नवीन लेखन...

पोलिस-चोर आणि भजन (संक्षिप्त रूपांतरीत कथा २७)

भिवा नाक्यावरच्या बाकावर बसल्याजागीच अस्वस्थ हालचाली करत होता.
पावसाळा जवळ येत होता.
मुंबईचा पावसाळा म्हणजे त्रासदायक.
दुकाना दुकानात लावलेल्या छत्र्या आणि रेनकोट जाहिर करत होते की पावसाळा जवळ आलाय.
लोकांची खरेदी सुरू होती.
कावळे घरटी बांधत होते.
नक्कीच पावसाळा जवळ आला होता.
फूटपाथवर रहाणाऱ्या सर्वांना एखाद दुसरा आकाशांत दिसणारा ढग चिंताक्रांत करत होता.
तसे बरेच जण जवळच्या एखाद्या स्टेशनच्या आसऱ्याला जात.
पण त्यासाठी किती मारामाऱ्या !
भिवाला लक्षांत आले की आता कांहीतरी हालचाल करायला हवी.
पावसाळ्याची सोय करायला हवी.
त्यामुळेच तो अस्वस्थ होता.
भिवाची पावसाळ्यात सुरक्षित रहाण्याची कल्पना म्हणजे कांही उंची हॉटेलात रहाणं ही नव्हती की पाऊस कमी असतो अशा भागांत जायचं अशीही नव्हती.
त्याला तीन-चार महिन्यांचा कैदी बनून सरकारी पाहुणा म्हणून रहायची त्याची इच्छा होती.
तुरूंगात रोज जेवण मिळणार हे नक्की होतं आणि झोपायला हक्काची जागा मिळणार होती.
त्याला जगांतल्या सर्वात हव्याहव्याशा वाटणाऱ्या ह्या दोन गोष्टी होत्या.
अनेक पावसाळे त्याने असे डोंगरीच्या तुरूंगात काढले होते.
कांही मोठे लोक मुंबईचा पावसाळा चुकवायला दुसऱ्या शहरांत जायचे मोठे बेत करत.
भिवा आपला तुरूंगात जाण्याचा छोटा बेत करायचा.
आता ती वेळ आली होती.
तसा तो दुकानांच्या फळ्यांवर त्यांच्या कमानीखाली, आज इथे, उद्या तिथे करत पावसाळा काढू शकला असता.
कांही दयाळू लोक पावसांत थोडा आडोसा करून देत तिथे जाऊ शकला असता.
पण त्या सर्वांपेक्षा त्याला डोंगरीचा तुरूंगच बरा वाटे.
भिवा स्वाभिमानी होता.
लोक दया दाखवतील पण दहा प्रश्न विचारतील.
तो काय करतो, हा पहिला प्रश्न असेल.
नाही तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदतीची किंमतही वसूल करतील.
त्याहून तुरूंग बरा.
तुरूंगात तिथले नियम पाळायला लागत.
तरीही तो कोणाचा मिंधा होत नसे.
ह्या वेळीही त्याने पावसाळा तुरूंगातच काढायचे ठरवले आणि त्याप्रमाणे हालचाली करायला सुरूवात केली.
त्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे खूप सोपे सोपे मार्ग होते.
सर्वांत सोपा मार्ग म्हणजे एखाद्या चांगल्या हॉटेलात जायचं, भरपूर खायचं आणि मग द्यायला पैसे नाहीत म्हणून सांगायच.
मग मालक पोलिस हवालदाराला बोलावेल.
हवालदार त्याला अटक करेल व मॅजिस्ट्रेटपुढे उभा करेल.
मॅजिस्ट्रेट आपलं काम चोख पार पाडेल.
मग भिवा उठला आणि नाक्यावरच्या डाव्या रस्त्यावरून मोठ्या सिनेमा थिएटरकडे वळला.
तिथलाही मोठा चौक ओलांडून तो थिएटरजवळ आला.
थिएटरच्या बाजूलाच एक मोठे प्रसिध्द महागडे रेस्टॉरंट होते.
इथे सर्व उत्तम पेहराव केलेले मोठे लोक दररोज संध्याकाळी सर्वोत्तम भोजन घ्यायला येत असत.
भिवाने स्वतःकडे नजर टाकली.
त्याला तो ‘जंटलमन’ वाटत होता.
त्याने घातलेला कोट जरी चोरलेला असला तरी तो चांगला होता.
भिवा मान ताठ ठेऊन रेस्टोरन्टमधे शिरला.
तो आत जाऊन टेबल शोधत होता.
एकदा टेबलाशी बसला की फक्त त्याचा वरचा भागच दिसणार होता.
मग वेटरला शंका आली नसती.
