नवीन लेखन...

श्री. रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम; व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती..

श्री. रामचंद्र शिवाजी कदम हे भारदस्त आणि भारतीय समाजाच्या संस्कारांचे पुतळे समजल्या जाणाऱ्या थोरांचं नांव आपल्या नांवात गुंफलेल्या महाशयांना आपण सांप्रत राम कदम या नांवाने ओळखतो. ‘नांवात काय आहे’ असं शेक्सपियर म्हणाला होता, याची या क्षणाला आठवण होते. प्रभु रामचंद्र हे स्वत:चं नांव आणि वडिलांचं नांव छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करुन देणारं, याचं भान राम कदमांनी सोडलं व नांव काहीही असलं तरी त्यांची मूळ प्रवृत्ती रावण आणि मोगलांचीच आहे, याची त्यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली.

पुन्हा एकदा म्हणायचं कारण म्हणजे, राम कदम असं वागण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. सन २००९ मधे मनसेच्या तिकिटावर निवडून आल्यावर विधानसभेत अन्य आमदार अबु आझमींनी मराठीत शपथ घेतली नाही म्हणून त्यांना कानपटवण्यात राम कदमांचा पुढाकार होता. अबु आझमींच्या कानशिवापर्यंत हात पोचत नसतानाही उडी मारुन मारुन त्यांच्या कानाशी राम कदमांच्या तळहाताची सलगी होताना उभ्या महाराष्ट्रानेच कशाला, तर सर्व देशाने पाहिलं होतं. अबु आझमींचे कारनामे कायदा सोडून सर्वांनाच माहित असल्याने, त्यांच्यासोबत जे काही त्यावेळी झालं त्याने कुणाला फार काही दु:ख वैगेरे झालं असेल असं वाटत नसलं तरी विधानसभा ही काही तसं करण्याची जागा नव्हती आणि राम कदम किंवा इतर कोणत्याही आमदारांना तसं करण्याचा अधिकार नव्हता या वर सर्वच देशाचं एकमत होतं आणि म्हणून त्याचा निषेध सर्व देशातून झाला होता व ते आवश्यकही होतं.

त्यानंतर याच विधानसभेच्या सन २०१३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राम कदम यांनी अन्य एक शक्तिशाली आमदार क्षितीज ठाकूर यांच्या जोडीने पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशींना विधान भवनाच्या लॉबीत बेदम मारहाण केली व त्या गुन्ह्यात त्यांना कोठडीची हवाही खावी लागली होती.

राम कदम यांच्या या एकंदर इतिहासाशी, त्यानी केलेलं मुलींच्या बाबतीतलं विधान अगदी सुसंगत आहे. भले त्यांनी ते विधान विनोदाने केलं असं गृहित धरलं तरी, विनोद कळत-नकळत मनातलं सत्य उघडकीस आणतो, हा विनोदाचा अंगभूत गुणधर्म काल अनुभवायला मिळाला. राम कदमांचं कालचं विधान, ते म्हणत असले तरी, विनोदाच्या व्याख्येत बसत नाही. विनोद रक्त त्याला ऐकणाराला रक्तबंबाळ करत नाही. राम कदमांनी माझ्यासारख्या अनेकांचं मन काल रक्त बंबाळ केलं. राम कदमांच्यी विधानाचा केवळ निषेध करुन चालणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी तरच ते ताळ्यावर येतील असं वाटतं (फक्त वाटतं. तसं होण्याची सुतरामही शक्यता नाही.)

राम कदमांनीही शाळेत असताना रामायणातल्या कथा वाचलेल्या असाव्यात. सितेच्या ‘पळवा पळवी’मुळे पुढे रावणाचं राज्य बेचिराख झालं, हा बोध त्यांनी घेतला असेल, पण बहुतेक नसावाच असं त्यांच्या कालच्या वक्कव्यावरून वाटतं. ‘दुसऱ्याच्या मालकीच्या कोणत्याही गोष्टीवर त्याच्या मर्जीशिवाय हक्क सांगू नये’ येवढा बोध आम्ही सामान्य अकलेच्या लोकांनी घेतला. राम कदम आमदार असल्याने त्यांना सुपर अक्रल असावी हे सहाजिकच आहे आणि म्हणून त्यांना रामायणाचा बहुतेक उलटा अर्थ स्वत:च्या मनावर बिंबवला असावा. स्वत:ही राजकीय पळवा-पळवीचंच फळ असल्याने आणि आपल्याकडे जे नाही त्याचं आकर्षण माणसाला असतं या न्यायाने, या रामाला रावणाचं आकर्षण असावं, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

राम कदमांच्या कालच्या विधानाच्या निमित्ताने काही गोष्टींच मंथन करावं अस मला वाटत. श्री. राम कदम असं बोलले असतील तर चुक केवळ त्यांची नाही, तर आपल्या संपूर्ण समाजाचीच आहे असं मानावं लागेल. अन्यथा श्री. राम कदमांनी काल जे वक्तव्य ज्या हजारो फुकट्या लोकांसमोर केलं, त्यातील एकानेही त्यांच्या बोलण्याचा विरोध केला असता. असं न होता उलट त्यांच्या समोरच्या त्या हुजऱ्यांची गर्दी फिदीफिदी हसत असताना दिसते. जगाला संस्कारांची शिकवण देणाऱ्या आपल्या देशातील जनतेची नैतिक पातळी किती घसरलीय, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

आपल्याकडे संस्काराच्या नांवाने वैयक्तिक पाकळीवर कसं वागावं आणि कसं वागू नये याची शिकवण घराघरातून आणि शाळाशाळांतून दिली जात होती. कदाचित आताही दिली जात असावी. परंतू समाजात वागताना कसं वागावं, या सामाजिक संस्कारांच्या शिकवणूकीच्या नांवाने आपल्याकडे बोंबच दिसते, असं अनुमान काढलं तर चुकणार नाही. समाजात वावरताना काही किमान निती-नियम पाळायचे असतात याचं भान कुणालाही नाही. राम कदम काय किंवा आपण निवडून दिलेले इतर लोकप्रतिधी काय, समाजातूनच उत्पन्न झालेले असल्याने त्यांच्याकडे काही नैतिकता असेल याची अपेक्षाच करणं चुकीची आहे.

