नवीन लेखन...

रेशन कार्ड (लघुकथा)

प्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला.

पत्ता बदलल्यावर सर्व बँका, वीमा कंपनी, गुंतवणूक केलेल्या कंपन्या, गॅस एजन्सी इत्यादींना नवीन पत्ता कळवणं जसं आवश्यक होतं, तसंच ते रेशनिंग ऑफीसलाही कळवणं आवश्यक होतं – दुकान आणि पत्ता बदलण्यासाठी. अगदी पांढरं रेशनकार्ड असलं आणि त्यावर काहीही मिळत नसलं तरीही.

मग एके दिवशी हाफ डे घेऊन तो किंग्ज सर्कलच्या रेशनिंग ऑफीसमधे गेला, आणि क्वार्टर अॅलोटमेंट लेटरची झीरॉक्स प्रत जोडून अर्ज सादर केला. अर्जाची स्थळप्रत परत देतांना खिडकीतला कारकून म्हणाला –

“आज गुरूवार आहे. येत्या सोमवारी रेशनिंग इन्पेक्टर घरी येतील. शक्यतो बाराच्या आतच येतील. तेंव्हा ओरिजनल अॅलॉटमेंट लेटर आणि फोटो आय.डी. तयार ठेवा. आणि हो, स्वतः घरी रहा.”

“बरं” म्हणून तो घरी आला. अपेक्षेप्रमाणे नंतरच्या सोमवारी रेशनिंग इनस्पेक्टर घरी आले. कागदपत्रं तपासून आणि अर्जावर तपासणी केल्याचा शेरा मारून परत गेले. जाताजाता म्हणाले –

“पुढच्या सोमवारी ऑफीसला या, येतांना जुनं रेशनकार्ड घेऊन या आणि १० नंबरच्या खिडकीतून नवीन रेशनकार्ड घेऊन जा.”

आभार मानून आणि सौ. नं केलेला कपभर चहा देऊन त्यानं इनस्पेक्टर साहेबांना निरोप दिला.

पुढच्या सोमवारी जुनं रेशनकार्ड घेऊन तो रेशनिंग ऑफीसच्या १० नंबरच्या खिडकीवर हजर झाला आणि रांगेत उभा राहिला. गर्दी तशी फारशी नव्हती. पाच सहाच माणसं होती रांगेत. समोरच्या भिंतीवर लावलेल्या वेगवेगळ्या सूचना वाचण्यात तो वेळ घालवत होता. पुढे सरकत सरकत जसा त्याचा दुसरा नंबर आला, तसा तो सावध झाला. आता त्याला खिडकीतल्या कारकूनाचं बोलणं ऐकू येत होतं.

” हं, पावती आणि जुनं कार्ड द्या.”

पुढच्या माणसानं पावती आणि कार्ड दिलं. कारकूनानं गठ्ठ्यातून त्याचं रेशनकार्ड काढलं.

“काय नाव तुमचं?”

पुढच्या माणसानं नाव सांगितलं. कारकूनानं प्रकरणाची कागदपत्रं पाहिली, आणि म्हणाला –

“तुम्ही आत येऊन साहेबांना भेटा.”

“आलो” म्हणून पुढचा माणूस आत जायला निघाला, तसं त्यानं आपली पावती आणि जुनं कार्ड खिडकीतून आत सरकवलं. ते घेता घेता कारकुनानं विचारलं –

“गेला का तो?”

“हो, गेला.”

“लांब गेला का?”

“हो, लांब गेला. का हो?”

“काय आहे, रेशनिंग इन्पेक्टर साहेबांनी त्याच्या अर्जावर रिमार्क मारलाय की ह्या कुटुंबातील अमुक नावाचा माणूस मयत आहे म्हणून.”

“बरं, मग?”

“त्याच नावाचा माणूस नवीन कार्ड मागायला आलाय.”

-संजीव गोखले,
१४ जून २०२२.

Avatar
About संजीव सदाशिव गोखले 8 Articles
मी ज्येष्ठ नागरिक असून अधून मधून लिहित असतो, नियमित लेखक होण्याची मनीषा असली तरी अजून झालेलो नाही. यापूर्वी मी आनंदवन हेमलकसा सोमनाथ प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबाबत फेसबुक वर लिहिले आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेबद्दल मी केलेले लेखन ""ब्रह्मांड – एक आठवणे"" या शीर्षकाखाली दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झाले आहे. २००४ साली मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून स्वेच्छा निवृत्त झालो.तेंव्हापासून वास्तव्य पुणे. थोडीफार लेखनाची आवड आहे. कोणत्या एखाद्या खास विषयावर नाही, जे सुचेल ते लिहितो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..