नवीन लेखन...

स्वदेशीचे बदलते स्वरूप

 

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला खासदार रवीप्रकाश कुलकर्णी  यांचा लेख 


शब्दांना अर्थ असतो, पण तो सापेक्ष असतो. कधीकधी तो कालसापेक्षही असतो. कोण कायबोलले आणि केव्हा बोलले याला महत्त्व असतेच… स्वदेशी या कल्पनेचे असेच काहीसे रूप दिसते, मात्र त्याचे प्रकटीकरण वेगवेगळे पाहता येते. स्वदेशी ही कल्पना आधी व्यक्तीला पटावी लागते, मगच त्याची अंमलबजावणी पसरू लागते. त्याचा परिणामही हळूहळू पसरू लागतो.

लोकमान्य टिळकांना १८९७ मध्ये ब्रिटिश सरकारने शिक्षा केली आणि त्यामुळे भारतीय मनात असंतोष निर्माण झाला. सर्वसामान्य नागरिकाला जमेल अशा तऱ्हेने हा राग कसा प्रकट करणे शक्य आहे? या विचारातून स्वदेशीची कल्पना पुढे आली. कारण ब्रिटिश भारतातून कच्चा माल स्वस्तात घेऊन इंग्लंडमध्ये तयार झालेला माल भारतात दामदुपटीने विकून भारतीय जनतेला लुटत असत. अशा प्रकारे भारताची लूट करून, तो पैसा ब्रिटिश त्यांच्या देशात घेऊन जाऊ लागले. ही दोन्ही बाजूंनी नागवणूक होती. याबाबतचा असंतोष कसा व्यक्त करता येईल?

यातून मार्ग असा दिसला की परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा. एवढेच नव्हे तर तो राग प्रकट करण्यासाठी परदेशी मालाची होळी करायची, असे प्रकार सुरू झाले. त्याकाळी आपल्याला साखर परदेशातून आयात करावी लागे, त्यामुळे साखर सोडणे म्हणजे टिळकांना पाठिंबा देणे, असे लोकांना वाटू लागले.

एक स्वदेशीची नवीन कल्पना रूढ झाली आणि स्वदेशी म्हणजे ब्रिटिशांना विरोध हे समीकरण मान्य झाले. लोकमान्य टिळकांना देखील हाच असंतोष हवा होता. त्याला स्वदेशी हे एक नवे हत्यार सापडले !

स्वदेशीचे हे वारे झपाट्याने सर्वत्र पसरू लागले, पण केवळ परदेशीवर बहिष्कार टाकून प्रश्न सुटणार नव्हता; त्याला आपण स्वदेशी निर्मितीची जोड द्यायला हवी असा विचार रत्नागिरीच्या एका नागरिकाच्या मनात होता…

पण निर्मिती म्हटलं की भांडवलाचा प्रश्न आला… भांडवल कुठून आणि कसे उभारायचे? यातून त्याला एक कल्पना सुचली ती म्हणजे आपल्या आजूबाजूच्या बांधवांकडून फक्त एक पैसा गोळा करायचा, जमलेल्या पैशातून कारखाना सुरू करायचा.. त्याला त्याने पैसा फंड असे नाव दिले..

या पैसा फंड कल्पनेचे जनक होते अंताजी दामोदर काळे. १८९९ मध्ये दुष्काळाच्या हृदयद्रावक घटनेतून त्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी हा विचार आणि कल्पना लोकमान्य टिळकांच्या पुढे मांडली. अर्थात लोकमान्यांना या तरुणाचे कौतुक वाटले आणि त्यांनी या गोष्टीला केसरीतून पाठिंबा तर दिलाच, पण वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने मदतही केली.

लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे तर थेंबे थेंबे तळे साचे हे खरेच, पण तो थेंब तळ्यात पडायला हवा, तो हवेत विरून जायला नको. अर्थात अंताजी दामोदर काळे यांनी स्वतः पदरमोड करून प्रसंगी घराकडे पाठ फिरवून पैसा-पैसा गोळा करण्यासाठी जणू रान पेटवले. त्यांचा विश्वास आणि मेहनत पाहून लोकांनी त्यांना मदत केली. त्यातून एक बऱ्यापैकी फंड जमा झाला आणि त्यातूनच भारतातला पहिला स्वदेशी काच कारखाना तळेगाव येथे १९०८ साली सुरू झाला. त्यामुळेच त्याचे नाव पैसा फंड काच कारखाना असे ठरले. काळाच्या ओघात पैसा हे चलन गेले, त्यामुळे पैसा म्हणजे धन या अर्थाने कुणाला वाटण्याची शक्यता आहे. म्हणून लोकांच्या एक एक पैशाने एखादा कारखाना उभा राहू शकतो त्याचे हे जिवंत प्रतीक आहे.. आजही या कारखान्यातून काचेची विविध उपकरणे तयार होतात, विशेष म्हणजे रेल्वे सिग्नलला लागणाऱ्या काचा फक्त इथेच तयार होतात, हा या कारखान्याचा विशेष सांगता येईल. टिळक युगातील ही स्वदेशीची मुहूर्तमेढ म्हणता येईल.

स्वदेशी म्हणजे केवळ बहिष्कार वा विरोध असं नसून निर्मितीची एक वाट आहे हे अंताजी दामोदर काळे यांनी दाखवून दिले.

त्याचाच परिणाम म्हणून असेल, कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा कॅमेरा स्वतः तयार केला आणि सैरंध्री चित्रपटाचे चित्रीकरण केले. एका प्रकारे पौराणिक गोष्ट प्रतीक म्हणून दाखवून, प्रत्यक्षात तो ब्रिटिशांना केलेला विरोध होता. तसंच प्रत्यक्ष माणसाचे धड आणि मुंडके वेगळे झालेले पडद्यावर पाहताना प्रेक्षकांचा थरकाप होई. ते दृश्य पाहून चित्रपटगृहात बायका बेशुद्ध पडायला लागल्या. या गोष्टीचा अर्थातच गवगवा झाला. अर्थात ही गोष्ट लोकमान्य टिळकांच्या कानी गेली. हे आहे तरी काय म्हणून हा चित्रपट पुण्यात आर्यन थिएटर मध्ये लागला तेव्हा ते पहायला गेले.

ही ट्रिक फोटोग्राफी आहे यावर त्यांचा विश्वास बसला नाही. दिग्दर्शक बाबूराव पेंटर यांनी जेव्हा सर्व करामत समजावून सांगितली, तेव्हा लोकमान्य टिळक यांनी बाबूराव यांना ‘सिनेमा केसरी’ अशी पदवी दिली.

दुर्दैवाने त्या काळात सिनेमाला आणि सिनेमातील लोकांना फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे बाबूराव पेंटर यांच्या स्वदेशी कॅमेराचे फारसे कौतुक झाले नाही. स्वतः बाबूराव हे संकोची होते. त्यामुळे त्यांनीही स्वतःची म्हणजे या देशी कॅमेराची जाहिरात केली नाही.

पुढे काय झाले माहीत नाही, बाबुरावांच्या शिष्यांनी पण या कॅमेराबद्दल उत्सुकता दाखवली नाही. परिणामी कॅमेऱ्याचे पुढे काय झाले हे कुणालाही माहीत नाही. कोल्हापुरात एक कॅमेराचे शिल्प आहे तेवढेच. या कॅमेऱ्याची तेवढीच खूण शिल्लक राहिली आहे. त्याकाळी, स्वदेशीचे असे अनेक प्रयोग लोकाश्रय वा प्रसिद्धी न मिळाल्याने विस्मृतीत गेले असतील….

लोकमान्य टिळकांनी मुंबईत बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स सुरू केले. त्यावेळी भारतीय बनावटीची कुठली गोष्ट मग ती खादी असेल, चंदनापासून केलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी असतील, हँडमेड पेपर असेल, वा चामड्याच्या वस्तू. आदी गोष्टी खात्रीशीर मिळण्याचे ठिकाण बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स होते.

पण पुढे ह्या स्वदेशी स्टोअर्सची मालकी बदलत गेली आणि त्याचे स्वदेशीपण देखील विझून गेले. आजही त्या जागी बॉम्बे म्हणजे आता मुंबई स्टोअर्स आहे. पण कुणालाही टिळकांची आठवण म्हणून ते स्वदेशीपण जपावे असं वाटत नाही. याला काय म्हणावे? असो म्हणजे खरंतर नसो !

स्वदेशीच्या इतिहासात डोकावले तर असे दिसते की, एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस स्वदेशीचे वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पसरू लागले होते.

