नवीन लेखन...

सही, सही एकदम सही

सही रे सही या नाटकात एका साध्या, छोट्या, क्षुल्लक, तुच्छ अशा सहीमुळे केवढे मोठे नाट्य घडते बघा. मी तर असेही वाचले की त्या नाटकाबाहेरही बरेच नाट्य घडले म्हणून. पण असो तो आपला विषय नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला निर्विवादपणे सांगू शकतो की नाटकातल्या काय आणि नाटकाबाहेरच्या काय साऱ्या नाट्याला जर कोणी कारणीभूत असेल तर ती आहे सही. तुमच्या आमच्या आयुष्यात घडनाऱ्या नाट्यामधे सहीचा सिंहाचा वाटा असतो. बर सहीवरुन नाट्य घडायला तुम्ही कोणी मदन सुखात्मेच असायला हवे असे काही नाही. तुम्ही कोण्या बुद्रुकवाडीचे दगडू धोंडे चोरे, टोरे जरी असलात तरीही तुमच्या आयुष्यात सहीवरुन नाट्य घडू शकते कारण सहीची ताकद. ही ताकद अच्छे अच्छोकी बोलती बंद कर देती है. अगदी सफाइने खोट बोलनाऱ्याला म्हणा ‘बाबारे तू जे बोलतोय ना ते सारे एका कागदावर सही करुन लिहू दे’ नाही त्याची दातखिळी बसली तर सांगा. या देशात धादांत खोटे बोलनारी दोनच माणसे एक राजकारणी आणि दुसरा साडीच्या दुकानातला सेल्समन. तुम्ही त्यांच्यापैकी कुणावरही हा प्रयोग करुन पहा, माझ्या म्हणण्याची प्रचिती नाही आली तर कळवा. इमेल करा, एसएमएस करा, काहीही करा.

हिंदी चित्रपटांच्या लेखकांना या सहीमुळे केवढा फायदा झाला बघा, तो लेखक कसलेही डोके न लावता चित्रपटाचा शेवट या सहीमुळे अगदी सहीसकट सहज लिहून टाकतो. साधारणतः साऱ्याच चित्रपटातले शेवटचे दृष्य सारखेच असते. ती त्या विलेनची धमकी ‘बुढ्ढे तू उस कागजपे साइन कर दे वरना.’ पुढे काहीही असू शकते कधी कोणाचे तुकडे तुकडे करायचे, तर कधी कुणाला जिवंत गाडायचे, तर कधी उकळत्या तेलात फेकून द्यायचे. हल्ली त्यातही बरेच इनोव्हेशन आणि क्रिएटीव्हीटी आलेली आहे. लोक कशा कशात इनोव्हेशन करतील काही सांगता येत नाही आमच्यासाठी तर ते संडासतले फॉसेटच फार मोठे इनोव्हेशन होते. सार कस ऑटोमेटीक, असो. विलेनची ती धमकी ऐकून मग तो जर्जर म्हातारा थरथरत्या हातात पेन घेउन त्या कागदावर सही करणार तेवढ्यात कुण्या मरतुकड्या हिरोची दिमाखात एंट्री, मग ती लुटुपुटुची लढाइ, विलेनची हार, हिरोचा विजय आणि शेवटी पोलीसाची सारवासारव. पोलीस गेल्यावर चित्रपटातला सर्वात महत्वाचा प्रसंग येतो हिरोइनने त्या हिरोला गळे काढत मिठी मारणे. तो सीन बघितला की मग आपणही पैसे वसूल झाले म्हणून जोरजोरात शिट्या मारत थेयटर सोडतो. कुठेतरी मनात आशा असते कधीतरी कुणीतरी आपल्याही अशीच मिठी मारेल. काही झाले तर सिनेमा हा स्वप्न विकायचाच बाजार असतो. या साऱ्यात एक महत्वाची गोष्ट दुर्लक्षिल्या जाते ती म्हणजे सही. जरा विचार करा त्या हिरोची एंट्री व्हायच्या आधी जर का म्हाताऱ्याची सही करुन झाली असती तर ….. आता मी तुम्हाला स्टँपपेपरवर सही करुन लिहून देतो त्या हिरोइनने त्या विलेनला मिठी मारली असती हिरोला नाही. अरे ती सही व्हायची थांबली म्हणून तो कालचा मरतुकडा पोरगा, ज्याच्यावर रस्त्यावरच काळं कुत्रही भुंकत नव्हत तो आज हिरो झाला. सारी सहीची करामत.

