मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ….एक वेध इतिहासाचा…

Pre-Mughal India - A look at the history

मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ) – सिंध, मुलतान , आताच्या ब्रम्हदेश – बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आजच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असा चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता; सर्व राज्ये – राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.

हिंदुस्थानच्या इतिहासातील मुसलमानी अंमलाखालील ७१२ ते १५२६ हा सु. आठशे वर्षांचा काळ मोगलपूर्व काळ किंवा दिल्ली सल्तनतीचा काळ म्हणून ओळखला जातो. आठव्या शतकातील अरबांच्या स्वाऱ्यांपासून सामान्यतः मुसलमानांचे हिंदुस्थानात आगमन झाले. अरब व मुसलमान यांचा हिंदुस्थानशी संबंध या काळात जास्ती आला. या लोकांनी वायव्य दिशेकडून अनेक स्वाऱ्या करून येथे सत्ता प्रस्थापित केली. अरबांनी हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वाऱ्या केल्या .हजरत मुहंमद पैगंबरांच्या प्रेरणेने अरबांनी पहिली स्वारी ६३६ मध्ये देबल(दायबूल) बंदर (आताच्या कराचीनजीक) व आताच्या मुंबईजवळील ठाणे येथे केली. यानंतर त्यांनी भडोच, चौल इ. ठिकाणी अनेक स्वाऱ्या केल्या. हिंदूंनी त्या परतवून लावल्या. ६४४ मध्ये रसीलचे युद्ध ह्या खलिफाच्या पाडावासाठी झाले. ६५१ मध्ये सिस्तान, झरांज आणि ६५२ मध्ये हेरात ( उर्फ अलेक्झांड्रीया अरींया वा आताचे तिसरे मोठे अफगाण शहर हेरांत ) ही सर्व श्वेतहुणाच्या ताब्यात असणारी शहरे त्यांच्या ताब्यात गेली. या स्वाऱ्या रशीदून खलिफाकडून व उथेमां (ओटोमान) खलिफाकडून केल्या गेल्या होत्या. ६५३मध्ये मकर (मेकरां – पर्शियन आखातालगतची वाळवंटीय भूमीपट्टी जी आताच्या पाकिस्तानातील बलुचीस्तानातून इराण ते ओमानच्या आखातापर्यंत आहे) या भूभागावर हल्ला करून उथेमा ( ओटोमान) खलिफाने ताब्यात घेतली. पुढे याच भूमीवरून भारतात आक्रमणे होत गेली, त्यामुळे भारतावरील इस्लामी आक्रमणाची दारे या भूमीच्या तुकड्याच्या पाडावामुळे झाली असे म्हटले तरी चालेल.

इथे एक महत्वाची बाब नोंद करून ठेवण्यासारखी आहे- सिस्तान. मेकरां आणि खुरासान इथून येणाऱ्या अरब आक्रमकांना थोपविण्याचे काम तत्कालीन काबुल आणि झाबुलच्या राजांनी आपापल्या परीने करून बघितले. या शतकात अफगाण आक्रमक हे अरब आक्रमकांच्या विरोधात लढत होते आणि त्यामुळेच अरबांचा भारताकडील भूमीत शिरकाव अशक्य झाला होता. अधिक खोलात न जाता एक सोपी माहिती देतो त्यामुळे गोंधळ होणार नाही – आताच्या पाकिस्तानातील वजिरीस्तानच्या दक्षिणेस असलेली, पाकच्या दक्षिणपुर्व सीमेलगत व ड्युरंड लाईन ह्या अंतरराष्ट्रीय सीमारेषेवर अफगाण – पाक सरहदीवर असलेली गोमाल खिंड व खैबरखिंड ह्या दोन्ही खिंडी काबुलच्या राजांनी २ शतके ह्या अरब आक्रमकांविरुद्ध लढताना अडवून धरल्या होत्या.

उम्माय्द खलिफाच्या आदेशांनुसार अल हजाज बीन युसुफ या इराकी सुभेदाराने मोठ्या फौजेसह त्याचा पुतण्या मुहंमद कासिमला सिंधच्या दाहर राजाविरूद्ध धाडले. राजा दाहरवर त्याने सर्वशक्तीनिशी हल्ले केले. यावेळी त्याच्या सोबतीला ६०००सिरीयन घोडदळ, ६००० इराकी सांडणीस्वार आणि मावळी (कुराण -हदीतनुसार मावला – mawla एकवचन, mawli अनेकवचनी शब्दार्थ – देवाचा सहायक, हा शब्द आणि आपल्या मराठी इतिहासातील मावळा हा शब्द खूप सारखे व समान अर्थाचे आहेत ; पण आपला मावळ प्रांतातले ते मावळे अशा अर्थाचा आहे ) यांच्या साह्याने ते आक्रमण झाले. ७१२–१३ च्या सुमारास कासिमने दाहरचा पराभव करून सिंध व मुलतान जिंकले, तत्कालीन सिंध व मुलतान ही हिंदू राज्ये होती व पाडाव झालेली ही पहिली राज्ये ठरली. मात्र यापेक्षा जादा प्रदेश त्यांना पादाक्रांत करता आला नाही. सिंध आणि मुलतान येथेच अरबांचे वर्चस्व प्रस्थापित झाले; कारण कच्छ, सौराष्ट्र, काश्मीर, पश्चिम राजपुताना येथील चालुक्य, प्रतीहार, कर्कोटक इ. वंशांतील राजांनी या स्वाऱ्यांना प्रतिकार केला.

