नवीन लेखन...

“जुन्या भांड्यांची शोभा अन् थाट”

विसावं शतक उजाडलं ते नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनाने. मनुष्याला चैनीसाठी लागणार्‍या या वस्तुंच्या आविष्कारानं, साहजिकच त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही जाणवला व वापरातल्या वस्तुंच्या जागेवर त्याच पद्धतीच्या पण पूर्णत: विज्ञानाच्या प्रगतीमुळे उगम झालेल्या वस्तु हळुहळु आपल्या जीवनाभोवती रेंगाळु लागल्या. त्यानंतर या वस्तु जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या. भारतही याला अपवाद नव्हता. पुरातन आणि वैविध्याची खाण असणार्‍या आपल्या देशातही विज्ञानाचे वारे वाहू लागले. जीवन सुखकर झालं, ज्ञानाच्या प्रसारामुळे मानवाचा उद्धार होतोय याचा आनंद होताच. पण, एक एक करुन वापरातल्या वस्तु जाऊन त्याजागी सो कॉल्ड “रोबोटिक वस्तु” थडकल्यामुळे जुनी भांडी, पाटा-वरवंटा, जातं, गंगाळ, तांब्या, तपेलं, बंब, उखळ आपल्यातून नाहिशी होऊन एखाद्या संग्रहालयातील शोभा होऊन बसल्या. आजही तांबा, पितळ, बिडं, जर्मन सिल्व्हर, चिनी माती या पासून बनलेली भांडी किंवा वस्तु पाहतो तेव्हा मन त्यांच्यात रमून जातं. कारण अनोखं नातं या भांड्यांनी व वस्तुंनी जुन्या पिढीतल्या लोकांशी प्रस्थापित केलेलं आहे.

साधारणत: ६० व ७० च्या दशकापासून स्टीलचा उपयोग हा घराघरातून होऊ लागला. स्टील स्वस्त झालं. त्यापासून बनणार्‍या वस्तु या वजनाने थोड्या हलक्या आणि साफ केल्यावर चकाचक दिसतात. कारण त्याच्या देखभालीसाठी फारसे कष्ट लागत नसत. लोकांनी सुद्धा तांबा, पितळची भांडी मोडीत काढत त्याजागी स्टील विकत घेतलं. सुरुवातीला स्टीलची टाकी किंवा हंडा-कळशी, त्यानंतर एक एक करुन सर्वच वस्तु अगदी छोट्या चमच्यापर्यंत स्टीलमय झाल्या व स्टील ची भांडी हा नित्याचा भाग होऊन गेला ते आजतागायत. आजकाल तर नॉनस्टीक आणि प्लास्टिकचा वापर सुद्धा होताना दिसत आहे. सांगायचं मूळ तात्पर्य हे की आपल्या संस्कृती व मूळत: आपल्या असलेल्या गोष्टींपासून आपणच लांब चाललेलो आहोत. असो काळाप्रमाणे मानवाला लवचिक रहाणं क्रमप्राप्त आहे, आणि बदल झाले तरच पृथ्वीतलावर नाविन्याचा स्त्रोत सुरु राहिल व जुन्याचं महत्व व इतिहास अबाधित राहिल.

तांबे व पितळी भांडी आणि अन्य विविध वस्तुंचं महत्व ठाऊक असल्यामुळे केव्हातरी म्हणजे सणासुदीच्या प्रसंगी, कार्यासाठी त्याचा वापर होताना दिसतो. अलिकडे अशा वस्तुंचा ट्रेंड पुन्हा वाढतोय पण प्रमाण कमी आहे. उदाहरणार्थ पाणी पिण्यासाठी एखादा तांब्या, किंवा छोटी कळशी, क्वचित घरांमध्ये जर्मनची भांडी आढळतात पण ते प्रमाण तुरळक असावं, तरीही देवपुजेसाठी आजही तांब्याचा तांब्या, ताम्हण, लोटी, पळी याचा वापर होतो आहे, यात दुमत नाही. आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त असणारे असे हे धातू. आयुर्वेदातही याचं महत्व अनन्यसाधारण आहे. शरीराच्या शुद्धीबरोबरच यात औषधी गुणधर्म असल्याचं सिद्ध झालं आहे व तसं सांगितलं गेलं असून, कोणकोणत्या पदार्थांसाठी तांब, पितळ वर्ज्य करावं याचाही उल्लेख आढळतो. त्याचबरोबर बिडांपासून बनलेली अप्याची अनोखी भांडी उचलायला जड तरी, आकर्षक असतात, व त्यातील लोहसुद्धा शरीराला मिळत राहतं.

