नवीन लेखन...

सातच्या आत, घराबाहेर !

‘पोहनकर फाउंडेशन’तर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मी निघालो होतो. विदर्भातील एका बऱ्यापैकी मोठया शहराला वळसा घालून तालुक्याच्या गावाकडे निघालो असताना निसर्गरम्य घाटाच्या वळणावर धाबा स्टाईलचं एक रेस्टॉरेंट दृष्टीस पडलं. शहरापासून जवळ असलेल्या निर्मनुष्य घाटातील या ठिकाणी मुद्दाम पोटपूजा करण्यासाठी कोण येत असावं? काही वर्षांपूर्वी या घाटातून मी अनेकदा प्रवास केला होता तेव्हा इथे एकही धाबा नव्हता. पोटात कावळ्यांनी कावकाव करायला सुरवात केली होती. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी गरमागरम जेवण मिळालं तर काय मजा येईल असा विचार करत एका खुर्चीवर स्वत:ला झोकून देत ड्रायव्हिंगचा शीण घालविण्यास सुरवात केली. वेटरला ऑर्डर दिल्यानंतर जेवण तयार होण्याची वाट बघत असताना तिथे मोटारसायकलवर एक तरुण जोडपं आलं. त्या दोघांच्या वय व पोशाखावरून ते कॉलेजवीर होते हे स्पष्टच दिसत होतं. मुलीने चेहरा पूर्ण झाकून घेतल्यामुळे आणि डोळ्यांवर काळा कुळकुळीत गॉगल चढविल्यामुळे ती आपलीच मुलगी आहे हे तिच्या जन्मदात्यांनाही ओळखता आलं नसतं. त्या रेस्टॉरेंटच्या मोठ्या हॉलमध्ये व सभोवतालच्या जागेत माझ्या व्यतिरिक्त कुणीही नव्हतं आणि सर्व खुर्च्या अगदी रिकाम्या पडल्या होत्या. पण तरीही तिथे न थांबता ते दोघे एका झोपडीच्या दिशेने चालू लागले. त्या कॉटेज नामक झोपडीत त्यांनी प्रवेश करताच तिचा दरवाजा त्वरित बंद झाला. मला वाटलं आता वेटर चहा, कॉफी किंवा खाद्यपदार्थांची ऑर्डर घेण्यासाठी त्या झोपडीकडे रवाना होईल, पण तसं काही घडलं नाही.

गरम जेवणावर ताव मारण्यात गर्क झालो असतानाच तिथे आणखी तीन मोटरबाईक्सवर सळसळत्या तरुणाईचं आगमन झालं. आपल्याला कोणीही ओळखू नये म्हणून चेहरा पूर्ण झाकून घेतलेल्या कॉलेजकन्यका त्यांच्या मित्रांच्या हातात हात गुंफून हसतखिदळत कॉटेजेसकडे रवाना झाल्या. त्या जोडप्यांकडे मालकाने किंवा वेटरने ढुंकूनही बघितलं नाही. ती सगळी मंडळी तिथे का आली होती आणि त्यांना त्या झोपड्यांचा आसरा घ्यायची गरज का भासली हे माझ्यातल्या ‘पुरुषाला’ कळायला थोडाही वेळ लागला नाही. माझ्या आसपास नक्की काय घडतंय याची मला बऱ्यापैकी जाणीव झाली होती, तरीही उत्सुकतेपोटी मी वेटरकडून माहिती मिळविण्यास सुरवात केली. वेटर मला उत्साहाने सांगू लागला. ‘‘आमच्या धाब्यावर येणाऱ्या सर्व तरुण-तरुणी इथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेगवेगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत. कॉलेजमध्ये जाण्याच्या बहाण्याने वह्या-पुस्तकं घेऊन घरून निघतात,एखाद्या लेक्चरला कशीबशी हजेरी लावतात आणि सरळ इथे येऊन या झोपड्यांच्या आश्रयाने शरीरसुखाचा मनसोक्त आनंद लुटून बरोबर पाचच्या आत घरी पोहोचतात. रेस्टॉरेंट हा तर एक देखावा आहे. तुमच्यासारख्यांना जेवायला घालून आमचे हॉटेल चालणार आहे का साहेब? आम्ही खरी कमाई करतो या झोपड्यांचं भाडं वसूल करून!’’ एका साध्या वेटरने मला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं.

