नवीन लेखन...

निवृत्ती

सृष्टीमध्ये प्रारंभ आणि अंत हे चक्र सदैव सुरूच असतं. एखाद्या रोपट्याचंच उदाहरण घेऊया. पहिला कोंब फुटतो आणि प्रारंभ होतो रोपट्याचा. तो कोंब उमलतो, ज्याला आपण पान असं म्हणतो. अगदी हिरवंकंच असतं ते. कालपरत्वे उत्कर्षबिंदूनंतर हळूहळू पानाचा रंग बदलायला लागतो आणि नंतर ते पान सुकायला लागतं आणि एके दिवशी ते पान गळून पडतं. पानाचा रंग बदलायला सुरूवात होणे आणि ते सुकायला लागणे ही झाली निवृत्ती.

माणसाचं देखील असंच असतं. पण माणसाच्या आयुष्यात एकदाच येते का हो ही निवृत्ती ? नाही. माणूस अनेक वेळा निवृत्त होत असतो. नव्हे, त्याने प्रत्येक वेळी, प्रत्येक फेजमध्ये निवृत्ती घ्यायलाच हवी. एका फेजमधून निवृत्ती घेऊन पुढच्या फेजमध्ये पाऊल टाकायला हवं. असं करताना त्या त्या फेजमध्ये निर्माण झालेले अनुबंध तोडण्याची काहीच आवश्यकता नाही. खरं तर अनुबंध तोडण्यासाठी नसतातच. पण माणसाने एका फेजमध्ये गुंतून राहूच नये.

माणसाच्या अनेक निवृत्तींपैकी पहिली निवृत्ती म्हणता येईल ती म्हणजे शालेय शिक्षण संपताना घ्यावी लागणारी निवृत्ती. हे वयच तसं असतं. आता सगळेच मित्र मैत्रिणी पांगणार असतात. इतकी वर्षे केलेला एकत्र अभ्यास, एकत्र खाल्लेला टिफिन, खेळ आणि मारामारी देखील. खुपच हळुवार आठवणी असतात आणि हुरहुर लावणारे क्षण. पण या निवृत्तीला पर्याय नसतो.

दुसरी निवृत्ती येते ती काॅलेजचं शिक्षण संपताना. पण शाळा सोडताना वाटणारी हुरहुर तेवढ्या प्रमाणात यावेळी नसते. एक चांगली बाजू असते हल्ली की काॅलेज सोडल्यावर देखील आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. त्यामुळे ही निवृत्ती तेवढी क्लेशदायक नसते.

त्यानंतर माणूस नोकरी व्यवसायात शिरला की घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा नुसता धावत असतो, अखंड. करिअर, पैसा, सेव्हिंग्ज, आपल्या स्वप्नातील घर, मनासारखा जोडीदार आणि नंतर मुलं बाळं. त्यानंतर पाल्यांचं पालनपोषण, शिक्षण, वगैरे. कधीही न संपणारी यादी असते ही.

मुलं मुली मोठे झाले की त्यांना शिंगं फुटायला लागतात. त्यावेळी मित्रत्वाच्या भूमिकेत शिरून त्यांना सल्ला द्यावा, चांगलं वाईट काय ते समजावून सांगावं. आपल्या संस्कारांमुळे त्यांना आपलं बरंचसं पटतं. पण कधी कधी जनरेशन गॅपमुळे काही मतभिन्नता होऊ शकते. त्यावेळी त्यांच्यापासून त्या वेळेपुरती निवृत्ती घ्यावी. दुरून लक्ष ठेवावं हे ओघाने आलंच.

मुलामुलीच्या लग्नाच्या वेळेच्या आसपास आपली सेवानिवृत्ती जवळ आलेली असतेच. त्यावेळी मुलामुलीला त्यांच्या स्वतःच्या पायांवर उभं रहायला द्यावं. फार काही ढवळाढवळ करू नये त्यांच्या आयुष्यात. त्यांच्यापासून निवृत्ती घ्यावी.