आता म्हणे सहीएवजी बायोमेट्रीक की काय असा प्रकार येणार आहेत. त्यात ते तुमच्या बोटांचे ठसे, डोळ्याचा रॅटीना स्कॅन किंवा ह्रदयाचा स्कॅन वगेरे असले काहीतरी घेणार आहेत. असे स्कॅन (MRI, CITI, Airport Scan) सारखे भयंकर प्रकार का नेहमी करायचे. सही हीच तर व्यक्तीची ओळख आहे कशाला बदलायची. सहीची सर त्या बायोमेट्रिकला येनार आहे का? आठवा दिवारमधला तो दोन भावांमधला जागतिक ख्यातीचा अजरामर संवाद. हो जागतिक किर्तीचाच, उद्या कुण्या हॉलीवूडच्या चित्रपटात जॉर्ज क्लूनी हेच वाक्य ब्रॅड पिटला ऐकवित असेल. ‘जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाइ तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं साइन करनेको तयार हू.’ काय ताकत आहे या संवादात बघा. ही ताकत का आली हे सांगायलाच नको. अर्थातच सही. आता हाच संवाद जरा त्या बायोमेट्रीकचा आधार घेउन लिहायचा झाला तर कसा होइल. ‘जाओ पहले उस आदमी का अंगूठा लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाइ तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं अंगूठा लगानेको तयार हू.’ खरच कुणी अमिताभ हे वाक्य शशीकपूरला ऐकविणार आहे. फारच झाले तर जॉनी लिव्हर जगदीपला सांगेल. जानच नाही राहीली आता त्या संवादात. बिर्याणीतले चिकन, मटन, मसाला सारे काढून उरलेल्या भाताला तुप जिऱ्याची फोडणी दिल्यासारखे वाटेल. खरच कोणी सलीम जावेद असल्या प्रकारचा संवाद लिहायला धजेल का? तेंव्हा सहीला आव्हान देणे म्हणजे आजपासून घरात माझी सत्ता आहे असे बायकोला सांगण्यासारखे आहे. ती ऐकनार आहे का? किंवा रिक्षावाल्याला लेन कटींगचा नियम समजावून सांगण्यासारखे आहे. तो समजून घेणार आहे का? सहीच्या ताकतीला आव्हान द्यायचे नाही.

