नवीन लेखन...

रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती

रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचा जन्म १५ सप्टेंबर १८९०

आजतागायत- म्हणजे मृत्यूनंतरही एव्हढी वर्षे लोकप्रियतेत खंड न पडलेल्या या लेखिकेला आजवर अनेक समीक्षकांनी ‘अभिजात’ ठरवले आहे.

गुन्ह्याचा शोध लागला आणि गुन्हेगारावर कारवाई झाली की पोलीस जसे फाईल बंद करतात तसेच रहस्याचा उलगडा झाला की वाचक पुस्तकाचे वाचन थांबवतात. ही रहस्यवाङ्मयाची अंगभूत मर्यादा असूनही त्यात विविध प्रकारे अभिजातता आणण्याचे प्रयत्न ज्या लेखकांनी केले, त्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे अगाथा ख्रिस्ती.. ‘डचेस ऑफ डेथ’, क्वीन ऑफ क्राइम, रहस्यसम्राज्ञी!

अगाथा ख्रिस्तीच्या अनुभूतिविश्वाच्या विस्तारित कक्षा तिच्या कथा-कादंबऱ्या वाचल्यावर जाणवत राहतात. या कादंबऱ्यांतील स्थळ-वैविध्यही लक्षणीय आहे. ‘डेथ ऑन दि नाइल’चे कथानक नाइल नदीवरील एका महाकाय आगबोटीवर घडते. ‘डेथ कम्स अॅकज दि एण्ड’मध्ये अगाथाने चार हजार वर्षांपूर्वीचा इजिप्त रंगवला आहे. इमॅन्होटेप या पुरातन थडग्याची व्यवस्था पाहणाऱ्या पुजाऱ्याच्या एकत्र कुटुंबाची कथा येथे अतिशय प्रभावीपणे साकार झाली आहे. ‘मिरर क्रॅक्ड फ्रॉम साइड टु साइड’मध्ये प्रसिद्धीच्या प्रकाशझोताने उजळलेल्या एका धनाढय़ अभिनेत्रीच्या व्यक्तिगत जीवनातील निराशा अगाथाने रंगविली आहे. तीन वेळा घटस्फोट घेतलेली ही अभिनेत्री केवळ नाइलाजापोटी आपल्या विद्यमान पतीबरोबर संसार करते आहे. आपला पती बाहेरख्याली आहे, हे तिला माहीत आहे. या अभिनेत्रीला मुलांची आवड होती, पण जंतुसंसर्गामुळे तिचे मूल अपंग जन्मले. आपल्या दु:खाला कारणीभूत असलेल्यांचा बदला घेण्याचा ती निर्णय घेते; पण प्रत्यक्षात बळी पडतो तिचाच! ‘मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस’ या कादंबरीत एका कुटुंबाने आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या सूडासाठी वर्षांनुवर्षे आखलेल्या कटाची कहाणी अगाथाने शब्दबद्ध केली आहे. अंतर्मनाच्या पोकळीत खदखदणारा रागद्वेषाचा लाव्हारस किती प्रलयंकारी असू शकतो, हे या कादंबरीत दिसते. ही कादंबरी वाचताना उत्कंठा वाढते, पण रक्त तापत नाही. कारण वाचकांना चक्रावून टाकणारा घटनांचा क्रम आणि नंतर त्यावरचे भाष्य अशी या कादंबरीची रचना असल्याने तर्कशक्ती उत्कंठेबरोबरच धावू लागते. तिने नाटकेही लिहिली, त्यापैकी ‘माउस ट्रॅप’ हे लंडनच्या रंगभूमीवर सलग सर्वाधिक काळ (आजही) चालणारे नाटक आहे.

अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर दहा वर्षांनी दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने अगाथाला कळविले की, ‘या विषाच्या लक्षणाबद्दल कादंबरीत तुम्ही एवढे सूक्ष्म वर्णन केले होते की, एका माणसाला विषप्रयोग झाल्याचे मला वेळीच समजले आणि मी त्याचा जीव वाचवला.’ अगाथाचा विषविद्येचा अभ्यास गाढा होताच.

