नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ७

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

अतीव आनंदात आणि भक्ती-भावात तल्लीन होऊन मी वाचत होते. आणि तो कुत्रा ऐकत होता. (असं मला वाटतं होतं) जाणाऱ्या-येणाऱ्या भाविकांपैकी एक-दोघांनी तर चक्क आम्हाला नमस्कार केला. त्या वेळेस मात्र खूप अवघडल्या सारखे झाले.

संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला ३५-४० मिनिटे लागतात. तेवढा वेळ , थोडा कमी तो कुत्रा तिथेच बसून होता. माझा शेवटचा अध्याय सुरू झाला.मग तो उठून मागच्या बाजूने बाहेर गेला किंवा गेला असावा. माझं वाचन झाल्यावर नमस्कार करून मी उठले आणि कुत्र्याला शोधायचा प्रयत्न केला. पण तो कुठे ही परत दिसला नाही. अर्थात, आदल्या दिवशी संध्याकाळी मी त्याला बघितलं होतं, त्यामुळे तो तिथला स्थानिक असणार. पण मला राहून राहून आश्चर्य वाटत होत की, तो इतका वेळ, इतकं शांत कसा बसून राहिला आणि बाकी परत तिथे कुठे रेंगाळला नाही . गुरुदेव दत्त म्हणत मी नकळत हात जोडले आणि अचानक डोळेही भरून आले.

सावकाश मग हात पाय धुऊन, पाणी पिऊन मी आई बसली होती तिथे येऊन नाष्टा केला. तिथे राजेंद्र भोसले दादा उभे होते. त्यांनी हाक मारली, ताई, इथे या. मी तुमचा नंबर लावून ठेवलाय. आता लेपन आणि भस्म वाटतील.

मी पटकन जाऊन ४ डब्या घेऊन आले. २ पादुकांवरील लेपन/गंध घेण्यासाठी आणि २ भस्म घेण्यासाठी. तसंच एक नारळही घेऊन आले. गुरुदेव, सर्वांचे रक्षण करा ‘ अशी मनोभावे प्रार्थना करुन मी नारळ औदुंबराला बांधला. परत आले तर ही भली मोठ्ठी रांग लागली होती तिथे. पण राजेंद्र भोसले दादांनी आधीच माझा नंबर धरून ठेवला होता, त्यामुळे आम्ही रांगेत अगदी पहिले.

आधी त्यांनी २ डब्यांमध्ये गंध देण्यास नकार दिला, पण मग आईसाठी एक आहे आणि एक माझ्यासाठी आहे म्हंटल्यावर त्यांनी दोन्हीच्या दोन डब्या भरून दिल्या. तोपर्यंत एका ठिकाणी प्रसाद आणि तीर्थ वाटप चालू होते. ते ही घेतले.आईला तीर्थ कसं न्यावं ह्या विचारात असतानाच गजानन काळे काका एक ग्लास घेऊन आले आणि म्हणाले, हे घे. तीर्थ दे आईला.’ मनात येणे, आणि गुरुदेवांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते पूर्ण करणे हा अनुभव पावलो पावली येत होता. अगदी कुरवपूर – पिठापूरच्या यात्रेचा तारखेपासूनच हा अनुभव येत होता. अजून त्यांची कृपा अशीच बरसत राहणार होती.

प्रसाद, तीर्थ, लेपन, भस्म घेऊन झाले. तितक्यात मेघना काकू ३-४ बॅग्स घेऊन आल्या. बाहेर जवळच सुंदर सुती साड्या मिळतात, ते सुध्धा चांगल्या किमतीत. साड्या पहिल्या, छानच होत्या. आईला विचारले, हव्यात का तुला? तसही आज काल तिला साडी झेपत नाही, त्यामुळे ती नको म्हणाली. मलाही काही इंटरेस्ट नव्हता. मग इथला महाप्रसाद घेऊन पुढे जाऊयात असं ठरलं.

सर्व जण मागच्या बाजूला असणाऱ्या भोजन गृहाकडे निघाले. आई खूप थकली होती. ती म्हणाली, मला तशीही भूक नाहीये. मी इथेच बसते. तुम्ही जाऊन या. येताना मला थोडं काही तरी प्रसाद म्हणून घेऊन ये.

