नवीन लेखन...

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ४

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

सुबाय्या गिरी हॉटेलचे चविष्ट भोजन करून गाड्या अन्नावरम मंदिराकडे निघाल्या. साधारण एक तासाचा किंवा थोडा कमीच वेळ लागेल असा रस्ता. ट्रॅफिकचा सुध्धा कुठे कधीच प्रोब्लेम आला नाही. असो.

अन्नावरम हे एक आंध्र मधील गोदावरी डिस्ट्रिक्ट मधलं गाव आहे. तिथे भारतातील किंबहुना जगातील एकमेव श्री सत्यनारायण महाराज मंदिर आहे. ते डोंगरावर आहे. गाड्या वरपर्यंत जातात. भाविक तीन किलोमीटरचा डोंगर चढून जाऊ शकतात किंवा जातात. पण आम्ही गाड्या वरपर्यंत नेल्या. पूर्ण रस्ता वळणदार, झाडा-झुडुपांनी सजलेला आणि जोडीला नदीचे सुंदर वळणदार पात्र. मला ती गोदावरी नदी वाटली. पण ती पंपा नदी आहे असं स्मिता काकूंनी सांगितले. तिथे पोहचलो तेंव्हा दुपारचे ४-४.१५ वाजले होते. खूप ऊन होत. आणि गरम पण खूप होत होतं. पण हे सगळं असणारच हे गृहीत धरूनच बुकिंग केलं होतं. त्यामुळे तक्रार काय करणार? मी कॅप आणि गॉगल्स सतत अनुक्रमे डोक्यावर आणि डोळ्यांवर ठेवले होते. डोकं थंड तर तुमचा निभाव लागेल उन्हात.

आम्ही सगळे खाली उतरलो. तिथे सत्तर एक पायऱ्या आहेत चढायला आणि दर्शनासाठी पण एक मजला चढून जावे लागते. लिफ्ट ची सोय होती पण ती बंद होती. त्यामुळे आईने गाडीतच बसावे असे ठरले.

गाडीतून उतरल्यावर इतर ओळखी हळू हळू सुरू झाल्या.

पल्लवी कुलकर्णी आणि तिची आई स्मिता जोशी नाशिकहून आले होते. पल्लवी साधारण माझ्या एवढी होती. पल्लवीची मावस बहीण कल्पना साठे कांदिवलीहून तर तिचे मामा श्रीकांत दास पुण्याहून आले होते. पुढे भरत काटदरे, स्नेहा काटदरे आणि स्नेहाताई यांची बहीण सुधा दुबळे ताई ह्यांची ओळख झाली.ते बडोद्याहून आणि सुधाताई जळगाव हून आल्या होत्या.बळवंत काकांचे सख्खे भाऊ अविनाश विद्वांस आणि त्यांची पत्नी अनुराधा विद्वांस हे मालाडचे होते. चंद्रकांत काळे काका आणि रोहिणी काकू हे अजून एक कपल डोंबिवलीचे होते. असं एकमेकांची ओळख करून घेत आम्ही पायऱ्या चढत होतो. अशी एकेक ओळख होत गेली आणि त्या ४-५ दिवसात मैत्रीचे, जिव्हाळ्याचे घट्ट नाते विणले गेले.
तसं बघायला गेलं तर मी आणि पल्लवी 47-48 वर्षाच्या तरण्या होतो. बाकी तिघी-चौघी ५०-६०च्या घरात.आणि बाकी सगळे वयाच्या हिशोबाने ज्येष्ठ नागरिक. पण त्या लोकांचा उत्साह आणि stamina अचंबित करणारा होता.

सत्तरच पायऱ्या होत्या खऱ्या! पण उन्हात त्या खूप तापदायक वाटल्या. निम्म्या पायऱ्या झाल्यावर थोडी मोकळी जागा होती. तिथे मिठाई, पूजा साहित्य अश्या गोष्टींची विविध दुकाने होती.

