नवीन लेखन...

वाटणी (कथा)

अनघा दिवाळी अंक २०२० मध्ये प्रा. भास्कर बंगाळे यांनी लिहिलेली ही कथा.


प्रत्येक गावात दादा, काका, मामा, नाना अशा नावाने ओळखली जाणारी माणसे असतात. अशाच एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला सर्व गाव ‘आबा’ म्हणायचा. साऱ्या गावाचे ते ‘आबा’ होते..

काबाडकष्ट करून आबानं दोन पोरं वाढवली, लहानाची मोठी केली. पोरांना खायला-प्यायला दूध पाहिजे, रतिबांचं किती पुरायचं म्हणून एक म्हैस पाळली. पोरं तालमीत लोळायची आणि घरी येऊन दूध-दुभतं, खारीक-खोबऱ्याच्या खुराकावर ताव मारायची. अशा लाडात वाढवलेल्या पोरांचं धूमधडाक्यात लग्नं केली आणि मॉडर्न विचारांच्या सुना घरात आल्या.

पूर्वी सासवा सुनांना त्रास द्यायच्या, त्यांचा छळ, करायच्या, जाचहाट करायच्या, पण अलीकडे काळ बदलला. सुना सासवांना छळायला लागल्या. प्रसंगी घराबाहेर काढायला कमी करत नाहीत. काही सासू-सुना माय-लेकींसारख्या असतील तो काळ वेगळा, पण सुनांकडून त्रास सहन करण्याचे नशीब सगुणाच्या वाट्याला आले होते. सगुणा लवकर उठायची, म्हशीचं शेणघाण काढायची, अंगण झाडून काढायची, भांडी घासायची, आंघोळीला पाणी गरम करायची. दिवस चांगला वर आल्यावर सुना उठायच्या. तरी अजून झालं नाय, ते झालं नाय म्हणून सासूला बोलायच्या. मोलकरणीसारखं काम करून सुनांचं बोलणं ऐकून घ्यावं लागायचं. बिचारी सगुणा गपगुमान सहन करायची. अब्रुदार बाई! घरातली गोष्ट कुणाला बोलून दाखवायची. झाकली मूठ सव्वा लाखाची. कष्ट करून करून एके दिवशी सगुणानं डोळं झाकलं.

आयुष्यभर जिनं साथ दिली ती जोडीदारीण निघून गेल्यावर स्वत:च्या घरात आबा पोरकं झालं. आबा आता थकून गेलं व्हतं. आबांच्या दोन्ही सुना चांगल्याच म्हणायच्या तर काय! सकाळी शिळं कालवण असलं तर भाकरी हमखास गरम असायची आणि रात्री भाकरी शिळी असली तर कालवण हमखास गरम असायचं. तेही दुपारच्या आत. असं दोन्ही सुना आबाला चांगलं काळजीनं जेवायला जपायच्या.

सगुणा होती तव्हा आबाला सकाळी सकाळी दुधाचा चहा मिळायचा. दिवस थोडा वर आला नाही तोवर गरम भाकरी, भाजी, दूध, ताक हवं नको ते वेळेवर जेवायला घालायची. किती जेवलं तरी सगुणा ‘आज कमी जेवला हो’ म्हणायची. ताटातली भाकरी मोजून बघायची. तब्येत ठीक नाही का? तुम्हाला बरं नाही का? म्हणून विचारायची; पण आता सूर्य डोक्यावर आला तरी जेवणाचा पत्ता नाही. आबा उगीच दारात सून ‘आतातरी जेवा म्हणलं, मग तरी जेवा म्हणलं’ म्हणून वाट बघत बसायचे. पोटात भुकेनं कावळे ओरडायला लागलेलं असायचं. मग आबाला दम निघायचा नाही.

“सुनबाय, स्वयंपाक झाला असंल तर वाढ की जेवायला.”

“म्हातारपणात भूका तर कशा लागतात काय माहीत? उठलं सुटलं की वाढ जेवायला.” दोघीतली एक सुनबाई कुरकूर करायची.

त्यांनी सकाळी पोहे, शिरा किंवा उप्पीट असा नाश्ता केलेला असायचा. त्यामुळे त्यांना भूक लागत नसायची. दुपारी जेवलं तरी चालायचं; पण आबा कुठला काय? त्यांना भूक लागायची. शिळं पाळं जे असंल ते ताटात घालून सुनबाई ताट आबांपुढे आपटायची.
“गिळा.”

