नवीन लेखन...

मिडिया इंडस्ट्रीची हाक

फिल्म क्षेत्रात आपले कुणी नातलग असतील, काही वशिला असेल तरच आपला इथे शिरकाव होऊ शकतो हा फार मोठा गैरसमज आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. आपली प्रतिभा, आपल्या ओळखी आणि आपलं काम हेच महत्त्वाचं ! आपली आवड नक्की कशात आहे, ह्याची खात्री झाल्यानंतरच त्याविषयीचं शिक्षण घ्यावं हे बरं, त्यामुळे नैराश्य, धरसोडपणा उद्भवत नाही आणि आपण आपल्या आवडीच्या विषयातलं काम कितीही अडचणी आल्या तरी न थांबता पूर्णत्वाला नेऊ शकतो. कॉमर्स आणि आर्ट्स शाखेतील तरुण अधिक संख्येने मिडिया इंडस्ट्रीकडे वळताना दिसतात. एमबीएला इथे फायनान्स, मार्केटिंग ह्यांसारख्या क्षेत्रात वाव असतो, फिल्म, डॉक्युमेंटरी, फिक्शन, नॉन फिक्शन, वेगवेगळे टीव्ही शोज, रिअॅलिटी शोज, वेब सिरीज इत्यादी बरेच विभाग असतात. नेटवर सर्च करून आपल्याला कशात रस आहे, ते ठरवता येतं. ह्या सगळ्याच्या प्रॉडक्शन भागांत अनेक उपविभाग असतात. तिथे जबाबदारीने काम करू शकणाऱ्यांची गरज असते. लाईट लावण्यापासून तर ते ऑफ करीपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रोडक्शनभागाकडे असते. विसलिंग वूड्ससारखी संस्था उत्तम असली तरी सर्वांनाच फी परवडेल असं नसेल तर काही ऑन लाईन कोर्सेस असतात. मुंबईत केसी कॉलेज, ठाकूर आणि युपीजी कॉलेजमध्ये मिडिया इंडस्ट्रीविषयी पदवी-पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं. आपल्याला ह्या क्षेत्राची आवड असेल तर महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत असतानाच इथे पार्ट टाईम कामाची सुरुवात करावी. पदवीधर होईपर्यंत बरंच शिकायला मिळतं. खरं तर कॉलेजमध्ये जे आपल्या शिकायला मिळत नाही, ते इथे प्रत्यक्ष शिकायला मिळतं. अनुभवाची कमाई जेवढी करता येईल तेवढी करावी. क्षेत्रातील जेवढं शिकता येईल तेवढं शिकावं. त्या काळातली कमाई पॉकेटमनी म्हणून एखाद्याला पुरते. सुरुवातीला मानधनाची फार अपेक्षा करू नये. हा एक शिक्षणाचाच भाग असल्यामुळे इतर खर्च, संसार चालवणं वगैरे खर्च नसतात. अनुभव वाढत जातो, तसतशी मानधनातही वाढ होते. पदव्युत्तर प्रवेश केला तर मात्र आपल्यापेक्षा वयाने कमी असलेली मुलं अधिक अनुभवसंपन्न आणि आर्थिकदृष्ट्याही बऱ्यापैकी कमाई करताना दिसतील. चाळिशीनंतरही काही जण क्षेत्रबदल करून इकडे येताना दिसतात. पण त्यांच्या अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. ही नवी सुरुवात असल्याने आधीच्या मानाने मानधन कमी मिळतं. शरीर, बुद्धी ह्या दोन्हीची शक्ती तरुणांच्या मानाने कमी पडते. समाधानकारक काम होत नाही. म्हणून आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे, तो निर्णय घेणं, त्याच्या पूर्तीसाठी पाठपुरावा करणं हे फार महत्त्वाचं आहे. एवढंच नव्हे तर, पदवी आणि अनुभव घेतल्यानंतर पाच वर्षांनी आपण कुठे असू हा देखील विचार केला पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकत राहणं ही काळाची गरज सर्वच क्षेत्रांत आहे, हे लक्षात घेतलं तरच निभाव लागेल. मिडिया इंडस्ट्रीत दोन गोष्टी करता येतात. एक तर फ्री लान्स काम करू शकता किंवा एखाद्या बॅनरखाली काम करू शकता. कुठेही काम केलंत तरी कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचं बंधन पाळावंच लागतं. मात्र फ्री लान्समध्ये तुम्हांला कामाच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं आणि ते केलेलं काम आणि त्यातून मिळणारं श्रेय पूर्णपणे तुमच्या खात्यावर जमा होतं. ते तुमच्या भविष्यासाठी मोठं भांडवल ठरू शकतं. ह्या क्षेत्रात स्थैर्य नसतं, नियमित पगार नसतो, कामाच्या वेळा दिलेल्या