वेटरने त्याला हवे ते पदार्थ आणून दिले असते.
तो काय काय मागवायचं याचा विचार करू लागला.
पदार्थ त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले.
अर्थात ह्या क्षणी खाणं तितकं महत्त्वाचं नव्हतं.
मालकाला राग येऊन तो हवालदाराला बोलावेल आणि त्याचा डोंगरी तुरुंगाकडे जाणारा मार्ग निश्चित होईल, एवढं बिल तरी होणं आवश्यक होतं.
भिवाच्या दुर्दैवाने एका मॅनेजरने भिवा आत शिरत असतानाच त्याला पाहिले.
भिवाचे फाटके, विटलेले बूट आणि चुरगाळलेली व खाली झिरमिळ्या लोंबणारी पँट त्याने पाहिली.
तो पुढे आला व त्याने सरळ भिवाचे बकोट धरले आणि त्याला दाराशी आणून बाहेर घालवले.
भिवा निमूटपणे तिथून निघाला.
भिवाने विचार केला की ही साधी युक्ती कांही त्याला आज यश देणार नाही.
दुसरा मार्ग शोधायला हवा.
पोलिसाने पकडावे म्हणून दुसरा मार्ग शोधायला हवा होता.
थियेटरसमोरच्या चौकाच्या दुसऱ्या टोकाला एक मोठं दुकान होतं.
त्या दुकानाची शो केस मोठ्या कांचेची होती.
विकायच्या सुंदर सुंदर वस्तू त्यात आकर्षक पध्दतीने मांडल्या होत्या.
भिवाने एक दगड घेतला आणि त्या कांचेवर भिरकावला.
खळ्ळकन् कांच फुटली, मोठा आवाज झाला.
लोक जमा झाले.
त्यांत एक पोलिस हवालदार अगदी पुढे होता.
भिवा हवालदाराकडे बघून हंसला.
हवालदाराने विचारले, “हे करणारा माणूस कुठे आहे ?”
भिवा खुशींत होता.
त्याला हवं तेंच होत होतं.
त्याने जवळीकीच्या स्वरांत हवालदाराला विचारले, “मीच हे केलं असेल, असं नाही वाटत तुम्हाला ?”
पण हवालदाराने त्याच्याकडे दुर्लक्षच केले.
हवालदाराच्या अनुभवाप्रमाणे दगड मारणारी माणसे तिथेच उभी रहात नाहीत, ती त्या जागेपासून दूर पळतात. हवालदाराने मागे वळून पाहिले.
थोड्या अंतरावर एक व्यक्ती पळतांना त्याला दिसली.
हवालदार त्याच्या मागे गेला व दिसेनासा झाला.
भिवा नाराज झाला.
त्याचा दुसरा प्रयत्नही वाया गेला होता.
जड अंतःकरणाने तो तिथून निघाला.
नाक्याच्या ह्या टोकाला दुसरे रेस्टॉरंट होते.
पहिल्यासारखे मोठे नव्हते.
श्रीमंतांची वर्दळ असणारे नव्हते.
भिवा त्या हाॅटेलांत तसाच शिरला.
त्याच्या फाटक्या बुटांमुळे किंवा विजारीमुळे इथे कुणी त्याला अडवलं नाही.
तो एका टेबलाशी बसला व त्याने जेवण मागितले.
जेव्हा बिल आले, तेव्हा तो वेटरला म्हणाला,
“पैसा आणि मी, आमची कधीच दोस्ती नव्हती.
माझा खिसा खाली आहे.
तेव्हा तू पोलिस हवालदाराला बोलावलेलं बरं !”
वेटर म्हणाला,
“तुझ्यासाठी हवालदाराला बोलवायचं गरज नाही.”
त्याने दुसऱ्या वेटरला हांक मारली.
मग दोघानी भिवाला उचलला आणि हॉटेलाच्या दाराबाहेर आणून फूटपाथवर चक्क फेंकला.
कांही क्षण भिवा आपली हाडं शाबूत आहेत कां, हे चांचपत होता.
मग हळू हळू तो उभा राहिला.
त्याने आपले कपडे झटकले.
पोलिसाने पकडणं, तुरूंगात जाणं हे त्याला स्वप्नवत् वाटायला लागलं.
डोंगरी तुरुंग खूप दूर असलेला वाटायला लागला.
तिथेच एक हवालदार उभा होता.
तो भिवाकडे पाहून कुत्सित हंसला व चालू पडला.
पुन्हा पोलिसाच्या मागे लागण्याआधी भिवा तिथून चालत दोन किलोमीटर दूर आला.
ह्यावेळी आपल्याला यश मिळणार असं त्याला मनापासून वाटतं होतं.