उतारवयात आबाला बी.पी. व डायबेटिस होऊ नये म्हणून काळजी घेत असाव्यात.

आबांचा वय झालेलं होतं. वाढलेला घास गिळवत नव्हता, तसाच तोंडातून फिरायचा. सगुणाची आठवण व्हायची. आबा कसंतरी चार घास पोटात ढकलायचं आणि बाहेर निघून जायचं. गावातल्या पारावर, चौकातल्या कट्ट्यावर, मारुतीच्या देवळात नाहीतर, गावाकडच्या चिंचेच्या, वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचं, तेथेच थोडं लोळायचं. सारं उदास उदास आबांचं जिणं झालेलं. मोठी लेक नाही म्हणून दोन्ही सूना लेकीसारख्या मानल्या; पण दोघीही एक शब्ददेखील बोलत नाहीत. घरात घरपण राहिलं नाही. एखादा आलाच तर विचारतो,

“काय आबा, बरं हाय का?”

“व्हय बाबा. बरं हाय की.”

मनातलं दु:ख जिवाभावाचं कोणाजवळ बोलायचं?

आबा मनातल्या मनात कुढत राहायचं.

आबांची दोन्ही पोरं चांगली. दररोज दोघांपैकी एकजण आबांच्या जवळ बसायचा, बोलायचा. “काय म्हणायचा, आबा वाटून द्या की.”

मग आबा म्हणायचं, “आरं काय वाटून द्यायचं? हाये हे सगळं तुमचंच हाये की. आता करताय तसंच कष्ट करा, पिकवा आन गुण्यागोविंदानं खावा. घराची घरफोड बरी न्हाई. एकदा आळा इस्कटला की पुन्हा एक व्हत नाय. दोघांनी मिळून कमवा अन् मिळून रहावा.”

परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दोन्ही पोरांना वाटून घ्यायची घाई झाली होती.

आबाला पाच एकर जमीन. नवरा-बायको जमिनीत राबायचे, कष्ट करायचे. दिवस म्हणायता नाही रात्र म्हणायची नाही, घाम गाळायचे, उत्पन्न काढायचे. पांढरं धोतर, पांढरा सदरा, डोईवर तांबडा फेटा. आयुष्यभर हा पोशाख. कसदार शरीर, सगुणाची साथ. गाडी भरून माल शेतातून घरी आणायचे. ओसरीला पोती ठेवायला जागा कमी पडायची.

दोन्ही पोरं तालमीत ठेवलेली. त्यांना कधी कष्ट माहीत होऊ दिले नाहीत. दुधासाठी म्हैस, खाऊन पिऊन पोरं हत्तीवाणी पोसलेली; पण लग्न झाली आणि पोरांना बायकांनी ताब्यात घेतलं. दोन्ही पोरं बाईल बुद्धीची निघाली. त्यांनी वाटून द्यायचा लकडा सारखा आबामागं लावला होता.

वाटण्या झाल्या की आपआपला राजाराणीचा संसार! काही कर्तृत करून दाखवता येईल, कमावून दाखविता येईल, गावात नाव होईल. त्यामुळे शेत, घर, सोनं-नाणं, पैसा-अडका वाटून मागत होते; पण आबा चालढकल करीत होते. दोघांनी एकत्र राहावं. एका घरात दोन चुली पेटवू नयेत असे आबांना वाटत होतं.

शेवटी धाकट्याने एके दिवशी आपल्या ऐकण्यातले पाच पंच गोळा केले, थोरल्यानेही त्याची चार माणसं आणली. आबांचा नाइलाज झाला. घरातली भांडीकुंडी, कपडालत्ता, व्हतं नव्हतं ते बाहेर आणलं आणि वाटणी सुरू झाली.

“हंऽऽ एक ताट थोरल्याला. हे दुसरं धाकट्याला, हा एक तांब्या थोरल्याला, दुसरा धाकट्याला, एक त्याला अन एक याला अशी भांड्यांची वाटणी झाली.

एक सतरंजी थोरल्याला, एक धाकट्याला. एक चादर थोरल्याला, दुसरी धाकट्याला.” पंच वस्तू उचलून दोघांना समान वाटण्या करून देत होते.

एक फाटकं घोंगडं होतं. “याचं काय करायचं? फाडून अर्ध अर्ध करायचं का?” एक पंच घोंगडं उचलून म्हणाला.

