नवीन लेखन...

आठवणीतले गिरणगाव

श्रीयुत विश्वास पाटील ह्यांचे “लस्ट फॉर लालबाग” हे पुस्तक वाचनात आले. लालबागशी माझा संबंध असल्यामुळे असेल कदाचित पण हातात घेतल्यापासून ते संपेपर्यंत हे पुस्तक मला सोडताच आले नाही. हे पुस्तक मला जुन्या काळात घेऊन गेले.

माझा जन्म गिरगावचा, मी वाढलो डिलाइल रोड (आता ना. म. जोशी मार्ग) ला – संभाजी नगर मध्ये. इथे आमची खोली होती – अशी खोली कि ज्यात पुढे पानाची गादी आणि मागे दोन खणाची खोली. साठच्या दशकात बारा वर्षे मी डिलाइल रोड ला रहात होतो. इराणी चाळ, लोहार चाळ, चाळ, समोर शिवाजी नगर बाजूला बावला मशीद, समोर सिमेंट चाळी. बाजूला मुनिसिपाल्टीची आमची शाळा – तिच्या बाजूला हरहर वाला बिल्डींग – पुढे दिन बिल्डींग त्याच्या समोर हुक्मील गल्ली जिच्या बाजूला न्यू प्रकाश थिएटर – ज्याला आम्ही “डब्बा” टॉकीज म्हणायचो. करी रोड आणि चिंचपोकळी स्टेशना मध्ये पसरलेला हा परिसर. इथे जवळ असलेल्या प्रभात बेकरी चे पाव – कडक पाव – बन पाव छान बनवत असत. इकडे लोअर परेल आणि तिकडे बकरी अड्डा आणि पुढे सात रस्ता !

आमच्या चाळी समोर “महाराष्ट्र वाच कंपनी” नावाचे घड्याळाचे दुकान होते – परब फोटो स्टुडिओ होता – सावंतवाडी नावाचे मालवणी हॉटेल होते, सलून होते, पिठाची गिरणी होती, “शंकर विलास हिंदू हॉटेल” नावाची (गुलाबी -अमृतुतुल्य) चहा विकणारी हॉटेले होती. त्यावेळी डब्बा टॉकीज जवळ भर वस्तीत गोदरेज ची साबणाची कंपनी होती.
आमच्या चाळीच्या मागील बाजूस लालबाग ला (बॉंबे) गॅस कंपनी होती. साबणाच्या उत्पादनामुळे खूप वास पसरत असे त्यामुळे (प्रदूषणामुळे) ती कंपनी पुढे उपनगरात विक्रोळी ला शिफ्ट केली गेली. कोळशाची काजळी पसरत असल्याने आणि पुढे आग लागल्यामुळे गॅस कंपनी बंद झाली.

इथले माझे बालपण मी कधीच विसरू शकणार नाही. एकत्र कुटुंब पद्धती आणि चाळी मध्ये एकोप्याने आणि सहकार्याने रहाणार्या – साधी रहाणीमान असणार्या त्या वेळच्या समाजाने फार चांगले संस्कार दिले. प्रत्येक चाळीत सार्वजनिक नळ असत, डबल बार आणि मल्लखांब दिसत, छोटी व्यायामशाळा असे आणि सर्वात महत्त्वाचे – छोटे का होईना मैदान असे. त्या मैदानात आम्ही वेगवेगळे खेळ खेळलो – डब्बा ऐसपैस, लगोरी – आबा धुबी, कबड्डी, विटी दांडू, क्रिकेट, छत्री ची तार वाकवून लोखंडी रिंग गाडी म्हणून चालवणे, पतंग उडवणे, गोट्या (कान घष्टी – राजा राणी – कोयबा), कांदा चिरी, लंगडी, आट्या पाट्या, सागरगोटे, दोरीच्या उड्या, उभा आणि बैठा खो खो, दांड पट्टा, लेझीम, पकडा पकडी – असे किती तरी खेळ.

त्यावेळचे जीवन गिरणी कामगार, तत्सम कामगार वर्ग आणि त्यांच्या आयष्यशी निगडीत असलेल्या अर्थ् व्यवस्थेवर आधारलेले होते. पान तंबाखूची दुकाने, चणे भेळवाले वाले, गाडीवरून आईस्क्रीम – कुल्फी विकणारे, लक्ष्मी विलास (गुलाबी अमृतुतुल्य) चहा च्या टपर्या, कापडाची – भांड्यांची दुकाने, दवाखाने, शाळा, फूटपाथवर बसणारे भाजी वाले, कान कोरणारे, वातीचे आणि बर्नर चे स्टोव्ह – (पत्र्याच्या) बादल्या रिपेर करणारे, कल्हई लावणारे, हातगाडीवरून खड्याचे मीठ घेऊन येणारे मिठ्वाले, कापूस पिंजून बिछाने बनून देणारे पिंजारी, अस्वल नाचवणारे दरवेशी, तेल मालिश करणारे मालिशवाले, खेळ करून पोट भरणारे डोंबारी, वासुदेव, नंदी बैल वाले, पोपट घेऊन बसणारे ज्योतिषी, फुगेवाले आणि कितीतरी पोटार्थी ह्या अर्थ-कारणाशी निगडित होते.कामगार वर्गाची मुले चिवट, मेहनती, प्रामाणिक होती.

