नवीन लेखन...

पंछी को उड जाना है ! (नशायात्रा – भाग ३८)

त्या पोलीस चोकीत लगेच रेल्वे स्टेशन च्या बाहेरील स्टँडवरचे माझे आँटोचालक मित्र गोळा झाले आमचा मित्र विलास पाटील तेथेच हॉटेल ‘ मराठा ‘ मध्ये बसलेला होता त्यालाही समजले , तो देखील चौकीत आला . सगळे जण नेमके काय झाले हे विचारात होते व त्या पोलिसांना जाऊ द्या सोडून द्या म्हणत होते पण पोलिसांनी सांगितले याला मुख्य पोलीस स्टेशनला साहेबांसमोर हजर करायचे आहे आम्हाला . पोलिसांनी मग तेथून रिक्षा करून मला नाशिक रोड पोलीस स्टेशन ला आणले आणि साहेबांसमोर उभे केले , साहेब नेमके कोठेतरी बाहेर निघाले होते म्हणून त्यांनी मला बसवून ठेवायला सांगितले …मला आता परत टर्की सुरु झाली होती , सकाळी भाऊ कामावर जाईल व नंतर पैसे मिळतील या आशेवर मी होतो तो पर्यंत फारसा त्रास जाणवला नव्हता पण आता आपल्याला अजिबात ब्राऊन शुगर मिळणे शक्य नाही हे लक्ष्यात आले तव्हा त्रास जास्त जाणवू लागला…

मला सारख्या जांभया आणि शिंका येत होत्या . तेथील पोलीस मला कुतूहलाने ब्राऊन शुगर कशी असते वगैरे प्रश्न विचारात होते ( मुंबई , नाशिक , पुणे या पट्ट्यात ब्राऊन शुगर चे आगमन व विक्री साधारणतः १९८० साली सुरु झाली होती , ही घटना ८४ सालची , अनेक पोलिसांना ब्राऊन शुगर म्हणजे नेमके काय हे देखील माहित नसे , काहीना गांजासदृश काहीतरी असावे असे वाटत होते , नंतर मग NDPS अँक्ट आल्यावर पोलिसांना खास ब्राऊन शुगर बाबत केसेस कश्या करायच्या याचे प्रशिक्षण दिले गेले , व त्यांना माहित झाले की हा प्रकार काय आहे ते ) मला साहेबांच्या ऑफिस मधून दुसऱ्या खोलीत जेथे पोलिसांचे लिखापढीचे काम चालते त्या ठिकाणी नेण्यात आले आणि एका कोपर्यात भिंतीला टेकून खाली बसायला सांगितले गेले , माझी हालत टर्की ने खराब होत होती . अश्या वेळी स्मोकिंग केल्याने जरा दिलासा मिळतो पण माझ्या खिशात बिड्या देखील नव्हत्या , स्वतच्या नशिबाला दोष देत मी गुढघ्याभोवती हात बांधून विमनस्क बसलो होतो . तेथे माझे वडील आणि मोठा भाऊ ही मग येऊन पोचला , मी त्यांना आता असे करणार नाही मला सोडायला सांगा म्हणून आग्रह करू लागलो तर एका हवालदाराने मला दटावले व ‘ चूप बस ‘ असे ओरडला . पुन्हा मी गरीब चेहरा करून करुण डोळ्यांनी त्यांच्या कडे पाहत बसून राहिलो ..

त्याच वेळी नाशिकरोड शिवसेना अध्यक्ष श्री . प्रभाकर कर्डिले . त्याच्या काही कामानिमित्त आले होते ( आमच्या सिन्नरफाटा ‘ शिवसेना ‘ शाखेचे उद्घाटन ते आणि साबीर शेख यांच्या हस्ते झाले होते व येथील शाखेचा सेक्रेटरी म्हणून ते मला ओळखत होते ., एकदोन वेळा काही कामानिमित त्यांच्या कडे गेलोही होतो मी ) मला तेथे असा बसलेला पाहून त्यांनी शिपायांना काय भानगड आहे ते विचारले तेव्हा त्यांना पोलिसांनी मी काल पासून केलेल्या तमाशाची माहिती दिली , ते माझ्या जवळ येऊन म्हणाले ‘ काय रे , तू शिवसैनिक आहेस ना , आणि असली व्यसने करतोस , हे तुला शोभत नाही ” मी मान खाली घातली मग म्हणाले ‘ जाऊ दे ! घाबरू नकोस , तुला कोणी मारणार नाही इथे , सोडून देतील जरा वेळाने , नंतर भेट मला येऊन ” आणि ते निघून गेले . भाऊ आणि वडील तेथील मुख्य हवालदाराशी काहीतरी बोलले त्यावर त्याने मान हलवली आणि ते देखील निघून गेले हे सर्व घडेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते ..