चार तासांचा प्रवास आटोपून तालुक्याच्या गावी पोहोचलो. इथे असलेल्या एकमेव लॉजमध्ये मला मुक्काम करावा लागणार होता. लॉजमालकाच्या भाषेत त्याचे लॉज पूर्ण ‘पॅक’ होते म्हणजेच एकही खोली उपलब्ध नव्हती. या गावात केवळ दोन दिवसांसाठी मी आलो होतो व थोडाही वेळ वाया घालवणे मला परवडण्यासारखे नव्हते. माझी अडचण ओळखून मालक माझ्यासाठी खोली उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना लागला. त्याने एका रूमच्या दरवाज्यावर नॉक् केले. दरवाजा उघडायला जवळपास दहा मिनिटे लागली. अंधाऱ्या खोलीतील मला न दिसलेल्या व्यक्तिंशी तो काहीतरी बोलला. थोड्याच वेळात त्या रूममधून अंदाजे पंधरा वर्षे वयाच्या, शाळेच्या गणवेशातील दोन मुली त्यांच्यापेक्षा वयाने बऱ्याच जास्त असलेल्या दोन पुरुषांबरोबर स्वत:चा चेहरा लपवत बाहेर पडल्या. त्या चौघांच्या देहबोलीवरून त्यांच्या त्या खोलीतील मुक्कामाच्या प्रयोजनाचा अंदाज बांधणं सहज शक्य होतं. दिवसभरात अनेक व्यक्तिंच्या भेटी घेत  असताना  त्या दोन मुलींचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हते. रात्री लॉजवर परत आल्यानंतर

जेवण घेत असताना गप्पांच्या ओघात मी मालकाकडे त्या मुलींचा विषय काढला. ‘‘या गोष्टीचं काही नाविन्य राहिलेलं नाही साहेब आमच्या गावात.’’ मालक बोलू लागला. ‘‘आजकाल पैश्याचं स्तोम इतकं वाढलं आहे की शाळा-कॉलेजातल्या मुली गिऱ्हाईकांना  खुश करण्यासाठी नेहमीच येत असतात आमच्या लॉजवर. वेळेचं मात्र बंधन पाळावं लागतं बरं का. या मुली सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचच्या मध्येच उपलब्ध असतात, कारण त्यांना ‘पाचच्या आत घरी’ पोहोचणं आवश्यक असतं ना!’’