“नको… नको. ते असू द्या आबाला. आबाला अंथरा पांघरायला नको का?” दुसरा पंच बोलला.

“बरं हे आबाला.” घोंगडं बाजूला ठेवलं. धान्याची वाटणी!

“हे एक गव्हाचं पोतं थोरल्याला, दुसरं धाकट्याला.

हे ज्वारीचं पोतं थोरल्याला, हे धाकट्याला.’,

तेवढ्यात म्हैस ओरडली. जणू ती म्हणत होती, “माझं काय?” तिच्यापुढे गवताची काडीदेखील नव्हती. एकानं म्हशीकडे हात करून विचारले, “म्हशीचं काय करायचं?”

“म्हैस तर एकच हाय. दोन असत्या तर दोघांना एकेक दिली असती.’

“आता कसं करायचं?” एक पंच लिया एका पंचाला विनोद करण्याची हुक्की आली.

“दोघात अर्धी अर्धी करा.” सारे पंच हसले. “व्हय गड्या. दोन तुकडं करा अन एकेक तुकडं दोघांना वाटून द्या.” “तसं नको, दोन तुकडं केल्यावर म्हैस मरल की राहील. मग कसं?” “पुढचा भाग थोरल्याला अन मागचा भाग धाकट्याला.” “म्हणजे थोरल्यानं वैरण खावू घालायची आणि धाकट्यानं दूध पिळायचं!” “वा रे वा.” पंच खल करत होते. विनोद करून हसत होते.

तेव्हा आबा म्हणाले, “म्हशीला वैरणपाणी मी बघतो मला काय काम आहे. दूध त्या दोघांनी घेऊ दे.”

अशाप्रकारे म्हशीची वैरण-पाणी, झाडलोट आबांनी करायची आणि दूध दोघा मुलांनी घ्यायचे हा निर्णय सर्वानुमते करण्यात आला.

“आता घराची वाटणी.”

आबांनी दूरदृष्टीने दोन पोरांसाठी आत-बाहेर अशा दोन खोल्यांचे नियोजित बांधकाम केले होते.

“ही, या बाजूची खोली थोरल्याला, ही इकडली धाकट्याला.’ पंचानं खुलासा केला.

‘अन् आबा रं? आबानं कुठे झोपायचं?” एक पंच “आबा झोपतील ओसरीला.”

“नको. मी आपला देवळात झोपत जाईन.” आबा स्वत:च म्हणाले. आबांनी स्वत:च देवळात झोपायचं कबूल केलं. घराची वाटणी झाली.

“आता शेताची वाटणी.

“पाच एकर जमीन आहे. दोन एकर थोरल्याला, दोन एकर धाकट्याला अन एक एकर आबाच्या नावावर असू द्या.” पंचानं सर्वांकडे नजर फिरवली.

“व्हय. व्हय… आबांच्या नावाचा उतारा असू द्या.” दुसऱ्या पंचानं पाठिंबा दिला.

तेवढ्यात धाकटा म्हणाला, “आबाच्या नावावर कशाला?’ अडीच अडीच एकर करा. आबांचं आता किती राहिलं? पुन्हा खातेफोड करायला तलाठ्याकडे जावं, तालुक्याला तहसील कार्यालयात हेलपाटं घाला. पुन्हा कोणी हेलपाटं घालायचं?”

काय किया “व्हय गड्या! आबा काय आता पिकलेलं पान! पुन्हा कोणी निस्तरायचं? त्यापरीस अडीच अडीच एकर दोघांच्या नावावर करा.” एका पंचानं सविस्तर ” स्पष्ट केले. त्याला सर्वांनी होकार दिला. शेत झालं.

पैसा-अडका, सोनं-नाणं काही नव्हतंच. जे सोनं होतं ते सगुणानं अगोदरच दोन्ही सुनांच्या अंगावर समान घातलेलं होतं. अशा प्रकारे सर्व चीजवस्तूंची समान वाटणी झाली; पण एका पंचानं मुद्दा उपस्थित केला.

“वाटणी झाली खरी, पण आबानं जेवायचं कुणाकडं? का त्यांनी हवेवर जगायचं?

ही गोष्ट खरी होती. आबांनी खायचं काय? सगळे पंच एकमेकांकडे पाहू लागले. दोन्ही पोरं एकमेकांकडे आणि हळूच आपल्या बायकांकडे पाहत होती. बायका नकळत नकार दर्शवित होत्या. दोघांपैकी एकजणही जन्मदात्या पित्याला “मी खाऊ घालतो’ म्हणत नव्हता.