सही ही चार प्रकारची असते मालदार सही, वजनदार सही, भानगडीची सही आणि अतिसामान्य सही. ज्या सहीमुळे माल मिळतो ती सही म्हणजे मालदार सही. म्हणजे आता बघा तुम्ही पन्नास रुपयाला एक साधी फडतूस बॅट घ्या. त्या बॅटवर सचिन तेंडुलकरची सही घ्या. रीटायर्ड झाला म्हणून काय झाले आपण देव बदलत नसतो. तीच बॅट तोच दुकानदार तुमच्याच कडून पन्नास हजार रुपयाला घेइल. असा माल मिळवून देणारी सही म्हणजे मालदार सही. मालदार सहीचे दुसरे उदाहरण म्हणजे चित्रकाराची सही. माझ्यासारख्या अतिसामान्य बुद्धिच्या कलादरीद्री माणसासाठी ते मॉडर्न पेंटींग म्हणजे मुलाचा पाय लागून सांडलेले रंग आणि ते पुसण्यासाठी म्हणून फिरविलेला बोळा. आता अशा न उमजनाऱ्या पेंटींगवर कुण्या मोठ्या चित्रकाराने सही केली की त्या चित्राला खऱ्या अर्थाने ‘अर्थ’ प्राप्त होतो. ते पेंटींग करोडो रुपयाला विकल्या जाते. प्रत्येकाला त्या पेंटींगमधे वेगळे वेगळे अर्थ सापडायला लागतात. आता जर का त्याच पेंटींगवर त्या कोण्या मोठ्या चित्रकाराएवजी खालच्या आळीतल्या देशपांडे वकीलाने सही केली तर कोण त्याचे करोडो मोजेल? च्या हातात ऍफेडिव्हेटचे वीस रुपये टिकवून त्याला कटवाल. तेंव्हा जी काही किंमत आहे ती त्या पेंटींगवर कोण सही करतो त्याच्यासाठी आहे. सहीमुळे असे धबाड मिळते म्हणूनच ते चित्रकार लोक त्या सहीला दागिण्यांनी मढवतात, फुलांनी सजवतात, बिंदी लावतात, वर एक छोटीसी टिकली सुद्धा लावतात. नाहीतर आमची सही बघा. दागिण्यांनी मढवणे तर सोडा आम्ही तिला धड कपडे सुद्धा घालतो की नाही अशी शंका येते. मुळात सही ही पण एक सुंदर गोष्ट आहे हेच आम्ही मान्य करीत नाही. अशा मोठ्या लोकांच्या सहीपुढे आमच्यासारख्यांची सही म्हणजे व्हीआयपीच्या सुटकेसच्या बाजूला ठेवलेले कपड्य़ांचे गाठोडे. तिला ना धड आकार ना उकार, सजवने तर दूरच राहीले.

‘साहेब तुमचे सगळे काम झाले आहे फक्त मोठ्या साहेबांची सही तेवढी राहीली आहे’ हे वाक्य ऐकले नाही असा भारतीय नागरीक सापडणे शक्य नाही. किंबहुना भारतीय नागरीकत्वाची परीक्षा घ्यायची ठरवली तर वरील वाक्याचा खरा अर्थ काय असा प्रश्न विचारावा लागेल. ज्याला सांगता आला नाही त्याला बिनबाभोट नापास करायचे. या देशातल्या शेंबड्या पोराला देखील त्याचा अर्थ व्यवस्थित कळतो. ज्या अशा सहीशिवाय टेबलावरचा कागद पुढे सरकत नाही ती सही म्हणजे वजनदार सही. त्या सहीचे वजन त्या सही करनाऱ्याच्या वजनावर अवलंबून असते. त्या सहीच्या वजनानुसार मग तुम्हाला तेवढ्याच वजनाचे पैसे सरकावे लागतात मग हळूहळू तुमचा सरकारी कागज सरकू लागतो. वजनदार सहीचे दुसरे उदाहण द्यायचे झाले तर आता हे बघा. तुम्ही तुमच्या लग्नासाठी लाखो रुपये खर्च कराल, मोठा हॉल घ्याल, हजार पाचशे लोकांना जेवू घाला पण तुमच्या या अशा वायफळ खर्चाला सरकार दरबारी मान्यता नाही. सरकारी नियमानुसार तुम्ही नवरा बायको नाही. पण तेच आता एका दहा बाय दहाच्या खोलीत चारच लोकांच्या साक्षीने फाइलच्या ढीगाऱ्यातल्या एका रजिस्टरवर, मोडके पेन वापरुन सही करा. मग आहे कोणाची बिशाद आहे तुमचा व्हीसा रिजेक्ट करायची. तुम्ही दोघे एकमेकाचे पक्के डिपेंडंट होता. हल्लीच्या या जमान्यात दोन इंडीपेंडंट माणसे फक्त व्हीसाच्या वेळेलाच डीपेंडंट असतात. लग्नासारख्या कार्यात ही वजनदार सही फेव्हीक़ॉलचे काम करते. मजबूत जोड है.

