नवीन लेखन...

पाकिस्तान अस्थिरतेकडुन अस्थिरतेकडे

विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांना पदावरून पायउतार करण्यासाठी पुढील आठवडय़ात विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, मात्र त्यामुळे भारतात आनंदाची लाट पसरली असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

जमात-उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय-एफ) नेते फझलूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये आझादी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याला पाकिस्तान मुस्लीम लीग-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाकिस्तानमध्ये जुलै २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या विजयासाठी मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप फझलूर यांनी केला असून इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.फझलूर यांच्या आंदोलनामागे विशिष्ट हेतूने प्रेरित कारस्थान आहे, असे मत इम्रान खान यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषकांच्या बैठकीत व्यक्त केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आपण राजीनामा देणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

काही जनरल्सचा मौलानांना छुपा पाठिंबा

काश्मीर प्रकरणी चहूबाजूंनी अपयश आल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता देशांतर्गत राजकारणात फसले आहेत. पाकिस्तानमधीलच कट्टर धार्मिक मुसलमानांच्या, जमात उलेमा-ए-इस्लाम या एका राजकीय पक्षाने राजधानी इस्लामाबादला घेराव करून त्याची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. या राजकीय पक्षाचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचा ‘आझाद मार्च’ नावाचा मोर्चा 27 ऑक्टोबर ला काढला, 31 ऑक्टोबरला तो इस्लामाबाद येथे पोहोचेल आणि या शहराला घेराव करेल. मौलान फजलुर रहमान म्हणतात, सध्या सत्तेत असलेले इम्रान खान सरकार अवैध व असंवैधानिक आहे. हे सरकार लोकांनी निवडलेले नसून लष्कराने नियुक्त केलेले आहे. त्यामुळे इम्रान खानने ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. जोपर्यंत इम्रान खान राजीनामा देत नाही, तोपर्यंत इस्लामाबादची नाकेबंदी सुरू राहील. इम्रान खान यांना वाटले की, आपण मौलानांची समजूत काढून त्यांना परावृत्त करू. परंतु, मौलाना आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मोर्चाची तारीख जवळ येताच, इम्रान खान यांचे धाबे दणाणले आहे. शेवटी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी मौलाना रहमान यांना भेटीला बोलावले आणि खडसावले की, तुमची कारवाइ संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे हा आझादी मार्च रद्द करा. बाजवा त्यांना म्हणाले की, तुम्ही एक जबाबदार राजकीय नेते आहात आणि आज पाकिस्तान ज्या परिस्थितीत आहे, त्या वेळी असले आंदोलन करणे योग्य नाही. काश्मीर प्रकरणामुळे भारताच्या सीमेवर अशांती, अफगाणिस्तानच्या सीमेवरही गडबड, तिकडे इराण व सौदी यांच्यात ठिणग्या पडत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानला अस्थिर करण्याचे कुठलेही प्रयत्न लष्कर सहन करणार नाही. परंतु, मौलाना रहमान अजूनतरी वाकले नाहीत.

पाकी लष्करप्रमुखाचेही मौलाना ऐकत नाहीत, याचा अर्थ लष्करातील बाजवाविरुद्ध जनरल्सचा मौलानांना छुपा पाठिंबा असावा. कारण, बाजवा यांनी स्वत:चा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवून घेतल्यामुळे, काही जनरल्स अत्यंत चिडले आहे आणी  पाकिस्तानी लष्करही दोन गटांत विभागले आहे.

पाकिस्तानची चिंताजनक आर्थिक स्थिती

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय चिंताजनक आहे. अमेरिका, चीन आणि सौदी अरब यांनी पैसे देणे बंद केले आहे. महागाईने कळस गाठला आहे. इम्रान खानच्या विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. देशातील गंभीर आर्थिक स्थितीवर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधाना ऐवजी लष्करप्रमुख बाजवा यांनी देशातील मोठ्या उद्योगपतींची एक बैठक पंधरा दिवसांपूर्वी बोलावली आणि त्यात देशाच्या आर्थिक स्थितीची चर्चा केली. इम्रान खान हे लष्कराच्या हातातले बाहुले आहेत. देशात लोकशाही आहे, हे जगाला दाखविता यावे, यासाठीच लष्कराने, पश्चिमेला पसंत पडणारा चेहरा असलेल्या इम्रान खानला निवडले आणि निवडून आणले. इम्रान खान फक्त नावाचे पंतप्रधानपद आहे. सर्वात मोठी ताकद लष्कर आहे.