तेव्हा एका पंचाने तोडगा काढला. “आबा सकाळी थोरल्याकडं आणि संध्याकाळी धाकट्याकडं जेवतील. हाय कबूल?

दोन्ही पोरांनी होकारार्थी माना हलवल्या. अशा प्रकारे आबांच्या जेवणाची वाटणी झाली आणि पंच आपापल्या घरी निघून गेले.

वाटण्या झाल्यामुळे दोन्ही पोरं आणि सुनांना आनंद झाला होता. कर्तृत्व नसताना आयत्या वडिलार्जित इस्टेटीचे मालक होऊन मिरवायला कोणाला आवडत नाही!

आबांची मात्र खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली. सकाळी थोरल्याच्या दारात आबा जेवणाची वाट बघत बसायचे. सूनबाई नुसतंच घरात मिरवायची; पण आबाला जेवायला देत नव्हती. आबानं जेवायला मागितलंच तर…

“ऊठसूट म्हातारं जेवायला मागतंय. सकाळ संध्याकाळचं एकदाच खातंय काय कुणास ठाऊक. थोरली फडाफडा बोलायची. आबाची कुत्र्यावाणी गत झाली.

आबा कसंतरी चार घास खाऊन बाहेर निघून जायचे. रात्री जेवायला जायची इच्छाच व्हायची नाही. कधी जेवायचं, तर कधी तसंच उपाशी देवळात घोंगड्यावर झोपायचं. दिवस कसातरी जायचा. एखादं दुसरं माणूस देवळात यायचा. “रामकृष्ण हरी, जय हनुमान, मारुतीराया.” म्हणून हात जोडायचा. आबाजवळ थोडं टेकायचा, थोडं बोलायचा आणि निघून जायचा. रात्री आबा एकटंच असायचं. आला दिवस ढकलला पाहिजे म्हणत मनातल्या मनात झुरायचं. बोलायचं कुणाला? अलीकडं काळ बदललाय. म्हाताया माणसाला घरात थारा नाही.

आबा आजारी पडलं, अंगात ताप भरला. छाती भरून आली होती, सारं अंग ठणकत होतं. आबा खोकत खोकत देवळाच्या कोपऱ्यात पडून व्हतं. देवापुढे केवळ एक तेलाचा दिवा मिणमिणत होता बाकी सगळीकडे अंधारच अंधार! आबा खोकत व्हतं, तेवढ्यात त्या गावचे गुरुजी देवापुढे उभं राहून दर्शन करत होतं. खोकल्याचा आवाज ऐकून त्यांनी विचारलं, “कोण आहे ते?”

आबांनी गुरुजींचा आवाज ओळखला.

गिक “का वं गुरुजी? मी हाय.” गुरुजींच्या ओळखीचा आवाज.

“कोण आबा? कोण आबा तुम्ही?”

यो “व्हय हो गुरुजी. मीच हाय.” या “आबा इथं काय करताय? अंधारात अंऽऽ.”

गुरुजी जाऊन आबाजवळ बसलं. जिवाभावाचा माणूस म्हणून आबांनी सगळा इतिहास सांगितला. वाटण्या झाल्या, मुलांचं दुर्लक्ष, सुनांचं बोलणं, साऱ्या गोष्टींचं रामायण आबांनी भडभडून सांगितलं. आबांचं मन मोकळं झालं. भरून आलेलं आभाळ ओसरलं. आबा डोळे पुसत शेवटी म्हणालं, “गुरुजी, जगण्यात काय राम नाय बघा! म्हातारपण आणि कुतरपण सारखंच! आता मेलेलं बरं! करायचे काय जगून!”

मामा मात्र जा गुरुजी दिलगीर झाले. एकेकाळचा आबांचा रुबाब त्यांना आठवला. गावात केवढा दरारा होता, किती मान होता. आबा रस्त्यानं चाललं तर नमस्कार केल्याशिवाय माणूस पुढे जात नव्हता. सगळा गाव पोसायची आबांची ताकद होती. दारात आलेलं माणूस रिकाम्या हातानी परत जात नव्हता. अशा आबांची ही अवस्था! गुरुजींनी थोडा विचार केला.

