नवीन लेखन...

अतिदक्षता विभागाचे जनक डॉ. जॉन कर्कलीन

जगातील अगदी पहिल्‍या ‘ओपन हार्ट’ शस्‍त्रक्रिया करण्‍याचे श्रेय डॉ. जॉन कर्कलीन यांच्‍याकडे जाते. १९५० च्‍या दशकात डॉ.गिबनने विकसित केलेल्‍या ‘हार्ट-लंग मशीनमध्‍ये’ डॉ. कर्कलीन यांनी काही सुधारणा केल्‍या व त्‍या उपकरणाचा वापर शस्‍त्रक्रियेसाठी केला. आज हृदयावरील शस्‍त्रक्रियांमध्‍ये या उपकरणाचा वापर केला जाते. हार्ट-लंग मशीनचा सुकर व ‘रूटीन’ वापर होण्‍यामागचे श्रेय कर्कलीन यांचे आहे.

५ एप्रिल १९१७ रोजी अमेरिकेतील इंडियाना प्रांतात म्युनिस नावाच्‍या गावात कर्कलीन यांचा जन्‍म झाला. १९४२ मध्‍ये ‘हार्वर्ड मेडिकल स्‍कूल’ मधून त्‍यांनी वैद्यकीय पदवी प्राप्‍त केली. वैद्यकीय पदवी मिळविण्‍यापूर्वी १९३८ मध्‍ये त्‍यांनी मिनेसोटा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते. पेनसिल्‍व्‍हेनिया विद्यापीठाच्‍या फिलाडेल्फिया येथील रुग्‍णालयात त्‍यांनी वैद्यकीय इंटर्न म्‍हणून उमेदवारी केली. त्‍यानंतर मेयो क्लिनिकमध्‍ये त्‍यांनी सर्जरीच्‍या (शल्‍यचिकित्‍सा) अभ्‍यासाला सुरुवात केली. मिनेसोटा विद्यापीठातून त्‍यांनी शल्‍यचिकित्‍सेचे पदव्‍युत्तर शिक्षण घेतले व १९५० मध्‍ये मेयो क्लिनिकमध्‍ये काम करण्‍यास सुरुवात केली.

‘हार्ट लंग मशीन’चा वापर करण्‍यास कर्कलीन यांनी सुरुवात केली, इतकेच नव्‍हे तर हृदयशस्‍त्रक्रियांच्‍या क्षेत्रात त्‍यांनी भरीव योगदान दिले आहे. अतिदक्षता विभागात संगणकीकृत निरीक्षणे ठेवणे व तेथील रुग्‍णांच्‍या अतिमहत्त्वाच्‍या चाचण्‍यांवर सतत लक्ष ठेवणे हे आज आपल्‍या ओळखीचे आहे. परंतु अशा प्रकारचा अतिदक्षता विभाग असावा अशी कल्पना मांडून , त्‍याचे प्रारूप कर्कलीन यांनी सुचविले व आज जगभरात ते अंमलात येते आहे. या प्रारूपाच्‍या वापरामुळे रुग्‍णांची काळजी घेणे सुलभ झाले आहे. त्‍याचप्रमाणे शस्‍त्रक्रियेनंतरची गुंतागुंत कमी झाली आहे व पर्यायाने कित्‍येकांना जीवदान मिळाले आहे.

१९६६ मध्‍ये कर्कलीन यांनी अमेरिकेतील अलाबामा विद्यापीठात सर्जरी (शल्‍यचिकित्‍सा) विभागात कामाला सुरुवात केली व थोड्याच अवकाशात अमेरिकेतील उत्‍कृष्‍ट असा हृदयशल्‍यचिकित्‍सा कार्यक्रम तेथे सुरू केला. कर्कलीन यांच्‍या सन्‍मानार्थ १९९२ मध्‍ये या विभागास त्‍यांचे नाव देण्‍यात आले. आज हा विभाग ‘कर्कलीन क्लिनिक’ म्‍हणून ओळखला जातो.

