नवीन लेखन...

राजकन्या आणि सिंह

कथा म्हटली की राजा आणि राणी आलेच, ते होतेच.
राजा खूप म्हातारा नेमबाज आणि दरारा निर्माण करणारा होता.
असा ओरडायचा की उंदीर सुध्दा घाबरून आपापल्या बिळांत घुसून लपायचे.
पूर्वी तिथे व्हीस्परींग बेन म्हणून कुटुंब रहात असे.
जेव्हा त्याने ५०००० एकर जागा खरेदी केली आणि मोजतां येणार नाहीत इतकी गुरे आणली, तेव्हा त्याला गुरांच्या कळपाचा राजा म्हणू लागले.
राणी ही मेक्सिकन मुलगी होती.
तिने राजा बेनला ओरडल्या शिवाय कसे बोलायचे, हे शिकवले आणि घरांतल्या कपबशा वगैरे फुटण्यापासून वाचवल्या.
जेव्हा बेन राजा म्हणून बसू लागला, तेव्हा ती समोर बसून चटया विणत बसे.
जेव्हा संपत्ती खूपच वाढली तशी गाड्यांमधून खुर्च्या, टेबल, इ फर्निचर शहरांतून आले.
तिने त्या नशीबापुढे मान तुकवली आणि त्याचा वापर सुरू केला.
फक्त सुरूवात म्हणून राजा आणि राणी यांना तुमच्यापुढे सादर केलं, त्यांचा कथेमधे कांही सहभाग नाही.
कथा आहे राजकन्येची आणि आपल्या कामांत चूक करणाऱ्या सिंहाची.
राजकन्या जोसेफा ही राजाची एकुलती जिवंत वारस होती.
तिने आईकडून वागणूक, सर्वांना सांभाळून घेणारा गोड स्वभाव आणि सौंदर्य वारशात मिळवलं होतं तर राजा बेनकडून निडरपणा, व्यवहार चातुर्य आणि राज्य चालवण्याची कला मिळवली होती.
अगदी खूप दुरून जाऊन पहाण्यासारखा तो गुणांचा संगम होता.
जोसेफा घोड्यावरून धावतांना रायफलच्या सहापैकी पांच काडतुसांत हलणाऱ्या दोऱ्यावरचे टोमॅटो टीपत असे.
ती तास न तास आपल्या मांजरीच्या पिलाबरोबर त्याला वेगवेगळे कपडे घालत खेळू शकत असे.
ती दोन वर्षाच्या जंगली प्राण्यांच्या अवयवांची किंमत काय येईल, हे सांगू शकत असे.
साधारण तो मळा चाळीस मैल लांब आणि तीस मैल रूंद पसरलेला होता पण बरीचशी जागा भाड्याने दिली होती.
जोसेफाने आपल्या तट्टावरून त्यांतील प्रत्येक मैलाची नीट पहाणी केलेली होती.
कुरणावरचा प्रत्येक गुराखी तिला ओळखत होता आणि इमानदार कुळाप्रमाणे वागत होता.
रिपली गीव्हन्स, हा गुराख्यांच्या एका छोट्या गटाचा प्रमुख होता.
त्याने एक दिवस जोसेफाला पाहिले व मनांत ठरवले की तिच्याशी राजेशाही विवाह करायचाच.
त्याचे दु:साहस म्हणायचे कां ?
नाही, त्या काळी त्या राज्यात पुरूष हा पुरूष होता आणि राजा ही उपाधी कांही वंशपरंपरेने मिळत नव्हती.
अनेक वेळा त्याचा अर्थ एवढाच असे की हा माणूस खूप जनावरं बाळगतो आणि दुसऱ्यांची गुरे पळवण्यांत वाकबगार आहे.
एक दिवस रिपली गीव्हन्स एल्म मळ्याकडे कांही चुकलेल्या गुरांची चौकशी करायला गेला होता.
त्याला तिथून परततांना उशीर झाला आणि तो “पांढरा घोडा” नाक्यावर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती.
तिथून त्याचे मुक्कामाचे ठिकाण सोळा मैल दूर होते तर एस्पिनोसा मळा बारा मैलांवर होता.
गीव्हन्स खूप दमला होता.
त्याने रात्र तिथेच काढायचे ठरवले.
नदीकांठी एके ठिकाणी झरा होता.
नदीच्या काठावर दाट झाडी होती व झाडांच्या खाली तशीच गच्च झुडुपं होती.
झऱ्यापासून पन्नास यार्डांवर छान गवत होतं, जे त्याच्या घोड्याला संध्याकाळच्या जेवणासारखं होतं तर त्याला स्वत:लाही तो मऊ बिछाना होणार होता.
