नवीन लेखन...

मानवतेचे दूत

कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे-

१) वैद्यकीय / आरोग्य व्यवस्थेवरील आघात

२) अर्थचक्रावरील आघात

३) मानसिक स्तरावरील पडझड

सगळ्या अस्तित्वालाच जेव्हा आव्हान निर्माण झाले त्यावेळी असंख्य मानवतेचे दूत पुढे आले. निव्वळ शासन आणि प्रशासन यंत्रणेवर विसंबून न राहता अनेक हात पुढे आले -संस्था, व्यक्ती सर्व पातळ्यांवर जे कार्य उभे राहात आहे ते कौतुकाच्या पलीकडचे आहे.

औद्योगिक संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी जे कार्य आरंभले ते “सामाजिक उत्तरदायित्व” या संज्ञेच्या पल्याड जाऊन नोंदविले गेले पाहिजे.

बोरोसिल कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कोविड मुळे मृत्यू पावलेल्या चार कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहत असे घोषित केले आहे की कोविड मुळे मृत्यू पावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दोन वर्षांचा पगार देण्यात येईल आणि त्यांच्या पाल्यांचा पदवी पर्यंतचा शिक्षण खर्च उचलला जाईल. अर्थात ही पावले आघातांच्या मानाने दुय्यम पण कुटुंबियांना सावरायला कदाचित मदत करतील. ते पुढे म्हणतात – बोरोसिल कंपनीची खरी मालमत्ता म्हणजे आमची माणसे, जी कधीच कंपनीच्या ताळेबंदात प्रतिबिंबित होत नाहीत, पण त्यांचे हरप्रकारे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

नोएडा येथील भिलवारा कंपनीने असे ठरविले आहे की कोविड मुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या कुटुंबियांना पुढील दोन वर्षे दरमहा त्याच्या पगाराचा ५० टक्के हिस्सा (किमान २५०००/- रुपये) देईल, पुढील तीन वर्षांसाठी पाल्यांच्या शिक्षणासाठी दरमहा ५०००/- रुपये देईल, कुटुंबियांना तीन वर्षांसाठी आयुर्विम्याचे संरक्षण देईल आणि कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीस पात्रतेनुसार नोकरी देईल.

अमिटी विद्यापीठाच्या अध्यक्षांनी असे घोषित केले आहे की कोविड मुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला असेल त्यांचे उर्वरित शिक्षण शुल्क माफ केले जाईल.

सातारा येथील अल्फा लावल कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा आरोग्य विभागाला पीपीई कीट, मुखपट्ट्या, ग्लोव्हस, सॅनिटायझर्स, ग्लुकोमीटर्स असे साहित्य आणि उपकरणांची मदत केली आहे.

लुधियाना येथील वर्धमान स्टील कंपनीच्या वतीने रुग्णालयांना रोज १००० ऑक्सिजन सिलेंडर्स मोफत देण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी त्यांनी ३५ लाख सिलिंडर्सचे मोफत वाटप केले होते.

रेड क्रॉस ने स्पेन मधील माता अमृतानंदमयी प्रतिष्ठानला त्यांच्या कोविड काळातील मदतकार्याबद्दल नुकतेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. प्रतिष्ठानने २०२० साली कोविड काळात ४८०० स्थानिक कुटुंबियांना आपल्या स्वयंसेवकांमार्फत सर्व मूलभूत गरजेच्या सामुग्रीचे मोफत वाटप केले, या कार्याचा हा गौरव आहे.

बजाज अलियान्झ कंपनीने तीन योजना जाहीर केल्या आहेत- एक -१० लाख ते १ कोटी रू पर्यंत कुटुंबियांना २४ महिन्यांसाठी अर्थसहाय्य, दोन- दोन पाल्यांसाठी शैक्षणिक मदत (कमाल रक्कम) – प्रत्येकी रू २ लाख (पदवीपर्यंत अथवा २१ व्या वर्षापर्यंत),पूर्वी भरलेले शैक्षणिक शुल्क परतफेड केले जाईल, तीन -मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीसाठी पाच वर्षे आणि मुलांसाठी २ वर्षे मेडिक्लेम फायदे !

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने कोरोनाचे बळी ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पाच वर्षाचा पगार आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलण्याचे ठरविले आहे.

टाटा स्टील ने कोविडमुळे मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्ती वयापर्यंत (६० वर्षे) त्याचे वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला आहे, तसेच घर व वैद्यकीय सेवा अखंडित ठेवण्याचे ठरविले आहे. याखेरीज  पाल्यांचा भारतातील पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे.