कर्कलीन यांनी त्‍यांच्‍या ज्ञानाचा कायमच इतरांना उपयोग करून दिला. त्‍यांचे एक महत्त्वाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ते नेहमीच त्‍यांच्‍या विद्यार्थ्‍यांना व सहकार्‍यांना स्‍वतःजवळील माहिती व ज्ञान भरभरून देत असत. त्‍यांनी ७०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले. कित्‍येक प्रख्‍यात वैद्यकीय नियतकालिकांच्‍या संपादकीय मंडळांवर काम केले. ‘द जर्नल ऑफ थोरॅसिक अॅण्‍ड कार्डिओव्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी’ या हृदयशल्‍यचिकित्‍सेला वाहिलेल्‍या नियतकालिकाचे ते संपादक होते.

मेयो क्लिनिक – गिबनहार्ट लंग मशीन. १९५५ मध्ये डॉ. कर्कलीन व त्यांच्या सहकाऱ्यांनीया उपकरणाचा उपयोग ओपन-हार्टशस्‍त्रक्रियांसाठी केला.

त्‍यांनी ‘कार्डिअॅक सर्जरी’ (हृदयशल्‍यचिकित्‍सा) या नावाचे एक पुस्‍तक लिहिले. ते आजही या विषयातील उत्‍कृष्‍ट संदर्भग्रंथ म्‍हणून गणले जाते.

केवळ स्‍वतः डॉ. कर्कलीनच नव्‍हे तर त्‍यांचे सर्व कुटुंबच वैद्यकीय क्षेत्रात आहे. कर्कलीन यांना वैद्यकीय पार्श्वभूमी होती. त्‍यांचे वडील मेयो क्लिनिक येथे रेडिओलॉजी विभागाचे संचालक होते. तर आई देखील डॉक्‍टर होती व अलाबामा विद्यापीठात ‘सर्जन्‍स असिस्‍टंट’ या कार्यक्रमाची संचालक होती. त्‍यांचा पुत्रही हृदयशल्‍यचिकित्‍सक म्‍हणून अलाबामा विद्यापीठातील प्रत्‍यारोपण विभागाचा संचालक आहे.

डॉ. कर्कलीन यांना त्‍यांच्‍या भरीव योगदानाबद्दल कित्‍येक सन्‍मान व पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले. त्‍यातील काही विशेष सन्‍मान –

  • १९७६ सालचे ‘द अमेरिकन हार्ट असोसिएशन रिसर्च अॅवॉर्ड’.
  • ‘द रूडॉल्‍फ मेटास अॅवॉर्ड इन व्‍हॅस्‍क्‍युलर सर्जरी’(हृदय व रक्‍तवाहिन्‍यांची शस्‍त्रक्रिया या विषयासाठीचा हा जगातील अत्त्युच्‍च सन्‍मान आहे).
  • रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्‍स, इंग्‍लंड यांच्‍यातर्फे १९७२ चे ‘लिस्‍टर पदक’.
  • इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सर्जरी यांच्‍यातर्फे दिले जाणारे ‘रेने लेरिश गौरवचिन्‍ह’.
  • अमेरिकन सर्जिकल असोएशनचे शास्‍त्रीय संशोधनातील कामगिरीसाठीचे गौरवपदक.

ह्याव्‍यतिरिक्‍त म्‍युनिक विद्यापीठ, जर्मनी; हॅमलिन विद्यापीठ, अलाबामा विद्यापीठ, इंडिआना विद्यापीठ, जॉर्ज टाऊन युनिव्‍हर्सिटी स्‍कूल ऑफ मेडिसीन, मार्सेल्‍स विद्यापीठ फ्रान्‍स अशा जगभरातील कित्‍येक नामवंत विद्यापीठांतर्फे मानद डॉक्‍टरेटही कर्कलीन यांना प्रदान करण्‍यात आल्‍या.

ते साठपेक्षा अधिक राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय संशोधन मंडळे, अभ्‍यास गटांचे सदस्‍य होते. अमेरिकन असोसिएशन फॉर थोरॅसिक सर्जरीचे १९७८-७९ सालचे अध्‍यक्षपद, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्‍या बोर्ड ऑफ गव्‍हर्नर्स चे १९७३-७४ चे उपाध्‍यक्षपदही त्‍यांनी भूषविले.

हृदयशल्‍यचिकित्‍सेला आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या मदतीने सुकर करणार्‍या या महान शल्‍यविशारदाचे २१ एप्रिल २००४ रोजी निधन झाले.

— डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..