नवीन लेखन...

सजीवांतील संदेशवहन

रविवार ४ मार्च २०१२.

 
आपण एकमेकांशी बोलतो, भांडतो, संकटकाळी मदत मिळावी म्हणून मोठमोठ्याने ओरडतो, दुख्खाची बातमी कळली तर मोठ्याने रडतो, कुत्री भुंकतात, पक्षी किलकिलाट करतात, प्राणी आपापला विशिष्ट आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. हे आवाज निर्माण करणे, तो आवाज ऐकून प्रतिसाद देणे, म्हणजे सजीवांचे एकमेकातील संदेशवहन, कम्युनिकेशन आहे.
लेखन-वाचन, बोलणे-ऐकणे, दिसणे-पाहणे या क्रियांमुळेही संदेशवहन करता येते. संदेशवहनाचे आणखीही प्रकार आहेत. चेहर्‍यावरील हावभाव, नाच, हातवारे, खुणावणे वगैरे.
संदेशवहन फक्त आवाजाच्या लहरींनीच करता येते असे नाही. काही आवाज माणसांना ऐकू येत नाहीत पण ते आवाज काही प्राण्यांना चांगले ऐकू येतात. वटवाघळे तर रडारमध्ये वापरतात त्या लहरींचा वापर करून संचार करतात. पक्ष्यांचे थवे आकाशात उडतात तेव्हा त्यांच्यातही संदेशांची देवाण-घेवाण होतच असली पाहिजे.
संदेशवहनासाठी विचार कळविणे आणि विचार कळणे या दोन महत्वाच्या आणि एकमेकांवर अवलंबून असणार्‍या पायर्‍या आहेत. यासाठी एखाद्या माध्यमाची गरज असते. जमिनीवरील आणि आकाशातील सजीवांचे संदेशवहन हवेतील आवाज तरंगांच्या वहनामुळे होते. म्हणजे आवाजाची उर्जा वाहून नेण्याचे काम हवेचे माध्यम करते. पण पाण्यातील जलचरांचे संदेशवहन पाण्याच्या माध्यमातून होते हे विशेष.
डॉल्फिन मासे, सोनार या तंत्राचा वापर करून संदेशवहन करतात. याचा अर्थ असा की, रडार, सोनार वगैरे संदेशवहनाची अत्याधुनिक तंत्रे निसर्गाला कोट्यवधी पृथ्वी वर्षांपासून माहित आहेत आणि काही प्राणी या तंत्रांचा वापर लाखो वर्षांपासून करीतही आहेत.
ही तंत्रे वापरण्याची यंत्रणा, एका पिढीतून पुढच्या पिढीत जाण्यासाठी, निसर्गाने आनुवंशिक आणि जनुकीय आज्ञावली विकसित करून तिचा पुरेपूर आणि कमालीचा यशस्वी वापरही लाखो वर्षांपासून आजतागायत केला आहेच. मानवाने, निसर्गात केलेली ढवळाढवळ वेळीच थांबविली तर, हा वापर, पृथ्वीवर सजीव जगू शकतील अशी परिस्थिती टिकून राहिली तर, भविष्यकाळातही कोट्यवधी वर्षे केला जाईल. पर्यावरणीय बदलानुसार त्यात उत्क्रांतीही होऊ शकेल. हे सर्व विज्ञान सध्यातरी अनाकलनीय आहे.
या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती निर्माण होऊन त्यांच्या सजीवांची संख्या वाढावी यासाठी निसर्गाने, काळजीपूर्वक भक्कम तजवीज करून ठेवली आहे.
प्रत्येक सजीवाला स्वरयंत्राच्या सहाय्याने विशिष्ट आवाज काढता येतो. हा आवाज सजीवांच्या भावनांनुसार बदलतो. या आवाजाचा आशय, श्रवण इंद्रियाच्या सहाय्याने, तो आवाज ऐकून दुसर्‍या, त्याच प्रजातीच्या सजीवाला बरोबर समजतो.
आवाज निर्माण करणे, त्याचे हवेच्या माध्यमातून वहन होणे, त्या आवाजाची उर्जा, ध्वनी लहरींच्या स्वरूपात, आसमंतात पसरणे, श्रवण इंद्रियाच्या सहाय्याने, त्या सजीवाच्या मेंदूला जाणवेल अशा संदेशात रुपांतर करणे आणि शेवटी त्या संदेशाचा आशय कळणे हे सर्व अतीप्रगत विज्ञान आहे.
पृथ्वीवर वातावरण आहे, त्यामुळे आवाजाच्या लहरींमुळे उर्जेचे वहन होणे शक्य आहे, म्हणजे आवाज निर्माण करण्याची यंत्रणा आणि आवाज ग्रहण करण्याची यंत्रणा सज्ज केली तर सजीवांमध्ये संदेशवहन होऊन मेंदूतले आशय एकमेकांना कळविणे शक्य होईल हे निसर्गाला कसे कळ्ले? हे फार मोठे विज्ञानीय गूढ आहे.
आवाजाची तरंगायाम, वारंवारिता, तीव्रता वगैरे गुणधर्म निसर्गाला माहित होते, तेही कोट्यवधी वर्षांपूर्वी, हे कसे? सजीवांच्या स्वरयंत्राची आणि कानाची जडणघडण अभ्यासिली तर लक्षात येते की, हा आराखडा, त्यांच्या जागा आणि मेंदूशी असलेला त्यांचा संपर्क वगैरे एखाद्या निष्णात वैज्ञानिकाने आणि तंत्रज्ञाने घडविला आहे.
स्वरयंत्राला अगदी हळू आवाज काढता येतो आणि मोठा आवाजही काढता येतो. आवाजाची वारंवारिता आणि तीव्रता, मेंदूच्या आज्ञेनुसार बदलविता येते. लता मंगेशकर किंवा भीमसेन जोशी यांच्या गायनात नाद, सूर, लय, रागदारी वगैरेंचे बारकावे किती बहारदार असतात याची आपणा सर्वांना जाणीव आहेच. हेच बारकावे त्यांच्या कानांनाही जाणवतात.
आवाजाद्वारे कानात आणलेली उर्जा, कानाच्या यंत्रणेत असा संदेश निर्माण करते, की जो मेंदूपर्यंत जाऊन त्याचे विश्लेषणही होऊ शकते, त्याचा निर्णय शरीराच्या सर्व अवयवांना कळवू शकते इतकेच नव्हे तर योग्य ती कारवाईही करू शकते. श्रोत्यांची दाद हा उत्तम पुरावा आहे.
एकदा कोणती यंत्रणा सिद्ध करायची हे ठरले म्हणजे ती यंत्रणा कुठे आणि कशी सिद्ध करायची हे ठरवून तो निर्णय प्रत्यक्षात घडविणे या क्रिया अचाट आहेत पण त्या निसर्गाने साध्य तर केल्याच पण आनुवंशिक तत्वाच्या सहाय्याने पुढच्या पिढ्यात संक्रमित करण्याचीही यंत्रणा सिद्ध केली. तीही फक्त कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नैट्रोजन यासारखे साधे अणू आणि त्यांची संयुगे वापरून !! हे सर्व मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडले आहे.
मानवी मेंदूचा जसजसा विकास होऊ लागला, उत्क्रान्ती होऊ लागली तसतसा भाषेचा उदय झाला. नाद किंवा आवाजाला संकेत चिकटविले जाऊ लागले. विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी शब्द निर्माण झाले आणि भाषा निर्माण झाल्या. पशुपक्ष्यातही आवाजाधिष्ठीत भाषा असावी.

 

 

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..