अरबांच्या स्वाऱ्यांमुळे हिंदुस्थानात इस्लाम धर्माची बीजे रावली गेली. हिंदुस्थानशी संबंध आल्यामुळे हिंदू आचार-विचार, साहित्य, तत्त्वज्ञान इ. गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झाला. भारतीयांकडून त्यांनी शासनव्यवहार, संगीत, वैद्यक, गणित, ज्योतिष, वास्तुकला वगैरे आत्मसात केले. भिन्न भिन्न विषयांवरील हजारो संस्कृत ग्रंथ त्यांनी अरबी भाषेत भाषांतर करून घेतले. अरबांनी अप्रत्यक्षपणे भारतीय तत्त्वज्ञान, संख्याशास्त्र, ज्योतिष व अन्य शाखांतील ज्ञानाचा यूरोपात प्रसार केला. अरबांनी सिंधूमधील हजारो हिंदूंना बाटविले.

यानंतर तुर्कांनी अफगाणिस्तानातील हिंदू राज्यावर आक्रमणे केली. जवळजवळ २२० वर्षे प्रतिकार केल्यानंतर ८७० मध्ये तुर्कांच्या लुटारू टोळीचा पुढारी याकूब बिन लेयात याने हिंदू-अफगाणिस्तानातील हिंदू राज्य नाहीसे केले. काबूल येथे राज्य करणाऱ्या राजाला काबूल सोडावे लागले. अशा तऱ्हेने अफगाणिस्तानातील हिंदू राज्याचा शेवट झाला. हुण, श्वेतहुण यांची राजवट व गांधार – तक्षशिला ही राज्ये पूर्णतः हिंदुंच्या ताब्यातून कायमची गेली अन आता तिथे हिंदू नावाला देखील नाहीत !

गझनी – यापुढील काही दशकात काही वर्षे हिंदुस्थानात मुसलमानांच्या स्वाऱ्या थांबल्या होत्या; परंतु दहाव्या शतकाच्या अखेरीस मुसलमानांचे हल्ले काबूल-पेशावरच्या दिशेने होऊ लागले. दहाव्या शतकाच्या मध्यास गझनी येथे राज्य करणाऱ्या गझनी घराण्यातील सबक्तगीनने राज्य वाढविण्यास सुरुवात केली. सबक्तगीन प्रबळ होत असल्याचे पाहून पंजाबच्या जयपाल राजाने त्याच्यावर अयशस्वी स्वारी केली. त्यानंतर सबक्तगीनने पंजाबवर स्वारी करून लमधान आणि पेशावर हस्तगत केले. गझनी सुलतानांची राजवट हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानावी लागेल; कारण तेव्हापासून मुसलमानांची भारतावर सतत आक्रमणे सुरू झाली. या घराण्यातील महमूद गझनी हा धर्मवेडा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने १००१ ते १०२७ पर्यंत हिंदूस्थानवर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या. पहिल्या स्वारीत त्याने जयपालचा पराभव करून सिंधूच्या पश्चिमेकडील सर्व मुलूख खालसा केला. त्याने मुलतान, अटक, स्थाणेश्वर, मथुरा, कनौज, सोरटी सोमनाथ यांवर स्वाऱ्या करून तेथील इमारती व मंदिरे उद्‌ध्वस्त केली; हिंदुस्थानातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती लुटून नेली व पंजाब कायमचा जिंकला. महमूद गझनी हा हिंदुस्थानातील तुर्की सत्तेचा संस्थापक असून त्याने भावी इस्लामी सत्तेचा पाया घातला आणि पुढील सुलतानांचा मार्ग सुलभ करून ठेवला. महमूदाच्या वारसदारांची ११८६ पर्यंत पंजाबवर सत्ता होती. लवकरच गझनीचे राज्य कर्त्या पुरुषांच्या अभावामुळे मोडकळीस येऊन, गझनीच्या वायव्येस असलेल्या घोर प्रांतातील घराणे बाराव्या शतकात गझनीच्या मुसलमानांची सत्ता झुगारून स्वतंत्र झाले.About समीर गायकवाड 155 लेख
समीर गायकवाड हे अनेक विषयांवर इंटरनेटवर लेखन करत असतात. त्यांचे लेखन अतिशय वास्तववादी असते. गायकवाड यांना विषयाचे कोणतेही बंधन नाही. ते जसे वैचारिक लेखन करतात तसेच चित्रपटांची परिक्षणेही लिहितात. समीर गायकवाड हे सोलापूरचे रहिवासी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

अंबेजोगाई

अंबेजोगाई बीड जिल्ह्यातील एक शहर आहे. १३व्या शतकात स्वामी मुकुंदराज ...

Loading…