त्या ऑफिसात आता फक्त चार हवालदार आपापल्या टेबलवर काम करत बसलेले होते आणि ड्युटीवरील बाकी तीनचार पोलीस बाकावर गप्पा मरत बसले होते , गप्पा मारता मारता त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला व माझी विचारपूस करू लागले , ब्राऊन शुगर कुठे मिळते ? , कशी दिसते , कशी पितात , किती रुपयाला ? वगैरे कुतुहलाचे प्रश्न होते ते मला त्यांच्याशी बोलणे जीवावर आले होते पण उत्तरे दिल्यावाचून इलाज नव्हता तसेच असेच बोलता बोलता जर त्यांच्याकडून मला बिड्या काढता आल्या असत्या तर हवेच होते , अधून मधून बाहेर ड्युटी करणारे किवा पेट्रोलिंग करणारे पोलीस जेव्हा ऑफिस मध्ये येत तेव्हा माझ्या कडे पाहून नवीन केस कोणती याची चौकशी करत , काही जण तर डायरेक्ट चौकशी न करता एकदम ‘ काय रे , भडव्या .. तूच ना तो पर्वा दरोडा घातलेला , सांग अजून तुझे साथीदार कोठे आहेत , किवा तूला १ वर्षापूर्वी मी पकडले होते ना रे चोरीच्या केस मध्ये ‘ असे म्हणत ( नंतर मला समजले की पोलीस गुन्हेगारावर मानसिक दबाव आणून त्याने सर्व कबुली द्यावी यासाठी असे त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याच्याशी बोलतात व त्याला घाबरवतात , न केलेले गुन्हे देखील अंगावर टाकतील या भीतीने काही नवखे गुन्हेगार मग लगेच केलेले गुन्हे कबुल करुन टाकतात )

तेथे एका हवालदाराने जेव्हा बिडी काढून पेटवली तेव्हा लगेच मी त्याच्याकडे बिडी मागू लागलो या वर तो म्हणाला ‘ अरे , माझा मुलगा तुझ्या इतका आहे , तुला लाज वाटत नाही का माझ्याकडे बिडी मागायला ‘ साधारणतः तो हवालदार माझ्या वडिलांच्याच वयाचा होता , झुबकेदार मिशा , केसात चंदेरी छटा , मी खूप गयावया केल्यावर त्याला माझी दया आली व त्याने एक बिडी दिली मला मग माझी चौकशी करू लागला तू कोणत्या वर्गात शिकतोस ? कोणत्या कॉलेजला आहेस ? वगैरे , मी त्याला बिटको कॉलेजला आहे असे सांगितल्यावर तो जरा चपापला म्हणाला , माझा मुलगा पण याच कॉलेजला आहे आणि तो पण शेवटच्या वर्षाला आहे , मी त्याला मुलाचे नाव विचारले तर त्याने सांगितलेले नाव माझ्या चांगलेच ओळखीचे होते , म्हणजे त्याचा मुलगा आमच्या सोबत ‘ सटाणा ‘ युवक महोत्सवात समूहनृत्याच्या समूहात होता . आम्ही चांगले ओळखत होतो एकमेकांना . मग म्हणाला ‘ ओळखतोस का माझ्या मुलाला ? त्याला काही व्यसन नाही ना तुझ्यासारखे ? . त्या हवालदाराचा मुलगा कधीतरी स्मोकिंग करत असे फक्त, ते मला माहित होते पण मी ते सांगितले नाही व म्हणालो नाही साहेब ओळखतो मी त्याला खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे तुमचा , यावर तो मिशीत हसला व खुश झाला…