नरेनने तिकडून आंध्रची एक स्पेशल मिठाई आणली होती. भाताच्या खरपुडीचा रोल ज्यात खोबरं आणि ड्राय फ्रूटच फिलिंग होत. खूप टेस्टी होतं. ते ही तिथे पाहिलं पण घरी एक बॉक्स होता म्हणून घेतलं नाही. पटापट पायऱ्या चढून वरती पोहचले. समोर प्रशस्त प्रवेश द्वार… एकदम टीपिकल साऊथची गोपुर पद्धतीची रचना आणि परिसर अत्यंत स्वच्छ.
मुख्य प्रवेश दारातून प्रवेश नव्हता. बाजूला एक चपला स्टँड होता. तिथे चपला काढून आम्ही पुढे निघालो. समोर मोठ्या उंच दगडी पायऱ्या. बरं झालं आई नाही आली. ह्या चढण तिला जमलंच नसतं. एक मजला वर आम्ही गेलो. आणि गोल गोल फिरत अखेर शेवटी एका सुंदर नारायणाच्या मूर्ती समोर उभे होतो. खूप सुंदर फुलांच्या सजावटीत मूर्तीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. हात जोडून नमस्कार केला. सत्यनारायण महाराज की जय असा जयघोष करून पुढे निघालो. तिथे सर्व मंदिरात गुरुजी तुम्हाला गोत्र विचारतात आणि गोत्राच नाव, तुमचं नाव घेवून मंत्र म्हणतात आणि तुमच्या डोक्यावर मंतरलेल्या पाण्याचा अभिषेक करतात. त्या बदल्यात तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता. मी ते सगळं टाळलं. तरी एक दोन ठिकाणी त्यांनी जबरदस्ती अभिषेक केला.अर्थात दक्षिणा नाही घेतली त्या बदल्यात.

पुढे तीर्थ प्रसादाच्या रांगेत गेलो. आणि दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. एक प्रदक्षिणा घालून पायऱ्या उतरायला सुरुवात करताच होते की लक्षात आलं अरे, चप्पल आपण दुसरीकडे काढल्या आहेत. परत मागे जाऊन चप्पल घालून आले. आणि पायऱ्या उतरायला लागले.

निम्म्या पायऱ्या उतरल्यावर मला मेघना काकू उतरताना दिसल्या. त्यांच्या पायात चप्पल नव्हत्या. जी गडबड माझी होत होती, तीच त्यांची झाली. दुसऱ्या बाजूने बाहेर आल्यावर त्यांनीही चपला न घालता उतरायला सुरुवात केली.

‘काकू, तुमच्या चपला?’ असं मी म्हणताच त्यांच्या झालेला घोळ लक्षात आला. त्या पुन्हा पायऱ्या चढायला लागल्या. सत्तरीच्या पुढच्या काकू परत वरती जाऊन चपला आणणार? माझा जीव कळवळला. मी गिरनारला गेले होते तेंव्हा मी receiving end ला होते. मला वेळोवेळी सर्वांनी शरारिक, मानसिक, अध्यात्मिक मदत केली होती. दत्त गुरूंनी मला सेवेची संधी दिली होती. गिरनारच्या मदतीची थोडीफार उतराई होण्याचे भाग्य दिल्याबद्दल गुरुदेवांचे मी मनोमन आभार मानले आणि ‘पूर्ण प्रवासात मला सर्वांची लागेल तशी मदत करण्यासाठी शारारिक बळ दे’ अशी प्रार्थना करून काकूंना थांबवले. माझ्या चपला त्यांना घालायला दिल्या. त्यांनी कुठे चपला काढल्या? कशा आहेत असं विचारून मी त्यांना खाली जायला सांगितले.आणि मी पुन्हा वरती गेले. Luckily त्यांच्या चपला मला लगेच मिळाल्या. आणि मी त्या घेऊन खाली आले.

हळू हळू सर्व जण खाली येत होते. स्मृती ताईंना जरा उन्हाचा त्रास झाला.त्यांची चौकशी करून त्यांना औषध देत असतानाच समोरून बळवंत काका आले. ते ही चपला विसरले होते. त्यांनी request केली माझ्या सोबत येतेस का? ‘मी आणते. तुम्ही इथेच थांबा’ अस मी त्यांना सांगितले. पण ते हट्टाने माझ्या बरोबर आले.
आम्ही पुन्हा वर मंदिरात गेलो. मी तीनदा दर्शन घ्यावं अशी सत्यनारायण महाराजांची इच्छा असावी.

वरती आम्हाला काकांच्या चपला मिळाल्या नाहीत. ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि आमची चुकामूक झाली. मी २ प्रदक्षिणा घातल्या मंदिराला. ते कुठेच दिसले नाहीत. तीनदा पायऱ्या चढायला लावल्या आणि तीन प्रदक्षिणा घातल्या गेल्या ह्या सारखा योगायोग अजून काय असावा? आणि एवढं करूनही मला कसलाही त्रास झालं नाही.ना ही उन्हाचा, डोकेदुखीचा किंवा गुडघ्याचा. तो खरंच करून घेतो. हेच खरे!

शेवटी बराच वेळ तिथे वाट बघून खाली आले. तोपर्यंत काका खाली पोहचले होते. पण त्यांच्या चपला मिळाल्या नाहीत. एका दृष्टीने झालं ते चांगलं झालं, चपलेवर निभावलं असं सर्वांच्या म्हणण्यात आलं.

