नवीन लेखन...

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ५ – सदाहरित जंगलातील धन्वंतरी – अर्जुन वृक्ष

अर्जुन ही कॉम्ब्रिटेसी कुळातील वनस्पती सदाहरित वनस्पती आहे. या वनस्पतीची वाढ प्रामुख्याने जंगलामध्ये होते. अनमोल उपयोगामुळे याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. हा वृक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, बिहार, बंगाल, हिमालय, मध्य प्रदेश, इत्यादी राज्यामध्ये आढळून येतो. सह्याद्री आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये आढळून येणारी ही बहुवार्षिक झाड वनस्पती आहे. कोकणातील बहुतांश देवरायात ही वनस्पती पहावयास मिळते. हा वृक्ष २५ ते ३० फुट वाढणारा असून तो आकाराने मोठा आहे. उभ्या व लांबट अशा त्याच्या खपल्या पडतात. त्याची पाने ही ऋतूपर्णी, चामड्यासारखी १३ ते २० से.मी. वाटूळकी व देठाकडे निमुळती होणारी असतात. शेंडे पिवळसर असतात. त्याची फळे ही २.५० ते ५ से.मी. लांब चामड्या सारखी जाड पंख, निमुळती व त्यावर आडव्या रेषा व त्याला पंचाकृती आवरण असते.

शोभा वाढविण्यासाठी व सावलीसाठी या वृक्षांची लागवड केलेली आढळते. भारतातील सुंदर शहरांपैकी एक असलेल्या चंदिगड शहरात रस्त्याच्या दुतर्फा बागांमध्ये विविध सेक्टरमध्ये या वृक्षांची लागवड केलेली आहे. महाराष्ट्रात कोकण, पश्‍चिम – उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे व विदर्भ इ. ठिकाणी हा वृक्ष आढळतो.

अर्जुन वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते –

संस्कृत- अर्जुन, अर्जुनसादडा, अर्जुनाव्हय, इन्द्रू, ककुभ, देवसाल, धनंजय, धाराफल, धूर्तपाद्य, नदीसर्ज, पार्थ, शक्रतरू, क्षीरस्वामी, सर्पण, सेव्य, वगैरे

हिंदी- कौहा, कोह

बंगाली- अर्जुन

गुजराती- अर्जुन

मल्याळम- मारुत

तामिळ- मारुड

तेलुगू- मदिचट्ट

इंग्रजी- The White Murdah Tree

लॅटिन नाव- (टरमीनैलीया अर्जुना) Terminalia arjuna

कुळ- (कॉम्ब्रीटेसी) Combretaceae

अर्जुनाच्या विविध नावांचे अर्थ:

अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत. नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे. पार्थ, धनंजय या पांडवपुत्र अर्जुनाच्या नावांवरून अर्जुन वृक्षालाही ती नावे पडली. अनेक वृक्षांपासून चीक मिळतो. पण अर्जुनवृक्षाचा गोंद (चीक) हा सुंदर, पारदर्शक, स्वच्छ, बल्य व पौष्टिक आहे. त्यामुळे अर्जुनवृक्षाला क्षीरस्वामी असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. मूळ अर्जुन या संस्कृत शब्दाचा अर्थ “पांढरा स्वच्छ”, “दिवसाच्या प्रकाशासारखा” असा आहे. अर्जुन वृक्षाला त्याच्या पांढऱ्या खोडामुळे हे नाव मिळाले आहे. पांढऱ्या किंचित हिरवट-राखाडी झाक असलेल्या गुळगुळीत खोडाचा हा वृक्ष अस्सल भारतीय वंशाचा आहे. वरचे खोडाचे साल निघून गेल्यावर याचे खोड ताजेतवाने दिसते. वर्षाचे किमान सहा-सात महिने वाहणारे पाणी असणाऱ्या ठिकाणी हा वृक्ष वाढतो. हे वाहणारे पाणी त्याचे बी रुजवतात. हिमालयापासून थेट कन्याकुमारीपर्यंत तसेच श्रीलंका, मलेशिया, म्यानमार (ब्रह्मदेश) इथे हा वृक्ष आढळतो. हा एक भव्य वृक्ष आहे. या वृक्षाच्या वाढलेल्या मोठया फांद्या थोडया खाली झुकलेल्या असतात. समोरासमोर देठ असलेली व थोडा लांबट आकार असलेली किंचित फिकट हिरवी पाने, या पानांच्या मागे देठाजवळ, मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूस गोगलगाईच्या शिंगाप्रमाणे दिसणाऱ्या दोन लहान ग्रंथी हे याचे वैशिष्टय आहे. ऐन आणि अर्जुन एकाचवेळी पावसाळ्यात फुलणारे व ताक घुसळण्याच्या रवीच्या बोंडाप्रमाणे पाच पंख असलेली फळे धारण करणारे असतात. फरक केवळ खोडात दिसतो. ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले व तपकिरी रंगाचे तर अर्जुनाचे गुळगुळीत व पांढरे असते. त्यामुळेच कोकणात हा पांढरा ऐन म्हणून ओळखला जातो. सालीतील कॅल्शियम मॅग्नेशियम व इतर उपयुक्त घटकांच्या संपन्नतेमुळे हा बलकारक आहे. म्हणून याला धन्वंतरी हे नाव मिळाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग प्रचंड मोठया अर्जुन वृक्षाखाली आहे. नागार्जुन, तामिळनाडू येथील देवराईत एक भव्य अर्जुन वृक्ष असून त्याच्या खोडाचा घेर ३० फुट आहे. हा वृक्ष सुरुवातीच्या काळात फार हळू वाढतो. सुरुवातीला त्याला पाण्याचे दुर्भिक्ष चालत नाही. याचे देखणे पांढरे खोड असल्यामुळे हा वृक्ष रस्त्यांवर लावण्यालायक आहे. ककुभ्‌ म्हणजे दिशा. ज्याचा पसारा सर्व दिशांना पसरलेला आहे, म्हणून अर्जुनसादडाला ककुभ म्हणतात. ज्याचे बुद्धिपुरस्सर सेवन केले जाते, अशा त्याला सेव्य असे नाव मिळाले.

पांढऱ्या रंगाला अर्जुन हा एक प्रतिशब्द आहे, म्हणून ज्याची साल बाहेरून पांढरी दिसतेत्या झाडाला अर्जुन हे नाव पडले असावे.

वर्णन :

अर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात. मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही. रुजतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने ती हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते.

अर्जुन वृक्षाचे वेगवेगळ्या संस्कृत संहिते मद्धे संदर्भ आहेत. अर्जुनस्य त्वचा सिद्धं क्षीरं योज्यं हृदामये। … (चक्रधर हृद्रोग चि/ १०) श्वेतवल्कलवान् वृक्षः पुष्पं नेत्राञ्जने उपयुज्यते।…(सुश्रुत उत्तरस्थानम् १२.११) शीतकषायः रक्तपित्त्प्रशमनः .. (औ.उ. ४५.२३)

अर्जुनः शीतलो भग्नक्षतक्षयविषास्त्रजित् |(मदनपाल)

उपयोग:

आयुर्वेदानुसार अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. तसेच त्याच्या फुलांपासून उत्तम नेत्रांजन बनते. अर्जुनासव व अर्जुनारिष्ठ औषधे सालीपासुन बनवतात. अर्जुनची साल दुधासोबत ही खूप गुणकारी आहे पण ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी. मुकामार, हाड तुटणे याच्या सालीचा वापर होतो. कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी व हृदयाचे आकारमान वाढले असल्यास अंर्तसालीचा वापर करावा.

