नवीन लेखन...

मोबाईलचे दुष्परिणाम : एक शालेय विरुद्ध खरा संवाद

बंडयाने परवा मला एक शालेय संवाद दाखवला. मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे त्याला आई सांगत असते असा एकूण मजेशीर विषय होता. एकूण विषय देतानाच कर्ता, कर्म आणि क्रियापद वापरून जे काही तयार होते ते खरे असते का, हे तपासण्याची शाळेला गरज वाटली नसावी. असो, तर आपण शालेय संवादाकडे वळू.

शालेय संवाद :

मुलगा : आई मी थोडा वेळ तुझा मोबाईल घेऊ का? (एवढी आज्ञाधारक बालके असतात का? एरव्ही अगदी सहा महिन्याचे बाळ जरी रडायला लागले तरी त्याला मोबाईल दाखवून गप्प करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.)
आई : नको बाळा. तू आत्ताच टीव्ही पाहिलास ना? आणि आता लगेच मोबाईल मागतोस. उद्या तुझी परीक्षा आहे. जा आणि अभ्यास कर.
मुलगा : आई, माझा अभ्यास झाला आहे. म्हणून मी टीव्ही पहात बसलो होतो. आता तो बंद केलाय म्हणून तुझा मोबाईल मागतोय. मुलगा त्याला मोबाईल का हवा आहे याचे लॉजिकही सांगून टाकतो.
आई : बाळा, मोबाईल जास्त वापरु नये. जास्त वापरला तर त्याचे खूप सारे दुष्परिणाम असतात. एकतर डोळे खराब होतात आणि आता सारा अभ्यास केलाय तो विसरशील.
मुलगा : खरंच आई? (जसे ह्याला काही माहितच नाही! दुनियाभरातल्या खबरी ठेवणार्‍या या पोराने असा आव आणला की सीन पहायला मजा येतेे. लेकाचा हाच रोनाल्डोचा पीए असल्यासारखा त्याचे दिवसभराचे शेडयुल ह्याला माहित असते. तो किती वेळ प्रॅक्टिस करतो, त्याच्या गाडया किती आणि कोणकोणत्या आहेत वगैरे वगैरे. त्याला माहित असलेल्या गोष्टींचा आम्हांला ठावठिकाणा नसेल तर विचारायलाच नको. आम्हाला तो अक्षरश: वेडयातच काढतो.)

आणि आता खरा संवाद :

हा सुरु होण्याआधी बंडया गुपचूप बायकोचा मोबाईल घेऊन पसार झालेला असतो. त्याला मोबाईलसहित बसलेला पाहिला की माझ्या डोक्याची शीर उठते. म्हणूने तो माझ्या नजरेस पडू नये अशा ठिकाणी बसलेला असतो. मी हॉलमध्ये असेन तर तो बेडरुममध्ये आणि व्हाईस अ व्हर्सा. मग हिला फोनची आठवण झाली की ती फोनला न शोधता बंडयाला हाक मारते आणि “माझा मोबाईल जरा आण रे.” अशी आज्ञा सोडते. मालकाने आठवण काढल्यावर उचकी लागायचे फिचर मोबाईलमध्ये आणावे अशी माझी मोबाईल कंपन्याना कळकळीची विनंती आहे. ते आल्यास समस्त स्त्रीवर्गाला त्याचा खूप उपयोग होईल.
हिचा आवाज कानावर पडल्यावर मोबाईलचा टिक टिक असा अनेकवेळा प्रोगाम बंद करायचा आवाज आला की बंडया काय करत असेल याचा हिला बरोबर अंदाज येतो.
“काय करतोयस बंडया? पुन्हा माझ्या फोनला हात लावलास तर थोबाड फोडीन तुझं.”
“मग आता तुला फोन देऊ की नको?” बंडया दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. नको त्या वेळी शब्दांत पकडतो.
“आण इकडे आधी.”
त्याच्या हाातातून मोबाईल हिसकावून घेेतला जातो.
“उद्या पेपर आहे ना तुझा?”
“झालाय माझा अभ्यास.” आजकालची मुले स्वामी विवेकानंद की कोणाच्या (एकदा पुस्तकाचे पान वाचून झाल्यावर फाडून टाकणारे) वंशातली आहेत की काय, कळत नाही. मला तर जे कोण पुस्तकाची पाने फाडून टाकणारे होते, त्याबद्दल खरोखर शंका येते. पुन्हा काय वाचलंस म्हणून कोणी विचारू नयेत म्हणून तो सगळा खटाटोप असावा.
“जा पुन्हा एकदा वाच.”
“पण झालाय ना अभ्यास, पुन्हा काय वाचू?”
“जा मग, जेवढं वाचलं असशील तेवढं लिहून काढ.” बंडयाला लिखाणाचा प्रचंड कंटाळा आहे. म्हणून त्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला टयुशन टीचरही पाचवेळा लिहायला देतात.
“नाही मम्मे. मी आता लिहीत बसणार नाही. वाटल्यास एकदा नजरेखालून घालतो. का थोडा टीव्ही बघू?”
“त्या केबलवाल्याला सांगून तोडून टाकेन केबल. दिवसभर टीव्हीसमोर चिकटून बसलेला असतोस नुसता.”
“आता बसतो का अभ्यासाला? का येऊ आत?” असा मध्येच माझा आवाज आल्यावर बंडया थोडा बिथरतो.
“जा नाहीतर पप्पांनाच सांगेन अभ्यास घ्यायला.”
उगाचच मॅटर पप्पांकडे जायला नको म्हणून मग बंडया पुस्तक घेऊन कुठल्या जन्माचे भोग भोगतोय असा विचार करत वाचत बसतो.

©विजय माने, ठाणे

https://vijaymane.blog/

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..