नवीन लेखन...

नांदी स्वर सोहळ्याची

‘स्व र-मंच’तर्फे पहिला जाहीर कार्यक्रम संगीतबद्ध करण्याची विनंती मी प्रभाकर पंडितांना केली आणि त्यांनी आनंदाने ती मान्य केली. संपूर्ण तीन तासांचा कार्यक्रम मला सादर करायचा होता, पण प्रभाकरजींनी मला सल्ला दिला की, पहिला कार्यक्रम मी काही मान्यवर कलाकारांबरोबर सादर करावा, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. त्यांचा सल्ला मला पटला. मराठी अभंगांच्या या कार्यक्रमात रंजना पेठे-जोगळेकर आणि मी मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतर मान्यवर गायक प्रभाकर कारेकर गातील असे ठरले. कार्यक्रमाच्या निवेदनासाठी मी शंकर वैद्यांना गळ घातली. २ जून १९८६ ही गडकरी रंगायतनची तारीख मला मिळाली आणि कार्यक्रमाच्या रिहल्सल दादरला सुरू झाल्या. हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम असल्याने मी उत्साहात होतो. पण ते तसे व्हायचे नव्हते. मी आजारी पडलो आणि मला कावीळ झाली. डॉक्टरांनी किमान दीड महिने विश्रांतीचा सल्ला दिला. आता रंगायतनची तारीख बदलून घ्यावी लागणार होती आणि हे काम बिलकूल सोपे नव्हते. माझी स्वर-मंच ही नवीन कंपनी असून मोठ्या कष्टाने मला तारीख मिळाली होती. त्यावेळचे रंगायतनचे व्यवस्थापक श्री. अभय पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांना माझ्या धडपडीचे कौतुक वाटले असेल कदाचित, पण त्यांनी तारीख बदलून दिली. माझी नवीन तारीख होती १३ ऑगस्ट १९८६. कार्यक्रमातील सर्व कलाकारांच्या तारखा बदलून घ्याव्या लागल्या.

एकंदरीत पहिल्या कार्यक्रमातच मी अनेक गोष्टी शिकलो. आता कार्यक्रमाच्या खर्चासाठी पैसे उभे करायचे होते. माझ्या पगाराचे काही पैसे माझ्याकडे होते. पण तिकीटविक्री हाच एक उत्पन्नाचा मार्ग आमच्या जवळ होता. माझ्या अनेक मित्रांनी मदत केली. अगदी घरोघरी जाऊन आम्ही तिकिटे विकली. रंगायतनचा प्लॅन ११०० तिकीटांचा होता. त्यातील सुमारे ६०० तिकीटे आम्ही विकली. माझ्या इतकाच उत्साह माझ्या आई-वडिलांचा होता. त्यांनी भक्कम पाठिंबा दिला होता, म्हणूनच मी हे अवघड काम करू शकत होतो. कार्यक्रमाच्या रिहल्सल पुन्हा सुरू केल्या. आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याआधी जवळ जवळ एक महिना वर्तमानपत्रातील कार्यक्रमांच्या जाहिरातींचा अभ्यास करीत होतो. त्यांचे दर काढले होते. त्या सर्व अभ्यासाचा उपयोग जाहिरात देताना झाला. तेव्हा समजले की गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यासाठी गाण्याबरोबरच आणखी चाळीस गोष्टी याव्या लागतात. मदत करणारे हात अनेक असतात, पण निर्णय स्वतःला घ्यावे लागतात आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम स्वतः भोगायचे असतात.

कार्यक्रमाचा दिवस उजाडला. त्या दिवशी मला कार्यक्रमात गायचे असल्याने कमीत कमी बोलण्याचा सल्ला श्रीकांत ठाकरेसाहेबांनी दिला होता. त्यामुळे तोंडाने कमी बोलत मला सगळी कामे उरकावी लागत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा पाऊस होता. पण उपस्थिती चांगली होती. मंदिरात जाऊन मी श्रीदत्तगुरूंचे आणि श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादानेच ‘देवाचिये द्वारी’ हा तीन तासांचा मराठी अभंगाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये वेळेवर सुरू झाला. स्वर-मंच या माझ्या कंपनीतर्फे माझा हा पहिलावहिला जाहीर कार्यक्रम! थोडेसे दडपण माझ्यावर होतेच, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साह होता. माझे गुरु पं. विनायकराव काळे मला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. आ. बुवा हेही उपस्थित होते. शंकर वैद्यांनी कार्यक्रमाचे निवेदन अत्यंत परिणामकारक केले. रंजना पेठे ही तेव्हा खूपच लोकप्रिय गायिका होती. “तू नवीन असलास तरी घाबरू नकोस. आत्मविश्वासाने गा. मी तुझ्याबरोबर आहेच.” या शब्दांनी रंजनाने माझा उत्साह वाढवला. मग मध्यंतरापर्यंत आम्ही दोघांनी दहा अभंग सादर केले. मध्यंतर झाला आणि मला हायसे वाटले. कारण या पुढील कार्यक्रम प्रभाकर कारेकर सादर करणार होते. त्यामुळे आता मला गायचे नव्हते. त्यामुळे इतर कामांना मी सुरवात केली.

मध्यंतरानंतर प्रभाकर कारेकरांनी आपल्या कसलेल्या आवाजात अनेक अभंग सादर केले आणि माझा पहिला जाहीर कार्यक्रम संपला. सर्व कलाकारांचे मी आभार मानले. इतर कामे संपवली आणि रात्री दोनच्या सुमारास घरी पोहोचलो. अतिशय दमल्यामुळे काही मिनिटातच मला झोप लागली. हाती घेतलेले एक अवघड काम केल्याचा आनंद देणारी ती एक कृतार्थ झोप होती.

या कार्यक्रमाला अनेक पत्रकारांना मी निमंत्रित केले होते. त्यामुळे काही दिवसातच अनेक वर्तमानपत्रांतून या कार्यक्रमाबद्दल लेख आले. बहुतेकांनी पहिल्या कार्यक्रमाबद्दल माझे कौतुक केले होते आणि काही सूचनाही केल्या होत्या. एका वर्तमानपत्राने गाणे गाताना माझा फोटो छापला होता. वर्तमानपत्रात आलेला माझा पहिला फोटो. या छोट्या गोष्टींनी मला भरपूर आनंद दिला. मी इतका खूष झालो होतो की केवळ या फोटोबद्दल मी मित्रांना पार्टी दिली.

– अनिरुद्ध जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..