नवीन लेखन...

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे डोंगरमाथ्यावर वास्तव्य असलेल्या या देवतेला महाराष्ट्रात बालाजी वा व्यंकटेश या नावाने साद घातली जात असली तरी दक्षिणेकडे त्याला वेंकट,पेरुमल,श्रीनिवास, वेंकटेश्वर,शेशाद्रि,तिरुपति,तिरुमलवास अशा विविध नावांनी ओळखले जाते.

‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा (१३७०-१४५०) यांनी रचलेल्या ‘सुप्रभातम्’ या स्तोत्रात भगवंतासाठी मंगलमय सकाळ चिंतिली आहे. देव सर्वव्यापी सर्वशक्तिमान आहे, तो कधीही झोपत नाही, हे खरे. तथापि त्याला ‘जागे’ करून मनुष्याप्रमाणे सर्व उपचार करण्यात भक्तालाही विशेष आनंद होतो हेही तितकेच खरे.

पहाटेस देवाला जागे करून भक्तांवर कृपादृष्टी ठेवण्याची विनवणी करणा-या या स्तोत्रात सुंदर शब्दचित्र दिसते. त्यातील वर्णनावरून हे काव्य देवालयाच्या संदर्भात नसून एखाद्या मोठ्या हवेलीच्या संदर्भात रचले असावे असे दिसते. सहाव्या श्लोकातील ‘पंचानन’ शब्द ब्रह्म्याला वा शंकराला उल्लेखून आहे हे समजणे कठीणच. तसेच आठव्या श्लोकातील पोपटाला ‘कदलीफलपायसानि’ (केळ्याचे शिकरण) खायला घालण्याचा उल्लेख गंमतीदार वाटतो.

या काव्यात मुख्यत्वे प्रबोधिता(समरा जनास समरा जनास गा) व उद्धर्षिणी(ताराप भास्कर जनास जनास गा गा) वृत्ते वापरली आहेत.

कौसल्या सुप्रजा राम पूर्वासन्ध्या प्रवर्तते 
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्त्तव्यं दैवमाह्निकम् ॥१॥

मराठी – हे कौसल्येच्या सुपुत्रा, रामा, पूर्वेला झुंजूमुंजू झाले आहे. हे नरश्रेष्ठा ऊठ, आमची रोजची कामे स्वर्गीय कर्तव्यासमान करावयाची आहेत.

कौसल्यानंदना रामा, पूर्वे प्राची प्रकाशली
ऊठ रे नरसिंहा तू दैवी कार्ये विलंबली ॥ १॥


उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज 
उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु ॥२॥

मराठी – हे गोविन्दा ऊठ, ऊठ. ज्याच्या ध्वजावर गरूड आहे अशा विष्णो ऊठ. हे लक्ष्मीचा पती ऊठ. या तिन्ही लोकांना पवित्र कर.

ऊठ रे ऊठ गोविंदा, ऊठ रे गरुडध्वजा
भ्रतारा भार्गवीच्या तू पवित्र कर या जगा ॥ २ ॥


मातस्समस्तजगतां मधुकैटभारेः
वक्षोविहारिणि मनोहरदिव्यमूर्ते 
श्रीस्वामिनि श्रितजनप्रियदानशीले
श्रीवेङ्कटेशदयिते तव सुप्रभातम् ॥३॥

मराठी – हे सर्व जगाच्या माते, मधु व कैटभाच्या शत्रूच्या हृदयी विहार करणा-या स्वर्गीय मनोहर रूपधारिणी, आश्रयाला आलेल्या जनांना हवे ते दान देण्याचा जिचा स्वभाव आहे, श्रीवेंकटेशाच्या प्रिय स्वामिनी, तुझी सकाळ मंगलमय झाली आहे.

विश्वास सर्व जननी, मधुकैटभाच्या
शत्रूमनी विहरते, रमणीय दिव्या
श्रीमल्लिका, शरण त्या प्रिय दान देते
श्रीवेंकटप्रियतमे सु-सकाळ तूते ॥ ३॥


तव सुप्रभातमरविन्दलोचने
भवतु प्रसन्नमुखचन्द्रमण्डले 
विधिशङ्करेन्द्रवनिताभिरर्चिते
वृशशैलनाथदयिते दयानिधे ॥४॥

मराठी – हे कमळासारखे नेत्र असणा-या, पूर्ण चंद्राकृती प्रसन्न मुख असणा-या, ब्रह्मा, शंकर तसेच इन्द्राच्या बायकांनी जिची पूजा केली आहे अश्या, वृषपर्वताच्या स्वामीची प्रिया असणा-या, कृपेचा मोठा साठाच असणा-या (देवी) तुझी सकाळ मंगलमय झाली आहे.

