नवीन लेखन...

“सर्वोत्कृष्ट अभिनयाचा उष:काल”

”ती आली, तिला पाहीलं आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. आपल्या अद्वितीय अभिनय शैलीत आणि कलेवर प्रचंड हुकुमत असणार्‍या तसेच मॉडेलिंग विश्वावर आपली अनोखी छाप पाडणार्‍या राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव यांच्यासोबत खास गप्पा..फक्त मराठीसृष्टी.कॉमच्या महाराष्ट्राच्या दिपशिखा या सदरासाठी..

प्रश्न: धग चित्रपटातील तुमची भूमिका आणि व्यक्तीगत आयुष्यातील तुमचं व्यक्तीमत्व याची सांगड तुम्ही कशी घालता?
उषा जाधव: धग चित्रपटामध्ये माझी भुमिका आहे यशोदा नावाची. आणि तिचा नवरा स्मशाणात काम करतोय. परंपरेनी चालत आलेला व्यवसाय सुद्धा सांभाळतोय. यशोदेला कुठेतरी या कामाविषयी घुसमट वाटते. पण ती विरोध करत नाहीये. आपल्या मुलांना शाळेतदेखील शिकवतेय. मुलांनी शिकून आम्हाला या व्यवसायातून मुक्त करावं असं तिला वाटतंय म्हणून खंबीर होऊन ती आपल्या मुलांच्या आणि परिवारापाठी अगदी भक्कम उभी आहे. कुठेतरी खंबीर आणि जिद्द बाळगून असलेली यशोदा आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळेल. काहीसे असेच गुण माझ्यामधेही आहेत. वेळप्रसंगी आन्यायाला विरोध करणं, परिस्थितितूण सक्षमपणे मार्ग काढणे. तर हा स्ट्रॉंग पॉंईंट मी माझ्या व्यक्तिमत्वासोबत कुठेतरी रिलेट करते.
प्रश्न: धग चित्रपटानी तुम्हाला खुप ख्याती आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळवून दिले. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत, अॅड फिल्म्स केल्या आहेत पण या टप्प्यावर पोचण्यासाठी खुप स्ट्रगलदेखील करावं लागलं असेल, तर एक मुलगी म्हणून तुम्हाला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागले ?
उषा जाधव: स्ट्रगल तर प्रचंड होता ! पुण्याहून मी मुंबईत आले त्यावेळी मिरा रोडला राहायचे. आणि माझी नोकरी होती महालक्ष्मीला. त्यावेळी ईस्ट वेस्ट, इथली गर्दी हे सर्वच वातावरण नवीन असल्यामुळे मी खुप गोंधळून गेलेले. पण त्याचवेळी अनेक चित्रपट, मालिका आणि अॅड्स् साठी ऑडिशन्स देणे सुरुच होतं. पण मी सावळी असल्याने बर्‍याचदा माझं रिजेक्शन व्हायचं. अभिनयक्षमता असूनदेखील माझी निवड न होणं हा माझ्यासाठी खुप मोठा सेटबॅक होता. पण त्याचदरम्यान मी मधुर भांडारकर यांची ट्रॅफिक सिग्नल नावाची फिल्म केली. त्यामध्ये माझी भूमिका छोटी होती. तरीपण मी आव्हान म्हणून ही भूमिका स्वीकारली. त्यानंतर स्ट्रायकर, चार आने की धूप यांसारख्या हिंदी, मराठी सिनेमांमधून लहान मोठ्या भूमिका साकारल्या. पण म्हणावी तशी संधी मिळत नव्हती. तरीसुद्धा काम सुरु ठेवणं गरजेचं होतं. कारण मुंबईत सर्वाइव्ह करायचं असेल तर काम करावंच लागणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात माझी कोणी गॉडमदर किंवा गॉडफादर सुद्धा नव्हते. एक काळ तर असा होता की माझ्याजवळ रेल्वेचा पास काढण्यासाठी १५० रुपयेसुद्धा नव्हते. पण मी संघर्ष सुरुच ठेवला. अशातच मला कौन बनेगा करोडपतीच्या एका प्रमोशनसाठी माझी निवड करण्यात आली. या अॅडमध्ये माझ्यासोबत अमिताभ बच्चनदेखील होते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव एक वेगळाच आनंद देऊन गेला आणि मला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोचवले. त्यानंतर धग चित्रपटाची ऑफर मिळाली. आणि धगने जे काही मला दिले तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय अनुभव आहे असं मी मानते.
प्रश्न: चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळून एक वर्ष झालंय तर आत्ता कुठे हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तर मनात कुठे खंत आहे का की आपली भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोचायला वेळ लागतोय ?