तिथे अशाच एका मोठ्या दुकानाच्या शोकेससमोर एक सुंदर, छान पोशाखातली बाई उभी होती.
जवळच एक दांडगा हवालदार होता.
भिवाने ठरवलं की जवळ जाऊन तिला राग येईल, असं कांहीतरी तिच्याशी बोलायचं.
ती ताबडतोब त्या हवालदाराकडे तक्रार करेल.
मग हवालदाराचा हवा हवासा वाटणारा हात आपल्याला पकडेल.
मग डोंगरी तुरुंग फार दूर नाही.
भिवा त्या बाईच्या अगदी जवळ गेला.
डोळ्यांच्या कोपऱ्यांतून त्याने पाहिलं, तो दांडगा हवालदार त्यांच्याकडेच पहात होता.
बाई दोन चार पावलं पुढे गेली होती.
तिला गांठत भिवा म्हणाला, “काय चाललय सीमाबाई ?
येणार कां माझ्याबरोबर संध्याकाळ घालवायला ?”
हवालदार अजून त्यांच्याकडेच पहात होता.
त्या बाईने आता फक्त हवालदाराला हात करायचा अवकाश होता की भिवाचा डोंगरीचा मार्ग मोकळा झाला असता.
तो मनाने डोंगरी तुरुंगात पोंचला देखील.
तोच ती बाईच त्याच्याकडे वळली आणि त्याचा दंड धरून त्याला चिकटली.
ती म्हणाली, “माझ्या राजा,जरूर येणार. मला हवं ते मद्य घेणार ना !
खरं तर मीच आधी विचारणार होते तुला पण तो मेला हवालदार होता ना जवळ !”
नाईलाजाने तिचा हात हातात घेऊन भिवाला हवालदाराच्या अगदी समोरून पुढे जावं लागलं.
तो अजूनही मोकळाच होता.
तो असाच रहाणार होता काय ?
पुढच्या रस्त्यावर येतांच त्याने त्या बाईचा हात हिसडला व तो पळत सुटला.
तो थांबला त्या नाक्यावर चार कोपऱ्यांत चार थिएटर्स होती.
शहरातल्या इतर भागापेक्षा इथे लोक मौज करत.
छान छान कपड्यात फिरत.
भिवाच्या मनांत भीती उमटली, “कोणत्याच हवालदाराने आपल्याला पकडलं नाही तर !”
तेवढ्यात त्याला एका थिएटरसमोर एक दुसरा हवालदार दिसला.
भिवाने नवी युक्ती वापरायचे ठरवले.
तो तिथे गेला व जणू कांही खूप पिऊन चाळे करतो आहोत असं मोठमोठ्याने बडबडायला लागला.
नाच करू लागला.
ओरडू लागला.
तिथल्या हवालदाराने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि जवळच्या एका माणसाला म्हणाला, “हा त्या महाविद्यालयांतल्या तरूणांपैकी एक दिसतोय.
तो कुणाला कांही करणार नाही.
आम्हाला सूचना दिल्या गेल्या आहेत की ह्या कॉलेजच्या ओरडणाऱ्या मुलांना अटक करू नका. त्यांना ओरडू द्या.”
भिवा गप्प झाला.
आज कोणीच हवालदार त्याला पकडणार नव्हता की काय ?
त्याला आता डोंगरीचा तुरूंग स्वर्गासारखाच खूप दूर वाटू लागला.
तो पुढे निघाला.
एक गृहस्थ एका दुकानात पेपर विकत घेत होता.
त्याने त्याची छत्री बाहेर ठेवली होती.
भिवाने ती छत्री उचलली व तो हळूहळू पुढे जाऊ लागला.
तो गृहस्थ त्याच्या मागे आला.
तो म्हणाला, “माझी छत्री !”
भिवा म्हणाला, “ही तुमची छत्री आहे म्हणतां ! मग बोलवा ना हवालदाराला.
मी तुमची छत्री घेतली असं म्हणतां तर बोलवा त्या हवालदाराला.
तो बघा तिथे उभा आहे.”
त्याच्या मागून येणारा गृहस्थही हळू चालू लागला.
भिवाही आणखीच हळू चालू लागला.
त्याच्या मनांत आलं की बहुदा पुन्हा त्याच्या पदरी अपयश येणार की काय ?
हवालदाराने दोघांकडे पाहिलं.
तो छत्रीवाला गृहस्थ म्हणाला, “त्याचं काय आहे. अशा गोष्टी होतात चुकून. ही जर तुमची छत्री असेल तर माफ करा मला ! ती मला सकाळी एका रेस्टॉरंटमधे सांपडली. जर तुमची असेल….”
भिवा रागाने ओरडला, “ती माझीच आहे.”
तो गृहस्थ घाईघाईने तिथून निघून गेला.