आराध्यवृक्ष: हा स्वाती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

हवामान व जमीन – अशा बहुपयोगी आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असणाऱ्या या वृक्षाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. मात्र पाणी साचणाऱ्या आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये याची लागवड केल्यास त्याची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. साधारणपणे जास्त आर्द्रता असणाऱ्या आणि दमट ह्वामांच्या जागेत. शिवाय १००० ते ४००० मिमी. पाऊस पडणाऱ्या ठिकाणी लागवड करणे फायद्याचे आहे. उष्ण आणि समशीतोष्ण तापमानामध्ये व समुद्रसपाटीपासून १००० मी. उंची असणाऱ्या जागेत हि वनस्पती चांगली वाढते. दरी-खोऱ्यातील निवाऱ्याची जमीन या झाडास चांगली मानवते. खडकाळ आणि डोंगर उतारावरील आणि उताराच्या जमिनीत हा वृक्ष चांगला वाढत नाही.

रोपे तयार करणे – बियापासून रोपे तयार करणे कधीही योग्य. वजनदार बियाणे पेरणीसाठी वापरावे. रोपे तयार होण्यापासून ६ ते ८ महिने लागतात. १ किलोमध्ये ४५० इतके बियाणे असतात. बी २ ते ४ सेमी. लांब असते. गादी वाफ्यावर अलगद पेरणी करून रोपे तयार करावीत. बियांवर ज्यादा माती टाकू नये. त्यामुळे उगवण चांगली होत नाही. या वृक्षाची अभिवृद्धी रोपांपासून छाट कलमाद्वारे अथवा गुटी कलमाद्वारे करता येते. रोपे तयार करण्यासाठी एप्रिल महिन्यात वाफ्यावर बियाणे पेरावे. अर्जुनाची फळे ४८ तास पाण्यात भिजवून नंतर उथळ चाऱ्यामध्ये ठेवतात. कोंब फुटल्या बरोबर पेरणी करावी किंवा फळे उकळणाऱ्या पाण्यात टाकून ती थंड होऊ द्यावी व त्याच पाण्यामध्ये ६/ १२ तास भिजत ठेवल्यास उगवणशक्तीमध्ये निश्चितच वाढ होते. अशाप्रकारे बीजप्रक्रिया केलेल्या बियाणाची उगवण ८ ते१० दिवसात सुरु होते. प्रक्रिया केलेले बियाणे ३० सेमी. अंतरावरील ओळीत ५ सेमी. या अंतर ठेवून पेरावे. वाफ्यांना नियमित पाणी द्यावे व आवश्यकतेनुसार बेणणी करावी. रोपे ५ सेमी. उंचीची झाली की ती अगोदर भरलेल्या पिशवीत लावून घ्यावित.

रोपांची लागवड –

रोपांची उंची ५० सेमी झाल्यानंतर पावसाच्या सुरवातीस किंवा जून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात १० x १० मी. अंतरावर ३ x ३ x ३ मीटरचे खड्डे खोदून करावी. हेक्टरी १०० रोपे लागतात. जुलैत रोपांची लागवड स्वतंत्र करावी. लागवड करताना मुळा भोवतालच्या मातीच्या गोळ्यासहित रोप लावावी. लागवड करतेवेळी शेंड्याकडील पानांची जोडी तशीच ठेवून बाकीची पाने काढून टाकावीत. जुलै महिन्यात साधारणतः १५ महिने वयाच्या रोपांपासून छाट कलमे तयार करून लागवड करावी. छाट कलमांची जाडी साधारणतः १.२ ते २.५ सेमी असावी. रोपाभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घयावी. वर किंवा खूप उताराची जमीन असेल तर रोपांना आधार द्यावा. पहिले ३ ते ५ वर्षे आंतरपीक म्हणून अन्नधान्याची पिके/झुडूपवर्गीय औषधी वनस्पतीची लागवड करता येते.

काढणी –

या झाडाचे ३० ते ३५ वर्षांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. याची साल दर तीन वर्षांनी आपोआप गळून पडते. कुऱ्हाड/कोयत्याने साल काढू नये. एप्रिल/मे महिन्यात फुले येतात. ऋतू नुसार फुले येण्याचा काळ बदलतो. साल गोळा करून त्याची भुकटी तयार करून उत्पन्न मिळते. झाडाच्या वयानुसार ५०० ग्रॅम ते १० किलोपर्यंत साल मिळते.

