नवीन लेखन...

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ७

USA - Rutuchkra - Part 7

नोव्हेंबर डिसेंबरमधे कधी तरी हिमवृष्टी सुरू होते. गाडी चालवताना जर हिमवृष्टी होत असेल, तर काचेवर येणारे हे हिमकण, जणू आकाशातून अलगद उतरत येत असतात. गाडीच्या बाजूच्या काचेतून हिमकणांचा वर्षाव बघत रहावा. गाडीच्या वेगाप्रमाणे यांचा देखील वेग बदलल्या सारखा वाटतो. एरवी अलगदपणे उतरणारे हे हिमकण, गाडी वेगात जात असली म्हणजे पावसाच्या सपकार्‍यासारखे जोरात येऊ लागतात. सारा आसमंत असंख्य पांढर्‍या शुभ्र हिमकणांनी भरून जातो. आपल्याकडे पावसाळ्यात आभाळात बसून दळण दळणारी म्हातारी आजीबाई, इकडे हिवाळ्यात येऊन आभाळात कापसाची बोंडं फोडत बसते. मग त्या बोंडांतून निघणार्‍या पांढर्‍या शुभ्र म्हातार्‍या, लाखो पर्‍यांच्या पंखांवर बसून चहूबाजूने तरंगत तरंगत जमिनीवर उतरू लागतात. सुरवातीला रस्ते नुसते ओले होतात. मग जसजशी हिमवृष्टी वाढू लागते, तसंतसं हे बर्फ जमिनीवर, रस्त्यावर चिकटू लागतं. बघता बघता त्यांचा चांगला पांढरा शुभ्र थर तयार होतो.

हळू हळू पांढर्‍या रंगाने काना कोपरा भरून जातो. झाडांच्या फांद्यांवर, फांद्यांच्या बेचक्यामधे, झुडपाच्या काटक्यांवर बर्फ साचू लागतं. सूचिपर्णी वृक्षांच्या हिरव्यागार छत्र्या बर्फ तोलत उभ्या रहातात. रानावनात बर्फाची पेरणी करावी तशी जमीन बर्फाने झाकली जाते. घरांच्या छपरांवर, खिडक्या दारांच्या वरच्या पट्ट्यांवर, कुंपणांवर, पायर्‍यांवर, बर्फाच्या पांढर्‍या पट्ट्या दिसू लागतात. पार्क करून ठेवलेल्या गाड्या बर्फाने झाकल्या जाऊन जणू बर्फाची मॉडेल्स करून ठेवली असावीत, तशा दिसायला लागतात.

हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजामुळे येणार्‍या हिमवादळाची (snow storm) आगाऊ कल्पना असतेच. त्यात हिमवादळ जवळ आल्याच्या सूचना रेडिओ आणि टी.व्ही. वर येऊ लागल्या की snow scrappers, ट्रक्स वगैरे जय्यत तयारीनिशी बाहेर पडतात. मोठ्या आणि अधिक रहदारीच्या रस्त्यांवर, लवकर बर्फ वितळण्यासाठी ट्रक्स मधून salt टाकलं जातं. पण आजूबाजूचे छोटे किंवा कच्चे रस्ते मात्र तसेच बर्फाच्छादित रहातात.

हिमवर्षाव फारच जोरात सुरू झाला की गाड्यांचा वेग मंदावतो. वातावरण कुंद झालेलं असतं. रस्त्यांवर साठलेल्या बर्फांमधे पुढच्या गाड्यांच्या चाकांचे ठसे उमटलेले असतात. आधीच कमी जाणवणारी माणसांची वर्दळ आणखीनच कमी जाणवायला लागते. रस्त्यावरची रहदारी खूपच कमी होते. वाटेतल्या एखाद्या छोट्या गावातल्या घरातला मंद दिव्याचा उजेड हवाहवासा वाटायला लागतो. बर्‍याच काळ चाललेल्या हिमवृष्टीने, चांगला काही इंचांपासून ते १-२ फुटांपर्यंत बर्फ साचतो. Snow scrappers रस्त्यांवर फिरत, रस्त्यांवरचा बर्फ रस्त्याच्या कडेला ढकलून देतात. वरचे वर हिमवृष्टी होत राहिली तर रस्याच्या कडेला अशा लोटलेल्या बर्फाचे चांगले २-४ फूट उंच असे बंधारे तयार होतात. ते चांगले मार्च एप्रिलपर्यंत रहातात. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांच्या धुराने, मातीने, ते पांढरे शुभ्र बंधारे हळू हळू मातकट, काळसर होऊन जातात. दुकानांच्या पार्कींग लॉट्समधे, घरांच्या आगेमागे, चर्चेसच्या प्रांगणांमधे, शेत मळ्यांच्या बांधावर, असे साचलेले बर्फाचे ढीग महिनोन महिने पडून असतात.

रात्री गाडी चालवताना जर हिमवर्षाव होत असेल, तर येणार्‍या जाणार्‍या तुरळक गाड्यांच्या प्रकाशझोतात पडणारे हिमकण, सोनेरी झळाळी घेऊन चमकायला लागतात. वाटेवरल्या छोट्या गावांमधल्या काही चुकार दिव्यांच्या मंद चंदेरी प्रकाशात अलगद उतरणारे हिमकण, पावसाळ्यात कंदीलाभोवती गर्दी करणार्‍या चिलटांसारखे वाटायला लागतात.

पेनसिल्व्हेनीयाच्या या डोंगराळ भागातून जाता येता सह्याद्रिची आठवण आल्याशिवाय रहात नाही. फरक एवढाच की सह्याद्रिचे कभिन्न कातळ वार्‍या पावसाने झोडपले जातात आणि उन्हामधे पोळले जातात तर इथले दगड धोंडे बर्फाने झाकले जातात. रस्त्याकडेच्या डोंगरांच्या भिंतीतून पुढे आलेले दगडांचे कोपरे, कंगोरे माथ्यावर बर्फाच्या टोप्या घालून स्वस्थ बसलेले असतात. हिमवर्षाव संपून गेला की त्यांच्या या पांढर्‍या टोप्या बरेच दिवस तशाच असतात. काही ठिकाणी बर्फ थोडंसं वितळून, त्याचं पाणी दगडावरून खाली पडायला बघत असतं पण थंडीच्या प्रभावाने ते परत थिजतं आणि दगडाच्या टोकाला बर्फाचे लटकते लोलक तयार होतात. काही काही ठिकाणी, कातळावरून पडणार्‍या पाण्याचे असे थिजलेले धबधवे झालेले पहायला मिळतात.

इथल्या डोंगरांच्या आणि टेकड्यांच्या या न संपणार्‍या रांगांमुळे, या भागातल्या डोंगर रांगांना endless moutains असंही एक नाव आहे. त्यांच्या अंगभूत निळाईमुळे त्यांना blue mountains असं देखील संबोधलं जातं. डोंगरांच्या या निळ्या जांभळ्या लाटा, त्यांच्या माथ्यावर चमकणारं शुभ्र धवल बर्फ आणि दर्‍यांमधे साचलेलं आणि रुप्यासारखं झळाळणारं बर्फ, यांचं एक अजब मिश्रण होऊन जातं. कधी कधी या क्षितीजापर्यंत पसरलेल्या डोंगर रांगा म्हणजे एक अजस्र वळवळणारं जनावर वाटतं. जमिनीवर पडलेल्या बर्फामुळे या जनावराची कातडी पांढरी धप्प वाटत असते तर पर्णरहित झाडांची गर्दी त्या कातडीवरच्या राठ केसांप्रमाणे वाटत असते.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..