“आबा, तुम्ही काळजी करू नका, तुमची दोन्ही पोरं माझ्या हाताखाली शिकल्याती. त्यांचं कान उपटतो. तुम्हाला ती बोलवायला येतील. तुम्ही घरी जा.”

“काय नको बगा गुरुजी. कुणाची पोरं आनि कुणाचं घर?”

‘आबा, असं निराश होऊन बोलू नका. मी चलतो.” माया पोरांची कशी कानउघाडणी करायची, या विचारात गुरुजी आबांच्या घरासमोर आले.

थोरला नुकताच जेवण करून ओट्यावर तंबाखू मळत बसलेला होता. अंधारातून कोणीतरी येत असल्याचा अंदाज घेत असतानाच एकदम साक्षात गुरुजींना पाहून तो म्हणाला, “कोण गुरुजी? एवढ्या रात्रीचं हिकडं कसं काय?

“आलो सहज फिरत फिरत.

“या…या… बसा.

गुरुजींना सतरंजीवर बसायला जागा दिली. गुरुजी बसले. बायकोला पाण्याचा तांब्या आणायची ऑर्डर दिली. सुरूवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.

जाणे चा”पाऊस काय पडंना बघा गुरुजी. पिकं वाळून चालली.

“होय. सगळीकडंच न्हाई. दुष्काळाची चिन्हं हाईत.’

पाऊस-पाण्याचं बोलणं झालं. विदर्भ मराठवाड्यात भयाण परिस्थिती आहे. अन्नधान्याची उणीव, गुरांना चारा नाही. विहिरी आटल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली., त्याच परिस्थितीला कंटाळून, नापिकीमुळे हताश होऊन, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी विषयावर बरंचसं बोलणं झालं.

मग पुण्या-मुंबईच्या गोष्टी झाल्या. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणावर, सरकारवर बोलून झाल्यावर गुरुजींनी विषयाला हात घातला.

“आबा दिसत न्हाईत, आबा कुठायंत?’

“असतील की देवळात.”

“घरी येत न्हाईत का?”

‘कधी येतात, कधी न्हाईत, त्यांच्या मनावर असतं.”

मग गुरुजींनी जरा जवळ सरकून खालच्या आवाजात प्रश्न विचारला, “आबानं तुला सांगितलं की न्हाय अजून?”

“कशाचं ओ गुरूजी? कशाबद्दल म्हणताय?’

“पैशाचा आणि सोन्याचा हंडा कुठं पुरुन ठेवलाय, ते सांगितलं का नाय अजून?”

“न्हाय अजून. सोनं न् पैसं हायेत म्हणता?”

“सोन्याच्या कांडी आणि चांदीचे राणीछाप रुपये. येडा का शाना हायेस? आरे, काय आबाचा रुबाब व्हता! किती धान्य पिकायचं. आबाजवळ लई सोनं आन पैसे हाय. ते त्यांनी कुठंतरी पुरून ठेवलं असंल. गोड गोड बोलून आबाला विचारून घे. आबाला चांगलं चुंगलं खायाला घाल. त्यांची मर्जी मिळव, त्यांच्या पोटात शिर आन् विचारून घे कुठं पुरून ठेवलंय ते. अरे, हे पिकलं पान, कधी गळून पडल. मग बसा बोंबट्या मारत.

थोरल्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला गुरुजींचं म्हणणं पटलं. त्याला आबांची कारकीर्द आठवली.

“व्हय की हो गुरुजी, माझ्या लक्षात आलंच न्हाय.”

‘मग बघ गड्या, तेवढं आबाला विचारून घे. नायतर पश्चात्ताप करत बसावं लागंल, म्हणून म्हणतो.”

का थोरल्यानं ही गोष्ट बायकोला सांगितली. दोघांनी रात्रभर विचार केला. आपण ही गोष्ट आबाला विचारून घ्यायचीच, असा निश्चय केला.

या सकाळी दिवस उजाडायला थोरला देवळात गेला.

“आबा, चला की घरी! आंघोळ करून, चहा-पाणी घेऊन अजून परत या. चला.

जगाआबा कण्हत कण्हतच म्हणाले, “कशाला आत्ता घरी? उठू वाटत न्हाय बघ, उगं पडून राहावं वाटतंय.”

‘चला घरी. अंघोळ केल्यावर बरं वाटल.”

