नवीन लेखन...

निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – जन्मदिनी मानाचा मुजरा

निसर्गकन्या – बहिणाबाई चौधरी – २४ ऑगस्ट १८८० या जन्मदिनी आपल्याला मानाचा मुजरा

बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्‍या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्‍या संस्‍कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्‍यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्‍यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्‍यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.

‘Poet is born and not made’, हे त्यांच्या बाबतीत नि:संशयपणे खरं आहे. ही क्षमता त्यांना उपजतच लाभली होती आणि कथा-किर्तन श्रवणाने त्यांच्या प्रतिमेला बहुश्रुतपणा लाभला. त्यांचं जगणं, जीवन, व्यवहार. जगण्यातले अनुभव, कष्ट, निसर्गाशी असलेलं निर्व्याज नातं या सगळ्यांनी त्यांच्या कवितेची मुळं भक्कम केली. प्रतिभेला एक अस्सलपणा, हृदयाला भिडण्याचं सामर्थ्य दिलं. खानदेशाच्या ज्या काळ्या मातीत त्या जन्मल्या, वाढल्या, रुजल्या त्या काळ्या मातीनेच त्‍यांचं व्यक्तिमत्व घडवलं कणखर, मृदु व सोशिक. व्यक्तिमत्वाचा हा गंध त्यांच्‍या गाण्यात पुरेपुर उतरलेला दिसतो. त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्‍येक गोष्टीवर माणसांपासून ते बोरीबाभळी, लौकी, नदी, जनावरं, पाखरं यावर त्यांनी भरभरुन प्रेम केलं आणि हेच सगळं त्यांच्या कवितेत उतरलं. त्यांच्या स्वभावाला एक विनोदाची झालरही आहे. सुख वाढवणारी व दु:खाची कळ कमी करणारी. आहे त्यात सुख मानून भविष्याला सामोरं जाण्याची उमेद बाळगणारी व जीवनाची जाण वाढवणारी. ती त्‍यांच्‍या, स्वभावाच्या कणखरपणाची निदर्शक आहे. हाताला घट्टे पडे पर्यंत कष्ट, श्रम, शेतीची कामं या गोष्टी तर शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेल्‍या असतात. पण त्‍याबद्दल त्या कुठेच कातावत किंवा करवादत नाहीत. या उलट सुखात, दु:खात, कष्टात, संकटात, वैफल्‍यातही असलेलं काव्यच त्‍यानी टिपलं व त्याची कविता केली. वैधव्यात किंवा आलेल्या दु:खातही आक्रस्ताळेपणा नाही. त्या दु:खाला सामोरं जातानाही त्‍यांचा संयम, सहनशीलता आपल्‍या हृदयाला भिडते. या त्यांच्या अत्यंत साध्या अनलंकृत अशा व्यक्तिमत्वाच्या खुणा त्यांच्या कवितेत जागोजागी आढळतात.

एकदा एका बाईने त्यांना विचारले, ‘तुला एवढे हे ज्ञान शिकवतो कोण ? तुला ही सुचतात तरी कशी ?’

बहिणाईने दिलेले उत्तर पहा – सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त होता हे खरेच.

माझी माय सरसोती, माले शिकविते बोली
लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली ।
माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत
पावसात सामावतं माटीमधी उगवतं

पुढे त्या म्हणतात सूर्यबापा हृदयात येतो आणि मला अरुपाचे रुप दाखवतो. बहिणाईंचा जन्म खानदेशात आसोदे इथे, एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्या वैभवाचे वर्णन करताना त्या म्हणतात-

“बापाजीच्या हायलीत येती शेट-शेतकरी,
दारी खेटरांचा खच, घरी भरली कचेरी”.