गुंतागुंतीचे कथानक या रहस्यवर्धक गुणाइतकेच, चांगल्या ललित लेखकाच्या अंगचे इतर गुणही तिच्यात होते. आपल्या कथा- कादंबऱ्यांतून तिने माणसांचे जे वैविध्यपूर्ण जग निर्माण केले आहे, ते वाचकांना थक्क करून सोडते. त्यात मेजवान्यांची व नृत्यांची वर्णने आहेत. विविध भूप्रदेशातील निसर्गसौंदर्य तसेच भयप्रद वातावरणाचे चित्रणही आहे. या कादंबऱ्यांत देशोदेशीचे खाणेपिणे, पोषाख, रीतीरिवाज, नाना प्रकारचे खेळ आणि श्रीमंत विलासी जीवनाचे तपशील आहेत. त्याचबरोबर शेक्सपिअरपासून टी. एस. इलियटपर्यंतच्या अनेक श्रेष्ठ लेखकांच्या लेखनातील अर्थपूर्ण संदर्भ आहेत. त्यामुळे अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांना अभिजात साहित्यमूल्य प्राप्त होते. त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. पैकी एक म्हणजे ‘डेथ ऑन दि नाइल’ ही कादंबरी. या कादंबरीत हरक्युल पॉरो जे शेवटचे वाक्य उच्चारतो, तो मोलिअरच्या नाटकातील संवाद आहे- ‘प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील ‘प्रेम करणे’ हीच सर्वोत्तम आणि एकमेव महत्त्वाकांक्षा असते.’ हे वाक्य वाचल्यावर नाइल नदीतून प्रवास करणाऱ्या बोटीवर घडलेले ते पाच खून वाचकांना आठवत नाहीत, तर हे जीवनभाष्यच आठवते. कादंबरीच्या अखेरीस तेच मनावर ठसते.

अगाथा ख्रिस्तीच्या दीर्घकालीन यशाचे रहस्य हेही आहे की, रहस्याचा उलगडा झाल्यावरही तिच्या कथा-कादंबऱ्या पुन:पुन्हा वाचाव्याशा वाटतात, त्या तिच्या सुंदर लेखनशैलीसाठी आणि मनोविश्लेषणाच्या कसबासाठी. प्रत्येक सभ्य माणसात एक गुन्हेगार दडलेला असतो आणि सकृतदर्शनी निरुपद्रवी अशा जाणिवेच्या पृष्ठभागाखाली माणसाच्या अंतर्मनात अनेक परस्परविरोधी घटकांचा एकमेकांशी संघर्ष चालू असते. अर्थप्रेरणा आणि कामप्रेरणेमुळे तेथे विचित्र गंड निर्माण होतात आणि माणसाची नियती त्याला अनाकलनीयपणे खेळवीत असते. हे सर्व अभिजात साहित्यातून प्रत्ययास येणारे लेखनविशेष अगाथाच्या रहस्यमय लेखनातूनही आढळतात.

लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच अगाथाच्या आयुष्यात एक वादळ आले. तिचा पती आर्चिबाल्ड हा ट्रिसा नील या तरुणीच्या प्रेमात पडला होता. हे समजल्यावर तिचे मानसिक संतुलन ढळले आणि घर सोडून ती अज्ञातवासात गेली. दहा दिवसांनंतर अगाथा पोलिसांना सापडली, तेव्हा ती भग्नमनस्क अवस्थेत होती. पतीने तिला घटस्फोट दिला होता आणि मुलीची जबाबदारी तिच्यावर आली होती. मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करवून घेतल्यावर ती पुन्हा माणसात आली आणि लेखन करू लागली. १९३० मध्ये अगाथाने आपल्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या मॅक्स मेलावेन या पुरातत्त्व शास्त्रज्ञाशी विवाह केला. नंतर मात्र तिचे उर्वरित आयुष्य सरळ रेषेत गेले.

अगाथाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, तिच्या आयुष्यात अनेक संकटे आली, मनस्तापाचे प्रसंग आले; पण तिने लेखनव्रताचा त्याग केला नाही. गुलाबाची लालभडक फुले पाहिली की, अगाथाची प्रतिभा जागृत होई आणि मग ती घडय़ाळालाही मागे टाकणाऱ्या वेगाने लेखन करू लागे. वयाची ऐंशी वर्षे पार केल्यावरही अगाथा लेखनमग्न होती. अर्थात वयोमानानुसार तिचा लेखनवेग मंदावला होता, ही बाब वेगळी! आपल्या वाचकांना दरवर्षी नाताळच्या दिवसांत वाचण्यासाठी नवी कादंबरी देण्याचा अगाथाचा क्रम होता. १९७५च्या नाताळमध्ये तिची ‘कर्टन’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि वाचकांत खळबळ उडाली. कारण हरक्युल पॉरो ही अतिशय वाचकप्रिय व्यक्तिरेखा मरण पावल्याचे अगाथाने या कादंबरीत दाखविले होते. हरक्युल पॉरोचा मृत्यू हा वाचकांच्या चर्चेचा आणि वृत्तपत्रांच्या बातमीचा विषय झाला. एखाद्या खरोखरच अस्तित्वात असलेल्या अतिप्रसिद्ध व्यक्तीच्या मृत्यूची बातमी छापावी तशी हरक्युल पॉरोच्या निधनाची वार्ता ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने पहिल्या पानावर शीर्षभागी काल्पनिक छायाचित्रासह प्रसिद्ध केली होती.

अगाथा ख्रिस्ती यांचे १२ जानेवारी १९७६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4184 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..