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली स्वदेशी चळवळ, महात्मा गांधींनी पुढे चालवली. सुदैवाने गांधींना तसे अनुयायी मिळत गेले. वर्धा येथे एक हुशार विद्यार्थी अगदी गोल्ड मेडलिस्ट होता. अर्थशास्त्र विषयातील त्याचे नैपुण्य वाखाणण्यासारखे होते. त्यामुळे अर्थशास्त्रातील पुढील अभ्यासाकरता तो अमेरिकेतील विद्यापीठात जाणार होता. विद्यापीठाची तशी परवानगी देखील आली होती. महात्मा गांधींचा आशीर्वाद घेण्यासाठी तो आला. गांधींनी या तरुणाचे सर्व काही ऐकून घेतले आणि ते म्हणाले अर्थशास्त्र शिकण्याकरता अमेरिकेला जाऊन तू काय करणार? तेतिथल्या परिस्थितीला धरून असेल. त्यापेक्षा आपल्या खेड्यापाड्यात येथील परिस्थितीनुसार जो  जाऊन तू अभ्यास मांडशील त्याचा या देशाला उपयोग होईल. तो तरुण काही न बोलता बापूकुटीतून बाहेर पडला, बाहेर पडताच त्याने अमेरिकेहून आलेले विद्यापीठाचे पत्र फाडून टाकले! तेथून त्याने खेड्यापाड्यात जाऊन आपले आर्थिक व्यवहार आणि त्याचे शास्त्र प्रत्यक्ष पाहिले. त्या अभ्यासातून त्यांनी आपले स्वदेशीचे अर्थशास्त्र मांडले. त्याकरता त्यांचे नाव आजही घेतले जाते, हे अर्थशास्त्री म्हणजे ठाकूरदास बंग.

हाच आदर्श पुढे त्यांच्या मुलाने ठेवून सारे आयुष्य स्वदेशीचा अंगीकार करून आदिवासींसाठी व दलितांसाठी वेचले आहे. हा सुपुत्र म्हणजे सर्च संस्थेचे अभय बंग. ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या पुस्तकामुळे ते पांढरपेशी घराघरात पोचले. यात देखील अभय बंग स्वदेशीच्या दिशा दाखवतात. त्यांची पुढची पिढी या कामातच पुढे आली आहे.

स्वदेशीचा वसा, असा तीन-तीन पिढ्यात क्वचितच दिसतो. ही कमाई जशी ठाकूरदास बंग यांची तसेच महात्मा गांधींची देखील नव्हे काय?

प्रश्न नेहमीच असतात, पण त्याची उत्तरे शोधणारा योजक लागतो. ‘योजकस्तत्र दुर्लभ:’ म्हणतात त्याचं कारण हेच आहे. इतिहासात देखील अशी उदाहरणे शोधली तर सापडतात.

छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट घेऊया. महाराजांचा राज्याभिषेक होता तेव्हा इंग्लिश सरकारचा प्रतिनिधी देखील हजर होता. महाराजांना नजराणा देताना तो म्हणाला, महाराज तुमची नाणी अर्थात चलन फारच ओबडधोबड आहे, आम्ही म्हणजे कंपनी सरकार, तुम्हाला आमच्या टांकसाळीतून, छान चकचकीत नाणी करून देऊ शकतो.

तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले, ‘आमचं नाणं चालतं हे महत्त्वाचं आहे. ‘ कंपनी सरकारचा प्रतिनिधी काय समजायचं ते समजला, पुढे मग तो म्हणाला, महाराज आम्ही तुमच्या करता काय करू शकतो?

तेव्हा महाराज म्हणाले, तुम्हाला द्यायचेच असेल तर तोफा पाडण्याची फाउंड्री आम्हाला करून द्या.

त्या काळात आत्मनिर्भर, स्वदेशी असे शब्द नसतील पण महाराजांचा विचार तेच दर्शवतो ना?

शेवटी तुम्ही कसा विचार करता आणि मुद्दा मांडता, त्यावरून तुमची दिशा ठरते. यश अपयश या पुढच्या गोष्टी झाल्या.

गौतम बुद्धांच्या काळातील एक हकीकत…

एका ठिकाणी गौतम बुद्धांनी मठ स्थापन केला आणि तेथे एक प्रमुख नेमला. अर्थात तो त्यांचाच शिष्य असणार. त्या मठाची आणि तेथील शिष्यवर्गाला शिकवायची जबाबदारी त्याला दिलेली असे.