वृषपर्वतेश रमणी दयानिधी
चरणास जिष्णु-हर पूजिती विधी ।    (जिष्णु- इंद्र
, विधी- ब्रह्मा)
रमणी, सरोज नयना, शशी मुखी
हसरी, सकाळ तव ही सदा सुखी ॥ ४ ॥


अत्र्यादिसप्तऋषयः समुपास्य सन्ध्यां
आकाशसिन्धुकमलानि मनोहराणि 
आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥५॥

मराठी – अत्री वगैरे सात ऋषी झुंजूमंजू झाल्यावर पूजा करून आकाशसागरातील सुंदर कमळे घेऊन (तुझी) दोन पावले पूजण्यासाठी आलेले आहेत. हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल होवो.

आकाशसिंधुमधुनी अति रम्य कमळे
अत्रीऋषींसह सहा जमवून आले ।
होता पहाट चरणां तव पूजण्याला
हा मोदपूर्ण दिन शेषगिरी नृपाला ॥ ५ ॥


              

पञ्चाननाब्जभवषण्मुखवासवाद्याः
त्रैविक्रमादिचरितं विबुधाः स्तुवन्ति 
भाषापतिः पठति वासरशुद्धिमारात्
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥६॥

मराठी – कमळावर निवास करणारा पाच तोंडे असणारा (ब्रह्मा), सहा तोंडे असणारा कार्तिकेय, इंद्रादि देव त्रिविक्रमा (विष्णू) च्या चरित्राची स्तुती करीत आहेत, जवळच बृहस्पती दिनशुद्धिकरण (मंत्र) म्हणत आहे. हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल होवो.

गाती त्रिविक्रम कथा मघवा, विरंची       (मघवा- इंद्र, विरंची- ब्रह्मा)
पद्मात राहुन, मुखेहि षडाननाची ।       (षडानन-कार्तिकेय)
मंत्रा नजीक बुध शुद्ध दिनास गाई
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ होई ॥ ०६ ॥  


ईषत्प्रफुल्लसरसीरुहनारिकेल
पूगद्रुमादिसुमनोहरपालिकानाम् 
आवाति मन्दमनिलः सह दिव्यगन्धैः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥७॥

मराठी – किंचित् फुललेली सरोवरातील कमळे, त्याच्या काठावरील नारळ, सुपारी इत्यादि मनमोहक झाडांवरून मंद सुगंधी वारा वहात आहे. हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

किंचित् फुलून कमळे मृदु तेथ वाहे
काठास श्रीफल नि पोफळ बाग आहे ।
वारा सुगंधित तरूवरुनी वहातो
प्रारंभ श्रीनिधि दिना तव खास होतो ॥ ०७ ॥


उन्मील्य नेत्रयुगमुत्तमपञ्जरस्थाः
पात्रावशिष्टकदलीफलपायसानि 
भुक्त्वा सलीलमथ केलिशुकाः पठन्ति
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥८॥

 

मराठी – उत्कृष्ट पिंज-यात पाळलेले पोपट उभय नेत्र उघडून, (पिंज-यातील) भांड्यात शिल्लक केळ्यांचे तुकडे व खीर सहज खाऊन टाकून, गात आहेत – हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

हे पिंज-यात शुक जागृत होउनीया
केळे नि उर्वरित खीरहि खाउनीया ।
पात्रातली सहज, ओळ मुखात आली
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ झाली ॥ ०८  ॥


तन्त्रीप्रकर्षमधुरस्वनया विपञ्च्या
गायत्यनन्तचरितं तव नारदोऽपि 
भाषासमग्रमसकृत्करचाररम्यं
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥९॥

मराठी तंतूवाद्याच्या अत्यंत गोड साथीवर दुसरा हात आकर्षक रीतीने हलवत तंबू-यावर नारदही तुझे अगाध चरित्र गात आहे… हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे. 

वीणा करी मधुर संगत नारदाला                                                                                                  अत्यंत नाजुक हले, कर देत ताला ।                                                                                            गाई अगाध चरिता तव या सकाळी                                                                                              श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ झाली ॥९॥  


 

भृङ्गावली  मकरन्दरसानुविद्ध
झङ्कारगीतनिनदैस्सह सेवनाय 
निर्यात्युपान्तसरसीकमलोदरेभ्यः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥१०॥

मराठी – भरपूर मधात डुंबणारी भुंग्यांची मालिका आपल्या गुंजन गीतांनी तुझी सेवा करण्यासाठी कमळाच्या गाभ्यातून सरोवराच्या तीराला येत आहे….. हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

भुंगे जरी मधु पिण्या कमळात गेले
सेवेस ओळ करुनी तिरास आले ।
गाभा त्यजून स्वरगुंजन साद घाली
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ झाली ॥१०॥


योषागणेन वरदध्नि विमथ्यमाने
घोषालयेषु दधिमन्थनतीव्रघोषाः 
रोषात्कलिं विदधते ककुभश्च कुम्भाः
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥११॥