असाच तासभर गेला मला उलटी होईल अशी मळमळ सुरु झाली होती टर्कीमुळे , मी त्याला तसे सांगताच मला हात धरून त्याने बाहेर पटांगणात कोप -यात नेले मी तिथे उलटी केली , पोटातील सगळे पित्त बाहेर पडले , एकदम थकल्यासारखा मी खाली बसलो तेव्हा त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ,घोटभर पाणी पिऊन पुन्हा मी आत ऑफिस मध्ये आलो , माझी अवस्था पाहून त्याला दया येत होती , मला तो ‘ व्यसने चांगली नसतात , असे वागू नये वगैरे समजावू लागला , ‘ मी त्याला जेव्हा विचारले की मला केव्हा सोडणार तेव्हा म्हणाला ‘ पाहू साहेब आल्यावर काय ते पण तुला दोन तीन दिवस तरी डांबून ठेवावे असे तुझ्या घरच्या लोकांचे म्हणणे आहे ‘ ‘ माझ्यावर कोणती केस केली’ असे विचारले तर हसला म्हणाला ‘ कसली केस न काय , केस केली तर पुढे तुला नोकरी मिळेल का ? काही केस नाहीय फक्त असेच तुला अद्दल घडावी म्हणून तुझ्या भावाने साहेबाना विनंती करून दोन चार दिवस अडकवण्यास सांगितले आहे ‘ . मी थोडा निश्चिंत झाले तेव्हा , त्यांनी मला एकदम कोठडीत न टाकता ऑफिस मध्ये बसवले तेव्हाच मला अंदाज आला होता की केस वगैरे केली नाहीय ते ..

मला आता पोटात एकदम ढवळून आले जोराची संडास आली ( ही सगळी टर्की ची लक्षणे असतात ) मी त्याला तसे म्हणालो तेव्हा म्हणाला चल माझ्या सोबत व त्याने मला त्या बैठ्या इमारतीच्या डाव्या बाजूला पटांगणात असलेल्या कोपर्यात नेले तेथे चार संडास होते आजूबाजूला वाळक्या पानांचा वगैरे खूप कचरा होता तेथे जाण्यास सांगितले व तो माझ्या पासून साधारण १० फुट अंतरावर उभा राहिला मी आजूबाजूचे निरीक्षण केले संडासच्या मागे २० फुट अंतरावर तारेचे कुंपण होते तेथून बाहेर रस्ता आणि त्या पलीकडे मेनगेटची क्वार्टर्स होती ( मेनगेट क्वार्टर्स म्हणजे प्रेस मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या साठी बनवलेली सरकारी वसाहत आता ती सगळी घरे पाडण्यात आली आहेत ) मी संडास मध्ये जाऊन जोरात दार लावले , आधी पटकन माझे काम उरकले आणि मग हळूच आवाज न करता दाराची कडी काढून बाहेर डोकावून पहिले तर तो हवालदार संडासकडे पाठ करून पोलीस स्टेशनच्या दिशेला पाहत उभा होता ही चांगली संधी होती ,..

मी ताबडतोब चपला तिथेच सोडल्या व दबकत संडासच्या मागील बाजूला पोचलो आणि तारेच्या कुंपणांकडे धूम ठोकली साधारण आठदहा पावले नीट पडली आणि नंतर एकदम जाणवले पाय चिखलात रुतल्या सारखे रुतत आहेत खाली लक्ष गेले तर एकदम ओकारी सारखे झाले , खाली त्या संडास मधून बाहेर पडलेला मैला साचला होता काही वाळलेला तर काही ओला , माझे पाय साधारणतः पोटऱ्या पर्यंत त्यात भरले होते एकदम दुर्गंधी आली तरी मागे न पाहता तसाच नेटाने ते तुडवत कुंपणा जवळ गेलो आणि कुंपणाची तार हाताने वर उचलून तारेखालून बाहेर रस्त्यावर आलो पळत सुटलो मेनगेट क्वार्टर्सकडे . बाहेर कोठेतरी बहुतेक सत्यनारायण पूजा सुरु असावी तेथे लाउडस्पीकर वर सुरु असलेले कालिया सिनेमाचे गाणे लागले होते ‘ कौन किसी को रोक सका , सैयाद तो एक दिवाना है , तोड कें पिंजरा , देखना एक दिन ..पंछी को उड जाना है ! .’ पळताना ते गाणे कानात शिरत होते आणि मी अजून वेग पकडल…

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..