अशा या प्रमुखाकडे, म्हणजे भदंताकडे, एक शिष्य आला आणि तो अंगावर पांघरण्यासाठी उत्तरीय, म्हणजे वस्त्र मागू लागला तेव्हा भदंत म्हणाले, तुझे जुने वस्त्र कुठे आहे? शिष्य म्हणाला, त्या जुन्या वस्त्राचा उपयोग बसायला करत होतो.

भदंत म्हणाले, मग ते बस्तर कुठे आहे?

शिष्य म्हणाला, त्याचा तुकडा मी भांडीकुंडी पुसायला घेत होतो.

भदंत म्हणाले, तो तुकडा कुठे आहे?

शिष्य म्हणाला, त्याच्या नंतर मी दशा काढून वाती म्हणून वापरल्या.

भदंत म्हणाले, शाब्बास !! दिलेल्या गोष्टीचा शेवटपर्यंत उपयोग करायचा. ही गोष्ट तुला कळली आहे. असं म्हणून त्या शिष्याला नवीन वस्त्र दिले.

एखाद्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करणे हे देखील, आत्मनिर्भरता येणे हे एक महत्त्वाचे पाऊल आपण मानतोच.

आज आपण ही गोष्ट जवळ जवळ विसरलो आहोत. युज अॅन्ड थ्रो ही कल्पना आपल्याला परवडण्यासारखी आहे काय? याचा विचार कोणी करायचा? अशावेळी, बुद्धकाळातील हे गोष्ट विचार करण्यासारखी आहे की नाही!

आता थोडे आधुनिक काळाकडे वळू. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा विचार मांडला आणि हा विचार महात्मा गांधींनी बरोबर उचलला. ब्रिटिशांनी आपली खेडी उद्ध्वस्त केली, गावगाडा मोडून टाकला, लोकांच्या हाताला काम राहिले नाही. त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गांधींनी सूतकताई सारखी कल्पना मांडली. परदेशी वस्त्राला हा भारतीय पर्याय होता. पुढे खादी म्हणजे स्वदेशी आणि ही स्वदेशी म्हणजे ब्रिटिशांना विरोध हे समीकरण पक्क झालं होतं.

देशभक्ती म्हणजे खादी वापरणं हे समीकरण आजही कमी-जास्त प्रमाणात दिसतं..

स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यासाठी खरोखर लढणारे होते ते मागे पडले. संधिसाधू लोकांनी मोक्याच्या जागा पटकावल्या आणि शब्दांचे अर्थ बदलू लागले. अर्थाचा अनर्थ होऊ लागला. स्वदेशी म्हणजे कमी दर्जाचा असा अर्थ जनसामान्यात रूढ व्हायला लागला. काळाचा महिमा म्हणतात तो असा.. पण सगळेच बनेल असतात असं नाही. खरं तर, चांगुलपणाने वागणारी जी थोडी माणसं असतात, त्यांच्यामुळेच जग चाललेले असते. अशा चांगलं वागणाऱ्यांच्या शब्दाला मान मिळतो. त्यामुळे अनेकांना प्रोत्साहन मिळते. त्याची पण कहाणी सांगायला हवी..

एपीजे अब्दुल कलाम म्हणजे निःस्पृहपणाची कमाल. त्यांनी अखंडपणे भारताचा विचार केला आणि भारताच्या उत्कर्षाची काळजी वाहिली. त्यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर परदेशात उत्तम काम करणाऱ्या पुरुषोत्तमांना आवाहन केले की तुमची मायभूमी तुम्हाला बोलावत आहे. या आवाहनाला ज्यांनी प्रतिसाद दिला त्यापैकी एक होते डॉ. चंद्रशेखर चव्हाण. मुंबईतून नेत्रविशारद होऊन ते उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेत गेले. तेथे कॉन्टॅक्ट लेन्स बाबतीत त्यांची ख्याती झाली, रत्नजडित कॉन्टॅक्ट लेन्स हा एक विशेष प्रकार बसवावा तो चव्हाण यांनीच, असा त्यांचा लौकिक झाला. हे यश मिळत असतानाच त्यांनी यावरच समाधान मानले नाही. तर संशोधन करून कृत्रिम डोळा बनविण्यात त्यांना यश आले. साऱ्या जगात अजूनही कृत्रिम डोळा बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण डॉ. चव्हाण यांनी बनविलेल्या कृत्रिम डोळ्यामुळे त्याला एक नवी दिशा मिळाली. दृष्टिहीन लोकांसाठी तर ते प्रकाश दाखविणारे देवदूत ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या संशोधनाचे त्यांना स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाले. अर्थात डॉ. चंद्रशेखर चव्हाण यांचे नाव केवळ अमेरिकेतच नव्हे तर साऱ्या जगात झाले. त्याच्या जोडीलाच त्यांचा लौकिकही वाढतच गेला.