अर्थशास्त्र:

दर –

साधारणपणे सालीला २५-३० रुपये/ किलोप्रमाणे दर मिळतो व चूर्ण केल्यास ६०-७० रुपये/ किलो दर मिळतो. शिवाय आंतरपीक म्हणून झुडूप वर्गीय औषधी वनस्पतीची लागवड केल्यास जास्त फायदा मिळतो. सध्या याची लागवड रोजगार हमी योजनेमध्ये केली असता हेक्टरी जवळपास वीस हजार रुपये इतके सरकारी अनुदान मिळते. दर हेक्टरी १०० वृक्ष असतात. एका वृक्षापासून दर तीन वर्षांनी सुमारे वयोमानानुसार २-१० किलो साल मिळते. म्हणजे प्रत्येक वृक्षाचे उत्पन्न साधारणपणे २०० – ३०० रुपये व हेक्टरी वीस ते तीस हजार रुपये मिळते. परंतु आदिवासी लोक जंगलात फिरुन याची साल गोळा करतात व वनविभागाला विकतात. अशा प्रमाणे त्यांना चार महिन्याचा रोजगार मिळतो.

अर्जुन वृक्षाचे औषधी उपयोग:

आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलेल्या अनेक औषधी वनस्पती आणि वृक्षाची कमी नाही. बरेचसे शारीरिक आणि मानसिक त्रास आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने घरच्या घरी कमी करू शकतो. अर्जुन साल (Arjun Bark Benefit) आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरली जाते. संपूर्ण अर्जुन वृक्ष (Arjun Tree) औषधी गुणांनी समृद्ध आहे.

डॉ.पी.वी. रंगनायकुलू सांगतात की, अर्जुन वृक्षाची साल हृदय रोग, क्षय, पित्त, कफ, सर्दी, खोकला, अत्याधिक कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणासारखे आजार दूर करण्यास मदत करते. त्यात बीटा-साइटोस्टेरॉल, एलाजिक ॲ‍सिड, ट्रायहायड्रॉक्सी ट्राईटरपीन, मोनो कार्बोक्झिलिक ॲ‍सिड, अर्जुनिक ॲ‍सिड आढळतात. या प्रकरणी केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (सीआयएमएपी), लखनऊ येथे झालेल्या एका संशोधनात असे समोर आले की, अर्जुन वृक्षाच्या सालीमध्ये एक असे संयुग (compound) आढळते ज्यात कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचे नाव अर्जुनिक ॲ‍सिड असे ठेवण्यात आले आहे. ते ओरल आणि ओवरीच्या कॅन्सरवर फायदेशीर आहे. तसेच, या संदर्भात झालेल्या इतर काही संशोधनाच्या निकालांनुसार, अर्जुनाच्या झाडात कॅसुआरीनिन (Casuarinin) नावचे रासायनिक घटक देखील आढळते. या घटकामुळे कॅन्सरच्या पेशींना शरीरात पसरता येत नाही.

अर्जुन साल वापरण्याची पद्धत

जेवण करण्यापूर्वी अर्जुन सालचे पावडर (Arjun Sal Powder) पाण्यात टाकून दिवसातून एक किंवा दोनवेळा घ्यावे. 50 एमल एवढ्या प्रमाणात हे घ्यावे. पाण्याऐवजी दुधात टाकूनही ही पावडर घेतली जाऊ शकते.

अर्जुन सालीपासून बनलेल्या कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहेत. यांचादेखील वापर तुम्ही करू शकता.

एक कप पाण्यामध्ये 1 चमचा अर्जुन सालचे पावडर टाकून उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाल्यावर गाळून कोमट झाल्यावर प्यावे.

हृदयासाठी फायदेशीर

तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत असतील तर अर्जुन सालीचे (Arjun Sal For Heart) सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अर्जुन साल हृदयाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर अर्जुन सालचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच हृदयातील जळजळ दूर करण्यात मदत होते. हृदयाला बळ देण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते.