आता आणखी एका गावात दोन दिवस मुक्काम करून मी घरी परतणार होतो. माणसं व वाहनांच्या कोलाहलापासून दूर गावाबाहेर असलेल्या या हॉटेलमध्ये मी अनेकदा मुक्काम केला होता. हॉटेलचा मॅनेजर चक्क मराठी साहित्यात एम.ए. होता. दिवसभराचं काम आटोपल्यानंतर अनेक विषयांवर आमच्या गप्पा रंगत असत. दोनच्या सुमारास मी हॉटेलमध्ये पोहोचलो. पाच मिनिटातच मॅनेजर साहेबांनी चहा हजर केला. गरमागरम चहाचे घोट घेत असताना एक आलीशान कार आवारात शिरली. मॅनेजरने लगबगीने एका रूमचा दरवाजा उघडला. कारमधून एक जोडपं उतरलं. दोघांच्या वयात जाणवण्याइतका फरक होता. तो पस्तिशीचा असावा, पण तिचं वय मात्र अठराच्या आसपास असावं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. दिवसभराची भटकंती आटोपून परतल्यानंतर मॅनेजरजवळ मी त्या जोडप्याचा विषय काढला. ‘किती दिवस झाले असतील त्यांचं लग्न होऊन?’ माझा प्रश्न ऐकून त्याला हसू आवरलं नाही. ‘‘काय साहेब, तुम्हीही त्या मुलीच्या गळ्यातील मंगळसूत्रामुळे फसलात? अहो सर, जिला सौभाग्याची खूण समजतात ती मंगळसूत्र नावाची वस्तू आजच्या जगात सर्वात स्वस्त झाली आहे आणि कोणत्या स्त्रीने कधी, कुणाच्या नावाने व कितीदा ती घालावी याला काहीच घरबंद राहिलेला नाही. तुम्ही ज्याला त्या मुलीचा नवरा समजलात तो या जिल्ह्यातला एक मोठा कॉंट्रॅक्टर आहे. तो विवाहित आहे व त्याला शाळेत जाणारी दोन मुलं आहेत. ती मुलगी बारावीत शिकते. दुपारी ठरलेल्या वेळी त्याची कार तिच्या कॉलेजसमोर उभी झाली की हॉर्नचा आवाज ऐकून ही कॉलेजबाहेर पडते. अर्ध्या तासाचा प्रवास करून ते दोघं इथे येतात, दोन ते तीन तास शरीरसुखाचा महोत्सव मनवतात व त्यानंतर मंगळसूत्राला सोडचिठ्ठी देऊन मुलगी पाचच्या आत घरात!” आठवड्यातून कमीतकमी दोन-तीनदा हे जोडपं इथे येत असतं. मुलांकडे लक्ष द्यायला आजकालच्या आईबापांकडे फालतू वेळ आहे कुठे साहेब?’’ मराठी साहित्यात एम.ए. केलेल्या त्या हॉटेल मॅनेजरचं वक्तव्य ऐकून मी आ वासून त्याच्याकडे बघत राहिलो. भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानंतर असंख्य लहानसहान धक्के बसतच असतात याचा प्रत्यक्ष अनुभव मी अनेकदा घेतला होता, पण या दौऱ्यात एकामागून एक बसणारे (अ)नैतिक धक्के मात्र पचवायला जड जात होते!