गावामधी दबदबा बाप महाजन माझा, त्याचा काटेतोल न्याव जसा गावामधी राजा. आईबद्दलही स्वाभाविक अपरंपार प्रेम आणि माहेराबद्दल जिव्हाळा त्यांच्या शब्दांमधे भरुन राहिला आहे. आईविषयी सांगताना त्या म्हणतात –

मायभीमाई माऊली जशी आंब्याची साऊली
आम्हाईले केलं गार सोता उन्हात तावली

माहेरच्या वाटेवरची लौकी नदी, पायाला चटके देणारं व जीवाची लाही-लाही करणारं ऊन, झाडं-पेडं, दगड-धोंडे त्यांना किती प्रिय वाटतात हे माहेर व माहेरची वाट या कवितेत पहावं. १३व्या वर्षीच लग्न होऊन त्या जळगावच्या चौधरीच्या घरात आल्या. त्या घरातच संसार वाढला, फुलला. सासुरवाशीण म्हणून कष्ट तर होतेच पण त्यातही त्या सासूचं, मोठ्या जावेचं चांगुलपणा लक्षात घेतात. घरातली कामं करतानाही त्या सासुरवाशिणीला सांगतात, डोळ्यातले आंसू पूस, तू गोठ्यातल्या ढोरासारखी राब, उठल्याबरोबर दळण कर, चूल पेटव, पाण्याला जा, सोशिकपणे हे गुपचुप सहन कर, वाद घालू नको. मनात माहेराला आठव आणि गप्प रहा. संसाराचं गाणं गात रहा. दिवसाच्या कामाची सुरुवातच दळणानं करायची. घरोटा (जातं) सगळ्या दुनियेचं पोट भरतं तरी त्याला ‘जातं’ का म्हणायचं असा गमतीचा प्रश्न त्याना पडतो. घरोट्याच्‍या घरघरीतून दुधावानी मऊ पीठ जसं भरभर पडतं तसं त्यांच्या तोंडून पोटातलं गाणं ओठावर येतं असं त्या म्हणतात. दाणे दळून-दळून जातं जसं झिजतं तसं गाणं गाता गाता आयुष्य चाललंय असं त्यांना वाटतं. किती चपखल उदाहरण त्या देतात त्याचं नवल वाटतं.

सासरी कष्ट करताना माहेरच्या आठवणी प्रत्येक बाईच्‍याच हृदयाच्या कुपीत साठवलेल्या असतात. काम करताना बहिणाबाई मुक्तपणे माहेर वरुन रचलेली गाणी म्हणतात. त्या आवाजाने त्रासलेला एक योगी गाणारणीला विचारतो,  ‘काय गं सारखं माहेर माहेर करतेस, आणि गातेस, मगं तू सासरी आलीस तरी कशाला ?’ या प्रश्नाला बहिणाईनी दिलेलं उत्तर किती योग्य आहे बघा –

अरे भागले डोहाये, सांगे शेतातली माटी
गाते माहेराचं गानं, लेक येई येईन रे पोटी
दे रे दे रे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते

नेहमी कष्ट व निरनिराळ्या ताणात असणाऱ्या वासुरवाशिणींना सणासुदीला जरा मोकळेपणा मिळे. खेळ, टिपऱ्या, पिंगा, फुगडी, झोका यात रमण्याचा दिवस वाटे. हा मुक्तपणा त्यांच्या ‘आखजी’ (अक्षय तृतीया) या कवितेत छान प्रगट झाला आहे. त्या म्हणतात,

‘माझा झोका माझा झोका खेयतो वाऱ्यावरी जी’ किंवा
‘गेला झोका गेला झोका चालता माहेराला जी,
आला झोका आला झोका पलट सासरला जी’!

सणाच्या वेळी कोणी पिंगा घालतंय, तर कोणी फुगड्यांचा धांगाडधिंगा घालतायं, टिपऱ्या खेळतंय, गाणी म्हणतयं, हातपाय आंबेपर्यंत मुलींचा, बायकांचा एकच उत्साह आणि आनंद ! सण संपताना वाटणारा थोडासा विषाद व्यक्त करताना त्या म्हणतात – ‘सांग सई सांग सई, आखजी आता कही जी’ हा आनंददायक बदल चार दिवसचं रहाणारा, अल्पकाळ टिकणारा आहे आणि उद्यापासून परत शेतीच्या कामाची रोजच्या कष्टांची सुरुवात आहे हे त्या किती नेमकेपणाने व्यक्त करतात पहा.