संस्कार म्हणजे शिस्त, संस्कार म्हणजे विनम्र भाव, संस्कार म्हणजे थोरामोठ्यांचा आदर, संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची व्याख्या आहे. ती मनाची अवस्था आहे. स्वत: पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला आणि पर्यायाने राष्ट्राला आदर्शाप्रत पोचवू शकतो. निरोगी समाजासाठी समाजाला संस्कारांची आवश्यकता गरज पिढ्यानपिढ्या भासत आली आहे. सांप्रत काळात त्याची आवश्यकता जरा जास्तच आहे, असं एकंदर दुषित वातावरण पाहाता वाटतं. ‘अनुकरणप्रियता’ हा माणसाचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मामुळेच या संस्कारांचा प्रसार होत असतो. सध्याच्या काळात राजकीय व्यक्तिमत्वांकडे आदर्श म्हणून बघीतलं जाण्याचा आणि त्यांचं अनुकरण करण्याचा काळ आहे आणि एकूण सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची वागणूक पाहून, ते समाजापुढे नेमका कोणता आदर्श ठेवत आहेत आणि कोणतं अनुकरण करण्यास प्रोत्साहन देत आहेत, याचं ना त्याना भान आहे ना समाजाला. समाजात विचारवंत नांवाची जमातच शिल्लक राहिलेली नाही किंवा जन्माला येण्याचंच बंद झालं आहे, याचे हे प्रमाण आहे. दहिहंडीच्या कार्यक्रमातून नट्या नाचवून आणि बेताल विधानं करन नविन पिढीवर आपण नेमके कोणते संस्कार करतोय, याचं भान हक्कभंगाचा अधिकार कवच कुंडलांसारखा मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधीं ठेवायला हवं, हे आज ओरडून सांगावयं वाटतं. या लोक प्रतिनिधींचाच आदर्श ठेवून समाजही बेताल वागायला लागला, तर तो दोष कुणाला द्यायचा?

आम्ही शाळेत असताना रामायण, महाभारत आदी कथांतून मुल्य शिक्षण दिल जायचं. कथांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात कस वागावं, याचं नकळतचं शिक्षण आमच्या मनावर व्हायचं. संस्कारांची सुरुवात तिथे व्हायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाही, अस खेदाने म्हणव लागत. ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो’ याचीच स्पर्धा असल्याने, जो तो जीव तोडून पुढे जाण्यासाठी धावतो आहे, मग वाटेत येणारा कोणीही पायदळी तुडवला गेला तरी चालेल अशी सारी स्पर्धा आहे. बरं पळून जायचं कुठे त्याचाही पत्ता नाही. इतर सर्व क्षेत्रासारखीच राजकीय क्षेत्रात ही जीवघेणी स्पर्धा जास्त प्रकर्षाने दिसते. त्याच कारण सत्ता. सत्तेसाठी काहीही केलं जात आहे आणि त्या काहीही केल्या जाण्यात शिस्त आणि संस्काराला काहीच जागा उरलेली नाही. हल्ली राजकीय लोक जे सणांच्या नावाखाली ‘इव्हेंट’ साजरे करतात यामागे तीच प्रवृत्ती आहे. करोडो रुपयांच्या पैशांची उलाढाल करणारे दहीहंडी, गणपती, नवरात्री इ. सण आता स्वतःच्या मतपेटीच्या धृविकरणाचे राजमार्ग झालेले असून त्या सणांतलं पावित्र्य पूर्णपणे लोप पावलेलं आहे. ध्येय, नितीमत्ता, शिस्त हे सध्याच्या काळात दुर्गुण ठरलेले, असून त्याजागी काळ्या-सफेत पैशांनी मिळालेली प्रतिष्ठा मोठी होऊ लागली आहे. पुंडशाहीपुढे सुसंस्कृतपणाला मान खाली घालावी लागत आहे. या साऱ्या गोष्टींचा वाईट परिणाम युवकांच्या विचारांवर नकळत होत आहे, याच भान कुणालाच नाहीय, हे जास्त क्लेशदायी आहे. राम कदम किंवा तत्सम इतर राजकीय व्यक्तीनी आयोजित केलेल्या कालच्या दहिहंडीतून नट्या नाचवण्यातून आणि विधानातून ‘स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे’ ह्यापेक्षा वेगळं काही साधलं असेल असं वाटत नाही.

राम कदम ही व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती दिसल्या जागी ठेचून काढायला हवी हे या निमित्ताने सांगावस वाटत. हे काम समाजाचं आहे. समाजात अशा लोकांना आाणि एकूणच राजकीय व्यक्तिमत्वांनान ज्या दिवशी प्रतिष्ठा मिळायची बंद होईल, त्याच दिवशी आपला समाज एक नवीन पहाटेला जन्म देईल..!

— ©️ नितीन साळुंखे
9321811091

या लेखावर आपली मतं मांडताना शब्द योग्य असतील याची खबरदारी घ्यावी. राम कदम किंवा त्यांच्या घरातील व्यक्तींसाठी अपशब्द वापरून आपणही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही, हे दाखवू नये ही विनंती.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..