मुलगा मुलगी परदेशात गेले असतील तर आपल्या व त्यांच्यात कदाचित जास्त अंतर पडू शकतं. त्याची मानसिक तयारी ठेवावी.

आयुष्यात असेही प्रसंग येतात की एखाद्याने तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी करायला सांगितलेले असते आणि ते काम तुम्ही सहजरीत्या करून जाता. या कामाबद्दल तुम्हाला काही मोबदला मिळणार नसतो. तुमची तशी अपेक्षा देखील नसते. पण कौतुकाच्या दोन शब्दांची अपेक्षा मात्र असु शकते. पण खरं तर तशी अपेक्षा ठेवू नये. कारण अपेक्षापुर्ती झाली नाही तर आपल्यालाच मानसिक त्रास होतो. म्हणूनच ते काम करून मोकळं व्हावं व लगेचच त्यातून निवृत्ती घ्यावी.

एक निवृत्ती अशी देखील असावी ज्याची अनुभुती फक्त स्त्रीयाच घेऊ शकतात. पुरूष घेऊ शकत नाहीत. ती म्हणजे एकदा घरात सुन आली की सासुने मार्गदर्शकाच्या भूमिकेत शिरावं आणि सुनेचे नव्या नवलाईचे दिवस संपले की किचनचा ताबा हळूहळू सुनेकडे द्यावा. चार उपदेशाच्या गोष्टी जरूर सांगाव्यात. पण तिला मोकळीक द्यावी. तसेच तिच्याकडूनही काही नवं शिकावं, अपडेट रहाण्यासाठी.

यानंतर सर्वांच्याच आयुष्यात एकदाच येणारी निवृत्ती म्हणजे सेवानिवृत्ती. तो दिवस फारच हळवा असतो. उद्यापासून एकदम रिकामपण येणार असतं. एक मोठी पोकळी निर्माण होणार असते. काहीजण हे सगळं ग्रेसफुली घेतात आणि सहज निवृत्त होतात. पण ब-याच जणांना ते जमत नाही आणि तिथेच चुकतं त्यांचं. आता खरं तर सेकंड इनिंग सुरू करायची असते. त्या सेकंड इनिंगची तयारी अगोदरच केलेली असेल तर ती देखील एंजॉय करता येते. खुप सोपं असतं ते. आपण रोज कसं कसं आणि काय काय करायचं ते ठरवायचं आणि व्यवस्थित पार पाडायचं म्हणजे झालं. काय करता येत नाही या इनिंगमध्ये ? माॅर्निंग वाॅक, इव्हिनिंग वाॅक, व्यायाम, व्यवस्थित झोप, नाश्ता, जेवण, वगैरे. त्याच्या जोडीला वाचन, चिंतन, मनन आणि लेखनाचं अंग असल्यास उत्तमच. हल्ली तर WhatsApp, Facebook, Blogs, इत्यादी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात. संगीताची आवड असेल तर दुधामध्ये केशरच. तसेच निसर्गात भटकावं, ज्या ठिकाणी जायचं राहीलं असेल तेथे जोडीदारासह जाऊन यावं, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी करून टाकाव्यात.

या सगळ्यात एका निवृत्तीबद्दल सांगायचंच राहिलं. रोज रात्री झोपताना सर्वांतून काही तासांसाठी सक्तीची निवृत्ती घ्यावी. म्हणजे शांत झोप लागते व दुस-या दिवशी सकाळी आपण एकदम फ्रेश असतो त्या दिवसाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी. कारण नवीन दिवस म्हणजे नवीन जन्मच असतो आपला.

EVERY DAY IS A MINIATURE OF LIFE FOR BIG DREAMS.

या सर्व ब-याचशा सहजसाध्य निवृत्तींनंतर अगदी अखेरचीच निवृत्ती सहज घेता येईल का माणसाला ?

— शरद दिवेकर
कल्याण
70457 30570

2 Comments on निवृत्ती

  1. खूप छान. संपूर्ण जीवनाचं मोजक्या शब्दात केलेलं वर्णन. त्या प्रत्येक टप्प्यात कसं जगावं ह्याचं यथार्थ वर्णन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..