शेती हेच शेतकऱ्याचे सर्वस्व. शेतीची साधने, मशागत, कापणी, रगडणी (मळणी) उफळणी, मोट या सर्व गोष्टी त्यांनी काव्य प्रतिमांतून व्यक्त केल्या. पाऊस आला कि शेतकऱ्याला होणारा आनंद त्यांच्या “आला पाऊस” या कवितेतून प्रत्ययकारी रितीने व्यक्त होतो.

‘आला पहिला पाऊस शिपडली सारी भुई,
धरित्रीचा परिमय माझं मन गेलं भरी’.

धुमधडाक्याने ललकारी ठोकत गडगडाट करत येणारा पाऊस आनंदाचीच बरसात करतो. पुढचं हिरवं स्वप्न दाखवतो आणि सुखावतो. पुढे त्याच्या कामांची एकच रांग लागलेली असते. पेरणी, कापणी, रगडणी शेतकऱ्याला उफाहणी होवून पीक घरात येईपर्यंत नुसती कामांची धांदल. या सगळ्या शेतीच्या कामातही बहिणाईंना काव्य दिसते. शेतीची सगळी कामेही त्यांच्या कवितेचा विषय बनतात. त्यातला अस्सल ग्रामीणपणा मनाला फार भावतो. ‘पोथा’ म्हणजे पोळा हा तर बैलाचाच सण. बैलाना आंघोळ घालणे, शिंगाला शेंदूर, घुंगरु लावणे, झूल चढवणे, रेशमाचे गोंडे बांधणे, पायात पैंजण बांधणे, पुरणपोळ्यांचा नैवेद्य हे सारे, ही धांदल ? त्यातला आंनद, सगळं काही त्यांच्या कवितेत सुंदर रितीने व्यक्त झालं आहे.

‘आज पुंजा रे बैलाले फेडा उपकाराचं देनं
बैला खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन !’

किती मोजक्या शब्दात त्या कृषी संस्कृती, अवजारे, आणि बैल जो शेतीचा आत्माच आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात ! शेतात बी रुजवण्यापासून कणसं भरण्यापर्यंत सर्व अवस्था त्या इतक्या प्रेमाने सांगतात कि, ‘देव अजब गारुडी’ ही त्यांची कविता अजरामर आहे. धरित्रीच्या कुशीत बी बियाणं निजली आणि त्यावर धरित्री मातेची मऊ माती पसरली म्हणजे जणू काय ऊबदार शालचं अंगावर घातली. किती लडिवाळपणा त्यांच्या या भाषेत भरलाय त्याचं कौतुक वाटतं. पेरणीनंतर जमिनीतून आलेली रोपे पाहून त्यानी जो आनंद व्यक्त केलाय त्याला तोडचं नाही. ऊनवाऱ्याशी खेळता-खेळता त्या टारारलेल्या कोंबातून दोन पानं हळूच प्रगटतात, टाळ्या वाजवत देवाचं भजन करतात, शेतात रोपांची दाटी होते,  वाऱ्यावर डोलता-डोलता गाडी गाडी दाणे येतात आणि हे करणारा देव म्हणजे गारुडीच म्हटला पाहिजे. निसर्गाची ही विलक्षण जादू त्यांच्या शब्दातून किती समर्पक रितीने व्यक्त होते हे पाहिल्यावर ही बाई निरक्षर कशी म्हणायची असा प्रश्न पडतो. खरचं सरस्वतीचा कृपाप्रसाद त्यांच्यावर होतो हे निर्विवाद. मोटेचं पाणी थारोळ्यात पडलेले पाहून

‘वसांडली मोट करे धो-धो थायन्यान,
हुंदडत पानी जसं तान्हं पाळण्यात.