उषा जाधव: मला खंत नक्कीच आहे. हा चित्रपट गेल्या मार्च महिन्यातच प्रदर्शित व्हायला हवा होता. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तर आता कुठेतरी आनंददेखील वाटतोय की ७ मार्चला हा चित्रट प्रदर्शित होतो आहे. त्याशिवाय या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच त्याचं यश डोळे दिपवणारं आहे.
प्रश्न: सध्या तुम्ही भुतनाथ रिटर्न्स या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहात. तुमच्या सोबत अमिताभ बच्चन सहकलाकार म्हणुन काम करत आहेत. तर या व्यक्तिरेखेविषयी आणि कथेविषयी थोडं सांगा.
उषा जाधव: या चित्रपटात मी एका लहान मुलाच्या आईचा रोल करतेय. ज्याला घरात भुत दिसतंय. पण ते इतरांना दिसत नाहीये. आणि या भूताची व्यक्तिरेखा साकारली आहे अमिताभ बच्चन यांनी. तसेच आधीच्या भूतनाथ चित्रपटापेक्षा ही कथा नक्कीच वेगळी आहे एवढंच मी सांगू शकते.
प्रश्न: अमिताभजींसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता, आणि तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे हे जेव्हा त्यांना कळले त्यावेळी तुमच्याप्रती असलेली भावना काय होती ?
उषा जाधव: अमिताभजींसोबत काम करणं म्हणजे खूपच सुंदर अनुभव आहे असं मी म्हणेन. खुप एनर्जेटीक आणि पॉझिटीव्ह अशी ती व्यक्ती आहे. आपण खूप मोठे स्टार आहोत असं त्यांच्या मनात देखील नाहीये. अगदी सहज कोणासोबतही ते मिसळून जातात. एक अॅक्टर आणि माणूस म्हणून ते श्रेष्ठच आहेत आणि मला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे असं त्यांना जेव्हा कळलं त्यावेळी माझ्या कामगिरीबद्दल खूष होऊन त्यांनी माझं भरभरुन कौतुक केलं.
प्रश्न: बॉलिवुड आणि मॉडेलिंग विश्वात वावरताना आणि मराठी चित्रपटात काम करताना कोणता फरक जाणवला ?
उषा जाधव: फार फरक नाहीये. एक भाषा सोडली तर. ग्लॅमर दोन्ही कडे आहे. फक्त बॉलिवुडमध्ये स्टारडम भरपूर आहे. आणि आपल्याकडे अॅक्टर स्टार्स आहेत. त्याव्यतिरिक्त मॉडेलिंग आणि जाहीरातींमध्ये काम करण्याचा अनुभव काहिसा अनोखाच अशा प्रकारचा आहे. कारण तिथे कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त माहिती प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोचवायची असते. मग वेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स देऊन लोकांपर्यंत त्या प्रोडक्ट विषयी चागलं मत मांडण हे खुपच चॅलेंजिंग आणि माझ्या दृष्टीने मस्त अनुभव आहे.
प्रश्न: चित्रपट समांतर विषयाचे आहेत हे पाहून तुम्ही स्वीकारणार की त्या चित्रपटातील भूमिका पाहून स्वीकारणार ?
उषा जाधव: माझ्याकडे एखादा चित्रपट आला आणि त्यातली भूमिका जर मला आवडली तर मी ती स्वीकारणारच ! फक्त त्या भूमिकेत वैविधता असली पाहिजे, एकाच प्रकारच्या भुमिकांमध्ये मी स्वत:ला बांधून घेणार नाही.तसंच चित्रपट समांतर असो किंवा व्यावसायिक दोन्ही कडे मी काम करत रहाणार.तसंच सर्वप्रकारच्या भुमिका केल्याने माझ्यातली अभिनेत्री कुठेतरी प्रगल्भ होत जाईल असं मला वाटते.
प्रश्न: स्वत:तील अभिनेत्रीला घडवण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता?
उषा जाधव: प्रथम तर मी जागतिक स्तरावरील चित्रपट पहाते. शिवाय आजूबाजूला आणि लोकांकडे पाहून सतत निरीक्षण करत असते की कोण कसं बोलतेय, कश्या पध्दतीने रिअॅक्ट होतेय, विविध घटना वाचून काढते; दुसरं म्हणजे चित्रपट पहाताना कोणत्या कलाकारांनी एखाद्या चित्रपटात भूमिका सादर केली आहे, त्या चित्रपटाची कथा, तांत्रिक पार्श्वभूमी सुध्दा मी अभ्यासते; ”धग” चित्रपटाच्या निमित्ताने मी ”यशोदा” ची व्यक्तिरेखा साकारताना सुध्दा मी त्या पध्दतीच्या महिलांसोबत चर्चा केली होती, त्याशिवाय दिग्दर्शकाला काय अपेक्षित देखील समजून घेतले होते.
प्रश्न: इथून पुढे बॉलिवुड मध्येच स्वत:ची ओळख निर्माण करायची की मराठीत पण भूमिका करणार आहात?