आज दिवस कुणीकडे उजाडलाय तेच आबाला कळत नव्हतं. कधी दोन शब्द गोडीनं न बोलणारा पोरगा आज प्रेमानं घरी येण्याचा आग्रह करीत होता.

आबा कसंतरी लटपटत घरी आले तर सूनबाईनं आंघोळीला गरम गरम पाणी उतरलेलं व्हतं. लाईफबॉय साबण.रोज विहिरीवर थंड पाण्यानं आंघोळ करणा-या आबांना गरम गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर हलकं हलकं वाटायला लागलं. तेवढ्यात गरम गरम पोहे, चहा आला. आबाला समाधान वाटलं. थोड्याच वेळात आबाचं आवडतं पिठलं भाकरी, कांदा जेवायला! सकाळचं जेवण करून आबा देवळात आला. रात्री जेवायला या म्हणून थोरल्या आग्रहानं सांगितलं होतं.

आज थोरला आबाची इतकी का सेवा करतोय हे धाकट्याला कळत नव्हतं.

गुरुजींनी धाकट्याला चौकात गाठलं आणि आबाजवळच्या सोने आणि पैशाबद्दल थोरल्याप्रमाणंच सांगितलं. थोरला आबाला गोड बोलून विचारून घेईल आणि तुला बसावं लागेल तसंच बोंबट्या मारत हे देखील समजावून सांगितलं. धाकट्याच्या डोक्यात प्रकाश पडला.

रात्री जेवण झाल्यावर थोरल्यानं आबाला जवळ बसवून विचारलं, “आबा, तो सोन्याचा आणि पैशाचा हंडा कुठे पुरून ठेवलाय हो?”

“अरं लेका, कुठलं सोनं आणि कुठला पैका? तुम्हाला लहानाचं मोठं करता करता सगळं गेलं. तुमची थाटामाटात लग्न केली कुठला पैसा आणि कुठलं सोनं?

आबा तसं सांगायचे नाहीत. अजून आबाला चांगलं जपलं पाहिजे. त्यांच्या पोटात शिरलं पाहिजे तरच आबा सांगतील असा विचार थोरल्यानं केला.

धाकटा थोरल्याचं बारीक निरीक्षण करीत होता दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी धाकटा देवळात गेला. “आबा, चला की घरी. आंघोळ, नाष्टा, चहा, जेवण करून परत या. चला..

आबांना आजही आश्चर्य वाटलं. धाकट्याचं मन कसं वळलं, हे कळेना.

आबा घरी आले. धाकट्या सुनेने आंघोळीला कडक पाणी उतरले होते. लक्स साबण आणला होता. आबांची आंघोळ झाली. बरं वाटलं. गरम गरम शिरा, चहा, नाष्टा झाला. पुरणपोळीचा स्वयंपाक! जेवण करून आबा देवळात आले. रात्री जेवायला या बरं का!’ धाकट्याने आग्रहाने बजावले. रात्री जेवायला कोंबडीचं मटण. आबांचा जेवण झाल्यावर धाकटा जवळ येऊन बसला, आणि हळूच म्हणाला, “आबा, तो पैसा आणि सोन्याचा हंडा कुठं ठेवलाय वो? घरातच आहे की शेतात पुरलाय?”

“अरे लेका, कुठला हंडा? तुम्हाला वाढवता वाढवता सर्व खर्च झाले. थाटामाटात लग्न केली कुठला हंडा रं?”

धाकटा विचारात पडला. आबा तसं सांगायचे नाहीत. अजून थोडं आबाला जपलं पाहिजे. गोड बोलून पोटात शिरलं पाहिजे तरच आबा सांगतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी थोरला पुन्हा आबाला बोलवायला गेला. अंघोळीला गरम पाणी, मोती साबण आणलेला. थोरली सूनबाई आली.

“आबा, थोडी पाठ घासू का? खूप दिवस झालं तुमची पाठ घासली न्हाय.”

आबा नको म्हणत असताना एका खरबरीत दगडानं थोरल्या सूनबाईनं आबांची पाठ घासली. पाठ लालभडक झाली. चरचरायला लागली. गरम गरम उप्पीट, चहाचा नाष्टा झाला. जेवणाचा बेतही चांगला होता. मटणाचा रस्सा. आबांनी पोटभर खाल्लं.

प्रत्येक दिवशी पैसे आणि सोन्याच्या हंड्याविषयी पोरं का विचारतात हे गणित आणि गूढ आबांना कळलं नव्हतं.