मी माझ्याजवळ डिस्पोजेबल वाट्या आणि ग्लासेस् ठेवलेच होते, कधी गरज पडेल म्हणून. ते बरोबर घेतले. पण आईला माझं होईपर्यंत उकाड्यात तसच उपाशी किंवा अर्ध पोटी बसावं लागेल, म्हणून माझा जीव वर-खाली होत होता. आईला फ्रेश व्हायचं होतं, म्हणून वॉशरूमला जाऊन आलो. परत येऊन त्या कट्ट्यावर बसण्याआधी, एका मध्यम वयाच्या बाईने माझा हात धरून थांबवलं. जवळ जवळ थोड खेचलच. मी पण एकदम चमकून पाहिलं. तर ती एक डबा उघडायचा प्रयत्न करत होती. गडबडीत तिने तो डबा उघडला. भाषा माहीत नाही एकमेकींची. पण त्या डब्यातला प्रसाद मला देण्याची तिची धडपड होती.

डबा उघडताच माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. जसा शिरा करून नेण्याचं माझ्या मनात होतं सही सही त्याच appearance चा खमंग भाजलेला ब्राऊनिश रवा, भरपूर आणि खरपूस तळलेले बदाम, तेच सगळं जे माझ्या मनात होतं तशाच पद्धतीचा शिरा माझ्या समोर होता. माझा क्षणभर विश्वासच बसेना. मी परत तिच्याकडे पाहिलं, की कोणी ओळखीची आहे का, की जिला माहीत आहे मला कसा शिरा हवाय असं. पण ओळखीची नव्हती.

तिने मला शिऱ्याचा प्रसाद दिला, बदाम येत नव्हता चमच्यामध्ये तर, दोन-तीनदा चमचा भरला जेणेकरून भरपूर बदाम येतील. अर्थात तिने आमच्या मागे असणाऱ्या सर्वानाच प्रसाद दिला. पण हाताला धरून थांबवणे, माझ्या समोर डबा उघडणे, तसाच शिरा, गुरुदेव दत्त!! इतके योगायोग घडावेत. त्याच्या अस्तित्वाचा पुनः पुनः प्रत्यय येत होता. ‘तू श्रद्धा ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे’. असच जणू सुचवत होते गुरुदेव!

आईच्या पोटाला शिऱ्याचा आधार मिळाला. आता मी शांतपणे पण जरा घाई-घाईतच भोजन गृहात गेले. एवढं सुग्रास जेवण/प्रसाद कधी खाल्ला नाही. जेवण करून अरुताईने अन्नदानसाठी दिलेली दक्षिणा तिथे दान पेटीत अर्पण केली.

काउंटरवर जाऊन तिथल्या शिऱ्याचा प्रसाद, थोड चित्रान्न, आणि ग्लास मध्ये ताक घेऊन परत आई बसली होती तिथे आले.

आईच्या बाबांनी – माझ्या आजोबांनी, (ते खूप मोठे दत्त भक्त होते. वयाच्या ९२-९३ वर्षापर्यंत पारायण कधी चुकले नाहीत.) सर्व दत्तधामच्या ठिकाणी राहून संपूर्ण गुरूचरित्राचे पारायण केले. इथे ही ते राहिले होते आणि पारायण केले होते. आई खूप खुश होती की तिच्या दादांनी जिथे राहून पारायण केले, तिथे तिला शांत वेळ मिळाला आणि तिने दादा (आजोबा) म्हणतात ती सर्व स्तोत्रे म्हणून एक प्रकारे आजोबांचे स्मरण केले. तिला खूप समाधान वाटत होते. तिच्या ह्या सांगण्यामुळे ती एकटी कशी थांबली असेल ह्याचं उत्तर मला आपोआप मिळाले.

आता सर्वजण जेऊन आले होते. एकदा परत दर्शन घेऊन आम्ही मंदिरा बाहेर पडलो. जड पावलांनी बाहेर पडणे.. ह्याचा शब्दशः अर्थ अनुभवत होतो. तिथून कुणाचाही पाय निघत नव्हता.

बाहेर आलो आणि मुख्य दाराच्या डाव्या बाजूने एक ४-५ मिनिटाचा रस्ता होता, तिथे श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांचे आजोळ होते. ते घर अजून आहे आणि ज्या पारावर ते खेळत होते ते वडाचे झाड आणि पार ही आहे. अर्थात आता बांधकाम नवीन आहे, असे कळले.