आता भानगडीची सही म्हणजे काय जी सही केल्याने बँकेत पैसे नसूनही चेक वठवला जातो ती म्हणजे भानगडीची सही. नावाप्रमाणेच भानगडीच्या सहीमुळे भानगडी होतात, भांडणे होतात, खटले होतात, कोर्ट कचेऱ्या होतात पण त्याने भ्यायचे काही कारण नाही कारण जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे ठरत तो पर्यंत तुमच्या दोन तीन पिढ्या आरामात जगलेल्या असतात. उपयोगितेच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाल्यास भानगडीची सही पहिल्या क्रमांकावर येइल. जिवंत बापाचे डेथ सर्टीफिकेट आणणे किंवा मेलेल्या बापाचे आजच्या तारखेचे मृत्युपत्र आणणे, असलेली बहीण गाळणे किंवा नसलेली बहीण उभी करणे, बॉसच्या नकळत साळ्याच्या भानगडीच्या प्रॉपर्टीचे लोन मंजूर करणे किंवा बॉसने मंजूर केलेले शेजाऱ्याचे लोन नाकरणे अशी कितीतरी भानगडीच्या सहीच्या उपयुक्ततेची उदहरणे देता येतील. असे असूनही भानगडीची सही ही काही कोण्या लेच्यापेच्या व्यक्तीची गोष्ट नाही. त्यासाठी प्रखर बुद्दीमत्ता, हातात कला आणि मुख्य म्हणजे प्रचंड हिम्मतीची गरज लागते. वेळ पडल्यास कुण्या दरोडेखोराच्या सोबतीने दहा बाय दहाच्या खोलीत रात्र काढायची तयारी ठेवावी लागते.

भानगडीच्या सहीच्या अगदी विरुद्ध म्हणजे अतिसामान्य सही. जी सही केल्याने बँकेत पैसे असूनही चेक परत येतो ती म्हणजे अतिसामान्य सही. या अतिसामान्य सहीवर एक फार मोठ बंधन असते ते म्हणजे ही सही नेहमी एकसारखीच असली पाहीजे नाहीतर त्या अतिसामान्यांच्या गर्दीत तुम्ही कोण सामान्य ते ओळखू येत नाहीत. सामान्य माणसाचे सारे आयुष्य ती अतिसामान्य पण वेगळी अशी सही करण्यात जाते. मागे एकदा माझा चेक परत आला कारण काय? तर सहीला शेवटी दोन स्ट्रोक जास्त झालेत म्हणे. आता सही करताना त्याला किती स्ट्रोक आहेत हे मोजून सही करायची का. तेव्हापासून मला चेकबुकवर सही करायची धास्तीच वाटते. एका चेकबुकामागे निदान दहा तर चेक मी सही चुकली म्हणूनच फाडून फेकतो. असेच कागद फाडल्यामुळे वर्षभरात मी एका झाडाचा तरी गळा नक्कीच दाबत असेल. माझ्यासारखी निदान लाखभर माणसे तरी सापडतील तेंव्हा या सहीमुळे उगाचच एक लाख झाडांना आपला जीव गमवावा लागत आहे.

माझाच काय बहुतेकांचा कॉलेज पूर्ण होइपर्यंत सहीशी फारसा संबंध येत नाही. स्कॉलरशीपसाठी सही करावी लागायची पण त्यावेळेला माझ्या सहीपेक्षा त्या रेव्हून्यू स्टँपची किंमत जास्त होती. मी आधी मराठीत सही करायचो, मग इंग्रजीत सही करायला शिकलो. छान कॅपीटल लेटर मधे सारी अक्षरे सुटसुटीत लिहायचो. कोणी म्हणाले की असे रांगेत उभे केलेल्या मुलांसारखी सही करशील तर उद्या कुणीही तुझी सही करुन पैसे उचलून नेईन. तेंव्हा करस्यू रायटींग मधे सही करायला शिक. मी ते शिकून घेतले. मुळात माझे अक्षर म्हणजे मुंगळ्याच्या पायाला शाही लावून त्याला कागदावर सोडून दिल्यासारखे आणि आता ते करस्यू रायटींग म्हणजे आधीच मुंगळा (मर्कट) त्यात मद्य प्याला. माझ्या एका मित्राने सांगितले कोणी सहीवरुन माणसाचा स्वभाव, भविष्य वगेरे सांगतो. त्याने सांगितले की जर सही वर जाणारी असेल तर तो मनुष्य आयुष्यात वर जातो. तितका वर नाही…. पण त्याची प्रगती होती. सहीखाली एक रेष ओढली असेल तर ती त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दर्शविते. या साऱ्या गोष्टी ऐकून मी सुद्धा सहीचा वापर करुन माझे भविष्य बदलवायचे ठरविले. मी सहीला तिरपी करुन वर नेली, आत्मविश्वास दाखवायला त्याखाली एक काय दोन रेषा ओढायला लागलो. हे असे केल्याने भविष्य कितपत बदलले हे काही सांगता येनार नाही पण मी मात्र वरवर जात राहीलो म्हणजे राहायला घर नेहमी वरच्या मजल्यावरच मिळाले.