किती सहज सुंदर उपमा । थंडीमधे चूल लवकर पेटत नाही म्हणून त्या म्हणतात, ‘अरे इस्तवाच्या धन्या कसे तुला आले हीव ?’ किंवा ‘आले वडाच्या झाडाने जसे पोपटाचे पीक’ ही हिरव्यागार वडाची लाल लाल फळे पाहताना सुचलेली उपमा कल्पनेची विलक्षण भरारी दाखवते. ‘खोपा’ कवितेत सुगरिणीने बांधलेल्या घरट्याला पाहून त्यांना तो तिने पिलांसाठी बांधलेला झुलता बंगलाच वाटतो. ती करागिरी विलक्षण वाटते त्यातून त्या माणसाचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्‍हणतात की बघ सुगरिणीकडे फक्‍त इवलीशी चोच तेच तिची दात, ओठ सर्व काही. तुला तर देवाने दोन हात दहा बोटं दिलं असून तू मात्र तक्रार करत बसतोस ! या लहानग्या पक्ष्याकडून जरा शीक. त्‍या म्‍हणतात,

‘‘कोपा इवला इवला जसा गिलक्‍याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा !’’ जीवनात दु:ख, कष्ट हे अटळ आहे. पण त्याचा विचार करुन रडत बोलू नये. कुरकुर करु नये. आपल्‍या परीने ते सुखाचे, चांगले करण्याचाच प्रयत्‍न करावा.

‘संसार’ या सर्वांग सुंदर कवितेत अनेक प्रापंचिक उदाहरणांद्वारे त्यांनी उद्बबोधक संदेश दिला आहे. संसार हा चुल्‍हयावरच्‍या तव्‍यासारखा आहे. हाताला चटके बसल्‍याशिवाय भाकर मिळत नाही. पुढे त्‍या म्‍हणतात संसार खिरा काकडी सारखा, तोंडाजवळ कडू पण बाकी सर्व गोड, किंवा बिब्ब्याच्या गोडांबीचा ठेवा असलेला, किंवा बाजूने काटे पण आत छान सागरगोटे असलेल्या संसाराला कधी खोटं म्‍हणू नये. राऊळाच्‍या कळसाला  कधी लोटा म्‍हणू नये. दु:खाला होकार आणि सुखाला नकार देणारा संसार हा दोन जीवांनी एकत्र एकदिलाने केला पाहिजे. संसाराचे किती वास्‍तव दर्शन बहिणाबाई सहजतेने घडवतात !

‘कशाले काय म्‍हनू नाही’ या गाण्यातून मानवी अपप्रवृत्तींवर त्‍यांनी अचूक बोट ठेवलं आहे. ‘हरी नामाईना बोले त्‍याले तोंड म्हनू नाही’ किंवा

‘नाही ऐके हरीनाम त्‍याने कान म्हनू नाही’’
‘‘आखडला दानासाठी त्‍याले हात म्‍हनू नाही’’.
केली सोताची भरती, त्‍याले पोट म्हनू नाही’,
‘रंके पोट च्‍या पोरीला त्‍याले बाप म्‍हनू नाही’,
‘जन्‍मदात्याले भोवला ‌त्‍याले लेक म्‍हनू नाही’

त्‍यांच्‍या वृत्तीतला स्‍पष्टपणा आणि आजूबाजूच्‍या समाजाचे निरीक्षण इथे अधोरेखित होते.

‘मन’ ही त्‍यांची कविता अतिशय आशयधन आणि सशक्‍त विचारांनी भरलेली आहे. मन चंचल, मोकाट, स्‍वार्थी असं आहे म्‍हणून त्‍या मनाला ‘पिकातलं ढोर’ असं अगदी योग्‍य संबोधन देतात. ते लहरी आहे तसंच जहरीही आहे. क्षणात ते पृथ्वीवर असतं तर दुसऱ्या क्षणाला उंच आभाळात जातं ! मन म्हणजे पाण्यावरच्‍या लाटा, त्‍या थांबवता थोडयाच येणार ? वहाणाऱ्या वाऱ्याला जसं पकडणं कठीण तसंच मनाला थांबवणं केवळ अशक्‍य ! मन केवढं तर खसखशीच्या दाण्याएवढं पण मोठं इतकं की आभाळात मावणं ही तितकंच कठीण ! साप-विंचूच वीष निदान मंत्रामंत्राने उतरवता येत पण मनाचं तंत्र काही औरच इतकं ते जहरी ! असं मन घडवणं किती अवघड असेल. जागेपणीच्‍या स्‍वप्‍नातच तर हे विलक्षण मन देवानी घडवलं नसेलना वा जसं त्‍या म्‍हणतात आजूबाजूच्‍या अनेक माणसांवरही त्‍यांनी कविता केल्‍या आहेत. उदा. अप्पामहाराज, गावात आलेली पंढरीची दिंडी, खोकली माय, गोसाई, रायरंग (बहुरुपी), जयरामनु इतकंच काय नानाजींचा छापखाना, भूताची हवेली, महारवाडा प्‍लेगची साथ, दारुची भट्टी, त्‍यापैकी काही. सूक्ष्म नजरेने सर्व काही टिपणं ही त्‍यांची दृष्टीच यातून दिसते. वयाच्‍या तिशीतच त्‍यांच्‍या पतीचे निधन झाले आणि दोन मुलांची जबाबदारी त्‍यांच्‍यावर पडली ‘लपे करमाची रेखा’ आता माझा माले जीव’ ही गाणी वैधव्‍याची अवस्‍था सांगणारी आहेत. धरती मातेलाच त्‍या विचारतात’ अशी कशी जादू झाली,