हवालदार एका वृध्देला हाताला धरून रस्ता पार करायला मदत करत होता.
भिवा उलट दिशेने पुढे गेला.
तिथल्या मैदानांत त्याने रागाने ती छत्री जितक्या जोरात भिरकावता येईल तेवढ्या जोरांत लांब भिरकावली.
मनोमन पोलिस हवालदारांना शिव्या दिल्या.
एकही हवालदार त्याला अटक करायला पुढे येत नव्हता.
जणू कांही तो राजाच होता, तो सुध्दा चूक न करणारा राजा.
मग भिवा परत आपल्या घराकडे निघाला.
त्याचं घर म्हणजे नाक्यावरचा बाक.
जाता जाता मधेच भिवाच्या कानांवर भजनाचे स्वर कानी पडले.
चंद्र नुकताच उगवला होता.
आजूबाजूला थोडेच लोक होते.
जवळच्या देवळांत भजन चालू होते.
कुणीतरी सुंदर आवाजांत तुकारामाचा अभंग गात होता.
“पुण्य पर उपकार पाप परपीडा” भिवाला आईची आठवण झाली.
त्याची आई हा अभंग नेहमी गात असे.
त्याला ते लहानपणचे दिवस आठवले, जेव्हा तो स्वच्छ कपडे वापरत असे आणि त्याचे विचारही स्वच्छ होते.
तो तेव्हा मनाशी मोठेमोठे बेत करत होता.
एकाएकी आता भिवाला आपलं अध:पतन कसं कसं होतं गेलं ते आठवू लागलं.
तो आज जसा होता, तसं त्याला कधीच व्हायचं नव्हतं.
त्याला पश्चात्ताप वाटू लागला.
आपण बदललं पाहिजे याची तीव्रतेने जाणीव झाली.
त्याचे मन, आत्मा, सर्व त्याला म्हणू लागले, “हीच योग्य वेळ आहे. अजून फार कांही बिघडलेले नाही.
तो अजून तरूण आहे.
खूप वेळ आहे त्याच्याकडे.
बाजारातल्या एका भल्या दुकानदाराने त्याला सांगितले होते,
‘कधीही माझ्याकडे ये.तुला नोकरी देईन.’
भिवाने मनाशी ठरवलं की त्या दुकानदाराला जाऊन भेटायचं आणि ती नोकरी करायची.
आता चोऱ्यामाऱ्या बंद.
प्रामाणिकपणे मेहनत करून जगायचं.
कोणी तरी होऊन दाखवायचं.
ह्या चिखलातून स्वतःला बाहेर काढायचं.
नक्कीच जमेल आपल्याला.”
भिवा अशा विचारांत गढलेला
असतानाच देवळाच्या दाराशी येऊन पोहोचला होता.
तेवढ्यात एका बलदंड हाताने त्याचा दंड पकडल्याचे त्याला जाणवले.
तो वळला.
एका हवालदाराने त्याचा दंड धरला होता.
तो हवालदार म्हणाला, “काय रे? देवळात चोरी करायचा विचार आहे की काय ?
सर्वजण बाहेर भजन करताहेत, हे पाहून देवाचे दागिने पळवायचा बेत होता काय ?”
भिवा म्हणाला, “छे, छे बिलकुल तसं कांही नाही !”
हवालदार म्हणाला, “मग कसं ? मला शिकवतोस ?”
भिवा हवालदाराला समजावू लागला.
त्याच्याशी हुज्जत घालू लागला.
मुंबईच्या हवालदाराला आपल्याशी हुज्जत घालणारा इसम अजिबात आवडत नाही.
तो म्हणाला, “मुकाट चल, पोलिस स्टेशनवर.”
दुस-या दिवशी सकाळी मॅजिस्ट्रेटनी शिक्षा दिली, “तीन महिने कैद, डोंगरी तुरूंग.”
— अरविंद खानोलकर.
मूळ लेखक : ओ. हेन्री
मूळ कथा : द कॉप अँड अँथेम
तळटीपः आपण नेहमी चोर–पोलिस खेळतो. इथे पोलिस-चोर असा उलटा खेळ आहे. भुरटा चोर भिवा पोलिसाने पकडावे म्हणून पोलिसांच्या पाठी लागलाय. मूळ कथा न्यूयॉर्कमधे हिवाळ्याच्या आधी घडलेली दाखवली आहे व तो शेवटी चर्चजवळ पश्चात्ताप करत असतांना पकडला जातो, असे दाखवले आहे.
ब्रिटिशकालात सुरूवातीला तुरुंग डोंगरीला होता. खटला चालू असतांना लोकमान्य टिळकांना तिथे साध्या कैदेत ठेवण्यांत आलं होतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..