सोन्याच्या हंड्याविषयी आबाला विचारून घ्यायची स्पर्धाच लागली होती.

अखेर पंधरा दिवस होऊन गेले. खाऊन-पिऊन आबा गुटगुटीत झाले; पण आबा पैसे आणि सोन्याच्या हंड्याविषयी काहीच सांगत नाहीत म्हटल्यावर आबांकडे पुन्हा दुर्लक्ष होऊ लागलं. उतारवयात कितीही चांगलं खाल्लं तरी शरीर साथ देणार आहे थोडंच! असा महिना गेला.

एके दिवशी आबा पुन्हा आजारी पडले. आबांच्या अंगात त्राण उरलं नव्हतं. आबांना उठता-बसता येत नव्हते. नीट बोलताही येत नव्हतं. पुढच्या ओसरीवर कॉटवर आबा पडून होते. ते बेशुद्ध झाले होते. दोन्ही मुलांना आणि सुनांना खूप दु:ख झाले होते. आबा मरतील याचं नव्हे तर आबांनी हंडा कुठं पुरून ठेवलाय ते सांगितलं नसल्याचं दु:ख सर्वांना झालं होतं.

थोरला धावत डॉक्टरकडे गेला. जादा व्हिजीट फी देऊन डॉक्टरला घेऊन आला. औषधांचा उपयोग होत नव्हता. तरी डॉक्टरना म्हणाला, “डॉक्टर, आबांना बोलतं करा.”

डॉक्टरांनी विचार करून सांगितलं, “बोलतं कसं करायचं? एक इंजेक्शन दिल्यावर थोडंसं बोलतील, पण त्याला पाचशे रुपये लागतील.

“ठीक आहे. हे घ्या पाचशे रुपये. पण आबांना बोलतं करा.”

डॉक्टरांनी पाचशे रुपयाचं इंजेक्शन आबांना दिलं. दोन्ही मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. थोरला उशाला, धाकटा पायथ्याला, त्यांच्या बायका आपापल्या नवयांच्या पाठीमागे तोंडाला पदर लावून उभ्या होत्या.

आबांची थोडीशी हालचाल झाली. आबांनी डोळे उघडले. किलकिल्या डोळ्यांनी नजर इकडे तिकडे फिरविली. थोरला आबांच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, ‘आबा, बोला. काय सांगायचं असेल ते सांगा. बोला.

इकडे तिकडे पाहून काही न बोलताच आबांनी डोळे मिटले. शांत पडून राहिले.

मग धाकटा पुढे सरसावला, “डॉक्टर, मीही पाचशे रुपये देतो जरा जास्त औषध भरा. मोठं इंजेक्शन भरा. पण आबांना बोलतं करा.’

डॉक्टरांनी जरा जास्त औषध भरून आबांना इंजेक्शन दिले. पॉवर जास्त असल्यामुळे आबांनी चटकन डोळे उघडले. थोडीशी हालचाल झाली. ओठ थरथरले. धाकटा आबांच्या कानाशी जाऊन म्हणाला, “आबा बोला, आबा बोला.”

आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांनी उजवा हात वर केला आणि दोन बोटं वर केली. ओठ थरथरले..

“काय म्हणता आबा? दोन हांडे हाईत म्हणता?

कुठं पुरलं ते सांगा. बोलाऽऽ आबा बोला.”

आबांनी नकारार्थी मान हलवली. आता आबांच्या अंगात थोडा जीव आला होता. दोन बोटे वर नाचवीत आबा हळू अस्पष्ट आवाजात पुटपुटले,

“आरं पोरानूं, कुठला हंडा अन कुठलं काय? मीऽऽ तुमच्या लग्नाला गुरुजींकडून… दोन हजार रुपये… उसने घेतले होते… ते अजून परत केलेले नाहीत… तूऽऽ एक हजार…आणि तऽऽ एक हजार…असे ते परत कराऽऽ माझ्याऽऽ आत्म्यालाऽऽ शांतीऽऽ लाभेलऽऽ…’

अशा प्रकारे आबांनी वाटणी केली आणि डोळे मिटले.

ते पुन्हा कधीच न उघडण्यासाठी…

-प्रा. भास्कर बंगाळे


८४/५ब/२/१, माळी वस्ती, टाकळी रोड,
पंढरपूर – ४१३ ३०४
मो. ९८५०३७७८८१
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०२० मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..