नवीन लेखन...

माझी मा’लवणी’..

मालवणी माणसा ही अशीच रवतली,
फसली गेली तरी नाय म्हनतली,
हसणाऱ्याक रडयतली,
रडणार्‍याक हसवतली,
गुणगान करता करता
मधीच गाळीय घालतली..

कवितेच्या या ओळीचा कवी कोण ते माहित नाही मात्र या ओळीत मालवणी माणसाच्या स्वभावाच चपखल वर्णन आलेलं आहे..माझ्या अवीट गोडीच्या मालवणी भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, या भाषेत असलेला रांगडेपण किंवा सरळसोट सहजपणा. सहजपणे ओव्या गुणगुणाव्यात त्याच सहजतेने आमच्या मालवणीत बोलीत शिव्या, म्हणी येतात. शिवी आणि असभ्य शब्दांचं अस्तित्व हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो, तसा तो आमच्या मालवणीचीही आहे. शिव्या आणि असभ्य शब्दांवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. आमच्या सिंधुदुर्गात तर असभ्य समजली जाणारी ‘शिवी’, ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणाऱ्याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काही वाटत नाही. इथे प्रत्यक्ष बाप स्वत:च्या पोराला ‘रांडीच्या’ किंवा ‘भोसडीच्या’, अगदी त्याच्या आईसमोर बिनदिक्कत म्हणतो (आईही म्हणते अधे-मधे). येथे शब्दाचा अर्थ विचारात घेतला जात नाही, तर त्यामागील भावना पाहिली जाते. या शब्दांचा आमच्या मनातला अर्थ इंग्रजी ‘माय डियर’च्या जवळ जाणारा असतो..

व्यक्की जेवढी जवळची, तेवढी शिवी तिखट. मालवणीत शिवी हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. भांडणात दिल्या जाणऱ्या शिव्या त्याच किंवा तशाच असल्या, तरी ‘टोन’चा फरक असतो. शिव्यांच्या टोनवरुन प्रेम, लटका राग, सात्विक संताप किंवा भांडण चालू आहे हे हाडाच्या मालवण्याला लगेच कळतं, पण ऐकणाऱ्या बाहेरच्या एखाद्याला मात्र झीट येऊ शकते.

‘तुझ्या आवशीचो घोव’, ‘फटकेचो वाको इलो’, ‘भंगलो मेलो’, ‘खंय मराक गेल्लय’, ‘वशाड पडो मेल्याच्या त्वांडार’, हे तर खुपच सौम्य शब्दप्रयोग. परंतू काही शिव्यांचे उच्चार फारच अशिष्ट आहेतही ! उदा. ‘आंवझंवारो’, ‘मायझंया’ हे असेच काही शब्द. वय-नातं वैगेरेकडे न बघता कोणही कोणाला आणि कोणाच्याही समोर हे शब्द प्रसंगानुरुप बिनदिक्कत देत-घेत असतात. या शब्दांचा अर्थ घेतला जात नाही. आईसमोर लहान पोरंही भांडताना हे शब्द बिनधास्त उच्चारत असतात, तरी कुणालाच त्याचं काही वाटत नाही, एवढे हे शब्द मालवणी जिवनाचे अविभाज्य अंग बनले आहेत. शहरी सभ्यतेच्या कपड्यात गुंडाळलेल्या ऐकणाराच्या मात्र मेंदूला झिणझिण्या येऊ शकतात..!!

एका रांगडा सह्याद्री आणि दुसऱ्या कुशीत अथांग सागर घेऊन हयात घालवणाऱ्या आम्हा मालवणी माणसात आणि मालवणी भाषेत, सह्याद्रीचा रांगडेपणा आणि दर्याचा गूढ विक्षिप्तपणा पुरेपूर उतरला आहे आणि हे आमचं व्यवच्छेदक लक्षण आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी जाणत्याच्या लगेच लक्षात येतं. माणूस कुठला, हे ओळखण्याचं प्राथमिक साधन त्याची भाषा असते. ऐकणाराला शिवराळपणामुळे वरवर विचित्र वाटणारी भाषा आहे मात्र चविष्ट. खर तर हा शिवराळपणापेक्षा ‘चावट’पणा जास्त असतो आणि ‘चावट हा शब्द ‘चव’ या शब्दाचं एक रुप आहे आणि सह्याद्रीच्या रांगड्या मालवणीतला हा चवदारपणा, तिला तिच्या दुसऱ्या कुशीतल्या ‘लवणी’ दर्याने बहाल केला आहे असं म्हणता येईल. म्हणून तर आम्हाला आणि आमच्या भाषेला मा-‘लवणी’ असं नांव मिळालं असावं. ‘मिठा’चा हिन्दी अर्थ ‘गोड’ असा आहे, हे लक्षात घेतलं, तर मालवणी माणसातल्या आणि मालवणी भाषेतल्या गावरान ‘मिठाळ गोडव्या’चं रहस्य उलगडतं..

