नवीन लेखन...

प्राचीन कोकणातील बंदरे

व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल.


भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश आहे. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीमुळे, औद्योगिकीकरण होण्याच्या पूर्वीच्या काळात भारतातून फार मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असे. भारतातील मालाला परदेशात मोठी मागणी होती. भारतातील वस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, विविध प्रकारचे प्राणी, मौल्यवान दगड, हस्तिदंती कलाकुसरीच्या वस्तू, औषधी वनस्पती इत्यादी वस्तू निर्यात होत असत.  हा आंतरराष्ट्रीय व्यापार भारताला अतिशय फायद्याचा ठरत होता. भारतातील मालाच्या बदल्यात, आपले व्यापारी सोने चांदी घेऊन येत असत. भारतातून सोन्याचा धूर निघतो असे जे म्हटले जायचे ते या संपन्न व्यापारी संबंधांमुळेच.

अतिप्राचीन काळापासून भारताचा इतर देशांशी व्यापार सुरू असून भारतातील तसेच भारताबाहेरील पुरातत्वीय उत्खननांतून तसेच साहित्यिक उल्लेखातून आपल्याला यासंबंधी भरपूर पुरावे मिळाले आहेत. अगदी सिंधू सरस्वती संस्कृतीच्या काळातदेखील हा व्यापार जोमाने सुरू होता. अनेक इतिहास संशोधकांच्या मते सिंधू सरस्वती संस्कृतीची समृद्धता या व्यापारावरच अवलंबून होती. सिंधू सरस्वती संस्कृती लयाला गेल्यावर काही काळ हा व्यापार थंडावला होता. परंतु भारतातील दुसऱ्या नागरीकरणानंतर या व्यापारात पुन्हा वाढ झाल्याचे दिसते. मौर्य – सातवाहन काळात हा व्यापार परमोच्च शिखरावर गेल्याचे आपल्याला दिसून येते. भारत हा पश्चिमेकडे असलेले  देश आणि पूर्वेकडील नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेले देश यांच्या बरोबर मध्ये आहे आणि त्यामुळे पाश्चात्य देशांसाठी या पूर्वेकडील देशातील माल विकत घेण्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून देखील भारताचे स्थान महत्त्वाचे ठरले. भारताचा हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुष्कीच्या मार्गाने आणि जलमार्गाने अशा दोन्ही पद्धतींनी होत असे. उत्तर भारतातील व्यापार हा मुख्यत्वे करून खुष्कीच्या मार्गाने तर दक्षिण भारतातून चालणारा व्यापार हा मुख्यत्वे समुद्रमार्गे होत असे.

दक्षिण भारतातून समुद्रमार्गाने होणाऱ्या या व्यापारात महाराष्ट्राचा वाटा अतिशय महत्त्वाचा होता. महाराष्ट्राला जवळ जवळ 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राला लागून असलेल्या आणि सह्याद्री पर्वताच्या रांगेपर्यंत असलेल्या चिंचोळ्या भूपट्टीला कोकण म्हणतात. कोकणचा समुद्र किनारा दंतुर आहे आणि अंतर्गत भागात काही अंतरापर्यंत नौकायन करता येतील अशा अनेक खाड्या इथे आहेत आणि त्यामुळेच अनेक नैसर्गिक व सुरक्षित बंदरे उपलब्ध आहेत. व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल.  कोकणातील ही बंदरे सह्याद्री पर्वतातील घाटमार्गांनी देशावरील व्यापारी बाजारपेठांशी जोडली गेली होती.

सातवाहन साम्राज्याला या व्यापारातून प्रचंड आर्थिक फायदा होत होता. सातवाहन सम्राटांसाठी हा व्यापार किती महत्त्वाचा असेल हे यज्ञश्री सातकर्णी आणि वासिष्ठीपुत्र पुळुमावी यांच्या नाण्यांवर कोरलेल्या जहाजांच्या आकृतीवरून समजून येते.  गुजरात माळवा भागात राज्य करणाऱ्या आणि सातवाहन साम्राज्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या पश्चिमी क्षत्रपांची नजर उत्तर कोकणातील भरभराटीला आलेल्या आणि प्रचंड आर्थिक फायदा देणाऱ्या बंदरांवर आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर होती.  या प्रदेशावरील प्रभुत्वासाठी दोन्ही राजसत्तांमध्ये प्रचंड युद्धे झालेली दिसून येतात.

महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेणाऱ्या कोकणातील काही महत्त्वाच्या बंदरांचा आपण आता थोडक्यात परिचय करून घेऊया. व्यापारी वर्गाने बौद्ध धर्माला उदार आश्रय दिलेला होता त्यामुळे या बंदरांना देशावरील बाजारपेठांशी जोडणाऱ्या व्यापारी महामार्गांच्या आजूबाजूला आपल्याला बौद्ध लेणी कोरलेल्या आढळून येतात.

सोपारा – कोकण किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागात शूर्पारक किंवा सोपारा नावाचं एक अतिशय प्रख्यात बंदर होते. सोपाऱ्याची ओळख आता नालासोपाऱ्याशी पटवण्यात आली आहे. मौर्यकाळापासून किंवा कदाचित त्याही आधीपासून ते साधारण 15व्या शतकापर्यंत सोपारा हे एक अतिशय प्रसिद्ध बंदर होते तसेच हे एक राजकीय, आर्थिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नगर होते. इ.स. पूर्व 1500 ते इ.स. 1300 इतक्या प्रदीर्घ काळासाठी सोपारा ही अपरान्ताची राजधानी होती. कोकणाला प्राचीनकाळी अपरान्त म्हणत असत. नालासोपाऱ्यात मौर्यकालीन बांधीव स्तूपाचे अवशेष मिळाले आहेत तसेच येथे सम्राट अशोकाच्या धर्माज्ञांचे काही भाग देखील मिळाले आहेत. जातक कथांमध्ये सुप्पारक जातक नावाची एका नौकाप्रमुखाची कथा आहे ती सोपाऱ्याशी संबंधित असावी असे मानले जाते. पूर्णावदान नावाच्या बौद्ध धार्मिक कथेत सोपाऱ्यातील पूर्ण नावाच्या व्यापाऱ्याची गोष्ट आली आहे. सोपारा हे बंदर म्हणून किती मोठे होते हे आपल्याला या कथेतून समजते. महाभारतात देखील सोपाऱ्याहून होणाऱ्या नौकायनाचा थोडक्यात उल्लेख आहे. बायबलमध्ये ओफीर नावाच्या बंदराचा उल्लेख आला आहे. ह्या बंदरातून सोलोमन राजाच्या राज्यात व्यापारी मालाने भरलेली जहाजे येत असत. हे ओफीर बंदर म्हणजेच सोपारा असे अनेक संशोधकांचे मत आहे.

‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ हा इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेलेला ग्रंथ. इजिप्शियन ग्रीक नाविकाने हा ग्रंथ लिहिला असला तरी लेखकाचे नाव मात्र समजू शकलेले नाही. या ग्रंथातून आपल्याला इजिप्तमधील बंदरांतून भारताशी होणारा व्यापार, त्यासाठी लागणारा कालावधी, वाटेतील बाजारपेठा, भारतातील बाजारपेठा, शहरे, बंदरे, भारतातील व्यापारी माल, येथील राजकीय स्थिती तसेच इतर विविध प्रकारची माहिती मिळते. दक्षिणाबेडस असा महाराष्ट्राचा उल्लेख लेखकाने केला आहे. दक्षिणापथ या संस्कृत शब्दाचे हे अपभ्रंशित रूप आहे. या दक्षिणाबेडस मधील शहरांचा उल्लेख करताना सोपाऱ्याविषयीची माहिती लेखकाने नमूद केली आहे. भृगुकच्छ नंतर दक्षिणेकडे असलेल्या महत्त्वाच्या बाजारपेठांच्या नावांची एक यादी या ग्रंथात दिली गेली आहे ज्या मध्ये सोपाऱ्याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो.

इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात क्लोडियस टॉलेमी नावाचा एक प्रसिद्ध इजिप्शियन ग्रीक विद्वान होऊन गेला. याने अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. टॉलेमीचा भूगोल हा त्यातीलच एक प्रसिद्ध ग्रंथ. भूगोल विषयाशी संबंधित असलेल्या इतर समकालीन ग्रंथांपेक्षा या ग्रंथाचे स्वरूप आणि उद्दिष्ट वेगळे असून जगाचा नकाशा बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या माहितीचा समावेश यात करण्यात आहे. आधुनिक शोधांमुळे टॉलेमीची अनेक मते आता चुकीची सिद्ध झालेली असलेली तरी ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ आजही महत्त्वाचा मानला जातो. टॉलेमीने कोकण किनारपट्टी विषयी माहिती देताना त्याचा उल्लेख अराईके असा केला आहे. अराईके प्रांतामधे येणाऱ्या महत्त्वाच्या बंदरांमध्ये सोपाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे तसेच सोपाऱ्याच्या अक्षांश आणि रेखांशांविषयी देखील येथे उल्लेख मिळतो.

याव्यतिरिक्त अनेक साहित्यिक आणि शिलालेखीय पुराव्यातून आपल्याला सोपारा बंदराविषयी माहिती मिळते. सोपाऱ्यात स्तूपाच्या जवळच एका पांढरीचे अवशेष मिळाले असून तिथे उत्खनन झाल्यास प्राचीन सोपारा बंदराचे अवशेष मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कल्याण – उल्हास नदीच्या किनारी वसलेले आजचे कल्याण हे देखील सातवाहनकाळातील अतिशय प्रसिद्ध असे व्यापारी बंदर होते. पेरिप्लसमधे याचा कलियण असा उल्लेख आढळतो. या ग्रंथातील नोंदीवरून असे वाटते की कल्याण बंदर म्हणून सातवाहनकाळातच उदयाला आले किंवा जाणीवपूर्वक बंदर म्हणून त्याचा विकास केला गेला. उत्तर कोकणात झालेल्या पश्चिमी क्षत्रप आणि सातवाहनयांच्या संघर्षात कल्याणचा मोठ्या प्रमाणावर विनाश केला गेला आणि एखादे ग्रीक जहाज व्यापारासाठी कल्याणमधे आलेच तर ते क्षत्रपांच्या सैनिकांकडून जबरदस्तीने बेरीगाझा म्हणजेच भृगुकच्छ बंदरात नेले जात असे. भृगुकच्छ म्हणजेच आजचे भडोच शहर जे क्षत्रपांच्या राज्यातील अतिशय महत्त्वाचे बंदर होते. कल्याणचे बंदर म्हणून महत्त्व काही काळासाठी कमी झाले असावे म्हणूनच टॉलेमीने आपल्या ग्रंथात कल्याणचा उल्लेख केलेला नसावा. पुढील काळात कल्याण बंदर पुन्हा भरभराटीला आलेले दिसते कारण तसा उल्लेख आपल्याला कॉमस इंडिकोप्लेस्टसच्या ग्रंथात मिळतो.

मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाल्यामुळे सातवाहनकालीन वसाहतीचे काहीच अवशेष आज आपल्याला आढळत नाहीत. 1957-58 मधे कल्याणमध्ये सातवाहनकालीन वसाहतीचे काही अवशेष मिळाल्याची आणि काही रोमन पद्धतीची खापरे मिळाल्याची एक नोंद आढळते. कल्याण पूर्व मधे असलेल्या एका टेकडीवर एक छोटे कोरीव लेणे असल्याची नोंद देखील आपल्याला आढळते परंतु लेण्याच्या कालखंडाविषयी निश्चित विधान करता येत नाही. अनेक सातवाहनकालीन आणि नंतरच्या शिलालेखांतून आपल्याला कल्याणच्या समृद्धीचे पुरावे मिळतात.