त्याने आपला घोडा खुंटीला बांधला आणि खोगीर वगैरे उतरवून ठेवलं.
तो एका झाडाला पाठ टेकून बसला आणि त्याने सिगारेटची गुंडाळी तयार केली.
त्या घनदाट झाडांमधून कुठून तरी अचानक घोड्याचे जोराने थरथरणारे खिंकाळणे कानी आले.
त्याचे तट्टू भिऊन दोरी तोडायचा प्रयत्न करत नाचू व ओरडू लागले.
गीव्हन्सने आरामात सिगारेटचे झुरके घेतले पण त्याचा एक हात गवतात पडलेल्या पिस्तुलाकडे गेला व त्याने त्याची नळी अंदाजानेच आवाजाच्या दिशेने रोखली.
एका माशाने पाणी उडवत पाण्यातच उडी मारली आणि एक कबरा ससा फुलांच्या मधून बाहेर पडून आपले कल्ले खाजवत गीव्हन्सकडे हंसत पहात उभा राहिला. त्याचे तट्टू पुन्हा चरू लागले.
जेव्हा सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी मेक्सिकन सिंह गर्जना करून गातो, तेव्हां सावध रहाणं जरूरीच असतं.
त्याच्या आरोळीचा असाही अर्थ असू शकतो की त्याला गाईंचे बछडे, शेळ्या, पुरेशा मिळत नाहीत आणि जमल्यास तुमचीही ओळख करून घेण्याची त्याची हिंसक इच्छा असते.
गवतावर पूर्वी तिथून जाणाऱ्या एखाद्या प्रवाशाने फेकलेला एक फळांचा मोकळा डबा पडलेला होता.
गीव्हनसने त्याच्याकडे समाधानाचा आवंढा गिळत पाहिलं.
त्याच्या खोगीराला लावलेल्या कोटाच्या खिशांत मुठी, दोन मुठी कॉफी होती.
काळी कॉफी आणि सिगारेटस मळेवाल्याला आणखी काय हवं असतं.
दोन मिनिटांत त्याने पेटवलेला अग्नी स्पष्ट दिसू लागला.
तो आपला पत्र्याचा डबा घेऊन झऱ्याकडे वळला.
तिथून पंधरा यार्डावर डाव्या बाजूला पाठीवर खोगीर लटकत असलेलं व लगामासकट सोडलेलं एक तट्टू कुरणात चरतांना त्याला दिसलं.
तेवढ्यात तिथेच आपले हात आणि गुडघे ह्यावर बसलेली व नुकतेच झऱ्याचे पाणी पिऊन उठत असलेली जोसेफा दिसली.
तिच्यापासून दहा यार्डावर उजव्या बाजूला झुडुपांनी दडवलेला एक मेक्सिकन सिंह तिच्यावर झडप घालण्यासाठी पवित्रा घेत असलेला त्याला दिसला.
त्याचे पिवळे डोळे भुकेने चमकत होते व तिथून सहा फुटांवर असलेली त्याची शेपटी ताठ झाली होती.
सावजावर झडप घालतानाची तयारी करतांना त्याच्या मागच्या पायांचे स्नायु किंचित थरथरत होते.
जे करणं शक्य होतं ते गीव्हन्सने केलं.
त्याची सहाबारी बंदूक पस्तीस यार्डावर गवतात पडलेली होती.
तो जोरात ओरडला आणि राजकन्या आणि सिंह यांच्यामधे पडला
नंतर ह्या बद्दल बोलताना गीव्हन्स म्हणाला, “गोंधळ थोडाच वेळ आणि न समजण्यासारखा झाला.
तो जेव्हा सिंहाच्या झेपेच्या रेषेत आला तेव्हां त्याला हवेत एक हलकीशी शलाका दिसली आणि थोडा आवाज आला.
मग तो शंभर पौंडांचा सिंह “थाड्” असा आवाज करून गीव्हन्सच्या अंगावर पडून आपटून निपचित पडला.
गीव्हन्सला आपण “सोड, आता जास्त मस्ती नाही” असं ओरडल्याची आठवण झाली.
मग तो त्या सिंहाच्या धूडाखालून कीड्यासारखा लोळत बाहेर सरकला.
त्याच्या तोंडात माती व घाण गेली होती आणि डोकं झऱ्याच्या मूळाशी असलेल्या खडकावर आपटून मागे एक मोठं टेंगूळ आलं होतं.
सिंहाची कांहीच हालचाल नव्हती.