सह्याद्री आणि समुद्राच्या नैसर्गिक रोखठोकपणाचं वैशिष्ट्य लेवून मालवणी भाषा सजली आहे.निसर्ग नागडाच असतो आणि नैसर्गिक नागडेपणा हाच मालवणीचा अलंकार असल्याने, उगाच भाषीक अलंकार मालवणी वापरत नाही. नागडेपणा नैसर्गिक आणि म्हणून अस्सल असतो आणि कपडे काहीतरी लपवत असतात. मालवण्याला आणि त्याच्या भाषेला लपवा छपवी मंजूर नाही आणि म्हणूच हे मालवणीचं लक्षण मालवणीतल्या शिव्या, म्हणी-वाक्प्रचारांमधे स्पष्टपणे उतरलेलं दिसतं.

अशी आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. उगाच करंगळी वर करणार नाहीत, की दोन बोटं दाखवणार नाहीत. ‘अडचणीत देव मार्ग दाखवेल’ किंवा ‘शोधा म्हणजे सापडेल’ अशी भारदस्त वाक्य उच्चारण्यापेक्षा, मालवणी सरळ ‘चोळणो शिवतलो तो मुताक वाट ठेयतालो’ असं म्हणेल. जावयाचं वर्णन ‘जामातो दशम ग्रह:’ असं न म्हणता, सरळ ‘खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच’ असंच म्हणणार, वर ‘मायझंयाक खांद्यार बसयलो, तर कानात मुतता’ असंही म्हणून दाखवणार..शहरी सभ्यतेच्या निकषावर या अशिष्ट समजल्या जाणाऱ्या शब्दांचं मालवणी शब्दांचं एक वैशिष्ट म्हणजे, त्यांचा अर्थ ऐकणाराला थेट कळतो आणि बोलणाराला काय म्हणायचंय ते चटकन लक्षात येत..कुडाळकडच्या माझ्या एका मित्राची आई ‘विनाकारण कुठलीही गोष्ट होत नाही’ हे सांगण्यासाठी ‘बॉट घालून पॉट येयत, तर xx कित्याक व्हयो’ असं थेट सुनवायची. ‘काही केल्याशिवाय काही घडत नाही’ हे सभ्य भाषेतलं तत्वज्ञान ती अशा रांगड्या शब्दांत सांगायची की, ते कायमचं डोक्यात फिट्ट बसलं..!!

मालवणीत व्यवहारात जातीभेद नाही, मात्र बोलताना भटाला भटच म्हणणार आणि धनगराला धनगर. मराठ्याला मराठा आणि वाण्याला वाणीच म्हणणार. ह्यात कुणाचा अपमान करायची भावना नसते, तर हे उच्चार मालवणी माणसाच्या निरमळ सहजतेने आलेले असतात. बोलावणाऱ्याची प्रेम भावना ऐकणाऱ्या बरोबर कळते आणि म्हणून तर इथं ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे… आश्चर्य म्हणजे बोलण्यात जातीचा उल्लेख सहजपणे करणारा हाच मालवणी, व्यवहारात मात्र जातीभेद पाळत नाही, हे ही आम्हा मालवण्यांचं वैशिष्ट्य. ‘गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी?’ किंवा ‘कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी’ किंवा ‘चव नाय रव धनगरा पोटभर जेव’ किंवा अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो’ ह्या काही म्हणी वानगीदाखल सांगता येतील

नग्नतेत पावित्र्य असतं, तसं सभ्यतेच्या कपड्यात नसतं..मुळात कपड्यांचं प्रयोजनच काहीतरी गुप्त ठेवण्याचं आहे. मालवणी माणसाला लपवाछपवी मान्य नाही, तो त्याचा पिंड नाही आणि त्याच्या या स्वभावाचं प्रतिबिंब त्याच्या भाषेत, शिव्यांत, म्हणी-वाक्प्रचारात स्वच्छ पडलेलं दिसतं. हे त्याचं नागडेपण त्याच्या मानाच्या निरमळतेतून आलेलं असतं. कणकवलीचे ‘भालचंद्र महाराज’ आता ‘भालचंद्र महाराज’ म्हणून प्रसिद्ध असले तरी ते मालवणीत ‘नागडे बाबा’ म्हणूनच प्रसिद्ध होते. महाराज असले म्हणून काय झाल, ते नागडे असल्याने आम्ही त्यांना नागडेच म्हणणार असा सारा रोख ठोक व्यवहार.हे आम्हा मालवण्यांचं आणि आमच्या मालवणी भाषेच हे वैशिष्ट्य आहे.. पण आता मात्र शहरी करणाच्या नादात आणि इंग्रजीच्या आक्रमणात मालवणीतील हे वैशिष्ट्य नाहीस होईल कि काय अशी भीती वाटू लागली आहे. ही गोड बोली टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि यासाठी ती रोजच्या व्यवहारात सर्वांनी वापरली पाहिजे..’मालवणी बोली साहित्य संमेलना’च्या निमित्ताने हेच सांगावस वाटतं..!!

— नितीन साळुंखे
9321811091

मे महिन्यात कणकवलीत  झालेल्या ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलनाच्या निमित्ताने..

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..