चौल – रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीच्या मुखाजवळ चौल बंदर वसलेले होते. कल्याण बंदराचा वापर कमी झाल्यामुळे कदाचित त्याला पर्याय म्हणून चौलचा बंदर म्हणून विकास झाला असण्याची शक्यता वाटते. पेरिप्लसमधे याचा उल्लेख सेमिल्य असा तर टॉलेमीच्या ग्रंथात सिमिल्य असा आढळतो. ग्रंथांमध्ये चौलचा उल्लेख चंपावती किंवा रेवतीक्षेत्र असा देखील मिळतो. कान्हेरी लेण्यांमध्ये चौलचा उल्लेख आढळतो. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या डॉ. विश्वास गोगटे यांनी चौलमध्ये उत्खनन केले होते. उत्खनकाच्या अंदाजानुसार प्राचीन चौल 2 किलोमीटर्सपेक्षा जास्त भागावर पसरलेले होते. सातवाहन काळातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी या उत्खननात आढळून आल्या ज्यात सातवाहनकालीन खापरे, रोमन मद्यकुंभाचे अवशेष, बंदराच्या धक्क्याचा भाग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

मांदाड – रायगड जिल्ह्यातील मंदार नदीच्या किनाऱ्यावर हे बंदर वसलेले होते. पेरिप्लस आणि टॉलेमीच्या ग्रंथामधील मंदगर या जागेची ओळख मांदाड बरोबर पटवण्यात आली आहे परंतु इतिहासकारांमध्ये याविषयी एकमत दिसत नाही. मांदाडपासून जवळ असलेल्या सातवाहनकालीन कुडा लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात व्यापाऱ्यांशी संबंधित काही उल्लेख आढळून आले आहेत.

दाभोळ – वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर दाभोळ वसलेले आहे. पेरिप्लसमध्ये पालाईपट्टमई असा एका बंदराचा उल्लेख केलेला आढळतो.  संशोधकांच्या एका गटाच्या मतानुसार हा उल्लेख दाभोळचा आहे. सातवाहनकाळात असलेल्या समुद्राच्या पाण्याची पातळी लक्षात घेता दाभोळ हे सातवाहनकाळात प्रसिद्ध बंदर असण्याची शक्यता कमी आहे. शिलालेखांमधून देखील दाभोळचा उल्लेख मध्ययुगापासून मिळायला सुरुवात होते. डेक्कन कॉलेजचे संशोधक डॉ. विश्वास गोगटे यांनी पालाईपट्टमई हे पालशेत असावे असे मत मांडले आहे. पालशेत गावात अनेक प्राचीन परंतु निश्चित कालखंड सांगता येणार नाही असे अवशेष आढळून येतात. सातवाहनकालीन खापरे देखील येथे मिळाली असली तरी या संदर्भात अंतिम निष्कर्ष काढण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे असे म्हणता येईल.

वर उल्लेख केलेल्या बंदरांव्यतिरिक्त अनेक छोटी मोठी बंदरे कोकणात आहेत. जागेअभावी सगळ्यांचा समावेश करता येत नाही म्हणून त्यातील निवडक बंदरांची माहिती आपण करून घेतली. ही सर्व बंदरे सह्याद्रीतील घाटवाटांनी देशावरील बाजारपेठांशी जोडलेली होती. उदाहरण घ्यायचं झालं तर कल्याण हे नाणेघाटातून जुन्नर आणि तेथून पुढे सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठणशी व्यापारी मार्गाने जोडलेले होते. या व्यापारी मार्गांच्या आसपास अनेक बौद्ध लेण्या कोरलेल्या आपल्याला आढळून येतात. जुन्नरमध्ये असलेले विविध लेणी समूह किंवा कार्ले, भाजे, बेडसे, नासिक लेणी ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाचा अंत या बंदरांचा अस्त झाल्यानंतरच झालेला इतिहासात आपल्याला दिसून येतो. कोकणातील मुंबई आणि आसपासची बंदरे सोडली तर इतर बंदरांचा विकास केल्यास कोकण आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येतील हे निश्चित.

संदर्भ ग्रंथ – 1) गाथा प्राचीन महाराष्ट्राची भाग 1 – अंकुर काणे, सागर सुर्वे, संपदा कुलकर्णी, श्वेता काजळे  2) सह्याद्री – स. आ. जोगळेकर 3) The Ancient Routes of the Deccan and Southern Peninsula – Dilip K. Chakrabarti.  4) The Periplus Erythean Sea – Translated by Wilfred H. Schoff.  5) Ancient India as described by Ptolemy – J.W.McCrindle 6) सिद्धार्थ जातक खंड 1 ते 7 – दुर्गा भागवत 7) Trade and trade routes in Ancient  – Moti Chandra.

अंकुर काणे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..