गीव्हन्सला आपल्यावर अन्याय झाल्यासारखं आणि आपल्याला चुकीची वागणूक मिळाली असं वाटत होतं.
त्याने सिंहाकडे पाहून मूठ दाखवली आणि ओरडला, “मी पुन्हा तुझ्याशी कुस्ती खेळीन …”
मग तो भानावर आला.
जोसेफा आपल्या जागीच उभी होती.
ती तिची चांदीने मढवलेली .३८ बंदूक पुन्हा भरत होती.
तो कठीण नेम होता पण सिंहाचे डोके हे टोमॅटोच्या हलत्या डब्ब्याहून खूप सोपे लक्ष्य होते.
तिच्या चेहऱ्यावर व काळ्याभोर डोळ्यात चेष्टा, तुच्छता, व आव्हान देणारे स्मित होते.
तिचे रक्षण करायला निघालेला सरदार त्यानेच केलेल्या गडबडीमुळे अंतर्यामी जळत होता.
त्याला संधी आली होती, जिचे त्याने स्वप्न पाहिले होते पण विदूषक, कामदेव नव्हे, त्या दृश्याचा अध्यक्ष झाला होता.
जंगलातील सर्व निःसंशयपणे गप्प राहून त्याला हंसत होते.
भुताटकी सारखे काहीतरी विचित्र होतं — सिन्योर गिव्हन्स यांची पुष्ट सिंहासह मजेदार झटापट.
जोसेफा मुद्दामच आपल्या संयमित पण गोड आवाजात म्हणाली, “मिस्टर गीव्हन्स, तुम्हीच आहांत कां ते ?
तुम्ही ओरडलांत, तेव्हां तुम्ही जवळजवळ माझा नेम चुकवलाच होतात.
तुम्ही पडलात तेव्हां तुम्हाला लागलं नाही ना फारसं !”
“अरे, नाही,” गिव्हन्स शांतपणे म्हणाला; “त्याने कांही दुखापत नाही झाली.”
तो शरमतच वाकला आणि त्याची सर्वोत्तम टोपी त्या प्राण्याच्या अंगाखालून त्याने ओढली.
ती एखाद्या विदूषकाची विनोदी टोपी वाटावी अशी दबलेली व वांकडी झालेली होती.
मग त्याने गुडघे टेकले आणि मृत सिंहाच्या भयंकर, जबडा उघडा असलेल्या डोक्यावर हलकी टपली मारली.
“गरीब बिचारा म्हातारा बिल !” तो शोकपूर्वक उद्गारला. “हें काय ?”
जोसेफाने रागानेच विचारले.
आपण औदार्याने दुःखावर मात करू शकतो, असा आव आणत गीव्हन्स म्हणाला “नक्कीच, मिस जोसेफा, तुम्हाला माहित नव्हते, तुम्हाला कोणीही दोष देऊ शकत नाही.
मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला वेळेत कळवू शकलो नाही.”
जोसेफाने विचारले “कोणाला वाचवायचा ?”
गीव्हन्स म्हणाला, “का, बिलला ! मी दिवसभर त्याला शोधत होतो. गेली दोन वर्षे तो आमच्या कॅम्पचा पाळीव प्राणी आहे.
गरीब म्हातारा, त्याने कापसाच्या सशाला सुध्दा दुखापत केली नसती.
त्याच्याशी खेळणाऱ्या सर्व मुलांना ह्याबद्दल कळेल, तेव्हां त्यांना खूप दु:ख होईल.
पण मी तुम्हाला हे सांगू शकलो नाही की बिल तुमच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.”
तिने कठोर भूमिका घेत विचारले.
“तुमचे पाळीव प्राणी येथे काय करत होते ? “पांढरा घोडा” नाक्याजवळ एकही छावणी नाही.”
गिव्हन्सने सहज उत्तर दिले, “हा म्हातारा बदमाश काल कॅम्पमधून पळून गेला, ही आश्चर्याची गोष्ट आहे की लांडग्यानी त्याला मारला नाही.
तुम्ही बघा, आमचा घोडे सांभाळणारा जिम वेबस्टर, गेल्या आठवड्यात एका छोट्या टेरियरच्या पिल्लाला कॅम्पमध्ये घेऊन आला.
त्या पिल्लाने ह्या बिलचे जीवन दयनीय बनवले–तें त्याचा पाठलाग करत असे.
त्याचे मागचे पाय तासनतास चघळायचें.
रोज रात्री झोपायची वेळ आली की बिल पिल्लाला दिसू नये म्हणून एखाद्या मुलाच्या घोंगडीत घुसून झोपायचा.