एच आई एल (बिर्ला ग्रुपची कंपनी) ने असे जाहीर केले आहे की या संसर्गजन्य आजारामुळे जे कर्मचारी आपल्या प्राणांना मुकले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना/वारसांना सदर कर्मचाऱ्यांच्या मासिक मूळ वेतनाच्या ४० पट मदत दिली जाईल, वैद्यकीय विम्याची सवलत दोन वर्षांपर्यंत (पत्नी आणि अवलंबून असणाऱ्या वय वर्षे २५ आतील मुलांना) दिली जाईल आणि अनुकंपा तत्वावर पत्नीला पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल.

ही झाली व्यवसाय क्षेत्रातील काही प्रातिनिधिक उदाहरणे! व्यक्ती आणि सेवाभावी संस्थाही मानवतेचा वसा चालविण्यात मागे नाहीत.

इचलकरंजी येथील मुस्लिम समुदायाने ईद मधील खर्चाला फाटा देत कोरोना विरुद्ध च्या लढाईसाठी ३६ लाख रुपये उभे केले आणि शासकीय रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु केला.

सांगलीतील एका तरुणीच्या मनात आपणही दीन दुबळ्यांसाठी काहीतरी करावे, हा विचार घोळू लागला- आई पेट्रोल पंपावर व्यवस्थापक तर वडील रिक्षाचालक! हे सामान्य कुटुंब १०० जणांना स्वखर्चाने किमान एक वेळचे जेवण जाग्यावर पुरवीत आहे.

नांदेड येथील गुरुद्वार तख्ताने गेल्या पन्नास वर्षांमध्ये साठलेल्या सोन्याचा वापर करून रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या संस्था उभ्या करण्याचे योजिले आहे.

दिल्ली येथील श्री शिव दुर्गा मंदिर १ मेपासून कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना सकाळ-संध्याकाळ मोफत जेवण पुरवीत आहे,तसेच कोरोना रुग्णांना मोफत औषधे देत आहे. गुजरात मधील एका दाम्पत्याने आपल्या एकुलत्या एक मुलाचे कोरोनाने निधन झाल्यावर, १५ लक्ष रुपयांची मुदत ठेव मोडली आणि ते सध्या गृह विलीनीकरणात असलेल्या रुग्णांना भोजन देत आहेत. आपली कारही अँब्युलन्स म्हणून वापरण्याकरीता त्यांनी दान केली आहे.

सरकारवर सारं लादू नका, जे शक्य ते आपल्यालाच करायचे आहे असा संदेश देत काही कुटुंबे प्लास्मा दान करण्याचे, बाधितांना घरपोच जेवण देण्याचे आवाहन करीत आहेत. चंद्रपूर येथील एक डॉक्टर कोरोना रुग्णाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आकारलेले उपचाराचे सर्व पैसे परत करीत आहेत. आपली २२ लक्ष रुपये किमतीची कार विकून एका तरुणाने चक्क ऑक्सिजन सिलेंडर्स विकत घेतले आणि गरजूंना दिले.! मराठवाड्यात एका मंदिराने कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांसाठी मंदिरात सर्व सोयी सवलती मोफत पुरविल्या आहेत.

या जगण्यावर आणि जीवनावर विश्वास बसायला लागला आहे अशा सकारात्मक  बातम्यांनी.  “दिलासा” च्या माध्यमातून निष्णात मनोविकासतज्ज्ञ झालेली पडझड सावरायचा प्रयत्न करीत आहेत. ” प्रार्थना ” आणि “श्रद्धा ” (हेही दिवस जातील) ही या घडीची महत्वाची अस्त्रे बनलेली आहेत.

असे “अनाम” वीर जागोजागी योध्यांसारखे या लढ्यात सकारात्मकतेने पुढे आले आहेत आणि या संसर्गजन्य रोगावर मात करणारे दूत बनले आहेत. मानवतेची ही फुफ्फुसे आपल्याला जीवनदायी प्राणवायू पुरविण्यात सध्या गुंतली आहेत.

काल सकाळी भाजी घ्यायला गेलो तेव्हा दाटलेल्या गळ्याने भाजीविक्रेता म्हणाला- ” साहेब, तुम्ही आम्हांला गेले दीड वर्षे जगवित आहात.” मी म्हणालो- ” अहो, खरंतर या अवघड काळात तुम्ही आम्हाला सतत भाजी पुरवठा करून जगविले आहे. कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाहीत. मी आहे कारण तुम्ही आहात.”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..