नवीन लेखन...

टीम वर्क ऑनबोर्ड अ शिप

जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते. कॅप्टन बनायचे असेल तर डेक कॅडेट आणि चीफ इंजिनियर बनायचे असेल तर जुनियर इंजिनियर म्हणून जॉईन व्हावे लागते. IAS किंवा IPS झाल्यावर काही महिने प्रोबेशन अधिकारी म्हणून काढल्यावर थेट कलेक्टर किंवा पोलीस अधीक्षक होता येते, जहाजावर कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्याकरिता प्रत्यक्ष जहाजावर प्रत्येक रँक मध्ये काम करता करता पाच ते सहा वर्ष आणि घरी असताना कोर्सेस आणि परीक्षा देत देत म्हणजेच साधारण नऊ ते दहा वर्षं तरी जातात. परंतु जहाजावर डेक साईडला येण्यासाठी नॉटिकल सायन्स ची पदवी किंवा पदविका मिळवावी लागते आणि इंजीन साईडला जाण्यासाठी B.E. मरिन किंवा मेकॅनिकल ची डिग्री लागते. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हे इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून जहाजावर काम करतात. जहाजावर जाण्यापूर्वी प्री सी ट्रेनिंग आणि बेसिक सेफ्टी कोर्सेस करावे लागतात, ज्यामध्ये जहाजावरील एटीकेट्स तसेच शिस्तबद्ध कामाची सवय होण्याकरिता प्रशिक्षण दिले जाते. कॅडेट म्हणून अठरा माहिने काम केल्यानंतर मेट्स ची पाहिली परीक्षा देता येते तसेच जुनियर इंजिनीअर म्हणून सहा महिने प्रत्यक्ष जहाजावर काम केल्यावर क्लास फोरची परीक्षा देता येते. त्यानंतर थर्ड मेट किंवा फोर्थ इंजिनियर म्हणून पहिल्यांदा जहाजावरील जवाबदार अधिकारी या नात्याने नियुक्ती केली जाते. डेक ऑफिसर आणि इंजिनियर यांना त्यांच्या त्यांच्या रँक प्रमाणे कामाची विभागणी करून दिलेली असते. तसेच एका रँक मधून दुसऱ्या रँक मध्ये जाण्याकरिता ठराविक सी टाईम नंतर परीक्षा देणे भाग असते. भारतात भारत सरकार किंवा इंग्लंड, न्यूझीलंड, सिंगापूर आदी देशांत सुद्धा परीक्षा देता येतात. ह्या परीक्षा दिल्यानंतर संबंधित मंत्रालयाकडून पास झालेल्या उमेदवारांना त्या त्या रँकवर काम करण्याचे प्रमाणपत्र किंवा लायसन्स दिले जाते. असे लायसन्स असले तरी कंपनी वरच्या रँक वर प्रमोशन देताना मागील अनुभव तसेच जहाजावरील वागणुकीचा विचार करूनच जहाजावर प्रमोशन देते. त्यामुळे केवळ परीक्षा पास झाले म्हणजे कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होता येते असे नसते.
प्रत्येक रँक मध्ये काम केल्यानंतर अनुभव घेत घेत प्रत्येक अधिकारी वरच्या रँक साठी पात्र होत असतो.
जहाजावर खलाशी आणि सगळे अधिकारी एका टीम प्रमाणे काम करत असतात. सिनियर अधिकारी त्यांच्या जुनियर अधिकाऱ्यांना कामं देऊन ते नीट करतात की नाही यावर लक्ष ठेवून असतात. जहाजावर वॉच सिस्टिम असते म्हणजे चार चार तासाचे दोन वॉच प्रत्येक अधिकाऱ्याला करावे लागतात. यामध्ये डेक ऑफिसर नेव्हिगेशन आणि जहाजाचे कार्गो लोडींग आणि ऑफ लोडींग ही कामे सांभाळतात तर इंजीनियर्स जहाजाचे इंजीन आणि इतर सर्व मशिनरी सतत चालू ठेवत असतात. जहाजावर माल चढ उतार तसेच इतर सर्व कामं ही डेक ऑफिसर आणि इंजिनियर एकमेकांना सांगून आणि कल्पना देऊन सुरळीतपणे पार पाडत असतात.
जहाजावर काम करताना हे माझे काम नाही किंवा मला हे माहीत नाही असे सांगून जमत नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या रँक नुसार कामाची माहिती आणि जवाबदारी असायलाच लागते. यामुळेच प्रत्येक रँक मध्ये काम करण्याचा अनुभव आणि परीक्षा दिल्यानंतच जहाजावर वरच्या रँक पर्यन्त पोहचता येते. जशी रँक वाढते तशी जवाबदारी सुद्धा वाढते.
जहाजावर वातावरणच असे असते की टीम मध्ये काम केल्याशिवाय काम होऊच शकत नाही. टीम मध्ये काम करताना प्रत्येकाचा सल्ला तसेच अनुभवाचे बोल विचारात घेतले जातात. कधी कधी अनुभव नसलेला खलाशी सुद्धा अडलेल्या कामात मार्ग सुचवतो ज्यामुळे खोळंबलेले काम सुद्धा चुटकीसरशी पूर्ण होऊन जातं.
जहाजावर काम करताना मी मोठा किंवा तू लहान असे करणारे लोकं खूपच कमी पाहायला मिळतात. एकमेकांना सांभाळून आणि एकमेकांच्या अनुभवाचा वापर करून टीम वर्क मध्ये काम केल्याने जहाजवरील कामकाज अत्यंत सुरळीतपणे सुरु असतं.
एखाद्या ऑफिस मध्ये मग ते सरकारी असो किंवा खाजगी असो तिथे गेल्यावर बऱ्याचदा जो अनुभव येतो ते बघून इथे काम करणारे कर्मचारी व अधिकारी या सर्वांना पण सर्वात खालच्या स्तरापासून काम करण्याचा अनुभव घेऊ देण्याची व्यवस्था पाहिजे होती असे वाटते. यामुळे तरी यांच्या वागण्यात आणि कामात खूप फरक पडला असता. वयाच्या तिसाव्या वर्षात हुशारी व अभ्यासामुळे एकदम वरच्या रँक वर पोहचता येतं परंतु तीस तीस वर्षं कामाचा अनुभव आणि मॅच्युरिटी येता येता रिटायरमेंट येते.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..