मला वाटते की तो खूपच हताश झाला असावा नाहीतर एवढ्या दूर धावला नसता.
त्याला कॅम्पच्या सुरक्षे बाहेर पडण्याची नेहमीच भीती वाटायची.”
जोसेफाने त्या भयानक मृत सिंहाकडे एकदा पाहिले.
गिव्हन्स हलकेच सिंहाच्या एका पंजावर, ज्या पंजाने एका फटक्यांत एक प्राणी मारला असता, हात फिरवत उभा होता.
हळू हळू जोसेफाच्या सुंदर नितळ चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसू लागला.
तें उगाचच एका निरपराध श्वापदाला ठार मारल्याचं खिलाडू वृत्तीचं दु:ख होतं कां ?
तिचे डोळे नरम पडले आणि पापण्या लवल्या.
त्यांतली थट्टा निघून गेली.
ती नम्रपणे म्हणाली, “मला दु:ख वाटतय !
पण तो एवढा अवाढव्य होता आणि त्याने इतकी उंच झेप घेतली की…”
गीव्हन्स मेलेल्या सिंहाची वकिली करत मधेच म्हणाला, “बिचारा बिल खूप भुकेला होता.
आम्ही त्याला कॅम्पमधे त्याच्या जेवणाआधी उड्या मारायला लावायचो.
तो मटणाच्या एका तुकड्यासाठी जमिनीवर लोळण घ्यायला तयार असायचा.
त्याने जेव्हा तुम्हाला पाहिलं, तेव्हां त्याला तुमच्याकडून कांही खायला मिळेल असं वाटलं असणार.”
अचानक जोसेफाचे डोळे मोठे झाले.
ती उद्गारली, “मी तर तुम्हाला मारले असते. तुम्ही अगदी मधेच आलांत.
तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे रक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला.
हे फारच चांगलं कृत्य आहे.
मिस्टर गीव्हन्स, प्राण्यांवर दया करणारा माणूस मला आवडतो.”
तिच्या नजरेत आता कौतुक होतं.
ह्या सर्व दु:खद प्रकरणातून शेवटी एक चांगली गोष्ट घडत होती कां?
गीव्हन्सच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्याला प्राणीमित्र संघटनेमधे मोठे पद मिळाले असते.
तो म्हणाला, “मी नेहमीच प्राण्यांवर प्रेम करतो. घोडे, कुत्रे, मेक्सिकन सिंह, गायी, मगरी…”
जोसेफा म्हणाली, “मी मगरींचा तिरस्कार करते. सरपटणाऱया, चिखलांत पडलेल्या, …”
“मी मगरी म्हणालो कां ? चुकून म्हटलं, मला “मृग” म्हणजे हरिण म्हणायचं होतं.”
जोसेफानेही आणखी सुधारणा करायचा प्रयत्न केला.
पश्चात्तापाने तिने आपला हात पुढे केला, तिच्या दोन्ही डोळ्यांत पाण्याचा थेंब होता.
“कृपया मला माफ करा, मिस्टर गिव्हन्स, कराल ना !
तुम्ही जाणतां की मी फक्त एक मुलगी आहे आणि मी सुरुवातीला घाबरले होते.
मला खूप, खूप वाईट वाटते कि मी बिलला गोळी मारली.
तुम्हाला माहीत नाही की मला किती शरम वाटतेय.
मी कशासाठीही असं कृत्य केलं नसतं.”
तिने पुढे केलेला हात गिव्हन्सने हातात घेतला आणि बराच वेळ, स्वत:च्या औदार्याने बिल गेल्याच्या दु:खावर मात करेपर्यंत, धरुन ठेवला.
शेवटी त्याने तिला माफ केल्याचे स्पष्ट झाले.
“कृपया पुढे बोलू नका, मिस जोसेफा.
बिल जसा दिसतो तसा कोणत्याही तरुणीला घाबरवायला पुरेसा होता.
मी मुलांना ते सगळं समजावून सांगेन.”
“तुम्हाला खरोखर खात्री आहे की तुम्ही माझा द्वेष करत नाही?”
जोसेफा आवेगाने त्याच्या जवळ आली.
तिचे डोळे गोड होते – अगदी गोड आणि पश्चात्तापदग्ध होऊन विनवणी करणारे…
“माझ्या मांजरीचे पिल्लू मारले तरी मला मारणाऱ्याचा तिरस्कार वाटेल आणि तुम्ही स्वत:ला गोळी लागण्याचा धोका पत्करूनही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलात !
किती धाडसाचे कृत्य !