इम्रान खाननी सत्तेत येताच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले. पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे आसिफ झरदारी, पाकिस्तान मुस्लिम लीगचे नवाझ शरीफ आणि इतरही अनेक महत्त्वाचे विरोधी नेते सध्या तुरुंगात आहेत. इतके महिने झालेत, परंतु अजूनही त्यांच्यावर आरोप दाखल झाले नाहीत. त्यामुळे या पक्षांच्या समर्थकांमध्ये अत्यंत संताप आहे. नवाझ शरीफ यांचा तर तुरुंगात चांगलाच छळ सुरू आहे. त्यांची मुलगी मरयम हिलादेखील वडिलांना भेटू दिले जात नाही. आतातर नवाझ शरीफ यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. तुरुंगात असताना त्यांच्या रक्तातील प्लेटलेटस्सात हजारापर्यंत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना गंभीर स्थितीत लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाझ शरीफ कुटुंबीयांनी तर, इम्रान खान सरकारवर जाहीर आरोप लावला आहे की, नवाझ शरीफ यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. नवाझ शरीफ यांच्या जिवाला काही बरेवाईट झाले, तर पाकिस्तानात मोठा हिंसाचार होउ शकतो.

पाकिस्तान जागतिक स्तरावर चोहोबाजूने घेरलेला पाकिस्तान

अशा या गंभीर परिस्थितीत इम्रान खान बावचळून गेले आहेत. पाकिस्तानने इतका बेजबाबदार पंतप्रधान कधी पाहिला नाही, असे आतापर्यंत इम्रान खानची तळी उचलणारी मिडीया म्हणू लागली आहे.

एफएटीएफ संस्थेने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने फेब्रुवारी 2020 पर्यंत दहशतवाद्यांविरुद्ध समाधानकारक कारवाई केली नाही, तर हा देश एफएटीएफच्या काळ्या यादीत जाईल. तसे झाले तर पाकिस्तान आणखीच गर्तेत जाईल. मग त्यांच्या अण्वस्त्रांचे काय होणार?

भारतद्वेषावरच पाकिस्तान आतापर्यंत पोसला गेला आहे.पाकिस्तानात काहीही झाले आणी  काश्मीरचा विषय काढला की पाकिस्तानची जनता पुन्हा सर्व विसरून एकजूट उभी राहते. पाकिस्तानची इतकी गंभीर स्थिती या आधी कधीच झाली नव्हती. पाकिस्तानशी फटकून वागणारे ट्रम्प शासन,  सिपिईसी प्रकल्प रेंगाळला म्हणून चिडलेला चीन, येमेन युध्दात व ईरान विरुध्द लढत नाही म्हणुन सौदी अरब व यूएई यांनी मदतीचा आखडता घेतलेला हात आणि इराण व अफगाणिस्तानशी संघर्ष. अशा रीतीने पाकिस्तान जागतिक स्तरावर चोहोबाजूने घेरला आहे. देशांतर्गत परिस्थिती पाहिली तर बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतात बंडखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीतून पाकिस्तानी लष्कर कसा मार्ग काढणार?

सर्वात सोपा मार्ग म्हणजे, या सर्व परिस्थितीला इम्रान खान यांना जबाबदार ठरवून पदावरून काढणे आणि दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी बसविणे. तसे होण्याची शक्यता पाकिस्तानात आहे.

भारताने काय करावे

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदुंवर अत्याचार केले जात आहेत. इम्रान खान यांच्या पक्षातील एक माजी आमदार बलदेव कुमार यांनी भारतात आश्रय मागितला आहे. भारताने बलुचिस्तान, सिंध, पश्तून आणि आझाद काश्मीर प्रांतातिल मानवधिकाराचा मुद्दा सातत्याने आंतरराष्ट्रिय स्तरावर उठवत राहावा.त्यांना नैतिक/मानसिक समर्थन देत राहावे. आता पाकव्याप्त काश्‍मीरवरूनही भारताला आक्रमक धोरण अवलंबावे लागेल. पाकिस्तान दहशतवादाला कशा रितीने पोसतो, हे सगळ्यांना कळले पाहिजे. माहिती युध्दाचा वापर करुन हा चेहरा जगासमोर येणे काळाची गरज आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..