अशी सही करीत करीत मी मोठा झालो. कॉलेज संपल्यावर मी पहीले काम कुठले केले असेल तर ते होते पासपोर्ट बनविण्याचे. माणसाच्या स्वप्नांच्या भरारीचे काही सांगता येत नाही, उगाचच आशा आपली. त्यावेळेला जशी करता येत होती तशी सही मी त्या पासपोर्टवर केली आणि विसरुन गेलो. पुढे जाउन ही सही गोचीड जसे बैलाच्या पाठीला चिकटते तशी आयुष्यभर मला चिकटणार आहे आणि रक्त काढल्याशिवाय काही ती बाहेर येणार नाही याची तिळमात्र कल्पना नव्हती. एका साध्या सहीमुळे मनस्ताप वगेरे व्हायला आमच्या बापजाद्याने काही गडगंज इस्टेट वगेरे ठेवली नव्हती. मी मुंबईला नोकरीला लागलो आणि बँकेत अकाउंट उघडायची गरज पडली तेंव्हा माझे ओळखपत्र म्हणून मी पासपोर्ट दिला. तोच पासपोर्ट माझ्या सहीचा पुरावा म्हणून सुद्धा वापरात येणार होता. मी त्या बँकेच्या फॉर्मवर पण मला यावेळेला जमेल तशी सही केली. काही दिवसांनी बँकेचा मनुष्य पासपोर्ट घेउन परत आला.

“सर सही मॅच होत नाही” मी निरखून बघितले तो म्हणत होता ते खरे होते.

“खरे आहे. आता वयोमानानुसार सही बदलतेच ना.”

“नो सर सही तशीच पाहीजे, पासपोर्टवर आहे अगदी तशी.”

आता आली ना पंचाइत. एक तर आमचे अक्षर असे दिव्य, त्यात त्या पासपोर्टवर करस्यू रायटींग मधे तीन वर्षापूर्वी केलेली इंग्रजी सही, आता परत तशीच्या तशीच कशी करनार. एकवेळ एकदा काढलेली चांगली अक्षरे परत तशीच काढता येतात पण एकदा केलेली घाण परत तशीच नाही करता येत हो. शेवटी घाण ही घाणच ती अशी केली का अन तशी केली का. तो बँकवाला माझे हे असल लॉजिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेही लॉजिक आणि सरकारी काम याचा फारसा संबंध नसतो. तेंव्हा तो बँकवाला एकच री ओढत होता तशीच सही पाहीजे आणि मी त्या सहीची प्रॅक्टीस करण्याच्या नादात कागदावर कागद फाडीत होतो. शेवटी माझे लक्ष त्या पासपोर्टवरील फोटोकडे गेले. मी परत एकदा लॉजिक वापरायच ठरविले. जुनी खोड काय करता

“का हो हा फोटो तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून चालतो का?”

“हो तो फोटो बरोबर आहे”

“आता तर मी तसा अजिबात दिसत नाही तरी तो तुम्हाला चालतो मग ही सही का चालत नाही?”