उषा जाधव: केवळ हिंदीच नाही तर सर्वच भाषांमध्ये मला काम करायचे आहे; मराठी तर माझी मातृभाषा आहे तेव्हा इथल्या चित्रपटात तर मी काम करणारच! फक्त त्या चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा मला आवडली पाहिजे; आणि त्या भूमिकेत वैविधता असली पाहिजे.
प्रश्न: या क्षेत्रात देशातल्या विविध भागांमधून आपलं नशीब आजमावण्यासाठी मुली येताहेत तर एक मैत्रिण म्हणून तुम्ही त्यांना काय सांगू इच्छीता?
उषा जाधव: एक मैत्रीण म्हणून मी इतकच सांगेन की तुम्हाला स्वत:च्या ”टॅलेंट” वर विश्र्वास असेल तरच या क्षेत्रात पाऊल ठेवा; जिद्द आणि चिकाटी हे गुण तुमच्याकडे असलेच पाहिजे कारण अनेकदा रिजेक्शन्सना सामोरे जावे लागते; तर ती पचवण्यासाठी ताकद जर तुमच्याकडे असेल तर नक्की या क्षेत्राचा तुम्ही विचार करा.
प्रश्न: कोल्हापूर शहरात तुमचे कुटुंबिय आहेत आणि तुम्ही मुंबईत करत असलेल्या कामासाठी एक मुलगी म्हणून कश्या प्रकारे पाठबळ आहे?
उषा जाधव: एक मुलगी म्हणून माझ्या कुटुंबियांनी मला कधीच कोणतंही काम करण्यावाचून रोखलं नाही; त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी कदाचित इथपर्यंत पोहचू ही शकले नसते. फक्त मी ज्यावेळी नोकरी सोडली तेव्हा माझे वडिल काहिसे नाराज होते. पण त्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कारकीर्द घडवू नकोस अशा प्रकारचा विरोध कधीच झाला नाही.
प्रश्न: रेड रिबीन सोसायटी या संस्थेसाठी तुम्ही कार्यरत आहात तर त्या विषयी थोडं सांगा?
उषा जाधव: रेड रिबीन सोसायटी ही एच आय व्ही बाधीत मुलांसाठी काम करणारी संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे अशी मुले आपल्या आयुष्यात खूप काही करु शकतात व सामान्य माणसाप्रमाणे आपलं जीवन व्यतित करु शकतात. त्याची जनजागृती व त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम ही संस्था करत आहे.
प्रश्न: तुमचे छंद आणि आवड निवड याविषयी आमच्या वाचकांना सांगा?
उषा जाधव: सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले चित्रपट मला पहायला आवडतात. गाणी आणि सुमधुर संगीत ऐकणे त्याचप्रमाणे वाचनाची पण आवड आहे. पण सध्या कामाच्या व्यापामुळे वाचन खूप कमी झाले आहे. पण वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच दर्जेदार साहित्य वाचण्याचा प्रयत्न करते.
प्रश्न: अभिनयाव्यतिरीक्त तुम्हाला आणखीन काय करायला आवडेल?
उषा जाधव: अभिनयाव्यतिरीक्त मला चित्रपटांची निर्मिती करायला नक्कीच आवडेल आणि याच क्षेत्रात राहून सतत काम करायचे आहे तसच चांगल्या व्यक्तिरेखा साकारण्याचा माझा मानस आहे.
प्रश्न: जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
उषा जाधव: सगळ्यात महत्वाचा मुद्दा भेडसावतोय तो म्हणजे सुरक्षेचा ! तेव्हा सर्वच महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वत:च काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपल्याकडे जरी पुरुषप्रधान संस्कृती असली तरी त्याकडे फारसं लक्ष न देता आपण आपली प्रगती कशी साधू शकतो याकडे लक्ष द्यावे , पण मला असं व्यक्तिश: जाणवते की सध्याच्या तरुण मुली आणि स्त्रिया खूप उत्तमपणे वाटचाल करत आहेत. पूर्वीसारखी आज अशी परिस्थिती नाही की त्यांच्यावर खूप अन्याय होतोय उलट आजची स्त्री अनेक आव्हाहने स्विकारते आहे. चाकोरीबध्द जीवनशैली तोडून स्वत:ला सिध्द करतेय. तर एका अर्थी त्यांच्या दृष्टीने हा प्रोग्रेसंच आहे. आणि मनात कुठेतरी आशादायी आणि सकारात्मकता निर्माण करणारी बाब आहे.

संपादक – निनाद प्रधान

तांत्रिक सहाय्य – सुमित्र माडगूळकर

संकल्पना, निमिर्ती व संकलन – सागर मालाडकर

निर्मिती सहाय्य – पुजा प्रधान

छायाचित्र संकलन – पुजा प्रधान, आदित्य देशपांडे आणि सागर मालाडकर

 

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..