विविध धातूंपासून बनलेली भांडी उपयुक्त आहेतच. त्याशिवाय दगडांपासून बनलेली उखळ, पाटा वरवंटा, जातं, चुली या वस्तुंकडे दुर्लक्षित करता येणं मुळी अशक्य. यावर वाटलेल्या व शिजवलेल्या अन्न पदार्थांना वेगळाच आस्वाद व रुचकता असते.

कित्येक उपहारगृहांमध्ये आज याचा वापर केला जात आहे. आपण कधी जर गावाकडच्या जुन्या वाड्यांना भेट दिलीत, तर तिथे राहणार्‍या कुटुंबाकडे हमखास अशा वस्तु वारसाने वापरल्या जात आहेत, ते ही अगदी आत्मीयतेने. इतकच काय तर शोभेच्या वस्तु सुद्धा दिमाखात व ऐटीने तग धरुन आहेत. जर हे गावाकडच्या लोकांना जमू शकतं तर ते आपल्याला का नाही? असा प्रश्न पडतो. खरं तर आपल्यालाही (म्हणजे शहरवासीयांना) त्याचं महत्व कळून चुकलंय पण त्याची देखभाल करण्यासाठी पुरेसा वेळ नाही.

आवड म्हणून तांब्या-पितळ्यापासून बनलेल्या अनेक वस्तु जतन करण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. त्यासाठी लागेल ती किंमत मोजण्याची तयारी असते. मुंबईतल्या चोरबाजारात फेरफटका मारतानाही ही बाब बर्‍याचदा मी अनुभवलेली आहे. या वस्तुंमध्ये केवळ घरगुती वापरातल्या वस्तु आहेत असं नाही तर विविध पुतळे, दिवे, झुंबर, फोन, पेटारे, हुक्का, नक्षीकाम केलेले आकर्षक डब्बे विक्रीस आहेत. पुरातन असलेल्या या वस्तु काही शे रुपयांपासून लाखाच्या घरातही आहेत. थोडक्यात, तांबा-पितळ जे काही दशकांपूर्वी कवडीमोल भावांनी विक्रीसाठी असायचं त्याला सोन्याचांदीचा भाव आला आहे.

एका आणखीन धातूची नोंद घ्यायची आहे ती म्हणजे जर्मन सिल्व्हर. चांदी सारख्याच हुबेहुब वाटणार्‍या पण त्याचा वापर ही ६०-७० च्या दशकापर्यंत व्हायचा. पुढे स्टीलच्या वापरामुळे “जर्मन” किंवा “निकेल सिल्व्हर” च्या वस्तू ही हद्दपार झाल्या.

आज कधीतरी प्रदर्शनातून हिंडताना किंवा एखाद्या संग्रहालयाला भेट देतो त्यावेळी तांबा, पितळ व जर्मनच्या वस्तु विक्रीसाठी तर कुठे फक्त माहिती कळावी म्हणून ठेवलेल्या असतात. थोडसं हसू ही येतं, कारण काल परवा पर्यंत वापरातल्या गोष्टींना आता अॅन्टीकचा दर्जा प्राप्त झालेला आहे. पण नवीन पिढीला त्याविषयी अप्रुपता, उत्सुकता आणि त्याविषयी जाणून घेण्याची घाई असते. कारण त्यांना यात नवलाई वाटत असते. पण त्याचा वापर केलेल्या आधीच्या पिढीतील लोकांना त्या धातूच्या भांड्यांविषयी आपुलकी आहे. जवळीक आहे. जणू त्याच्याशी काही नातं निर्माण झाल्यासारखे त्यामध्ये ते पार गुंग होऊन जातात. “फुल्ली नॉस्टॅलजिक.”

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..