प्रचंड उन होते आणि ह्या उकाड्यात इतकं चालत जायचं? तेवढ्यात मागून एक सहा सिटर टमटम आली. मी, आई आणि अजून २-४ जण त्या टमटम मधून त्या घरापर्यंत पोहचलो. आत आईच्या दृष्टीने बऱ्यापैकी चालायला होतं. हळू हळू चालत ते वडाचे झाड आणि ते स्थान ह्यांचे दर्शन घेतले. तोपर्यंत आमच्या गाड्या घरापर्यंत आल्या होत्या. सर्व जण घामाघूम होऊन गाडीत बसले आणि थंड पाणी पिऊन थंड झाले.

आता आमच्याकडे अडीच तास होते. पाच वाजेपर्यंत काकिनाड्याला हॉटेलवर येऊन तयार होऊन सहा वाजता हॉटेल सोडायचे होते. ७.३० च्या गौतमी एक्स्प्रेसने आम्ही सिकंदराबादला जाणार होतो.

ह्या २.३० तासात एक धार्मिक स्थळ बघून होईल असं सांगत स्मिता काकूंनी २-३ नावे घेतली. त्यात द्राक्षाराम हे नाव होतं. बऱ्याच जणांनी द्राक्षाराम करूयात असं सुचवलं. मला अर्थात त्या बद्दल माहीत नव्हतं. आणि मला कुठलेही स्थळ चालले असते.

द्राक्षाराम काय आहे? त्याबद्दलची माहिती गोळा केली.

स्मिता काकू, जळगावच्या सुधा काकू आणि थोडं फार गूगल सर्च ह्या वरून पुढील माहिती कळली, द्राक्षाराम हे शिवाच्या ५ रामांपैकी एक आहे. त्याला दक्षिण काशी असेही म्हणतात. इथे शिवा बरोबर शक्ती ही आहे. सतीचा १२ वा भाग म्हणजे डावा गाल येथे पडला त्यामुळे हे एक शक्ती पीठ सुध्धा आहे.
तारकासुराचा वध केल्यावर शिव लिंगाचे ५ भाग झाले. ते ५ भाग विविध ठिकाणी शिव राम म्हणून प्रसिद्ध झाले. त्यातले एक द्राक्षाराम.

हे पिठापुरपासून साधारण एक ते दीड तासाच्या अंतरावर होते. आम्ही द्राक्षाराम बघायला निघालो. रस्ते जरा खराब होते पण आजू-बाजूला हिरवी झाडे, पाणवठे डोळ्यांना सुख देत होते.

द्राक्षारामला पोहचल्यावर खाली ऊतरलो.आई खूप दमली होती म्हणून ती गाडीतच बसली होती. समोर मोठ्ठे चौसोपी दगडी मंदिर. चोहो बाजूंनी दगडी मंडप असावा असे बांध काम. एका बाजूला उंच गोपुर. आत शिरलो. अंगाची लाही लाही होत होती. पूर्ण घामाघूम झालो होतो. जमेल तितक्या सावलीतून आम्ही जात होतो. आता तर पायात चपलाही नव्हत्या.
समोर तिकीट काढून वर जायला परवानगी होती. आम्ही तिकिटे घेतली आणि त्या तापलेल्या काळ्या पाषाणातील पायऱ्या १-२ मजले उंचीवर नेत होत्या. तिथून आत गेलो. गर्दी आणि प्रचंड उकाडा, अगदी हवालदिल झाले मी. कशाला आलोय इथे आपण असे वाटले. मुख्य गाभार्यासमोर आलो. आणि सर्व कष्ट नष्ट झाले. समोर सुंदर शिव लिंग. अर्थात आमच्या समोर शिव लिंगाचा फक्त वरचा भाग होता. त्याच texture crystals सारखे चकचकीत होते आणि त्यावर काळ्या पट्ट्यांसारखं होतं. पिवळ्या फुलांच्या माळांनी सुशोभित केलेले ते शिव लिंग फार सुंदर वाटत होते. व्याघ्रांबर लेऊन स्वत: शिव शक्तीसह विराजमान आहेत असं वाटतं होतं. मन प्रसन्न झाले. तिथे ही परत नाव गोत्र विचारून अभिषेक झाला. पण मग मूळ बेस कुठे आहे शिव लिंगाचा? असं विचारताच कळलं की हे १६ फूट उंच शिवलिंग आहे आणि मूळ पायाच दर्शन खाली जाऊन घ्यायचे.
सगळंच अचंबित करणारं होतं. शिव शक्तीच एकत्रित दर्शन घेऊन आमच्या गाड्या काकीनाड्याला निघाल्या. वाटेत एका ठिकाणी थांबून छान चहा घेतला.

आता वेध लागले कुरवपूरचे!!!….

– यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..