माणसाचा चेहरा बदलू शकतो, त्याची उंची वाढू शकते, त्याचे शरीर वाढू शकते पण सही मात्र तशीच हवी. माणूस कपडे बदलू शकतो, चपला बदलू शकतो, गरज पडल्यास बायको सुद्धा बदलू शकतो पण सही मात्र बदलू शकत नाही. का हा अट्टहास का. असा विचार करीत पावसाची वाट बघनाऱ्या चातकाची व्याकुळता नजरेत आणून मी त्याच्याकडे बघत होतो आणि तो मात्र एक चुटकीभर सिंदूर कि किंमत तुम क्या जानो च्या तालावर एक आधा इंच सही का महत्व तुम नाही जाणते असा विचार करुन माझ्याकडे बघत होता. ल़ॉजिक कितीही योग्य असल तरी ते भावनेपुढे हरतच. तसाच माझा हा युक्तीवादही फसला आणि सही ही सारखीच पाहीजे ही सरकारी भावनाच श्रेष्ठ ठरली. तेंव्हापासून ते आजतागायत मी या सरकारी भावेनचा शिकार आहे.

“सर तुमची सही मॅच होत नाही आहे एक तासाच्या आत बँकेत येउन खातरजमा करा.”

कधीही कुणाला चेक दिला कि दोन दिवसात असा फोन येतो. कुण्या दरोडेखोऱ्याला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलीस दोन दिवसात आत्मसमर्पण करायला सांगतात ना हा तसलाच प्रकार असतो. त्याला तरी दोन दिवसाची वेळ दिली जाते आम्हाला तर तासाभरात हाजीर व्हायचे आदेश येतात. तिथे बँकेत गेल्यावर दोन गोड मुलींसमोर सही करायची. ती सही काही भलतीच तिसरी निघते ती ना ओरीजनल सोबत मॅच होत ना त्या चेकवर केलेल्या सहीसोबत मॅच होत. त्या दोन गोड मुली मग उगाचच त्यावर खल करतात, त्याच्या गोड इंग्रजीमधून ‘काय माणूस आहे साधी सही सुद्धा करता येत नाही, सही करता येत नाही तर बँकेत अकॉउंट काढतातच कशाला?’ असे काही म्हणत असतात. मला अजून दोन तीन सह्या करायला लावतात वेगवेगळ्या कागदावर सह्या करायला लावतात. अरे असे कागद नाहीतर पेन बदलून मुद्दलात काही फरक पडनार आहे का? प्रत्येक वेळेला सही ही वेगळीच. मग त्यांच्या लक्षात येते ही तर पार हाताबाहेर गेलली केस आहे मग ओळखपत्राची झेरॉक्स देउन माझी त्या गोड छळवादातून सुटका होते. हे प्रकरण इतक वाढल की हल्ली बायकोला भलतेच संशय यायला लागला. तिही विचारु लागली ‘तिथल्या मुली इतक्या सुंदर आहेत की तुझी सही नेहमीच चुकते’ तिलाही समजावून सांगतिले अरे बाबा माझ्यात एवढ स्कील नाही की मी चुकीची का असेना पण एकसारखी तशीच सही करु शकेल. उलट मला अशी शंका येते की एसीत बसून कंटाळा आला म्हणून काहीतरी भेजाफ्राय विरंगुळा म्हणून असे माझ्यासारख्याला छळण्याचा छंदच या मुलींना जडला आहे की काय? मी गेल्यावर चर्चा करीत असतील कसा घाम फुटला बघ, कसला छळला ना त्याला हात थरथरत होता.

असे हे सही सहीचे सहीसही सहीपुराण. काही सह्या अशा असतात की ज्या फ्रेम करावाशा वाटतात, ती फ्रेम दिवाणखान्यात टांगावशी वाटते. त्या फ्रेमकडे बघितल्याने प्रेरणा मिळते. अशा साऱ्या सह्यांना माझा परत एकदा सादर प्रणाम.

–मित्रहो

https://mitraho.wordpress.com

 

Avatar
About मित्रहो 7 Articles
“मित्रहो” (mitraho.wordpress.com)
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..