‘झाडं गेलं निंधीसनी मागे उरली सावली’
‘आसू सरले सरले आता हुंदके उरले’
‘आसू सरले सरले माझा मलेच इसावा’

त्‍यांचं त्‍यांनाच सावरायचं आहे. २ मुलांची जबाबदारी आहे. पण त्‍यातही त्‍यांचा कणखरपणा कास दिसतो बघा. त्‍या सांत्‍वनाला आलेल्‍या बायाबापडयांना म्‍हणतात. माझी कीव करु नका माझं मलाच सावरुन परिस्‍थीला तोंड द्यायचं आहे. ‘बांगडया जरी फुटल्‍या तरी ‘मनगटातलं करतूत’ शाबूत आहे. मंगमसूत्र तुटलं तरी गळयाची शपथ माझा सोबत आहे. आपल्‍या दु:खी जीवाला त्‍या समजतात की, सारखं रडू नको, तुला रडण्याचीच सवय आहे. जरा हास, त्‍यातून बाहेर ये त्‍यातच संसाराची चव आहे. ‘राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागनं, त्‍यात आले रे नशीब काय सांगे पंचागन’(पंचांग). म्‍हणून त्‍या ज्‍योतिष्यालाच म्‍हणतात’ नको नको रे जोतिषा, नको हात माझा पाहू. माझं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ’‘. लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्‍या खाली, पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली’ हे सत्‍य एकदा स्‍वीकारल्‍यानंतर हातावरच्‍या रेघोटया नऊ ग्रह त्‍यांचं भविष्य वर्तवणारा जोतिषी, पंचांग इ. गोष्टी निरर्थक आहेत. ही कटु जाणीव त्‍यांना होती. सौभाग्‍य लेण्यांपेक्षाही वैधव्याच्या कठोर जाणीवेनेच त्‍यांना जगण्याचं बळ दिलं. त्‍या म्‍हणतात.

‘नही सरलं सरलं जीवा तुझं येणं जानं,
जसा घडलस मुक्काम त्‍याला म्‍हणती रे जीनं.
‘आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर,
अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर’,

म्‍हणून त्‍या पुढे म्‍हणतात- ‘जग, जग माझ्या जीवा असं  जगणं तोलाचं, उच्‍च गगनासारखं धारित्रीच्‍या रे मोलाचं’

बहिणाबाईंच्‍या सहजसुंदर, पण अर्थपूर्ण आशयधन ओव्‍यांनी मराठी मनाला भुरळ घातली हे नि:संशय ! जळगावचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आता ‘कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ’ या नावाने ओळखलं जाणार आहे असं जाहीर झालं. या सरस्‍वतीच्‍या लेकीच्‍या हया परता दुमत गौरव काय असू शकतो?

— उषा शशीकांत जोशी

लेखकाचे नाव :
USHA SHASHIKANT JOSHI- (E MAIL ADDRESS PROVIDED BELOW IS HER SISTER- VASANTI ANIL GOKHALE
लेखकाचा ई-मेल :
vasananil2018@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..