या वळणावरच एपीजे अब्दुल कलाम यांनी जे आवाहन केले होते, ते डॉ. चव्हाण यांच्या कानावर गेले.. जणू मातृभूमी आपल्याला बोलावते आहे असं समजून डॉ. चव्हाण अमेरिकेतील सर्व पाश तोडून भारतात आले!

स्वदेशाबद्दल निष्ठा काय करू शकते आणि त्यामुळे स्वदेशीचे चित्र वेगळे दिसू शकेल, हेच या उदाहरणावरून दिसते.

श्री. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून आले आणि त्यांनी भारतीयांना ‘मेरे देशवासियो’ अशी साद दिली आणि सगळ्या भारतीयांना ते आपलेसे वाटू लागले. मात्र आज आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे. देश ही संकल्पना संपून ‘वर्ल्ड इज अ ग्लोबल विलेज’ असं म्हटलं जाऊ लागलं. मोबाईलमुळे ‘सारी दुनिया मुठ्ठी मे’ असं म्हटलं जाऊ लागलं.

ह्या परिस्थितीत नरेंद्र मोदींनी साऱ्या जगातल्या भारतीयांना हाक मारली. तुम्ही तुमच्या जागी राहून भारताची सेवा करू शकता. तुम्ही दुसऱ्या देशातील नागरिक जरी असलात तरी तुमचं भारतीयत्व विसरू नका. ही नवी संकल्पना त्यांनी मांडली. स्वदेशी म्हणजे केवळ या देशापुरते, असं नसून भारतातून तुम्ही तुमच्या देशात आयात केलीत तरी तो स्वदेशीचाच प्रकार आहे हे त्यांनी दाखवून दिले.

त्यांच्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी परदेशात पाठवण्यासाठी काही शिल्लक ठेवले नव्हते. भारत म्हणजे सतत दुसऱ्या पुढे हात पसणारा देश अशी प्रतिमा निर्माण झाली होती. पण नरेंद्र मोदींनी आपण सुद्धा अजून जगाला नक्की काहीतरी देऊ शकतो हे दाखवण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला. शिवाय आयुर्वेदासारख्या अनेक गोष्टी आपण जगाला देऊ शकतो हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. हे स्वदेशीपण आजतागायत कुणी दाखवले होते काय?

मोदींचे हे स्वदेशीपण वेगळेच. आजपर्यंत भारतावर कुणी आक्रमण केले की, आम्ही केवळ बचावाची भूमिका घ्यायची हे ठरून गेलं होतं. कित्येकदा तर आम्ही युद्ध जिंकले पण तहात हरलो. मोदींनी हे चित्र बदलले. सर्जिकल स्ट्राइक सारखा डाव खेळून ‘हम भी कुछ कम नही है’ हे दाखवून दिलं. हे देखील एक प्रकारे स्वदेशीपण झाले. या प्रकारे शब्दांना नवे अर्थ देणं हे सोपं काम नाही. मोदींच्याकडे जादूची कांडी नाही. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नात सर्व भारतीयांची साथ आवश्यक आहे.

शेवटी सांगायचे इतकेच की, देश बदलतो, वातावरण देखील बदलते, तेव्हा शब्दांना नवे बाळसे दिसू शकते. मात्र हा प्रवास जेव्हा व्यक्तीकडून समाजापर्यंत पोहोचू लागतो, तेव्हा त्या देशाचे भवितव्य नक्कीच बदलते. स्वदेशीमुळे हे चित्र नक्कीच बदललेले दिसेल.

रवीप्रकाश कुलकर्णी

(ज्येष्ठ समीक्षक, लेखक, विचारवंत. विविध विषयांवर नियतकालिके, मासिकांमधून नियमित लेखन. अनेक विशेषांक, पुस्तके यांचे संपादन सहाय्य. दुर्मिळ माहितीचा खजिना आणि संशोधक वृत्ती ही त्यांच्या लिखाणाची खासियत.)

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..