नवीन लेखन...

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ६

Modern American Agriculture and Animal Farming - Part-6

अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे:

– गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे कमी गायींपासून अधिक दूध उत्पादन शक्य झालं आहे.
– डेअरी फार्मस्‌चा वाढत चाललेला आकार आणि त्याचबरोबर त्यांची घटत जाणारी संख्या.

२००८ साली अमेरिकन शेती व्यवसायामधे डेअरी उद्योगाचा हिस्सा होता १२%. अमेरिकेतल्या एकूण दुधाळ गायींची संख्या होती ९ दशलक्ष आणि प्रत्येक गायीचे वर्षाला सरासरी दुध उत्पादन होते २३,४०० पाउंड. नुसता गेल्या १० वर्षांचा आढावा घेतला तरी १९९९ साली अमेरिकेत सुमारे ९७,००० डेअरी फार्म्स होते तर २००८ साली डेअरी फार्म्सची संख्या घटून ६७,००० झाली होती. थोडक्यात या दहा वर्षात अमेरिकेतले ३०,००० डेअरी फार्म्स बंद झाले. या दहा वर्षात छोट्या (१ते९९गायी असलेले फार्म्स), मध्यम (१०० ते २०० गायी असलेले फार्म्स), मोठ्या-मध्यम (२०० ते ५०० गायी असलेले फार्म्स) आणि मोठ्या (५०० पेक्षा अधिक गायी असलेले फार्म्स) फार्म्सच्या संख्येत झालेले बदल लक्षात घेण्यासारखे आहेत. या दहा वर्षात बंद झालेल्या ३०,००० फार्म्सपैकी २५,००० फार्म्स हे छोटे होते. या काळात मध्यम आकारांच्या फार्म्सची संख्या ४,५०० ने घटली तर मोठ्या-मध्यम फार्म्सची संख्या १,२०० ने घटली परंतु याच कालावधीमधे मोठ्या आकाराच्या फार्म्सची संख्या मात्र ८०० ने वाढली.

२००८ सालच्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतल्या डेअरी फार्म्सवरील गायींची सर्वसाधारण संख्या होती १६३, परंतु देशाच्या विविध भागातील निरनिराळ्या राज्यांमधल्या डेअरी फार्म्सवरील, गायींच्या सर्वसाधारण संख्येतील तफावत नजरेत भरण्यासारखी होती. डेअरीचा पूर्वापार बालेकिल्ला समजला जाणारी राज्ये म्हणजे नॉर्थईस्टमधली न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, न्यू हॅम्पशायर, व्हर्मांट, कनेक्टिकट, मॅसेच्यूसेट्स आणि अप्पर मिडवेस्टमधली विस्कॉनसीन, मिनेसोटा, मिशीगन, इंडियाना, ओहायो आणि इलिनॉय. या राज्यांमधले फार्म्स देखील घरगुती आणि छोटेखानी (साधारणपणे ५० किंवा कमी गायी असणारे) परंतु गेली काही दशके, पश्चिमेकडची काही राज्ये मोठ्या जोमाने डेअरी व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या देखील डेअरी उद्योगाचे माहेरघर आता पारंपारिक राज्यांकडून सरकून पश्चिमेकडच्या मोठ्या राज्यांमधे स्थिरावू लागले आहे. या पश्चिमेकडल्या राज्यांमधे डेअरी फार्म्स हे इसापाच्या गोष्टीमधल्या बेडकीच्या पोटासारखे वाढतच चालले आहेत. सर्वात मोठे डेअरी फार्म्स असलेली राज्ये आणि त्यातल्या फार्म्सवर असलेल्या गायींची सरासरी संख्या अशी- (कोलोरॅडो – ९१४ गायी, कॅलिफोर्नीया – ९६८ गायी, नेवाडा – १०८० गायी, अ‍ॅरिझोना – १५५० गायी आणि न्यू मेक्सिको – २११३ गायी)

पूर्वापार चालत आलेल्या डेअरी प्रधान राज्यांतली परिस्थिती म्हणजे लांबच लांब आणि कडकडीत हिवाळा, मुबलक पाणी, चारा, धान्य आणि छोटे छोटे घरगुती फार्म्स. त्यादृष्टीने पाहिलं तर पश्चिमेकडच्या नव्याने डेअरी प्रधान होत असलेल्या राज्यांमधे ह्याच्यापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी परिस्थिती. बर्‍याच ठिकाणी डोंगराळ, रखरखीत, वाळवंटी प्रदेश. पाण्याची कमतरता, भरपूर उन्हाळा. एकंदरीत पहाता दुधाळ गायींच्या दृष्टीने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती. परंतु या राज्यांमधल्या या नव्या मोठमोठ्या डेअरी फार्म्सनी, पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारून, भरमसाठ पैसा ओतून, या गायींना आरामदायी होतील असे सुविधापूर्ण अद्ययावत फार्म्स बांधले आहेत. त्यामुळे एका बाजूला नैसर्गिक अनुकुलता आणि घरगुती व्यवसाय तर दुसरीकडे पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन आणि पैशाच्या जोरावर नैसर्गिक प्रतिकूलतेवर मात करून घडवून आलेले बदल, अशी ही चढाओढ आहे आणि त्यात पश्चिमेकडील राज्ये बाजी मारत आहेत.

१९९२ मधे अमेरिकेतल्या एकूण गायींपैकी केवळ १०% गायी ह्या मोठ्या (१००० किंवा त्याहून अधिक गायी असणारे) फार्मस्‌वर होत्या. मोठ्या फार्मस्‌च्या वाढत जाणार्‍या संख्येमुळे २००२ साली, अमेरिकेतल्या एकूण गायींपैकी २९% गायी या अशा मोठ्या फार्मस्‌वर गेल्या होत्या; तर केवळ ५ वर्षात त्यांची संख्या आणखी वाढून २००७ साली ३६% गायी या अशा मोठ्या फार्मस्‌वर होत्या. या आकारमानाने मोठ्या मोठ्या होत जाणार्‍या डेअरी फार्म्समुळे आज अमेरिकेतल्या एकूण ५७,००० डेअरी फार्म्सपैकी केवळ १६,००० फार्म्स, एकूण दूध उत्पादनातील ८३% दूध उत्पादन करतात. बहुतेक लहान आणि मध्यम आकाराचे फार्मस्‌ अजून तरी कौटुंबिकच आहेत. आणि त्यांचे व्यवस्थापन जरी पिढ्यान पिढ्या घरच्याच मंडळींच्या हातात असले तरी आता त्यांना दूध काढण्यासाठी, जनावरांसाठी, चारा उगवण्यासाठी तसंच फार्मवरची इतर कामे करण्यासाठी अधिकाधिक पगारी किंवा दैनंदिन स्वरुपाची मदत (Hired help) लागू लागली आहे.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..