रक्तदाब नियंत्रण

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनची साल इतर औषधी वनस्पतींसोबत वापरली जाते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये डिस्पनिया आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर सुधारत असल्याचे दिसून आले आहे.

फुफ्फुसासाठी फायदेशीर

अर्जुन साल आयुर्वेदानुसार खोकला, दमा आणि काही संक्रमणांसह फुफ्फुसाच्या विकारांवरदेखील मदत करू शकते. आपल्याकडे आयुर्वेदाने सांगितलेल्या अनेक औषधी वनस्पती आणि वृक्षाची कमी नाही. बरेचसे शारीरिक आणि मानसिक त्रास आपण आयुर्वेदाच्या साहाय्याने घरच्या घरी कमी करू शकतो. हृदयास शिथिलता आली असता अर्जुन गुळाबरोबर दुधात उकळून देतात. मार, ठेच, हाड मोडणे, रक्तस्त्राव इत्यादी रोगात रक्तस्त्राव बंद होण्यासाठी अर्जुनसालीचे चूर्ण पोटातून देतात. सालीमधील कॅल्शियममुळे फ्रॅक्चर लवकर भरून येण्यासाठी चुर्णरूपात दिले जाते; तसेच बाहेरूनही लेप लावतात. एक कप पाणी, एक कप दूध व अर्जुन चुर्ण ६ ते ८ ग्रॅम याप्रमाणात घेऊन पाणी आटेपर्यंत उकळतात, यास क्षीरपाक असे म्हणतात.

आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आपले हृदय म्हणजेच आपले हृदय असते. हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यावर अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग आणि त्याचे फायदे याबद्दल आतापर्यंत अनेक अभ्यास केले गेले आहेत.

या झाडाचे साल आणि फळाचा उपयोग औषध बनवण्यासाठी प्राचीनकाळापासून करण्यात येत आहे.

अर्जुन वृक्षाच्या सालाचे फायदे –

या झाडाचे साल आणि कांद्याच्या पातीचे चूर्ण सम प्रमाणात रोज अर्धा चमचा दूधात टाकून घेतल्यास हृदय रोगामध्ये फायदा होतो.

अर्जुन सालीचा चहा: दोन कप पाण्यात अर्जुन सालीची एक लहान चमचा पूड घाला. मिश्रण उकळले कि दोन मिनिटे ढवळा. अर्धे मिश्रण झाले कि खाली उतरवा. हा चहाचा काढा दिवसातून दोन किंवा तीनदा घ्या.

लाकडाचे उपयोग:

अर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो.

गाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत.

कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो.

कोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.

लाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे.

टसर रेशमाचे कीडे वाढविण्यासाठी फार उपयुक्त.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.

संदर्भ:

विकिपीडिया

वनौषधी गुणादर्श- ले. आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे

गांवो में औषधी रत्न- प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा, (जि.-अजमेर)

Indian Medicinal Plants (IV volume)

भारतीय वनौषधी (भाग-६)

औषधीसंग्रह – लेखक-कै.डॉ.वामन गणेश देसाई

पूजा जगताप, लोकमत १८, जून २३, २०२२

गुगल वरील अनेक लेख

फोटो सौजन्य: गुगल

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 58 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग ५ – सदाहरित जंगलातील धन्वंतरी – अर्जुन वृक्ष

  1. अर्जुन वृक्ष हे तसे जरा दुर्लक्षितच. झाडांपासून आर्थिक फायदा नसुन लाकुड टिकाऊ असुन सुद्धा कारागिरांना कामासाठी अवघड असे असल्याने लाकडाला मागणी व किंमत येत नाही. फळ,पानं व बियां चे छायाचित्रे दिली असती तर अधिक माहिती मिळाली असती.

  2. छान माहिती. कोणते ज्योतिर्लिंग या वृक्षा खाली आहे याचा उल्लेख दिसत नाही. धन्यवाद!
    बऱ्याच दिवसांनी लेख वाचायला वेळ मिळाला. क्षमस्व…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..