मराठी – तरुण स्त्रियांकडून उत्तम दही घुसळले जात असताना घरातून अत्यंत मोठे आवाज येत आहेत (जणू) दही घुसळण्याची रवी व डेरा यात रागाने भांडण चालू आहे… (स्त्रिया गात आहेत) हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

नारी घरी घुसळती दहि दाट भारी
ये ओसरीतुन ध्वनी अतितीव्र दारी ।
की भांडणे रवि नि रांजण यात झाली
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ झाली ॥११॥


पद्मेशमित्रशतपत्रगतालिवर्गाः
हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या 
भेरीनिनादमिव बिभ्रति तीव्रनादं
शेषाद्रिशेखरविभो तव सुप्रभातम् ॥१२॥

मराठी सूर्याचे मित्र असलेले शतपत्र कमळाकडे गेलेले भुंगे, निळ्या कमळाचे सौंदर्य आपल्या अंगभूत लावण्याने पराभूत करण्यासाठी ढोलाच्या आवाजासमान मोठा आवाज करीत आहेत…हे शेष पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.     

हेलीसखे शतदलाप्रत भृंग गेले                (हेली- सूर्य)
जिंकावया शितिदला निज तेज ल्याले ।      (शितिदल- निळे कमळ)
ढोला जसा रव घुमे बहु या सकाळी
श्री वेंकटाचलपती
, सु-सकाळ झाली ॥ १२ ॥


श्रीमन्नभीष्टवरदाखिललोकबन्धो
श्रीश्रीनिवास जगदेकदयैकसिन्धो 
श्रीदेवतागृहभुजान्तरदिव्यमूर्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१३॥

मराठी – सर्व जगताचा बन्धु असलेल्या आणि जगाला हवीहवीशी असणारी लक्ष्मी ज्याच्याबरोबर आहे अशा सर्व जगतासाठी एकमेव करुणेचा सागर असणा-या, ज्याचे वक्षस्थळ श्री देवीचे निवासस्थान आहे, अशा स्वर्गीय रूप असलेल्या, हे श्रीनिवासा, वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

जे इष्ट श्रीपति जगा वररूप देसी
की
एकमेव करुणार्द्र समुद्र होसी ।
स्वर्गीय हो तव उरी कमला निवासी
झाली सकाळ शुभ मंगल श्रीनिधीसी ॥ १३ ॥


श्रीस्वामिपुष्करिणिकाप्लवनिर्मलाङ्गाः
श्रेयोऽर्थिनो हरविरिञ्चसनन्दनाद्याः 
द्वारे वसन्ति वरवेत्रहतोत्तमाङ्गाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१४॥

मराठीश्री स्वामींच्या तलावात स्नान करून स्वच्छ झालेले, ज्यांच्या शिरावर श्रेष्ठ वेताचा स्पर्श झाला आहे असे शंकर, ब्रह्मा, सनंदन वगैरे लाभेच्छू, दारावर उभे आहेत. वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

स्नाने तळ्यात तव शुद्ध करून दारी                                                                                        लाभेच्छु शंकर सनंदन ब्रह्म, भारी ।                                                                                 माथ्यावरून फिरतो तव वेत आता
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ होता ॥ १४


श्रीशेषशैल गरुडाचलवेङ्कटाद्रि
नारायणाद्रि वृषभाद्रिवृषाद्रि मुख्याम् 
आख्यां त्वदीयवसतेरनिशं वदन्ति
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१५॥

मराठी(भक्तगण) तुझ्या श्रीशेषपर्वत, गरुडपर्वत, वेंकटपर्वत, नारायणपर्वत, वृषभपर्वत, वृषपर्वत या मुख्य वसतीस्थानांबद्दल नेहेमी बोलत असतात. वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.       

श्रीशेष पर्वत नि वेंकट पर्वतासी
नारायणा नि वृषभा
, गरुडा, वृषासी ।
केला निवास म्हणती तव भक्त आता                                                                                            श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ होता ॥ १५ ॥

टीप- तिरुमला देवस्थानच्या एकूण सात टेकड्या आहेत. वृषभाद्री,अंजनाद्री,नीलाद्री,गरुडाद्री,शेषाद्री, नारायणाद्री,वेंकटाद्री अशी त्यांची नावे आहेत. श्री वेंकटेशाचे मंदिर वेंकटाद्रीच्या माथ्यावर आहे.


(उर्वरित श्लोक पुढील भागात…..
)

भाषांतरकार – धनंजय मुकुंद बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

5 Comments on श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग १

    • कृपया धनंजय बोरकर या नावाने ‘ marathisrushti.com ’ वर शोध घ्यावा. तेथे भाग २ तसेच इतर स्तित्रेही दिसतील.

Leave a Reply to Milind Barve Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..