मनोरंजनाची साधने आजच्या सारखी आधुनिक न्हवती. दूरदर्शन अजून यायचे होते. रेडिओ फार थोड्या लोकांकडे असायचा. ट्रान्झिस्टर नावाचा हातात किंवा गळ्यात घालून ऐकायचा रेडिओ चा प्रकार नुकताच आला होता आणि तो पण मोजक्या लोकांकडे होता. रेडिओ बाळगायला लायसन लागायचे. त्यामुळे मनोरंजनाची साधने त्यावेळी वेगळी होती. होती. भजने, रामायण – महाभारत – पुराणातील प्रसंग रंगवणारे भारुड / दशावतारी, बाल्या डान्स, चाळी मध्ये होणार्या स्पर्धा,रेकोर्ड डान्स, कबड्डीचे सामने, विवेकानंद व्याख्यानमाला, पुरंदरे ह्यांची शिव व्याख्यानमाला, तमाशा-वग – गौळण -नाटके आणि रस्त्यावर दाखवले जाणारे सिनेमा – एखाद दुसरे डब्बा थिएटर. साधी पण संस्कार करणारी समाजाभिमुख अशी ही साधने होती ज्यांनी संस्कारक्षम पिढी तयार केली. सर्व सण नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, दहीहंडी, गणपती, दसरा – दिवाळी, होळी वगैरे धामधुमीत साजरे होत. लग्नाच्या मिरवणुकीत बँड-बाजा असायचाच पण त्याबरोबर एखाद्या लोकल मंडळाचे लेझीम किंवा लाठ्या काठ्या खेळणारे पथक असायचे.

लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही.

खरं तर हा परिसर आम्ही गिरणी संपापूर्वी खूप आधी सोडला आणि वरळी ला राहायला गेलो. त्यानंतर मी मुंबई सोडली आणि पुण्याला आलो. आज माझयासारखे जे ह्या ठिकाणी ह्या काळात राहिले असतील ते जर इथे आले आणि भूतकाळातल्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करू लागतील तर ते नक्कीच हरवून जातील. आता येथे त्या गिरण्या नाहीत, गिरण्यांची धुरांडी नाहीत, त्या चाळी नाहीत, तशी मैदाने नाहीत;आता इथे आल्यावर हा परिसर पूर्वीसारखा “जिवंत” वाटतच नाही. ते दरवेशी, ते मालिशवाले, ते कल्हई वाले, ते मीठ वाले, ते डोंबारी कुठे तरी हरवले. गेलेल्या गिरण्यांच्या जागी आलेले टॉवर्स आणि पडक्या गिरण्यांचे अवशेष आणि चिमण्या पाहून काहीतरी हरवल्यासारखे वाटते. त्या पडक्या चिमण्या आणि भिंती पाहून टायट्यानिक चित्रपटात दाखवल्या प्रमाणे मन भूतकाळात फ्ल्याश बॅक मध्ये जाते आणि त्या पडक्या भिंती आणि चिमण्या डोळ्यासमोर त्यावेळचा परिसर जिवंत करतात, कामगारांची लगबग दिसू लागते आणि भूतकाळ जिवंत झाल्यासारखा वाटतो पण आसपासचा (मोठ मोठ्या शॉपिंग कॉप्लेक्स चा ) झगमगाट आणि (ऑफिसेस चा) चकचकाट पाहिल्यावर आपण परत वर्तमानात येतो.

आज पुन्हा तो परिसर गजबजू लागला आहे. मोठ मोठ्या शॉपिंग कॉप्लेक्स मुळे, मोठमोठ्या पब्स मुळे, रेस्टॉरंट्स आणि ऑफिसेस मुळे. पूर्वी इथले लोक गिरणी मधे काम करत होते आता त्यांची मुले इथल्या माल्स, पब्स आणि ऑफिसेस मध्ये काम करतात. पण पूर्वीच्या गर्दी ची गम्मत आणि आपुलकी आजच्या क्राउड मध्ये नाही. आजचा हा क्राउड परका वाटतो. ही आपली संस्कृती वाटत नाही आणि त्यामुळे हा आपला परिसर वाटत नाही. संप झाला – कामगार संपला – गिरणगाव संपले – अन्न, वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजांपैकी ” वस्त्र” हि गरज इथल्या गिरण्या आणि इथे जीव तोडून काम करणारे कामगार पुरवत होते – आज इथे गिरण्या नाहीत. ही गरज आता दुसरीकडून भागवली जाते – पण एके काळी मुंबई च्या अर्थकारणाच्या नाड्या असलेल्या इथल्या गिरण्या आणि त्या चालवणारे कामगार, इथली वस्ती आणि त्या सर्वांचा एक हिस्सा असणारे माझयासारखे (आणि एके काळी तिथे राहिलेली आणि आता रहाणारी त्या काळची पिढी) तो काळ ह्या जन्मात तरी विसरणार नाही

— प्रकाश दिगंबर सावंत 

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..