तोपर्यंत स्मृती ताईंना थोडं बरं वाटायला लागलं होतं. पण स्मृती ताई, सुरेखा ताई आणि सुषमा ताई ह्यांचे पाय, गुढघे दुखायला लागले होते. त्यांना मी रूमवर गेल्यावर गोळी देते सांगितले. त्याप्रमाणे रात्री त्यांना गोळ्या दिल्या तर त्यांना बरं वाटले सकाळपर्यंत.

तिथून पुढे पादगयेकडे प्रयाण केले. त्याच्याबद्दल असे म्हणतात की गयासुर नावाचा एक राक्षस होता. तो विष्णुभक्त होता. त्याने विष्णूचे तप करून खूप पुण्याई कमावली होती. त्यामुळे विष्णूने प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद दिला होता की, तुझ्या पायाला जो कोणी स्पर्श करेल, त्याला स्वर्ग मिळेल. त्यामुळे त्या जागेचे नाव पादगया असे पडले. आम्ही थोड्यावेळातच या जागी पोहोचलो. तिथे बाहेर फुलांची खूप दुकाने होती. पूर्ण साउथ इंडिया मध्ये मंदिराबाहेर असणारी फुले, हे एक मनमोहक दृश्य असते. वेगळ्या रंगाची, वेगवेगळी ताजी सुंदर फुले बघताना मन प्रसन्न होते.

पितरांचे श्राद्ध गयेला जाऊन करण्याची हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे. साऊथच्या लोकांना गयेपर्यंत जायला लागू नये म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी पादगया येथे श्राद्धकर्म सुरू केले. त्यामुळे त्या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आम्ही आत गेलो तर समोर मोठा तलाव होता. त्या तलावाचे पाणी आपण डोक्याला लावले तर आपल्याला मुक्ती मिळू शकते, अशी आख्यायिका आहे. आम्ही त्या पाण्याने पाय धुतले. पण फारसे स्वच्छ पाणी नव्हते. खूप कचरा होता त्या पाण्यात. मला ते पाणी डोक्याला लावायची अजिबात इच्छा झाली नाही. पाण्याचे जेमतेम दोन तीन थेंब पायावर टाकले आणि मी बाजूला झाले.

तलावाच्या एका बाजूला गयासुराची झोपलेली मूर्ती होती. मूर्तीच्या पोटावर ऋषी-मुनी यज्ञ करत आहेत असे दिसत होते. बाजूला एक कोंबड्याची मूर्ती होती. आणि त्याखाली शंकराची पिंड होती. हे असे का आहे? असे आम्ही तिथल्या गुरुजींना विचारले. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गयासुराची पुण्याई वाढली होती आणि गयासुराला देव लोकांमध्ये उच्च स्थान मिळावे, म्हणून त्याने आपल्या पोटावर यज्ञ करण्याचे बेत आखले. हा यज्ञ जर का सफल झाला असता तर गयासुरला देव लोकांमध्ये उच्च स्थान मिळाले असते. त्यामुळे श्री शंकराने तिथे कोंबड्याचे रूप घेऊन आरवले. त्यामुळे गयासुरला वाटले पहाट झाली आणि तो पटकन उठला आणि यज्ञ मोडला. त्यामुळे तिथल्या स्थानाला कुकुटेश्वर महादेव असे म्हणतात.
पुढे आत मध्ये वेगवेगळी मंदिरे होती. आम्ही महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. तिथे दत्तगुरूंचे मंदिरही होते. दत्तमूर्ती फार सुंदर होती. बाहेर आता जवळपास सहा-साडे सहा वाजले होते. तरीही प्रचंड उकाडा होता. आम्ही स्वतःवर शीतपेयाचा मारा केला. थंड पाण्याच्या बाटलीने तोंड धुतले. थोडे फ्रेश वाटले. तिथेच चहा घेऊन, फ्रेश होऊन आम्ही पुढे निघालो. आता मन पिठापूर मंदिराकडे धाव घेत होते. कधी एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन होते आहे असे झाले होते. आता अजुन किती वेळ? असा एक प्रश्न मनात आला. स्मिता काकू म्हणाल्या, आपण पिठापूर मध्येच आहोत आणि दहा मिनिटात आपण मंदिरात असू.

‘आपण गुरुदेवांच्या भूमीवर आहोत?’ न कळत भूमीला नमस्कार केला गेला. आणि मन आनंदविभोर झाले. त्या नादात गाडी कधी मंदिराच्या जवळील पार्किंग मधे येउन थांबली कळलेच नाही.

— यशश्री पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..