नवीन लेखन...

शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर ‘येलो जर्नालिझम’च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.

एखादी परिकथा लिहल्यासारखं, परिस्थितीचं वास्तव समजून न घेता शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलं जातंय, यापूर्वी जे लिहिलं… त्याचा उघड विरोध सोशल मीडियावर दिसून आला, मात्र यावर माफी मागण्याचं धाडस दाखवण्यात आलेलं नाही, मग दिलगिरी सारखा गोड-गोड शब्द वापरण्याचंही धाडस आता उरलेलं दिसत नाही.

या उलट आता आपणच लिहलेलं कसं बरोबर होतं, हे घोडं दामटवण्यासाठी आता शेतकरी कसा ‘गाडीवान’ आहे, तो रोख पैशांनी मर्सिडीज बेन्झ खरेदी करतोय, असा शब्दांचा खेळ करून लिहलं जातंय, यात कुणालाही वाटेल शेतकरी धनवान आहे, त्याला कर्जाची गरजचं नाहीय. सबघोडे बाराटके असं सूत्र शेतकऱ्यांना लावून चालणार नाही.

पुणे जिल्ह्यातील तसेच गुडगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एसईझेडमध्ये गेल्या, त्यांना त्याबदल्यात मिळालेल्या पैशातून त्यांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र त्यानंतर त्यातील बहुतेक देशोधडीला लागले, यावर लिहण्याचं धाडस काहींनी तेव्हा का दाखवलं नाही.

जो माणूस फक्त शेतीवर जगतोय, तो शेतकरी, ज्याची आवक फक्त शेतीतून असेल, आणि त्याने रोख पैशातून मर्सिडीज बेन्झ, पजेरो सारख्या ५०-५० लाखाच्या गाड्या खरेदी केल्या असतील, अशा व्यक्तींचं उदाहरण हे नाव, गावासह छापावं, मी देखिल त्यांच्या भेटीला जाईन आणि त्याची शेतीची यशोगाधा जाणून घेईन, तो करतोय तशीच शेती करण्याचा प्रयत्न करेन, मलाही आवडेल माझ्या बापाला जुनाट सायकलीवरून, सुसज्ज मर्सिडीज गाडीत फिरवायला.

मात्र ज्यांचा उद्योग-व्यवसाय असेल, आणि शेती नावाला असेल, तरीही तो स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत असेल, आणि तुम्ही त्याच्याकडे शेतकरी या नजरेनं पाहत असाल, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यावरून ते माप सर्वच शेतकऱ्यांना लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

खरं तर ज्या न्यूज पेपरमध्ये शेतकरी विरोधात सूर आवळले जात आहेत, अशा न्यूज पेपरचा कागद एखाद्या जत्रेत, किंवा बाजारात भजी बांधून खातांना शेतकऱ्याच्या हाती लागेल, आणि तो हे लिहलेलं वाचेल याची शाश्वती नाही, कारण या न्यूज पेपरचा अवाका त्या शेतकऱ्यांपर्यंत नाही.

मात्र अशा प्रकारच्या लिखाणावरून शेतीविषयी धोरणं ठरवतांना, एखाद्या सरकारचा संभ्रम होऊ शकतो हे नक्की, कारण सर्वच राज्यकर्त्यांनी अशा न्यूज पेपर्सची मतं महत्वाची मानली आहेत, कदाचित यापूर्वी त्या दर्जाचा विचार करणारी, लिहिणारी मंडळी अशा न्यूज पेपर्सना लाभली असावी.

मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार, कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.

एक खोटं लपवण्यासाठी हजार वेळेस खोटं बोलावं लागतं, त्याचा प्रत्यय इथे येतोय, आणि एकाने बोललेलं खोटं अनेकांच्या तोंडून नकळत वदवून सत्य ठरवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हिंदीत एक म्हण आहे, ‘अधजल घगरी छलकत जाएं’, घागरीत पाणी नसेल, तर ते पाणी सारखं उचंबळत असतं, सध्या शेतीविषयी ग्रासरूटला जाऊन शहानिशा न करता, त्यावर वाट्टेल ते लिहण्याचा प्रकार यासारखाच असावा.

शेतकरी नेते शरद जोशी यांना देखिल ग्रास रूटची खूप मोठी जाण होती, याची आठवण यावरून पुन्हा-पुन्हा होतेय. कारण शरद जोशी यांनी बागायतदार आणि जिरायती असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, त्यांनी नेहमीच अशा घटकांना पुढारी म्हणून संबोधलं आहे. पुढारी हे नेहमीच बोटावर मोजण्यासारखे असतात, पुढारी आणि शेतकरी यांचा उल्लेख वेगवेगळा झाला, तर यापूर्वी झालेला गोंधळ थांबू शकतो, मात्र येलो जर्नालिझम करणारी मंडळी शेतकऱ्यांना उठसूठ डागण्या ठेवतेय.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..