीव्ही समोरून उठण्याचे आपल्याला लवकर कसे सुचले नाही’ असे म्हणायचे, ही नंतरची प्रतिक्रिया असते. ‘टीव्ही बघा’ म्हणून आपल्याला कोणी भरीस घतलेले नसते. डोळे उघडे ठेवण्याची सक्ती कोणी केलेली नसते. मग टीव्हीचा दोष काय? आपण त्याचा सूज्ञपणे वापर करावा हे उत्तम.

— रविंद्रनाथ गांगल

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..