असतात पण त्याहून अधिक वेळ काम करावं लागतं. हे खरं आहे. शूटिंगच्या वेळा शिफ्टमध्ये असतात त्यामुळे कुठल्या शिफ्टमध्ये तुम्हांला काम करावं लागेल, हे सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार शिफ्ट मागू शकत नाही. शिफ्ट १२ ते १२ असली तरी प्रत्यक्षात काम आठपासूनच सुरू होतं. तुम्ही कुठल्या कौटुंबिक किंवा सामाजिक स्तरातून आलात हे इथे महत्त्वाचं मानलं जात नाही. तुम्ही किती शिकलात, चुकांमधून किती शिकता आणि किती क्षमतेने काम करता हेच पाहिलं जातं. इथे काम करताना लिंगभेद मानत नाहीत. फक्त काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण होण्याशी कर्तव्य असतं. घरी पोहचायला रात्री उशीर होत असेल, कामाच्या ठिकाणापासून घरापर्यंतचा प्रवास सोयीस्कर वाटत नसेल तर जवळपास पेईंग गेस्ट म्हणून राहता येतं. हल्ली टॅक्सीने घरच्यांना लोकेशन पाठवता येतं, ही एक चांगली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांना विश्वासात घेऊन आपल्या कामाचं स्वरूप, आपण कुणाबरोबर काम करतो आहोत, कुठे काम करतो आहोत, ह्याची पूर्ण कल्पना दिली पाहिजे. त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. पळसाला पानं तीन ह्या म्हणीप्रमाणे माणसं कुठल्याही क्षेत्रात सारख्याच स्वभावाची असतात. चांगली आणि वाईटही. आपण आपल्या तत्त्वांवर किती खंबीरपणे उभे राहू शकतो, ते आपल्यावर आहे. इथेही पाय होतात. पण नुसत्या पाटय होत नाहीत. त्यात आपण कोणतं पेय घ्यायचं, कुणाशी किती, कसं बोलायचं ही मर्यादा आपणच ओळखून वागलं पाहिजे. हे लोकांना कळलं की, त्यांना तुमच्याशी अंतर राखून वागणं त्यांना भाग पडतं. तुमच्या हातात नेहमीच पर्याय असतात, फक्त तुम्ही त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे.कोणाची हांजी हांजी करण्याची गरज नाही. तुमचं काम बोललं पाहिजे. तुमच्या कामाने लोकांना तुमच्याविषयी विश्वासार्हता वाटली पाहिजे. कधी कधी आपलेच लोक आपल्याविषयी गैरसमज पसरवून आपल्याला काम मिळणार नाही, ह्याची तजवीज करून ठेवतात. त्याबाबतीत सावध राहायला हवं. ही इंडस्ट्री जितकी गूढरम्य आहे तितकीच पारदर्शकसुद्धा आहे. इथल्या पदवीच्या आणि अनुभवाच्या जोरावर पुढचं शिक्षण घ्यायला ऐपत असणारे काही जण परदेशी जातात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की, तिकडे ही तुमची पूंजी शून्यवत् असते. मिडियातला तिकडचा विचार, तो ऐकणाऱ्या-पाहणाऱ्या वर्गाची मानसिकता आणि संस्कृती ही आपल्यापेक्षा भिन्न असते. टार्गेट ऑडिअन्स बदलतो, तेव्हा तुम्हांला सगळाच विचार मुळापासून करावा लागतो. इथे आपण इंग्रजीचे कितीही पापड असलो तरी तिकडच्या इंग्रजी ऐकण्या-बोलण्या-वाचण्याची परीक्षा आपल्याला रीतसर शिक्षण घेऊन इथेच द्यावी लागते. त्यातल्या आपल्या रिझल्टवर तिकडचा कॉलेजप्रवेश अवलंबून असतो. पार्टटाईम जॉब करून आपला तिथला खर्च भागवता येतो. पण उगाच चार मित्र जाताहेत म्हणून आपण जाण्याचं खूळ डोक्यात आणू नये, आपलं कुंपण ओळखून उडी घ्यावी हे चांगलं. दिवसेंदिवस मिडिया इंडस्ट्री ह्या क्षेत्राच्या कक्षा विकास पावत आहेत. कल्पक, कलावंत आणि कर्तबगार तरुणाईला हाकारत आहेत. तिला साद देण्यासाठी पाऊल उचलण्या आधी आपल्या आयुष्याचं गणित कसं सोडवायचं म्हणजे बेरीज-गुणाकार अधिकाधिक येईल, हे ज्याचं त्याने हिशोब करून ठरवावं. पण कुठेही गेलात तरी तुमच्यासमोरचा कॅन्व्हास कोरा असतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्र तुम्ही त्यावर किती उत्कृष्ट रीतीने काढणार आहात, ह्याचा विचार आधी झाला पाहिजे.

-सावनी रंगारे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..