किती कमी पुरुषांनी असे केले असते !”
गीव्हन्स मनांत म्हणत होता, “पराभवाचे विजयात रूपांतर केलेस.
वगाचे नाटकात रुपांतर केलेस !
वा: ! रे, वा: ! रिप्ले गीव्हन्स !”
आता संध्याकाळ झाली होती.
अर्थात मिस जोसेफाला एकट्याने तिच्या मळ्यावर परत कसं जाऊ द्यायचं !
गिव्हन्सने त्या पोनीच्या नकारात्मक नजरेला न जुमानता त्याला पुन्हा जोडले आणि त्याच्यावर स्वार झाला.
एक राजकुमारी आणि एक प्राणीमित्र, दोघांचे तट्टू शेजारी शेजारी त्या मऊ गवतातून धावू लागले.
आजूबाजूला फळाफुलांनी भरलेली धरणी वेगवेगळे सुगंध पसरवत होती.
टेकडीवर लांडगे ओरडत आहेत !
पण त्यांना कांही भीती वाटत नव्हती.
आणि तरीही…..जोसेफा अगदी जवळून घोडा नेत होती.
एक नाजुक हात दुसरा हात शोधू लागला.
गीव्हन्सने तो आपल्या हातांत घेतला.
पोनीज जोडीने धावत होते.
हात एकत्र रेंगाळले आणि एका हाताचा मालक उद्गारला, “मी पूर्वी कधी इतकी घाबरली नव्हते पण विचार करा की खऱ्या जंगली सिंहाला सामोरं जायचं काम कठीण आहे !
बिचारा बिल ! तुम्ही बरोबर आलात, ह्याचा मला खूप आनंद झालाय.”
राजा बेन ओडोनेल पडवीत बसला होता.
तो म्हणाला, “हॅलो, रिप ! तू ..!”
“तो माझ्याबरोबर आलाय इथे, मी रस्ता चुकले होते आणि उशीरही झाला होता.”
जोसेफाने सांगितले.
ओडोनेल म्हणाला, “फार उपकार झाले. रिप, रहा तू आज इथेच आणि उद्या तुझ्या मळ्यावर परत जा.”
पण गीव्हन्स रहाणार नव्हता.
तो आपल्या मळ्यावर परतणार होता.
थोड्याच वेळांत कॅम्पकडे जायला खूप पायवाटा मिळाल्या असत्या.
तो त्यांना “शुभ रात्र” म्हणून तिथून निघाला.
एका तासाने, जेव्हा दिवे मालवले होते, तेव्हा जोसेफा आपल्या रात्रीच्या कपड्यांमध्ये खोलीच्या दाराशी आली आणि तिने गॅलरीत बसलेल्या राजाला हांक मारली, “बाबा, ऐकता कां ! तो म्हातारा मेक्सिकन सिंह होता ना !
तोच ज्याला ‘कान कापलेला सैतान’ म्हणायचे आणि ज्याने मार्टीनच्या गोन्झालेस नांवाच्या धनगराला मारले होते आणि सॅलाडो रेंजमधे पन्नास गायींचे बछडे मारले होते, मी आज त्याचे काम तमाम केले.
आज दुपारी “पांढरा घोडा” नाक्यावर तो झेप घेण्याच्या पवित्र्यात असतांना मी त्याला माझ्या बंदुकीने दोन गोळ्या घातल्या.
मी त्याला गोन्झालेजने आपल्या विळ्याने कापलेल्या डाव्या कानावरून बरोबर ओळखले.
तुम्ही सुध्दा ह्यापेक्षा जास्त अचूक निशाणा साधू शकला नसतात, बाबा.”
आपल्या राजेशाही महालातल्या अंधारात बेनचा आवाज घुमला, “तू तर काय दादागिरीत तरबेज झालीयस.”
*- अरविंद खानोलकर.*
मूळ कथा – प्रिन्सेस ॲंड पुमा
मूळ लेखक – ओ हेन्री
तळटीप- ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे.
गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं.
त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय.
खरं तर तीच त्याला मूर्ख बनवत असते कारण सिंहाला तिने आधीच बरोबर ओळखलेलं असतं व तिचा नेमही अचूक असतो.
गीव्हन्स त्यांच्याकडे कां थांबत नाही, ह्याचं कारण तितकं स्पष्ट होत नाही पण बहुदा राजा बेनला तो घाबरत असावा व आपलं बिंग फुटेल, अशी त्याला भीती वाटत असावी.
गीव्हन्सचं बिंग आधीच तिला कळलं होतं व तीच त्याला खेळवत होती.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..