घरी पोहोचलो तेव्हा टी.व्ही. वर ‘सातच्या आत घरात’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट सुरू होता. चित्रपटातील पात्रं प्रेक्षकांना मर्यादा पाळण्याविषयी विविध प्रकारे संदेश देत होती. ‘सातच्या आत घराबाहेर’ असताना दिवसाढवळ्या तरूण-तरुणी काय करतात हे याची देही याची डोळा मी चार दिवसांपूर्वी बघून आलो होतो. चित्रपटाने मला पुन्हा एकदा अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. विविध टी.व्ही. चॅनल्सवरून रिमिक्सच्या नावाखाली सुरू असलेलं स्त्रियांच्या (आणि आता तर पुरुषांच्याही!) नग्नतेचं ओंगळवाणं व   किळसवाणं प्रदर्शन, बहुसंख्य सीरिअल्समधून होत असलेलं अनैतिक संबंधांचं उदात्तीकरण, आधुनिकतेच्या नावाखाली वाईन बार्स व पब्जकडे धाव घेत असलेली तरुणाई आणि त्यातून जन्म घेणाऱ्या स्वैराचाराने प्रदूषित झालेलं वातावरण आजच्या अत्यंत संवेदनशील अशा तरुण पिढीवर विलक्षण घातक परिणाम करतंय याबद्दल दुमत नाहीच. पण म्हणून ‘वातावरण बिघडलंय, वातावरण बिघडलंय’ अशी नुसती ओरड करणं हाच त्यावर एकमेव उपाय असू शकतो का? शिक्षण घेण्यासाठी कॉलेजात जाऊन वेळेत घरी परतण्याऐवजी तरुण-तरुणींना शरीरसुखासाठी निर्जन जागेतील झोपड्यांचा आश्रय घेण्याची इच्छा का होते? कोवळ्या वयातील शाळकरी मुलींना एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन कोणाचीही शैय्यासोबत करण्याची गरज का भासते? करिअरच्या  उंबरठ्यावर  उभ्या  असलेल्या  मुलीला  तिच्यापेक्षा  वयाने  कितीतरी  मोठ्या असलेल्या एका विवाहित पुरुषाला सर्वस्व अर्पण करण्याची का इच्छा होते? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा शोध जिथे संपतो त्या जागेचं नाव आहे ‘घर’! निर्जीव दगडविटांच्या इमारतीत हाडामासाच्या जिवंत माणसांनी जे जन्माला घालणं अपेक्षित असतं ते घर. तुम्ही सातच्या आत घरात असा की घराबाहेर, या जगातलं खरंखुरं आणि सर्वात प्रभावी संस्कार केंद्र असतं ते प्रत्येकाच्या घरात आणि त्याचे संचालक असतात प्रत्यक्ष जन्मदाते. आज अशा बहुसंख्य घरांची काय अवस्था आहे? विनाकारण वाढवून ठेवलेल्या गरजा, इतरांबरोबर स्वत:ची तुलना करण्याच्या नादात केल्या जाणारा व न पेलवणारा खर्च, वर्षानुवर्षे अहंगड जोपासत बसल्यामुळे विस्कटलेले संसार आणि सांधता न येणारे तडे गेलेली मनं, आई-वडील व मुलांमधील संपत चाललेलं भावनिक सख्य व सुसंवाद या सगळ्या आधुनिक युगाच्या देणग्या असंख्य घरांना शेवटची घरघर लावताहेत. या जगात अस्तित्वात आल्यानंतर मुलं सर्वात जास्त जर कुणाचं अनुकरण करत असतील तर ते त्यांच्या जन्मदात्यांचं. सकाळी जाग येताक्षणीच तोंडातून सिगारेटचा धूर सोडणाऱ्या र्पिताश्रींचं ज्या घरात मुलांना दर्शन होतं त्यांनी वयात आल्यानंतर देवघरातल्या निरांजनावर सिगारेट पेटवली तर त्यात दोष कुणाचा? मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पती-पत्नी नोकरीच्या निमित्ताने जवळपास बारा तास घराबाहेर असतात. आपल्या अपत्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना जो वेळ द्यायला हवा त्या वेळाचा सदुपयोग (?) अनेकदा आत्यंतिक गरज नसलेल्या अशा अतिरिक्त अर्थार्जनासाठी केला जातो. अशा घरांमधील मुलींनी त्यांच्या भावना मोकळ्या करण्यासाठी नकळत कोणत्याही मुलांच्या खांद्यावर मान टाकली आणि त्यानंतर जर त्यांचा शारीरिक उपभोग घेण्याचा प्रयत्न झाला तर त्यात चूक कोणाची? ‘ज्या घरात आम्हाला समजून घेणारी माणसं डायनोसोर्स सारखी पूर्णत: नामशेष झाली आहेत तिथे काय करायचं आम्ही सातच्या आत घरी परतून?’ असा प्रश्न जर सगळं जग जिंकण्याची क्षमता असलेल्या तरुण पिढीने ओरडून विचारला तर आजच्या आई-वडिलांजवळ त्याचं उत्तर आहे? कोणत्याही जन्मदात्यांची खरीखुरी संपत्ती ही त्यांची अपत्यं असतात. लहान गावांमध्ये पैशाच्या अतिरेकी हव्यासापाई मुलंमुली जर बिनदिक्कत स्वैराचार करत असतील तर मोठ्या शहरात किती भयावह परिस्थिती असेल? लग्न झाल्यानंतर ‘आई’ व ‘वडील’ या पदव्या प्राप्त करण्यासाठी काही खास कर्तृत्व गाजवावे लागत नाही, पण ‘पालक’ ही उपाधी प्राप्त करणं अत्यंत कष्टसाध्य असतं.

आजच्या घराघरातील आई-वडिलांना खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठल्यातरी रस्त्याच्या कडेला ‘कॉटेज’ हे गोंडस नाव धारण केलेल्या झोपड्यांमध्ये मुलंमुली विवाहपूर्व मदनोत्सव साजरे करणार नाहीत, ‘आमची मुलं बिघडली हो’ असा आक्रोश करण्याची वेळ येणार नाही आणि ‘सातच्या आत घरात’ सारखे चित्रपट निर्माण करण्याची गरजच भासणार नाही !

— श्रीकांत पोहनकर

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..